दि.26 जून रोजी प्रमिलाचा वाढदिवस होता. आदल्या दिवशी भल्या पहाटे तिचे वडील तिच्या सासरच्या घरी गेले. प्रमिलाची आई आजारी असल्यामुळे भेटण्यासाठी प्रमिलाला त्यांनी सोबत घेतले. सोबत आणलेली रिक्षा दवाखान्याजवळ आल्यानंतर प्रमिलाच्या वडिलांनी रिक्षा चालकास दवाखान्यात पाठविले. आणि शांतपणे सोबत आणलेल्या दोरीने त्याने प्रमिलाचा गळा आवळला. जमलेल्या जमावाने प्रमिलास दवाखान्यात नेण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला पकडले परंतु ‘ती मेली नसेल तर पुन्हा मीच तिला मारेन’ असं तो गुर्मीने बोलत होता.
अंगावर काटा आणणारी व मन सुन्न करणारी ही घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली ती सुद्धा नाशिकमध्ये. जन्मदाता बापच आपल्या मुलीचा जीव घेतो असा काय गुन्हा प्रमिलाने केला होता? याचे मूळ जातीच्या खोट्या प्रतिष्ठेत दडलेले आहे. मूळची प्रमिला एकनाथ कुंभारकर ही तेवीस वर्षीय तरूणी. ती भटके जोशी समाजामधली. म्हैस पाळून त्यावर उपजीविका करणारा हा समाज. तिचे प्रेम जडलं ते दीपक काशिनाथ कांबळे ह्या तरूणावर. तो मातंग. मग नेहमी सारखंच झालं दोघांचं लग्न झालं परंतु छोट्या बाळाला जन्म देण्याअगोदरच तिचा बळी घेतला गेला.
ह्या घटनेची नाशिकमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी इतर समविचारी संघटनांना बरोबर घेऊन निषेध सभा घेतली. तिच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी केली. परंतु आरोपी पकडला असल्यामुळे पोलिसांच्या लेखी चौकशी संपली होती. भीतीमुळे प्रमिलाची आई कुठेतरी नातेवाईकांकडे अज्ञातवासात गेली तर दीपक कांबळे घर सोडून बेपत्ता झाले. आम्ही कार्यकर्त्यांनी चर्चा केली. प्रमिलाच्या वडिलांनी तिचा जीव लग्नानंतर दीड वर्षांनी का घेतला? बाळाला जन्म देण्यापूर्वीच तिला का संपविलं? आम्हाला या गोष्टींनी अस्वस्थ केलं होतं. डॉ.दाभोलकरांनी ह्या घटनेला अनुसरून जातीव्यवस्थेवर लेख लिहिला. तो घेऊन आम्ही दै.सकाळच्या कार्यालयात उत्तम कांबळे यांच्याकडे गेलो. त्यांचा चळवळीमधील लढा सर्वांना माहीत आहे. त्यांनी आमचा विचारांचा गुंता क्षणात सोडविला. प्रमिलाच्या बळीमागे जातपंचायत असावी अशी त्यांनी शंका व्यक्त केली. कारण भटके जोशी समाजाची नाशिकला जातपंचायत होत असते. महाराष्ट्रात ती सर्वात मोठी म्हणजे सर्वोच्च न्यायालयासारखी आहे. त्यांनी आम्हास त्याचा शोध घेण्यास सांगितले. याविषयी त्यांनी सप्तरंगमध्ये लिहिण्याची मी त्यांना विनंती केली.
दोन दिवसानंतर ‘प्रमिलाचा मृत्यू जात पंचायतीने घेतला असावा’ अशी मोठी बातमी दै.सकाळमध्ये छापून आली. डॉ.दाभोलकरांचा लेख दै.सकाळच्या सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून प्रबोधन होऊन हाताशी काहीतरी मिळेल ही शक्यता खरी ठरली. 3 जुलैला सायंकाळी कांबळे साहेबांचा मला फोन आला. आण्णा हिंगमिरे नावाचे भटके जोशी समाजाचा गृहस्थ बातमी वाचून सकाळच्या कार्यालयात आले होते. त्यांच्या मुलीने जैन समाजातील मुलाशी लग्न केल्यामुळे जातपंचायतीने त्यांना बहिष्कृत केले होते. दुसर्या दिवशी आम्ही नाशिक अंनिसचे कार्यकर्त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन गाठले. आण्णा हिंगमिरे यांनी रितसर तक्रार दाखल केली. इतकेच नव्हे तर जातीच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी प्रमिलाचा घेतला गेलेला बळी हा जातपंचायतीच्या सांगण्यामुळे झाला, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. पुरोगामी महाराष्ट्रात जातीतून बहिष्कृत केल्याची घटना क्षणभरात महाराष्ट्रभर पसरली.

आण्णा हिंगमिरे हे नाशिकच्या गंगापूर रोडला उच्चभ्रू परिसरात राहणारे. त्यांची मुलगी प्रतिभा हिचा विवाह गेल्या वर्षी 24 मेस जैन समाजातील प्रशांत छाजेड या युवकाशी नोंदणीपद्धतीने झाला. जोशी जात पंचायतीने त्या आंतरजातीय विवाहास विरोध करत हिंगमिरे कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकला. समाजातील सण-उत्सव, लग्न, जन्म-मृत्यू या ठिकाणी उपस्थित राहण्यास त्यांच्यावर बंदी लादली. निमंत्रणावरून एका नातेवाईकाच्या लग्नात हजर राहिल्यामुळे भर समारंभातून आण्णा हिंगमिरे यांना हाकलून देण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी कुणी संबंध ठेवल्यास 11 हजार रूपयांचा दंड करण्याचा फतवा निघाला. एका नातेवाईकाच्या अंत्ययात्रेस आण्णा हिंगमिरे यांना येऊ दिले नाही. त्यांच्या दुसर्या मुलीचं लग्न जातीतच झालं असलं तरी आण्णांना तिच्याशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला. एकंदरीत जातीतील सर्वांनी त्यांना वाळीत टाकलं. वर्षभर त्यांचं असं एकाकी जीवन त्यांना असह्य झालं. त्यातच प्रमिलाच्या मृत्यूच्या बातमीमुळे आण्णा संतापले, दै.सकाळची बातमी व डॉ.दाभोलकरांच्या लेखामुळे त्यांच्यात हिंमत आली. त्यांनी लढायचं ठरविलं. आम्ही सर्व नाशिककर कार्यकर्त्यांनी त्यांना पाठबळ दिलं.

गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जात पंचायतीचे पंच भास्कर रखमाजी शिंदे, शिवाजी रावजी कुंभारकर, रामनाथ बापू धुमाळ, लक्ष्मण शिलू शिंदे, भिमा गंगाधर धुमाळ, मधुकर भावराव कुंभारकर यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. त्यातील मधुकर कुंभारकर हे नाशिक महानगरपालिकेचे मनसेचे नगरसेवक रूची कुंभारकर यांचे वडील आहेत. ह्या सर्व जातपंचांना वाचविण्यासाठी भाजपाचे एक माजी महापौर दिवसभर पोलीस स्टेशनला तळ ठोकून होते. पोलिसांनी सुरवातीला मध्यस्थी करत नरमाईची भूमिका घेतली. पंचमंडळींच्या नातेवाईकांनी आण्णा हिंगमिरे यांना तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. परंतु त्यांची हिंमत पाहून नाशिकच्या त्याच समाजातील सहा व्यक्ती त्याच पंचाविरूद्ध तक्रार करण्यासाठी पुढे सरसावल्या. अंनिसचे कार्यकर्ते व माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यामुळे पोलिसांना तक्रार नोंदवावी लागली. पोलिसांनी भा.दं.वि.कलम 384, 385, 342, 115, 504, 506, 34 अन्वये गुन्हे दाखल केले. खरे तर पोलिसांनी 1949 चे वाळीत टाकण्यापासून प्रतिबंध कायदा व 1985 चा सामाजिक असमता कायदा अन्वये कारवाई करण्यास हवी होती. आम्ही तशी मागणी केली. त्या दिवशी दिवसभर आम्ही पोलीस स्टेशनलाच होतो, फिर्यादीपैकी रणजीत कुंभारकर यांनी आंतरजातीय विवाह केल्यामुळे त्याला जातपंचायतीने बहिष्कृत केले. आजीच्या अंतयात्रेत गेल्यामुळे 11 हजार रूपये दंड केला. मराठा समाजातील मालतीबाई गरड यांनी तीस वर्षांपूर्वी भटके जोशी समाजातील व्यक्तीशी लग्न केले म्हणून पतीच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार टाकला. त्यांच्या मुलांचे लग्न होऊ देत नाहीत. उत्तम शिंदे यांने मेहुणीचं लग्न गोंधळी जोशी समाजातील व राष्ट्रीय भटक्या आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांच्या भावकीत केलं म्हणून उत्तमला वाळीत टाकलं. त्याचा सख्खा भाऊ नायब तहसीलदार अकरा हजार रूपये दंड भरून पुन्हा समाजात आले परंतु उत्तम शिंदे स्वत:च्या आईलाही भेटू शकत नाही. बहिष्कृत व्यक्तीचे वडील मृत्यू झाले तरी मुलगा पंचाच्या आदेशाशिवाय मृतदेह उचलू शकत नाही, असं तुकाराम जाधव यांनी म्हटले.

ह्या घटनेने महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. गृहमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांनीसुद्धा ह्या घटनेची दखल घेतली. दूरचित्रवाणीच्या सर्वच वाहिन्यांनी तीन-चार दिवस हा विषय लावून धरला. त्यावर चर्चा घडवून आणल्या. राज्यभरातील सर्वच वृत्तपत्रांनी जातपंचावर अग्रलेख लिहून टीका केली. दै.सकाळने तीन चार दिवस ‘एल्गार’ नावाने पानभर सदर चालू ठेवलं. आरोपींना योग्य ते कलम लावावे व ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी अंनिसने पुढाकार घेऊन व समविचारी संघटनांना बरोबर घेत निषेध मोर्चाचं नियोजन केलं. अवघ्या एका दिवसाच्या नियोजनानंतर लगेचच भव्य निषेध मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला. वाळीत टाकल्यामुळे एकाच शहरात राहुनही आण्णा हिंगमिरे व त्यांची मुलगी प्रतिभा वर्षभरापासून भेटू शकले नव्हते. आम्ही मोर्चा निघताना बाप-लेकीची गळाभेट घडवून आणली. त्यावेळी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तर इतर सर्वच भावनिक झाले. ‘जातीने तोडलं-जनआंदोलनाने जोडलं’ अशी ब्रेकींग न्यूज चालू झाली.
भटके जोशी समाजातील अनेक लोक दबाव झुगारून मोर्चात सहभागी झाले, अंनिस बरोबरच छात्रभारती, मिश्र विवाह चळवळ, आयटक, समाजसेवा महाविद्यालय, राष्ट्र सेवा दल व नाशिककर जनता यामुळे हा निषेध मोर्चा यशस्वी झाला. मोर्चाचे आकर्षण हे सर्वांच्या पुढे चाललेले आण्णा हिंगमिरे, त्यांचे जावई, मुलगी प्रतिभा व तिचे महिनाभराचं छोटसं बाळ हे होतं. जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देऊन पुन्हा डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध सभेने मोर्चाची सांगता झाली. मोर्चामध्ये डॉ.दाभोलकर यांनी लिहिलेले दै.सकाळमधील लेखांचे तीन हजार पत्रके वाटण्यात आली.
दुसर्या दिवशी दै.सकाळच्या सप्तरंगमध्ये उत्तम कांबळे यांचा ‘कधी संपणार जात पंचायती?’ हा लेख सर्व आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाला. त्यात जातपंचायतीची सद्य:स्थितीविषयी माहीती कळविण्यासाठी माझे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. अनेकांनी जातीपंचायतीच्या जोखडात अडकल्याच्या व्यथा सांगितल्या. विशेष म्हणजे जातपंचायतीमुळे समाज बहिष्कृत करण्याच्या घटना केवळ भटक्या जमातीत नसून उच्चवर्णीय समजून घेणार्या श्रीगौड ब्राम्हण समाजातही आढळल्या. जातपंचायत अनेक समाजात होते परंतु त्यांच्या अन्यायाविरूद्ध बोलण्याची हिंमत कुणी करत नाही. किंबहुना तसं कुणी करू नये अशीच व्यवस्था जातपंचायत करून ठेवते. जातपंचायतीच्या अघोरी त्रासामुळे सर्वच स्तरातील कुटुंबे बळी पडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर, एका मोठ्या राजकीय पक्षाच्या शहरप्रमुख, नायब तहसीलदार, वनाधिकारी, लष्करातील मेजर, एक महानगरपालिकेच्या शिक्षणमंडळाचे सभापती, अनेक शिक्षक इत्यादींनी जातपंचायतीमुळे बहिष्कृत जीवनाच्या व्यथा सांगितल्या. एक जैन धर्मिय महिलेनेसुद्धा मंदिराच्या जागेच्या वादातून संघाने बहिष्कृत केल्याची व पोलीस केस मागे घेतल्यानंतर पुन्हा समाजात घेतल्याची कहाणी सांगितली. अकोले(जि.नगर) येथील रमेश बद्रीनाथ जाजू या माहेश्वरी समाजातील व्यक्तीला समाज वास्तुच्या वादामुळे त्यांच्या जातपंचायतीने बहिष्कृत केले होते. तसेच पुणे येथील काँग्रेस आयचे सरचिटणीस काका धर्मावत यांना श्रीगौड ब्राम्हण समाजाच्या जातपंचायतीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे बहिष्कृत केले होते. त्यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन ठाण्यात पंचांचाविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे जातपंचायतीच्या पंचांना अटक झाली. तसेच पुण्याच्या 85 वर्षीय डॉ.कुलकर्णी यांनी गंमतीदार किस्सा सांगितला. 1940 साली त्यांचे भाऊ मेजर गोपाल कुलकर्णी लिबीया देशात युद्धासाठी गेले. तेथून परत आल्यानंतर पुण्यात त्यांचं स्वागत होण्याऐवजी त्यांना समाजाने वाळीत टाकले. कारण त्यांनी समुद्रपार करून परदेशगमन केले होते आणि तसं करणं धर्माने निषीद्ध मानले आहे. त्यांचे वडील कणखर असल्यामुळे त्यांनी ते निभावून नेले. आंतरजातीय विवाहामुळे नातेवाईकांनी त्रास दिल्याची पन्नासच्यावर जोडप्यांनी व्यथा मांडली. जातपंचायतच नव्हे तर जातच संपली जावी असा प्रत्येकाचा सूर होता.
दरम्यान ह्याच पंचाविरूद्ध औरंगाबाद येथील गणेश धुमाळ यांनी, लातूर येथील शिवाजी जोशी यांनी व लासलगाव येथील मालतीबाई गरड यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. नाशिक न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर औरंगाबाद पोलीसांनी ताब्यात घेतलं. नाशिकची ही जातपंचायत सर्वोच्च असल्यामुळे व अनेक ठिकाणावरून त्यांच्याविरूद्ध तक्रार दाखल होत असल्यामुळे पंचमंडळींची वेगवेगळ्या शहरांच्या पोलीस ठाण्यात सफर चालू आहे.
महाराष्ट्र अंनिसने जातपंचायतीविरूद्ध एल्गार सुरू केला आहे. त्यासाठी ‘जातपंचायत मूठमाती परिषद’ महाराष्ट्राच्या विविध भागात घेण्यात येणार आहे. ह्या प्रबोधन सप्ताहाची सुरवात क्रांतीदिनी नाशिक येथून होऊन समारोप स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला लातूर येथे होईल. ह्या परिषदेत जातपंचायतीमळे उद्धवस्त झालेली पीडित कुटुंबे आपल्या व्यथा मांडतील. सरकारी वकील आसिम सरोदे, नागनाथ कोतापल्ले, राष्ट्रीय भटक्या आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, उत्तम कांबळे, डॉ.नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील आदी विचारवंत ह्या परिषदेस उपस्थित राहतील. पुरोगामी महाराष्ट्रात परिवर्तनाचे विविध लढे झाले आहे. त्यात अंनिसने चालविलेल्या आणखी एका लढ्याची नोंद होईल.
या सर्व मोहिमेमध्ये अंनिस कार्यकर्ते महेंद्र दातरंगे, सुधीर धुमाळ, डॉ.सुदेश घोडेराव, व्ही.टी.जाधव, डॉ.टी.आर.गोराणे, आयटकचे राजीव देसले, प्रा.लक्ष्मीकांत कावळे, मिश्र विवाह चळवळीचे जितेंद्र भावे, छात्रभारतीचे अॅड.शरद कोकाटे, रा.से.दलाचे वसंत हुदलीकर आदी सामील होते.
–कृष्णा चांदगुडे