पोहंडूळ (जि.यवतमाळ) येथून बावीस किलोमीटर अंतरावर सिंदखेड पोलिस ठाण्याअंतर्गत मदनापूर करळगाव येथे एका भोंदू बाबाचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नांदेड जिल्हा कार्यकर्त्यांनी केला. सदर भोंदूबाबाचे नाव आनंद महाराज उर्फ भोळेशंकर उर्फ नागनाथ महाराज असे आहे. हा महाराज स्वत:ला भगवान शंकराचा अवतार समजत होता. व अंगात नागनाथ महाराज येतो व समाजातील दु:खितांचे दु:ख संकटे दूर करतो अशी बतावणी करून भोळ्या भाबड्या व पीडित लोकांकडून लुबाडणूक करून पैसे लुटत होता. या महाराजाने लोकांना लुटून मोठ्याप्रमाणात माया जमविल्याचा आरोपही लोकांनी केला आहे. गावातील सुज्ञ व अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणार्या कार्यकर्ते युवकांनी एकमत करून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांशी संपर्क साधून सापळा रचला व आनंद महाराज या भोंदूबाबास जेरबंद केले. सदर महाराज पोटाने सापासारखा घुसून काट्या-गोट्यातून सरपटत जात होता व स्वत:ला फार असामान्य अवतारी पुरूष समजत होता. प्राप्त माहितीवरून गावातील दुश्मनीचा फायदा घेऊन गिर्हाईक पटविण्याचे काम तो सफाईने करायचा असे मदनापूर येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.
-ज्योती डब्बावार, यवतमाळ