‘आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाकडून मुलाचा किंवा मुलीचा खून.’ अशा क्लेशदायक बातम्या आता सारख्या वाचायला, ऐकायला मिळतात. त्यातही प्रामुख्यानं मुलीचाच खून होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्या परंपरेत मुलगी म्हणजे कुटुंबाची इज्जत असते. प्रतिष्ठा असते. तिचं पाय वाकडं पडलं, की कुटुंबाचीच प्रतिष्ठा खलास होते म्हणून तिलाच खलास करण्याचा अधिक प्रयत्न होतो. तिचा बालविवाह करण्याचा प्रयत्न होतो आणि मुलगी नकोच म्हणून तिला गर्भाशयातच खलास करण्याचा प्रयत्न होतो. गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली. पळून जाऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आणि गरोदर अवस्थेत असलेल्या मुलीचा खून जन्मदात्या पित्यानंच गळा आवळून केला. मुलीचाही मृत्यू झाला आणि तिच्या पोटात वाढणार्या अंकुराचाही मृत्यू झाला. ह्या विषयावर शहरात खूप खळबळ उडाली. नेहमीच अशी खळबळ होते. ती व्हायलाही हवी; पण पुढं अल्पावधीतच खळबळ थांबते आणि पुन्हा अशा घटना घडायला लागतात.
ह्या मुलीच्या पित्याच्या कृत्यामागं जातपंचायतीची किती फूस आहे किंवा दबाव आहे, हे शोधण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.
आपल्या समाजव्यवस्थेत अनेक जातींमध्ये त्यांची त्यांची म्हणून जातपंचायत असते. अशा उत्तरेकडे खाप पंचायती असतात, तशा ह्या पंचायती आहेत. अजूनही काही भटक्या विमुक्त जाती आणि आदिवासींमध्येही अशा पंचायती अस्तित्वात आहेत. जिथं शिक्षणाचा प्रसार झाला आणि ज्या जाती स्थिरस्थावर झाल्या, मुख्य प्रवाहाच्या आसपास आल्या, तिथल्या पंचायती थोड्याफार प्रमाणात निष्प्रभ होत आहेत. मात्र, जिथं असं काहीच घडलेलं नाही, तिथं मात्र जातपंचायतीचा किंवा त्यांच्या पंचाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. जातीचं सर्व प्रकारचं नियंत्रण जातपंचायतीकडूनच केलं जातं. ह्या जातीचं आर्थिक, सामाजिक, वैवाहिक, शैक्षणिक जीवन पंचायतच नियंत्रित करत असते. पंचायत सर्वोच्च असते आणि तिच्या अधिकारांना कुणीच आव्हान देऊ शकत नाही. ह्या जातीचे कायदे पंच तयार करतात. तेच अंमलात आणतात. निवाडे तेच करतात शिक्षाही तेच देतात. लग्नासाठी मुलगी पाहायची असेल तरीही पंचानाच विश्वासात घ्यावा लागतं. काडीमोड असो, नामकरण असो, मयतानंतरचे विधी असोत, सारं सारं काही पंचांच्या देखरेखीखाली चालतं. वर्षानुवर्षं ह्या पंचायती टिकून आहेत. त्यातली पंचांची निवडही वंशपरंपरेनं होते. शहाणपण ज्ञान तपासून होत नाही. जातीतला कोणताही माणूस न्याय मागण्यासाठी पंचाकडेच धाव घेतो. पोलिसांत, कोर्टात जात नाही. तसं करणं हाही पंचाच्या दृष्टीनं गुन्हा होतो. त्याला मोठी शिक्षा होते. थोडक्यात म्हणजे ह्या काही जाती देशाचा कायदा, न्यायव्यवस्था, राज्यघटना, लोकशाही, हक्क, कर्तव्यं यासारख्या गोष्टींपासून दूर आहेत.
आपल्या देशात आठ हजारांहून अधिक जाती आहेत. अर्थात, हा आकडा अंदाजे आहे. जातींचा नेमका आकडा अजून कुणालाच सापडलेला नाही. जाती, पोटजाती, उपजातींची निर्मिती सतत सुरू असते. जुन्या जाती टिकून असतात. नव्यानं काही जन्माला येत असतात. जात जन्माला यायला कोणतंही कारण चालतं. आहार, विहार, वस्त्र, भाषा, व्यवसाय, स्थलांतर अशा अनेक कारणांतून जाती जन्माला येत असतात. 25-30 वर्षांपूर्वी मी भटक्या जातींचा अभ्यास करत होतो.(वाचा पुस्तक : भटक्यांचे लग्न, मनोविकास प्रकाशन, पुणे). 27 भटक्या जाती आणि 14 विमुक्त जाती अभ्यासात आल्या होत्या. ज्या काही जातींना गुन्हेगार म्हणून इंग्रजांनी तारांच्या कुंपणाआड डांबून ठेवलं होतं व नंतर त्यांना सोडून देण्यात आलं, त्या जाती झाल्या विमुक्त. पूर्वी त्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवलं जायचं. मातेच्या गर्भाशयातच गुन्हेगार असतो, ह्या न्यायानं 1871 मध्ये हा कायदा मायबाप इंग्रजांनी केला होता. जगाच्या पाठीवर कुठंही नसलेला जन्मजात गुन्हेगार ठरवणारा कायदा. असो, ह्या जातींचा अभ्यास करतांना त्यांच्या जातपंचायतीचाही प्रभाव लक्षात आला.
आपापली जात टिकवून ठेवण्यासाठी, तिचे रिती-रिवाज टिकवून ठेवण्यासाठी आणि विशेष म्हणजे जातीवरची आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पंचायतीनं चित्र-विचित्र कायदे केले होते. अमानुषपणे त्यांची अंमलबजावणी कायम ठेवली होती. एका जातीत पत्नी विकण्याची, ती गहाण ठेवण्याची किंवा ती सोडवून विकण्याची पुन्हा गहाण ठेवण्याची प्रथा होती. दुसर्या जातीत लग्नापूर्वी नवर्याचं प्रशिक्षण घेण्याची प्रथा होती. नवर्याचं वर्हाड उकिरड्यात उतरवण्याची प्रथा, लग्नाच्या दिवशीच नवरीच्या चारित्र्यशुद्धतेची प्रथा, लग्नाच्या वेळी कूळ-मूळ शोधण्याची प्रथा, कलंक धुऊन काढण्याची प्रथा, बायकोला शिवी दिल्यास नवर्याला दंड करण्याची प्रथा, अंत्यविधीनंतर लगेचच दारू पिण्याची, मांस खाण्याची प्रथा, विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्याला कडू ठरवण्याची प्रथा, घरात लाईट न वापरण्याची प्रथा, सायंकाळनंतर चूल न पेटवण्याची प्रथा, शिक्षा म्हणून अंगावरच्या कपड्यात जिवंत सरडा सोडण्याची प्रथा, उकळत्या तेलात हात घालण्याची प्रथा, कोरडे तांदूळ तोंडात ठेवून कडाकडा फोडण्याची प्रथा, बहिष्कृत केल्यानंतर उंबर्यावर नाल ठोकण्याची प्रथा, वाळीत टाकण्याची प्रथा अनेक जातींमध्ये पाळली जात असे. अजूनही ह्यातल्या काही प्रथा काही जातींत पाळल्या जातात.(वाचा : फिरस्ती, मनोविकास प्रकाशन, पुणे).
मुलीनं जातीबाहेर लग्न केल्यास, ती मेली, असं समजून तिच्या नावानं श्राद्ध घालायचीही प्रथा काही जातींमध्ये आहे. समाज एकीकडं प्रगत होत आहे आणि दुसरीकडं आपल्याला माहीत नसलेलं अंधारातलं एक जगही आहे. स्थिर समाजाचा आणि ह्या जगाचा फार संबंध येत नाही. अन्य समाजाप्रमाणेच ह्या जातींमध्येही लग्नसमारंभाला खूप महत्व आहे. त्यातही जातपंचायतीला तर खूपच महत्व आहे. लग्नाच्या वेळी वधू ठरवण्यापासून ते त्या कुटुंबाची कुळंमुळं शोधेपर्यंत सर्व कामं पंच करतात. आपली जात शुद्धच राहिली पाहिजे. भेसळ नाही झाली पाहिजे, ही धारणा त्यामागं असते. काही वेळेला शुद्ध-अशुद्धता शोधण्याचा कार्यक्रम आठ आठ दिवस चालतो. चालत चालत पार पाच पिढ्या मागं जातो. चुकून एखादा कलंक आढळला, की लग्नाची प्रक्रिया थांबते, कलंक साफ करण्याची प्रक्रिया सुरू होते. निवाड्यासाठी पंच बसतात. त्यास ‘जातपंचायत बसली’ असं मानलं जातं.
पंढरपूर, जेजुरी, बार्शी, अक्कलकोट, मिरज, सोलापूर, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातलं मढी, औरंगाबाद आदी काही गावं जातपंचायतीसाठी प्रसिद्ध आहेत. काही निवाडे वर्षानुवर्षं चालतात. कारण, काहीही असू शकतं, सुपार्या किती वाटाव्यात, हळद कोणत्या मुठीत धरावी, आजीचा सन्मान कसा करावा, आदी कोणतीही कारणं निवाड्यासाठी असतात आणि अर्थातच पंचांचा निर्णय अंतिम असतो. एकदा मला पंढरपुरात एक पंच भेटला. तो म्हणाला, ‘लग्नात मुलीकडच्या सुपार्या किती आणि मुलाकडच्या किती, ह्यावरून वाद झाला. पंचायत बसली तेव्हा एका पोरानं चिंचा खाऊन चिंचोके फेकले. त्याचं झाड उगवलं. त्याला चिंचा लागल्या. चिंचा खाणारा पंच झाला, तरी सुपार्यांचा वाद काही मिटलेला नाही.’
आंतरजातीय लग्न सर्वप्रथम पंचायत अमान्य करते. अशा लग्नामुळे आपली जात नीच होते, हायब्रीड होते, दुसर्या जातीचा अंकुर आपल्या जातीत वाढू लागतो, देवाच्या इच्छेविरूद्ध होतं, असं सांगत पंच लग्न फेटाळून लावतात. ज्या कुटुंबात असं घडलेलं असतं, त्या कुटुंबावर सर्वात मोठं शस्त्र उगारतात, ते म्हणजे कुटुंब वाळीत टाकण्याचं! बहिष्कृत करण्याचं! कुटुंब जातीपासून तोडण्याचं शस्त्र!! बहिष्कृत कुटुंबाला जातीशिवाय जगता येत नाही. कुणाच्याही सभा-समारंभात ते जाऊ शकत नाहीत किंवा जातीतलं कुणी त्यांच्याकडं जाऊ शकत नाही. हुक्कापाणी बंद, रोटीबेटी बंद, मयतीत येण्यास प्रतिबंध, लग्नात येण्यास प्रतिबंध, जातीवर सावली टाकण्यास प्रतिबंध… मुलीनं जातीबाहेर लग्न केलं असल्यास प्रश्न खूपच गंभीर बनतो. अशा मुलीला पुन्हा जातीत कधीच घेतलं जात नाही. तिनं जात भ्रष्ट केलेली असते. कलंकित केलेली असते. प्रथम तिच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून कुटुंबाला मुलीपासून तोडून घेण्यास सांगितलं जातं. अवाक्याबाहेरचा आर्थिक दंड होतो. दहा हजारांपासून लाखापर्यंत हा दंड असतो. कुटुंबाची आर्थिक क्षमता अधिक असेल तर दंड अधिक असतो. तो पंचाकडं भरायचा असतो. हिशेब मागायचा नसतो. काही पंच स्वत:च हे पैसे खातात, तर काही जण जातीसाठी मटण-दारूपाणी करतात. दंडाचा पैसा स्वत:च खाणारे पंच अधिक भेटतील. ह्या सर्वांतून सुटण्यासाठी कुटुंबाची घालमेल होते. घरातल्या पोरा-पोरींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण होतो. मयत झाली तर काय करायचं, असाही प्रश्न निर्माण होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे एकटं कसं जगायचं, हाही प्रश्न निर्माण होतो. बहिष्कार किती भयानक असतो, ह्या कहाण्या मंदा चंदन(जामखेड), सुषमा अंधारे(पुणे), लक्ष्मण गायकवाड(मुंबई), व्यंकप्पा भोसले(कोल्हापूर) आदींना जरूर विचाराव्यात. ह्यांच्यासह अनेकांनी जातपंचायतीविरूद्ध दीर्घकाळ लढाही दिला आहे. त्यांचं प्रबोधनही केलं आहे.
बहिष्कार सहन न झाल्यामुळे जातीबाहेर लग्न करणार्या आपल्या मुलां-मुलींना टोकाची शिक्षा करणारे अनेक पालक असतात. त्यात मरणाची शिक्षा असतेच. ज्यांच्यामुळे आपल्याला वाळीत टाकलं गेलं, त्याचाच शेवट झाला, तर जातीतलं आपलं जगणं सुसह्य होईल, अशी भावना असते. खापसारखी पंचायतं तर गाव गोळा करून स्वत:समोर एखाद्याला ठार करण्याची शिक्षा देते. राज्यघटनेसह सर्वोच्च न्यायालयालाही आव्हान देते. एखादा पालक बेभान होऊन आपल्या पाल्याची हत्या करीत असंल तर त्याला जातपंचायतही जबाबदार असते. कारण, तिनं अशा पालकांचं जगणंच जणू नाकारलेलं असतं. जातपंचायत जणू अंधारयात्रा आहे. तिच्यामुळे अनेक अमानवी घटना घडू शकतात. घडल्या आहेत. ‘ऑनर किलिंग’चा विचार करताना केवळ दृश्य पाहून चालणार नाही, तर दृश्यामागं असलेल्या घातक शक्ती कोणत्या, ह्याचाही विचार करावा लागतो. खून करणारा जातपंचायतीचं नाव घेत नाही. कारण, तो तुरूंगात गेल्यावर त्याची जात वाळीत टाकली जाते. त्याची त्याला भीती वाटते. जातीतले अन्य लोकही पंचाविरूद्ध पुढं येत नाहीत. कारण, त्यांनाही वाळीत पडण्याची भीती असते.
पोलीत तपासात आणि चळवळ करणार्यांच्या अजेंड्यावरही ह्या गोष्टी येत नाहीत. तात्पर्य, पंच सुरक्षित राहतात. त्यांच्या सत्तेला धोका पोचत नाही. आव्हान दिलं जात नाही. मला वाटतं, की ‘ऑनर किलिंग’मध्ये थेट खून करणारा जसा दोषी आहे, तसेच त्याला हे टोकाचं कृत्य करायला लावणारी व्यवस्थाही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे. वाईट एवढंच, की चोर उजेडात येतो, तो गजाआड जातो; पण चोर जन्माला घालणारी व्यवस्था तशीच सत्तेत लोळत राहते. तिला धक्का दिल्याशिवाय गुन्हेगारांचा जन्म कसा थांबेल, हा प्रश्न आहे. हे टाळायचं असंल तर पंचायतीत अडकलेल्या सर्वांना सर्वमान्य कोर्टाचे, कायद्याचे, राज्यघटनेचे दरवाजे सुलभरीत्या खुले केले पाहिजेत. जातपंचायतीबाहेरही न्याय मिळतो, ह्याची खात्री करून दिली पाहिजे. विशेष म्हणजे, पंचायत चालवणार्या अनेक जातींमधून मोठमोठे अधिकारी, पोलीस अधिकारी जन्माला आले आहेत; पण तरीही समाज पंचाकडेच का वळतो, हाही प्रश्न आहे. पोटासाठी अजूनही त्यांना भटकंतीच करावी लागते, स्थिर समाजात राहताच येत नाही, अशा सर्वांचं पुनर्वसन आणि रोजगाराच्या संधी ही सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. ती आपण उपलब्ध करणार का? प्राथमिक अवस्थेत भटक्यांसाठी फिरत्या शाळा, फिरते दवाखाने, फिरती न्यायालयं, फिरती पोलीस ठाणी स्थापन करता येतील का? ह्याचाही शहाण्या समाजानं आणि सरकारनं विचार केला पाहिजे. शिक्षण, प्रबोधन आणि आंदोलन ह्याचा वापर करून अनेकांनी आपापल्या जातीतल्या ह्या व्यवस्थेला धक्का जरूर दिला आहे. आता प्रश्न आहे, तो सर्वच जाती पंचांच्या मगरमिठीतून मुक्त करण्याचा….
–उत्तम कांबळे
‘दै.सकाळ’वरून साभार