केवळ अंधश्रद्धा विरोध आज पुरेसा नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या संदर्भात एकीकडे विवेकवादाच्या सखोल तात्त्विक चर्चा घडवणे निकडीचे झाले आहे. म्हणजे नव्या कार्यकर्त्यांना अंधश्रद्धाविरोधाच्या प्रयोगापलीकडे जाऊन इहवाद, विवेकवाद, धार्मिकतेच्या अतिरेकाविरोधी कोणत्या प्रकारचा व काय विचार करायचा ते अधिक स्पष्ट होईल. त्याचबरोबर तरूण– तरूणींना आकर्षित करणार्या नव्या भाषेत, नव्या साधनांनिशी विवेकवादी संवाद अनेकपटींनी वाढेल कसा, हे महत्त्वाचे.

काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. पुण्यासारख्या शहरातल्या एका प्रथितयश महाविद्यालयातल्या युवतींशी भारतीय लोकशाहीविषयी चर्चा सुरू होती. ‘मतभेद असले, तरी संवाद करणे थांबवता कामा नये,’ असे मी म्हणताच एक युवती उठून म्हणाली, ‘मॅडम, ते आपल्याकडे शक्यच नाही. आमचे वडील सुशिक्षित नोकरदार आहेत. त्यांचे विचार बर्यापैकी आधुनिक आहेत. आमच्या शिक्षणाला, नोकरी करण्याला त्यांचा पाठिंबा आहे. पण मुलींचे जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य हा विषय निघाल्यावर मात्र ते जणू तनमनाने जुन्या काळात जातात. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संवाद होऊच शकत नाही.’ घराबाहेर आधुनिक आणि घरात मध्ययुगीन हीच आपल्याकडच्या बहुतेक घरातील पुरुषांनी स्वत:ची आणि घरातील विशेषत: स्त्रियांची करून ठेवलेली गोची आहे. जात, पुरुषसत्ता, रूढी परंपरा या बेड्यांसह एकविसाव्या शतकात जगणार्या भारताचे हे विरोधाभासयुक्त चित्र आहे. त्यामुळे अंधश्रद्धा बाळगणे, अघोरी रूढी, परंपरांचे पालन करणे ह्यात केवळ खेड्यापाड्यातील निरक्षर ‘जनता’ नाही, तर न्यायाधीश, प्राध्यापक,पत्रकार, इंजिनियर, डॉक्टर, अगदी सॉफ्टवेअर तज्ज्ञांनाही काहीच गैर वाटत नाही.
भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळूनही सदुसष्ट वषंंर्ं झाली. परंतु ‘स्वतंत्र’ भारताची शोकांतिका ही, की आजही आर्थिक आणि सामाजिक पातळीवरील खरे स्वातंत्र्य समाजातील सर्व घटकांना कधी मिळणार, हा खरा प्रश्न आहे. आपल्या देशातले दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समूह, स्त्रिया, भटके-विमुक्त समाज तर अशा प्रकारच्या वैचारिक गुलामगिरीत आहेतच, परंतु बाकी समाजाची मानसिकताही वेगळी नाही. एकुणातच स्वतंत्रपणे विचार करणार्या, तो स्पष्टपणे मांडू शकणार्या अनेक व्यक्ती असणे, हे एक समाज म्हणून स्वप्नवत्च आहे.
समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून याची कारणमीमांसा केली असता, एक अतिशय गुंतागुंतीचा पट समोर येतो. या विश्लेषणात एक भाग ब्रिटीश कालखंडातल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक परिवर्तनामुळे ज्याप्रकारे अचानक व समाजमनाला धक्कादायक असे बदल घडले, त्याचा आहे. दुसर्या बाजूला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या सात दशकांमध्ये जातीसंस्थेने व धर्मसंस्थेने नवनवी रुपे धारण केली आहेत. लोकशाही राजकारणाने अनेक विरोधाभास पुढे आणले आहेत. त्याचबरोबर अलीकडच्या काळात जागतिकीकरणाने बदललेले समाजजीवनाचे पैलू हेही एक महत्त्वाचे कारण म्हणता येईल.
ज्या पाश्चात्त्य समाजातून विवेकवाद, तर्कावर निष्ठा, विज्ञानवाद हे नवे विचार आपल्या समाजातल्या विचारवंतांनी, राजकीय नेत्यांनी घेतले, त्या समाजांचा इतिहास वेगळा आहे. त्या समाजांची घडणही वेगळ्या प्रकारे झालेली आहे. युरोपातील मध्ययुगाला तमोयुगच म्हटले जाते. रूढींचा कर्मठपणा, धर्मसंस्थेचे नियंत्रण यामुळे परिवर्तनाची क्षमताच खुंटली होती. याच काळात पौर्वात्य समाजात निर्माण झालेले ज्ञान हे कमी महत्वाचे मानले जाऊन पूर्व-पश्चिमेतील ज्ञानाची देवाणघेवाणही थांबली होती. अशा परिस्थितीत काही शतके गेल्यानंतर हळूहळू युरोपात नवे ज्ञान मिळवण्याच्या लालसेने काही लोकांनी वैज्ञानिक प्रयोगांना सुरूवात केली. या प्रयोगशीलतेबद्दल त्यांना धर्मसंस्थेने शिक्षाही ठोठावली. कोपर्निकस, गॅलिलिओ यांना बायबलमधील ‘पृथ्वी कागदासारखी सपाट आहे’, या विचाराच्या विरूद्ध असे प्रयोग केल्याबद्दल शिक्षा झाली. रोमन कॅथॉलिक चर्च अशा शिक्षा ठोठावत असताना दुसरीकडे मात्र प्रोटेस्टंट धर्माचा प्रभाव असलेल्या देशात बदलांना अनुकूल वातावण होते. साहजिकच कुठे उघडपणे तर कुठे छुपेपणाने विचारात बदल झाले. हळूहळू ते कृतीच्या, प्रयोगाच्या पातळीवर उतरले व प्रस्थापित मतांना आव्हान दिले गेले. तर काही ठिकाणी चर्चच्या मुजोरीला विरोध म्हणून आपणच धर्म समजून घेतला पाहिजे, ही मागणी लोकांनी केली. परिणामस्वरुप साक्षरताप्रसार झाला.
याच कालखंडाला युरोपातील ज्ञानोदय व ज्ञानप्रसाराचे युग म्हणतात. युरोपातील विविध देशात ही प्रक्रिया मागे पुढे घडली. समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबरने युरोपच्या इतिहासाविषयी विचार मांडताना प्रोटेस्टंट धर्मातील केल्विन या संताचे विचार भांडवलशाहीच्या उदयाला कसे कारणीभूत ठरले, हे मांडले आहे. खूप कष्ट करा, सचोटीने वागा, दारु-जुगारापासून दूर रहा, अशी केल्विनची शिकवण होती. परंतु त्यासोबतच सचोटीने केलेल्या कामातच देव भेटतो, त्यामुळे सुट्या घेऊन धर्मापाठीमागे लागू नका, असेही त्याने सांगितले. यातून या पंथाच्या सदस्यांचे राहणीमान, आचरण सुधारले. पैसा गाठीशी आला आणि राहणी साधी असल्याने बचत होऊ लागली. हेच पुढच्या काळात ‘भांडवल’ म्हणून वापरले गेले.
ज्ञानोदयाच्याच काळात भांडवलशाही, राष्ट्रवाद या कल्पनाही विकसित झाल्या. मानव प्रजाती ही तर्काने वागणारी आणि म्हणूनच ती विकसित प्रजाती असा विचार मांडला गेला. यातूनच विवेकवादाची विचारसरणी पुढे आली. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय पातळीवर ती दोन-तीन शतके शब्दशः घुसळणीची होती. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीने मोठे मंथन घडवले. राजेशाहीकडून लोकशाहीकडे, सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे, धर्माकडून विवेकाकडे असा युरोपीय समाजांचा प्रवास झाला.
विवेकवादाचीच एक परिणती ‘मानव हाच संपूर्ण मानवजातीचा केंद्रबिंदू आहे,’ असे मानण्यात झाली. साहजिकच मानवाचे सुख हेच अत्युच्च ध्येय मानले गेले. मग मानवाच्या हितासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान निर्माण करण्यात आले. जल, जंगल, जमीन, खनिजे एवढेच नव्हे तर समग्र सृष्टी केवळ मानवासाठीच आहे, अशा प्रकारे विवेकवादाचं टोक ताणलं गेलं. त्या विचारांचाही अतिरेक होऊन कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या नावाखाली घातक औषधे, शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात आली. हे तंत्रज्ञान, ही शस्त्रे वापरून, नकाशाशास्त्राचे ज्ञान वापरून जगभर साम्राज्यवाद पसरवण्यात आला. हेच एकांगी विवेकवादी विचार ब्रिटीश सरकारच्या केवळ नफ्यातील वाढीसाठी वापरण्यात आले. तेव्हा विवेकवादी विचारांचेच एक फलित म्हणजे युरोपातील राष्ट्रांचा साम्राज्यवाद, हे विसरता कामा नये. त्या साम्राज्यवादातील टोकाची स्पर्धा ही संपूर्ण जगाला दोन महायुद्धांकडे घेऊन गेली. म्हणजेच मॅक्स वेबर म्हणतात त्याप्रमाणे, विवेकाचे, तर्कबुद्धीचे साधनवादी व गुणात्मक तर्कबुद्धी असे दोन प्रकार पडतात. त्यातील साधनशुचिता न मानता केलेली साध्यप्राप्ती भांडवली समाजासाठी आवश्यक ठरली असली, तरी संपूर्ण जगातील मानवजातीसाठी ती धोकादायक, हिंसक ठरू शकते, हे वारंवार दिसून आले आहेे.
मोठ्या प्रमाणात संहार, करोडोंचे मृत्यू, अनेक शहरे बेचिराख, नंतरच्या पुननिर्मितीसाठी अघोरी पद्धतीने सामान्य लोकांना काम करावे लागणे, लक्षावधी लोकांची स्थलांतरे हे सर्व बदल महायुद्धांमुळे घडले. या दोन महायुद्धांच्या अनुभवातून गेलेले युरोपातील समाज हे इतक्या मोठ्या प्रमाणात घुसळून निघाले, की तेथे सामाजिक पातळीवर मूलभूत बदल घडले. सामूहिक जीवनात भावनिकतेपेक्षा टोकाचा विवेकवाद, धार्मिकतेपेक्षा दैनंदिन जीवनातील निधर्मीवाद, पारंपरिकतेपेक्षा आधुनिकता असे ठळक परिवर्तन विसाव्या शतकाच्या मध्यापर्यन्त युरोपात घडून आले. आज दैनंदिन पातळीवर विचारांचे स्वातंत्र्य पाश्चात्त्य समाजात मोठ्या प्रमाणात आढळते. कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करणे हे वैयक्तिक व सामूहिक पातळीवर स्वागतार्ह मानले जाते. धर्म असो की धर्मचिन्हं असोत, राजा, राणी यांची वैयक्तिक आयुष्यं असोत किंवा एखादा राजकीय नेता याविषयीची कितीही चिकित्सा केली जाऊ शकते. कठोर टीका केली, तरी त्याच्या खुनाचा फतवा निघत नाही. लोकशाही ही त्या अर्थाने जीवनसरणी म्हणून मान्य झालेली आहे.
युरोपाच्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर भारतातील परिस्थिती पाहिली असता काय आढळते? एक तर युरोपात विवेकवादाकडे झालेला प्रवास ही अत्यंत दीर्घ सामाजिक प्रक्रिया होती. दुसरे म्हणजे त्या परिवर्तनाला राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक असे इतरही पैलू होते. तसेच अतिशय संहारक अशा महायुद्धांमुळे धर्म, पंथ, विशिष्ट मूल्ये यांची दैनंदिन जीवनावरची पकड सैल होत गेली. आता यांवर आधारित जुन्या समुदाय भावनेऐवजी एकेकट्या नागरिकत्व जपणार्या व्यक्तींचा तो समाज बनला आहे.
आजचे भारतीय वास्तव : सांस्कृतिक छिन्नमनस्कता आणि दांभिकता
ब्रिटीश भारतात येण्यापूर्वीचा समाज हा जात, पितृसत्ताक व्यवस्था आणि सरंजामी मूल्ये यांच्या जोखडाखालच्या खेड्यांचा समाज होता. अतिशय बंदिस्त असे नातेसंबंध, जातीबद्ध व्यवसाय, उतरंडीवर आधारित सर्व सामाजिक संबंध ही या समाजाची वैशिष्ट्ये होती. सरंजामी अर्थरचनेमुळे एकूणच सामाजिक बदलाचा वेग अत्यंत संथ होता. अशा संपूर्ण व्यवस्थेत ईस्ट इंडिया कंपनी, तैनाती फौज आणि प्रत्यक्ष ब्रिटिश वसाहतवादी राज्यव्यवस्था यांचा प्रवेश झाला. त्यामुळे अनेक पातळ्यांवर व अनेक प्रकारचे परिवर्तन सुरू झाले. यातील काही बदल सक्तीने घडले, तर काही युरोपीय तंत्रज्ञान, विचारसरणीच्या प्रभावाने घडून आले. आधुनिक युरोपीय धाटणीच्या शिक्षणाची सुरूवात झाली. त्याकाळी न्यायमूर्ती रानडे, टिळक-आगरकर, महात्मा फुले या सर्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळे स्त्री-शूद्र शिकू लागले. आगरकरांनी बुद्धीप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे सर्वप्रकारे प्रयत्न केले. महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माच्या विचारसरणीतून पारंपरिक धर्मकल्पनेपलीकडे जाऊन मानवतावाद आणि सार्वत्रिक नैतिकतेवर आधारित नव्या काळाला सुसंगत असा धर्मविचार मांडला. त्यांच्या नाटकातून आणि त्यांच्या इतर लेखनातून त्यांनी कुडमुडे ज्योतिषी, कर्मकांड यातील पाखंड लोकांपुढे आणले. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई यांनी त्यांच्या लिखाणातून, कार्यातून स्त्रीदास्याची परखड चिकित्सा केली आणि खळबळ उडवून दिली. महात्मा फुल्यांच्या शिष्या ताराबाई शिंदे आणि मुक्ता साळवे यांनी जात आणि पुरुषप्रधानतेच्या एकत्रित परिणामांमुळे स्त्रियांवर कोणती परिस्थिती ओढवते, ते वर्णिले. हे सारे विचार सामान्यांच्या अगदी कल्पनेच्यापलिकडचे होते. तरीही काही प्रमाणात ही परिस्थिती बदलायला हवी, अशी सहमती सुशिक्षित समाजात निर्माण झाली.
आधुनिक ब्रिटीश शिक्षणातून नवे विचार पसरू लागले. परंतु असे शिक्षण मिळू शकणारा वर्ग हा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय बव्हंशी पुरुष हाच होता. साहजिकच गावगाडा, घरदार यावर या बदलांचा अगदीच जुजबी परिणाम झाला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळेतो भारतातील केवळ मूठभर उच्चवर्णीय, उच्चवर्गीय मंडळींच्या जगण्यात बदल घडून आले. नवे व्यवसाय, नवे उद्योगधंदे, नोकर्या यात काही शिक्षित मंडळी सामावली गेली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहूमहाराज यांनी जातीसंस्था, गावगाडा या रहाटगाडग्यात अडकलेल्या समाजात ठामपणाने काही बदल घडवले. नवे कायदे आणले. शिक्षण प्रसारासाठी कडक धोरणे राबवली. परंतु त्यांचाही प्रभाव तात्पुरता राहिला. आज त्या प्रागतिक संस्थानांतील लोकांवरही दुर्दैवाने शाहूविचाराची फारशी छाप दिसून येत नाही.
आजही आपल्याकडे बुद्धीप्रामाण्यवाद, विवेकवाद रुजलेला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे खाजगी जीवन व सार्वजनिक जीवनाची संपूर्ण फारकत. आज भारताला जगात एक आधुनिक आर्थिक महासत्ता म्हणून उभे राहायचे आहे. परंतु त्याचवेळी भारतातील जवळजवळ 27% जनता दारिद्र्यरेषेखाली जगते. (ही सरकारी आकडेवारी आहे, म्हणजे खरा आकडा कितीतरी जास्त मोठा असू शकतो.) म्हणजे जिवंत राहाण्याची धडपड करण्यातच गरीब जनतेचेे अस्तित्त्व पणाला लागते. त्यातही सरकारच्या तथाकथित कल्याणकारी योजनाही या गरीब जनतेपर्यन्त पोचत नाहीत. साहजिकच जेमतेम साक्षरता, आरोग्यसुविधांचा अभाव, शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक कुपोषण ही बहुसंख्य सर्वसामान्यांची परिस्थिती आहे. एकूणच तीव्र आर्थिक, सामाजिक विषमता हे भारतातले खरे वास्तव आहे. त्याचवेळी सार्वजनिक जीवनात प्रगतीची कास धरणारे धुरीणही खाजगी जीवन मात्र जुन्याच पठडीने जगायला हवे, असे मानतात, व जगतातही. म्हणजे एकीकडे आधुनिक आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न तर दुसरीकडे पारंपरिक पठडीबद्ध सामाजिक परिवेश अशी विसंगत धडपड आपला समाज करतो आहे. भांडवली विकासाच्या रेट्याने कितीतरी बदल जाणता, अजाणता होत आहेत, परंतु आजही परंपरा टिकवण्याचीच भाषा केली जाते. विशेष म्हणजे यातील विसंगतीचे भानही धुरीणांना नाही.
सत्तरच्या दशकात जसजसे भारतीय साक्षर, सुशिक्षित होतील, किमान राहणीमान वाढेल तसतशी पाश्चात्त्य समाजाप्रमाणे आधुनिकता वाढेल आणि रूढींचा पगडा कमीकमी होत जाईल, अशी अपेक्षा होती. सर्वच राजकीय विचारसरणींचे अनुयायी साधेपणा, कर्मठपणा कमी करणे, सामाजिक सुधारणा करणे यावर बोलत असत. 1990च्या दशकात मात्र परिस्थिती आश्चर्यकारकपणे पालटली. राजकीय नेते, सामाजिक धुरीण सर्वांनीच या विषयांवर गुळणी धरलेली दिसते. उलट सण-समारंभ, रूढी-परंपरा यांचे मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवन झाले. भांडवलशाही बाजारात हिंदूंच्या लाखो देवता, अनेक व्रते, सण ही अनेक नव्या उत्पादनांसाठीची पर्वणीच ठरली. दरवर्षी नव्याने बाजारात येणार्या गुढीपाडव्याच्या तयार गुढ्या, वर्तमानपत्रातून घरोघरी टाकली जाणारी आरत्यांची, स्तोत्रांची पुस्तके, शाळा कॉलेजात दणक्यात साजरे होणारे सण हे एकीकडे आर्थिक विपन्नता तर दुसरीकडे उधळपट्टी, वाचनसंस्कृतीचे दारिद्र्य तर दुसरीकडे सांस्कृतिकतेच्या नावाखाली गणपतीपुढे होणार्या लावणीनृत्य स्पर्धा अशी विसंगती पुढे आणतात. ही सर्व विसंगती म्हणजे एकीकडे आर्थिक जागतिकीकरण व दुसरीकडे पारंपरिक सामाजिक जीवन अशी सांस्कृतिक छिन्नमनस्कताच आहे.
त्यातही या बहुसंख्यांकांवर आजही जातीसंस्था, पुरुषप्रधानता यांचा सखोल पगडा आहे. बाहेर फ्लेक्स, डीजे, कम्प्युटर, डीवीडी, मोटरसायकली, जीप्स हे सर्व वापरणारे आपल्या समाजातले बहुसंख्य घरात मात्र चपला काढून शिरावं इतक्या सहजपणे आधुनिक विचार सोडून जुनाट विचारांनिशी निर्णय घेतात. कुटुंबाविषयीचे सर्व निर्णय मात्र सरंजामशाही पद्धतीनेच घेतले जातात. लग्नकार्य, जन्मविधी, मृत्यूविषयीचे विधी, घरातील राहणी, खानपान या सर्व गोष्टी आजही मोठ्या प्रमाणात जातीच्या उतरंडीला बांधलेल्या आहेत. त्यातही सरंजामशाही मूल्यांनुसार प्रत्येक समूह कोणालातरी श्रेष्ठ, कोणालातरी कनिष्ठ मानण्यात धन्यता मानतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्न करणे, धूमधडाक्यात सण-समारंभ, विधी साजरे करणे याला आजही प्रतिष्ठा आहे. सामान्य माणूस त्यातच धन्यता मानतो. गणपती, गौरी, नवरात्र, दहीहंडी सार्वजनिक पातळीवर मोठ्या प्रमाणात साजरे करण्याला राजकारणी, नेते यांचा सक्रिय आशीर्वाद आहे. गल्लीतल्या छोट्या नेत्यांनाही ते हवे आहे. थोडक्यात लोकानुययी राजकारण, भांडवली बाजारपाठेचा विस्तार आणि सरंजामी मूल्यव्यवस्थेमुळे आजही सतत स्वत:ला वरचढ सिद्ध करण्याचा सोस या सर्व घटकांमुळे आजची परिस्थिती सहजपणे आणि झटकन बदलेल, असे वाटत ऩाही.
मात्र वाढत्या आत्महत्त्या, व्यसनाधीनता, स्थलांतरे या रूपाने भांडवली आधुनिकतेतील विसंगती आपल्या समोर येत आहेत. दैनंदिन जीवनात आधिकाधिक लोक आधुनिक जीवनसरणी स्वीकारत आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारित शेती तंत्रे, उत्पादनपद्धती याचा वापर, अंगिकार वाढत चालला आहे. उच्चवर्णियांच्या अरेरावीला प्रतिकार होऊ लागला आहे. या वातावरणाचा फायदा करून घ्यायला हवा.
आजवर अंनिसने गावोगाव जनजागृतीचे अथक प्रयत्न केले. त्यासाठी बहुजन समाजातील कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली. ज्याकाळात याविषयावर बोलणेदेखील तुच्छतेचे, अर्थशून्य मानले जाई, त्याकाळात अंनिसने अतिशय लक्षणीय कामगिरी केली, यात वादच नाही. मात्र आज अंधश्रद्धाविरोधी कायदा संमत झाल्यावर परिस्थिती पालटली आहे. या परिस्थितीचे योग्य आकलन करून घेणे आवश्यक आहे.
नवी साधने, नवे मार्ग
बदलत्या परिस्थितीनुसार आपले मार्गही बदलणे आवश्यक आहे. यासाठी काही नवी साधने अंगिकारावी लागतील. अंनिसअंतर्गत विचारविनिमयापासून ते व्यापक समाजिक हस्तक्षेपापर्यन्त कायकाय करता येईल,हे सुचवत आहे. त्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने मंथन घडवावे लागेल. अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहासाची मीमांसा, जगभरचे आंदोलनातील नवे प्रवाह या सर्व सूत्रांवरचे आकलन वाढवावे लागेल.
आज तरूणांंमध्ये विशेषत: महाविद्यालयीन तरूण-तरूणींमध्ये आधुनिक विचारसरणी, वैज्ञानिकता, व्यक्तीस्वातंत्र्य यावियी जिज्ञासा व उत्सुकता आहे. नव्या शिक्षणातून बहुजन समाज नव्या दृष्टीचा अंगिकार करेल व अज्ञानातून बाहेर पडून नवे सम्यक राजकारण उभारेल असा आशावाद महात्मा फुल्यांनी मांडला होता. याच आशावादाच्या बळावर गावोगाव तळमळीने नव्या विचारांचा, जनआंदोलनवादी विचारांचा प्रसार करणार्या तरूण-तरूणींकडून या कठीण परिस्थितीत मार्ग काढला जाईल, याची खात्री वाटते. परंतु याविषयी सामाजिक चळवळींमध्ये काम करणार्या जाणत्यांनी गंभीरपणे दीर्घ चर्चा घडवून आणायला हव्यात. त्यासाठी समविचारी परंतु वेगवेगळ्या आंदोलनात काम करणार्या कार्यकर्त्यांचा संच एकत्र यायला हवा.
भारतात साक्षरतेचा प्रसार झाला असला, तरी व्यक्ती म्हणून स्त्रीपुरुषांना आजही सन्मानाने जगता येत नाही. आपले शालेय शिक्षणही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा हक्क मुलांच्या मनावर ठसवत नाही. पूर्वापारपासूनच्या ‘गप्प बसा’ संस्कृतीचा पगडा महाविद्यालयात तरी खिळखिळा करायला हवा. खरे आत्मभान जागवणारे, मानवी प्रतिष्ठेच्या कल्पना स्पष्ट करणारे शिक्षण देण्यासाठी शिबिरे, कार्यशाळा आयोजित करणे महत्त्वाचे आहे.
दारिद्र्य, आरोग्यविषयक समस्या व अंधश्रद्धा यांचे अत्यंत जवळचे नाते आहे, हे आपण जाणतोच. दैन्य, दुर्बलता आणि दमन यांची साखळी तोडण्यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र यायला हवे. दारिद्र्य निर्मूलन, स्वाभिमान जागा होणे आणि निर्णय घेण्याची क्षमता यांचे फार जवळचे नाते आहे. ते समजून घेतले, तर विवेकवाद जवळचा वाटू शकतो. जातीच्या उतरंडीपलीकडे विचार करणार्या व्यक्ती व संघटनांचा परिचय महाविद्यालयीन जीवनात झाला, तर नवे आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास जागवता येईल. त्यासाठी गावपातळीवर अनेक प्रकारचे व अनेक पातळ्यांवर कार्यक्रम घ्यायला हवेत. एकीकडे कष्टकर्यांची आंदोलने उभारणार्यांसोबत आरोग्यविषयक शिबिरे, व्याख्याने, कार्यशाळा घेणे फारच गरजेचे आहे. त्यासोबतच स्थानिक पातळीवर आरोग्य, पतपुरवठा या सेवांचे जाळे कसे विणता येईल, याचा पर्यायी विचार उभारावा लागेल.
भक्ती संप्रदाय, सूफी पंथ, गांधीवाद, सार्वजनिक सत्यधर्म , आंबेडकरवाद, मार्क्सवाद अशा अनेक विचारप्रवाहातून अंधश्रद्धाविरोध होत आला आहे. या विचारसरणींमधील विचारधन एकत्रितपणे तरूणांपुढे आणायला हवे. अंधश्रद्धा ज्याप्रकारे भावनिक, मानसिक शोषण करतात आणि त्यातून ज्याप्रकारची गुलामगिरी वाढीस लागते, त्याचे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने केलेले विश्लेषण लोकांसमोर आणता येईल. महात्मा फुल्यांनी ‘तृतीय रत्न’ नाटकात अंधश्रद्धेतून गुलामगिरी कशी वाढते, ते मनोरंजनातून तरीही परखडपणे दाखवल्याचे उदाहरण आहेच. अलीकडे ‘सत्यशोधक’ आणि ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ यांसारख्या नाटकांतून प्रभावीपणे वैचारिक भूमिकाही मांडता येतात हे सिद्ध झालेले दिसते. वैचारिक पुस्तिका आणि नाटके, जलसे हे मार्ग एकत्रितपणे वापरता येतील. वारकरी संप्रदायातील अंधश्रद्धाविरोधी कायद्याला पाठिंबा देणार्या प्रवाहांशी संवाद वाढवायला हवा.
बुवाबाजीची अनेक प्रकारची प्रकरणे आजवर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी लोकांपुढे आणली. आता दैनंदिन आयुष्यातील इहवादाच्या चर्चेची गरज आहे. वर्षातून एकदा यात्रेला जाणे, पशुबळी देणे, मांत्रिक बोलावून तंत्रमंत्र करणे, विशिष्ट तिथीला जारणमारण विधी करणे ह्यावर जागृतीचे प्रयत्न झाले आहेत. परंतु दररोजच्या आयुष्यात प्रभाव असणार्या अविवेकी प्रथा, विधी यांच्याविषयीची चर्चा आता अतिशय मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
जातीप्रथेच्या प्रभावातून, जातपंचायतीच्या दडपणातून अनेक अघोरी प्रथांना विविध जातीतील स्त्री-पुरुष शरण जातात, हे वास्तव आपण जाणतो. परंतु आपण दुर्लक्ष केलेला यातील महत्त्वाचा पैलू सामूहिकतेची आस हा आहे. पुरोगामी सामाजिक आंदोलनांमध्ये अनेकदा याविषयीची संवेदनशीलता फारशी दिसत नाही. जातीचा प्रभाव कमी व्हायचा असेल, तर जाणीवपूर्वक जातीसमूहापलीकडचे वेगळे असे समुदायजीवन वाढायला हवे. निम्न आर्थिक गटातील स्त्रियांना असे पर्यायी समुदायजीवन जगण्याची संधी कितपत मिळते, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. म्हणून अशा संधी आपल्या संघटनांमार्फत उपलब्ध करून देता येतील. हे जाणीवपूर्वक करायला हवे.
जातीव्यवस्था, पुरुषसत्ताक व्यवस्था, मध्ययुगीन मूल्यव्यवस्था यांचा खोल प्रभाव आजही जनमानसावर आहे. या व्यवस्थांचा परिणाम म्हणून स्वतंत्र विचारांचा विकास होणेही दुरापास्त झाले आहे. स्वत्त्व विकसित न झालेल्या, दुबळ्या अशा व्यक्तीमत्त्वांचा समाज आहे. वैचारिक गुलामीत अडकलेल्या अधिकाधिक व्यक्तींना भावनिक पाठबळ पुरवणे ही त्यांच्या व्यक्तित्त्वविकासातील महत्त्वाची पायरी आहे.
थोडक्यात केवळ अंधश्रद्धा विरोध आज पुरेसा नाही. जागतिकीकरणाच्या आजच्या संदर्भात एकीकडे विवेकवादाच्या सखोल तात्त्विक चर्चा घडवणे निकडीचे झाले आहे. म्हणजे नव्या कार्यकर्त्यांना अंधश्रद्धाविरोधाच्या प्रयोगापलीकडे जाऊन इहवाद, विवेकवाद, धार्मिकतेच्या अतिरेकाविरोधी कोणत्या प्रकारचा व काय विचार करायचा ते अधिक स्पष्ट होईल. त्याचबरोबर तरूण- तरूणींना आकर्षित करणार्या नव्या भाषेत, नव्या साधनांनिशी विवेकवादी संवाद अनेकपटींनी वाढेल कसा, हे महत्त्वाचे. यापुढच्या काळात वारकरी संप्रदायापासून ते इतर समविचारी आंदोलनांपर्यन्त वर्तुळ विस्तारणे, शालेय विद्यार्थ्यांपासून ते ग्रामीण, शहरी तरूण-तरूणींपर्यन्त विवेकवादी विचार पोचवणे यातून एका सर्वंकष विवेकवादाचा प्रसार साधायला हवा.त्यातून भारतातील अपूर्ण राहिलेली विवेकवादी क्रांती पूर्णत्त्वाला नेता येईल.
-प्रा. श्रुती तांबे
लेखक संपर्क: 9890906849
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.)