Categories
संपादकीय

जातपंचायती विरोधात एल्गार

ऑगस्ट - २०१३

अखेर जातपंचायतीच्या दडपशाहीच्या व जुलमाविरोधात एल्गार सुरू झाला. कारण घडले आंतरजातीय विवाह केलेल्या गर्भवती मुलीचा तिच्या पित्यानेच गळा आवळून केलेल्या खुनाचे.

सुरेश भटाच्या गझलमध्ये म्हटल्याप्रमाणे समाजाचे नियमन करणार्‍या ठेकेदारांनी विविध प्रकारचे ठेके घेतले… धर्मातील अनिष्ट प्रथांचे ठेके, वर्णव्यवस्थेचे ठेके तसेच जातपंचायतीचे ही ठेके. जातपंचायतीच्या तथाकथीत ठेकेदार पंचांनी आजपर्यंत किती जणांना वाळीत टाकले असेल, किती मुलींचा जीव यांच्या हुकुमामुळे गेला असेल याची कल्पनाच करवत नाही. गेल्या महिनाभरात जातपंचायतीच्या पंचांनी केलेल्या अंगावर शहारे आणणार्‍या अन्यायाच्या कथा प्रसारमाध्यमाद्वारे उजेडात आल्या. या अन्या अत्याचारांना वाचा फोडण्याची सुरवात केली नाशिकच्या आण्णा हिंगमिरे यांनी.

आण्णा हिंगमिरे हे भटक्या जोशी समाजातले. त्यांच्या प्रतिभा या सुशिक्षित मुलीने जैन युवकाशी विवाह केला म्हणून हिंगमिरेंना गेल्या दीड वर्षापासून जोशी जात पंचायतीच्या पंचांनी समाज बहिष्कृत केले. त्यांना जातीच्या समारंभात प्रवेश नाही. मूल व सुनांना अशा समारंभाला गेल्यावर हाकलून देण्यात आले.

जोशी समाजातील नाशिक येथील पित्याने आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या मुलीचा गळा आवळला व याची बातमी टी.व्ही.व वृत्तपत्रातून महाराष्ट्रभर झळकली. स्वयंसेवी संघटना पोलिसाकडे पोचल्या आणि आण्णा हिंगमिरे यांनी पहिली तक्रार पोलिसांकडे नोंदविली. त्यांच्या धैर्याचे कौतुक करायला हवे. परिणाम असा झाला की, अनेक पीडित कुटुंबे व स्त्रिया यांनी पोलिसांकडे आपल्या व्यथा मांडायला सुरवात केली.

औरंगाबादच्या दगडू गोरड यांना गेल्या आठ वर्षांपासून जातपंचायतीचा छळ सोसावा लागतोय. कारण त्यांच्या मुलीने जातीबाहेर लग्न केले. जातीत घेण्यासाठी त्यांना 51 हजाराचा दंड ठोठावला गेला. त्यातील बेचाळीस हजार भरले तरी बहिष्कार उठेना. पंचायतीच्या जाचामुळे अनेक मुलींची लग्ने अडून राहिलीत तर अनेक मुलींना फारकती घेणे सक्तीचे केलं गेलं. बीडची ललिता ही ‘युवाग्राम’ ह्या सामाजिक संस्थेची कार्यकर्ती. पण कुटुंबियांनी तिला या कार्यास मनाई केली व जातपंचायतीकडे तक्रार केली. पंचायतीने ती घराबाहेर पडली तर तिचे हातपाय तोडा असा आदेश दिला. तेव्हापासून ती जीव वाचवण्यासाठी एका गावातून दुसर्‍या गावात लपून रहाते आहे. अशा किती घटना सांगाव्या. सगळ्यात काही बाहेर आल्या नसतील. भूतकाळात कितीजणांना हा अन्याय सहन करावा लागला असेल!

पण अखेर अन्यायाला वाचा फुटली. नाशिकच्या जोशी समाजातील पंचांनी अन्यायाचा कहर केला आणि जातीच्या जाचाचे ठसठसणारे गळू अखेर फुटलेच. आण्णा हिंगमिरे यांच्याबरोबर इतर अनेक जण आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावले. प्रसारमाध्यमांनी त्यांना अधार दिला. पण पोलीस यंत्रणा व इतर अधिकारी यांना हलविण्यासाठी विविध संघटना पुढे सरसावल्या. त्यांनी नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढला. या मोर्च्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय महिला फेडरेशन, आयटक कामगार संघटना, छात्रभारती, मिश्रविवाह चळवळ व बहिष्कृत कुटुंबे सहभागी झाली. गृहखात्याने याची दखल घेऊन नाशिकमधील जातपंचायतीच्या सात पंचांना गजाआड केले. एल्गार सुरू झाला.

गेल्या हजार वर्षांच्या संतपरंपरेने जातीभेदाला विरोध केला. शिवाजी राजाने आपल्या सैन्यात सर्व जातीधर्मांना सामावून घेतले. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला पाठबळ दिले. महात्मा फुले, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, रमाबाई रानडे आणि इतर समाजसुधारकांनी जातीभेदाविरोधात कार्य केले. पण या कार्याने जातीची बंधने पूर्णपणे तुटली नाहीत याचे जातपंचायती हे आजचे वास्तव आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म व लिंग विषमता नाकारणारी घटना या देशाला दिली. पण या घटनेला आव्हान देणार्‍या अन्यायी संघटना किती चिवट आहेत याचे याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील जात पंचायती व उत्तरेकडील खाप पंचायती. पण आता एल्गार सुरू झालाय. त्यात अशा प्रतिगामी शक्ती नेस्तनाबूत होऊन समता व न्यायाचा विजय होईल. त्यासाठी हवी हा एल्गार पुढे नेण्याची जिद्द. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यात सहभाग घ्यावा. कृष्णा चांदगुडे व अंनिसचे नाशिकमधील कार्यकर्तेयांनी या एल्गारात सहभाग दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक!