डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे ज्यांच्यावर मनापासून प्रेम होते आणि ज्यांनी त्यांच्यावर मनापासून प्रेम केले अशा कार्यकर्ते मित्रांनो!
मंगळवारी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड, निर्घृण हल्ला करून त्यांची हत्या केली गेली. या रानटी कृत्याने आम्ही सर्व कुटुंबिय अत्यंत दुःखात आहोत. आमच्या दुःखात तुम्ही केवळ सहभागी आहात असे नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येकाला आमच्यासारखीच वेदना होत आहे व याची आम्हां सर्वांना जाणीव आहे. आपल्या या सहवेदनाबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत.
सातार्याच्या मातीत डॉक्टर वाढले, आणि मोठे झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू म्हणून त्यांनी शिवाजी उदय मंडळाचे आणि सातार्याचे नाव उज्ज्वल केले. आजही नरुभाऊबरोबर आम्ही मंडळात होतो. त्यांचा खेळ आम्ही पाहिला आहे, असे आनंदाने आणि अभिमानाने सांगणारी माणसे आम्हाला भेटत असतात.
एका क्षेत्रात उत्तम नाव कमवून आयुष्याच्या पुढील टप्प्यात अगदी वेगळ्याच क्षेत्रात त्याहून मोठे काम करून दाखविणार्या व्यक्ती अगदी विरळ असतात. खेळाडू म्हणून लोकांना आनंद या मर्यादेत कामापासून समाजातील वंचित, दलित, अज्ञानी लोकांच्या जीवनात आनंद घेण्याची क्षमता निर्माण करण्याच्या व्यापक कार्यात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
समाजाच्या वंचित, शोषित, दलित वर्गास सक्षम व क्रांतिकारक बनविणे हे मोठे काम आहे. या वर्गास जागृत करायचे असेल आणि त्यांना स्वतःला विचार करायला प्रेरित करायचे असेल तर या सर्वास जाणीवपूर्वक अंधश्रद्धात गुरफटवून त्यांनी दैववादी बनविण्या विरुद्ध लढा पुकारणे जरूर आहे. हे त्यांच्या लक्षात आले आणि गेल्या 25 वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य त्यांनी अधिक व्यापक केले. त्यांनी महाराष्ट्रात शाखा प्रसार केला आणि विकास केला याला आपण सर्व जण साक्षी आहात.
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर असे समीकरण निर्माण झाले. परंतु ते स्वतः याबाबत समाधानी नव्हते. किंबहुना कशाने तरी ‘निर्मूलन’ करणे हे ध्येय नव्हते. सर्व माणसे ‘विवेकी’ बनविता आली पाहिजेत. अशा ‘विवेकी’ माणसांचा समता, बंधुता आणि लोकशाहीवर आधारित समाज या महाराष्ट्रात आणि भारतात निर्माण करावा ही त्यांची इच्छा होती. ‘साधने’चे संपादक आणि ‘विवेकवाहिनी’मार्फत युवकांत त्यांनी केलेले कार्य ही त्यासाठीची धडपड होती. त्यांच्या या कार्याची प्रसिद्धी जास्त झाली नाही पण हेच कार्य त्यांना जास्त महत्त्वाचे होते.
समाजाला आणि त्यातही गरीब समाजाला ग्रासणारा एक मोठा शत्रू म्हणजे ‘व्यसन’. व्यसनविरोधी कार्य हे पुरेसे क्रांतिकारक समजले जात नाही. पण वैद्यकीय व्यवसाय केलेला असल्याने व्यसन माणसाला कसे ग्रासते आणि त्याला विवेकहीन पशू बनविते, लढण्याची, प्रगतीची आसच त्याच्या मनात निर्माण होऊ देत नाही. याची जाणीव त्यांना होती. तसेच व्यसन केवळ वैयक्तिक आजार नाही तर तो सार्या समाजाला ग्रासणारा कर्मरोग आहे आणि त्यामुळे व्यसनाविरोधी मोठे कार्य, विशेषतः मुलांना आणि तरुणांना या धोक्यापासून जागे करण्याचे कार्य त्यांनी केले तेही तितकेच महत्वाचे आहे.
‘विवेकी व्हा, चिकित्सा करा’ असे सांगणारी माणसे समाजातील एका मोठ्या, प्रस्थापित गटाला, नको असतात. असे विचार सांगणारा, त्यांचा प्रसार करणारा, तसे स्वतः वागणारा इतरांना तसे वागण्याची प्रेरणा देणारा आणि त्याआधारे संघटन करून समाजपरिवर्तन करू इच्छिणारा हा माणूस गेली कित्येक दशके प्रतिगामी शक्तींना खुपत होता. धमक्या, सभेत हुल्लडबाजी, प्रसंगी मारहाण हे त्यांनी आपल्या वाटेवरचा एक अपरिहार्य भाग म्हणून हसतमुखाने स्वीकारले होते. अशा गोष्टींबाबत ते आम्हा घरच्यांशीही क्वचितच बोलत आणि त्यांचे भांडवल तर त्यांनी कधीच केले नाही.
दुराग्रही, असहिष्णु कोत्या विचारांचे, मानवी जीवनाचे मूल्य न मानणारे, स्वार्थासाठी निर्घृण आणि निर्लज्जपणे वागणारे, धर्माच्या नावाखाली अधर्म पसरविणारे असे विषमय वातावरण आज महाराष्ट्रात भारतात आणि जगात वाढत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही केवळ एक वैयक्तिक बाब नाही तर या दुष्ट रानटी शक्तींनी समाजातील सर्व सुष्ट शक्तींना दिलेले खुले आव्हान आहे. या लढ्यात आणि सर्व जण आपला वाटा उचलू. प्रश्न केवळ ‘जादूटोणा विरोधी विधेयक’ संमत करण्याचा नाही. खरा प्रश्न सर्व समाजविघातक शक्तींचा सामना करण्याचा आहे.
आपण सर्व सूज्ञ, सहृदय, डॉक्टरांवर प्रेम करणारे आहात. आज आम्हा कुटुंबियांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी आहात. यापुढे आपण सर्वजण मिळून विवेकवादाचा आणि समाजसुधारणेचा त्यांचा वसा पुढे नेऊ या!