Categories
भांडाफोड

‘कडुलिंबाच्या झाडातून दूध’ चमत्काराचा भांडाफोड

मार्च - २०११

वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथील कळंबे ले आऊट लगतच्या देशमुख यांच्या वाड्याजवळील परिसरातील कडूलिंबाच्या झाडातून दूध वाहत आहे व तो दैवी चमत्कार आहे असे समजून त्यांचा बाऊ करून अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रयत्न चालू होता. तेथीलच जागरूक नागरीक गजानन मारोतराव सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र अंनिसचे विदर्भ संपर्क प्रमुख यांना कळविल्यावरून घटनास्थळी जाऊन दूध निघण्याच्या चमत्काराचा भांडाफोड केला गेला.

            सविस्तर वृत्त असे की, दि.12 सप्टेंबर 2010 रोजी दुपारी 1 वाजता कडूलिंबाच्या झाडातून दूध निघत आहे असे सांगून तिथे पूजा-अर्चा करून व झाडाला हिरवे कापड बांधून स्थानिक परिसरातील काही युवकांनी अंधश्रद्धा पसरविण्यास सुरवात केली. लगेच महिलांची गर्दी वाढून परिसरात त्याचा प्रसार होऊन कानोकानी या चमत्काराची चर्चा होऊ लागली. गजानन सूर्यवंशी हे पण तिथे गेले; मात्र त्यांना शंका आल्याने त्यांनी दूरध्वनीवरून गजेंद्र सुरकार यांना कळविले. याच वेळी अं.नि.स.चे कार्यकर्ते पंकज वंजारे पण तेथे पोहचले. त्यांच्यासोबत स्थानिक दै.तरूण भारतचे जिल्हा वार्ताहर पण होते तोपर्यंत सुरकार यांनी हस्तक्षेप करून झाडावरील कापड दूर करून दूध निघण्याच्या जागेला खोरून दूध नसून तो पातळ पदार्थ आहे. त्याला निघण्यास जागा मिळत नव्हती म्हणून फोर्समुळे फेस रूपाने तो दिसत असल्यामुळे दुधासारखा पांढरा दिसत आहे. हा चमत्कार नसून झाडाचा निसर्ग नियम आहे. असे सांगून उपस्थितांचे प्रबोधन केले.

            यावेळी उपस्थित झालेल्या पंकज वंजारे यांनी शास्त्रीय कारणमिमांसा करून त्यामागील सत्य उपस्थितांना समजावून सांगितले. यामुळे एका चमत्काराचा भांडाफोड होऊन अंधश्रद्धा दूर करण्यास मदत झाली. साध्या भोळ्या श्रद्धावान लोकांना फसण्यापासून परावृत्त करण्यात आले.

गजेंद्र सुरकार, वर्धा