Categories
कार्याध्यक्षांची डायरी

दु:खात निर्मितीची, स्फूर्ती उफाळलेली…..

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कामाचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या धक्क्यातून अवघा महाराष्ट्र अजून पुरता सावरलेला नाही. सुरुवातीच्या भावनांचा आवेग जसजसा कमी होऊन आपण अंतर्मुख होऊन विचार करू लागतो, तसा डॉक्टर असतांना आपण सर्वार्थाने किती आश्वस्त होतो हे तीव्रतेने जाणवते. पण आज डॉक्टर आपल्यात नाहीत म्हणून खचून गेलेला, हतबल झालेला एकही कार्यकर्ता मला किंवा आपणा कोणालाही भेटलेला नाही. या उलट आपली जबाबदारी वाढली आहे आणि हे काम निर्धारपूर्वक अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटीबद्ध होऊ या! अशीच प्रत्येकाची भूमिका आणि भावना आहे. म्हणूनच गावोगावी उत्स्फूर्तपणे निघालेल्या निषेध फेर्‍या, मूकमोर्चेआणि शोकसभेत तरुणाईसह सर्वांची घोषणा होती- “मी दाभोलकर, तू दाभोलकर आम्ही सारे दाभोलकर॥”

डॉक्टरांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर कानाकोपर्‍यापर्यंत लोक रस्त्यावर आले. संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सातार्‍याच्या वाटेवर असतांना आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विचारवंत विविध वाहिन्यांवर प्रतिक्रिया देण्यात अथवा डॉक्टरांवर लेख लिहिण्यात गुंतलेले असतांना स्थानिक सामान्य कार्यकर्ते आणि नागरीकांनी सभा घेतल्या, फेर्‍या काढल्या. यातील अनेक ठिकाणी तर समितीची शाखा देखील नाही. कधीतरी त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयात अथवा वाडी वस्तीवर डॉक्टरांचे भाषण झालेले होते. त्या ठिकाणी देखील हे घडले. हा जसा डॉक्टरांच्या विचारांचा प्रभाव होता तसा तो डॉक्टरांच्या कृतीशीलतेचा देखील प्रभाव होता. या सदिच्छा टिकविणे, वाढविणे, संघटीत करणे आणि ही निर्माण झालेली ऊर्जा विरून जाणार नाही तर वृद्धींगत होईल हे पहाणे यातच आपली खरी कसोटी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात सैरभैर होऊ नये.

अमुची सुखे निराळी, विश्वात बिंबलेली
दु:खात निर्मितीची, स्फूर्ती उफाळलेली

या मंगेश पाडगांवकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे आपले दु:ख आणि वेदना या आपली प्रेरणा बनल्या पाहिजेत . आपली ताकद बनली पाहिजे.

डॉक्टरांवरील हल्ला हा महाराष्ट्रातील विवेक शक्तीवरचा हल्ला आहे आणि डॉक्टरांचे बलीदान हे सहिष्णुतेसाठीचे बलीदान आहे.

समाजातील सज्जनशक्तीचा डॉक्टरांइतका कुशल संघटक या महाराष्ट्रात गेल्या पाव शतकात झाला नाही, पुढे होणे नाही असे म्हटले तर ते वावगे होऊ नये.

महाराष्ट्रातील राजकिय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांमध्ये डॉक्टरांना प्रचंड मान्यता होती. त्याचबरोबर व्यापक व्यवस्था परिवर्तनाच्या विविध आघाड्यांवरील नेतृत्त्वाला देखील डॉक्टर सोबत असण्याचा आधार होता. त्यामुळेच डॉक्टरांच्या जाण्याने पुरोगामी महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.

आपल्या सर्वांची आणि आपल्यासारख्या असंख्य लोकांची जडणघडण डॉक्टरांमुळे झाली. ती जशी डॉक्टरांची भाषणे, डॉक्टरांचे लेखन वाचून झाली. त्यापेक्षा देखील डॉक्टरांचा सहवास आणि त्यांच्या वर्तनातून अधिक झाली. सच्चेपणा आणि साधेपणा हा डॉक्टरांचा स्थायीभाव होता. त्यांच्या अनुकरणातूनच अंनिस संघटनेची देखील जडणघडण झाली.

डॉक्टर नेहमी म्हणायचे कोणत्याही स्वतंत्र प्रशिक्षणाशिवाय हे सारे कोठून आले? जसे-संघटनेचे कार्यकर्ते जसे बोलतात तसे वागण्याचा प्रयत्न करतात, ही प्रामाणिक माणसे आहेत अशीच समाजातील सर्वांची प्रतिक्रिया असते. संघटनेमध्ये कोठेही चुकून देखील ‘जात’ आली नाही. सर्व जाती, धर्माचे लोक संघटनेत आहेत. अंनिसच्या चळवळीतील जवळपास कोणीही व्यसन करीत नाही आणि सार्वजनिक ठिकाणी तर अजिबात करणे मान्य नाही.

अंनिसच्या चळवळीत पद, पैसा आणि प्रतिष्ठा याची कोणालाही लालसा नाही. आजपर्यंत संघटनेच्या राज्य पदाधिकारी निवडी या सर्वसहमतीने झाल्या. संघटनेची निर्णयप्रक्रिया लोकशाही पद्धतीने आणि आंदोलने सनदशीर, अहिंसक मार्गानेच होतात.

‘हे सारे कोठून आले?’ याचे खरे उत्तर- “डॉक्टर हे आपल्यामुळेच आले” हे आहे. डॉक्टरांनी दिलेला हा वसा आणि वारसा अधिक सघनपणे, अधिक निर्धारपूर्वक पुढे नेणे हीच डॉक्टरांना खरी आदरांजली ठरेल.

ज्या जादूटोणा विरोधी कायदा होणेसाठी डॉक्टरांनी जीवाचे रान केले आणि शेवटी जीवाचे बलिदान केले. तो कायदा आता होऊ घातला आहे. त्या कायद्याबाबतचे व्यापक प्रबोधन व त्याची उपयोगिता सिद्ध करणे हे देखील आपले काम आहे.

राष्ट्रार्थ वेचिती जे सर्वस्वही स्वत:चे
ते शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे

अविनाश पाटील