‘… मित्रहो, जगातील यच्चयावत विकसनशील राष्ट्रातल्या जनतेने आपल्या विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी विज्ञानाचे साहाय्य घेणे अनिवार्य आहे…. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे, सत्य आणि नवीन ज्ञानाचा शोध घेणे, वैज्ञानिक निकषांवर न टिकणार्या तत्त्वज्ञानाचा अस्वीकार करणे, नवीन पुराव्यांमुळे खोट्या ठरणार्या पारंपरिक जुन्या संकल्पना मोडीत काढणे, सत्य घटनांच्या आधारे जुन्या संकल्पनांमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि तार्किकदृष्ट्या सुसंगत अशा बुद्धिनिष्ठ विचारसरणीचा अवलंब करणे, हे आज आपल्या समाजाचे कर्तव्य ठरते. अशा विचारसरणीचा स्वीकार केल्यानंतर जीवनामध्ये, सामोरे जावे लागणार्या विविध समस्यांचे आपल्याला नक्कीच उत्तर सापडेल…’
आपल्या देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणातील हा उतारा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिनिष्ठ विचारसरणीचा अवलंब करण्याचे पंडितजींचे हे आवाहन सर्व क्षेत्रात स्वीकारले गेल्याने देशाच्या सर्वांगीण विकासाला योग्य दिशा लाभली. सन 1986 मध्ये राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना सुधारित शिक्षणविषयक राष्ट्रीय धोरण जाहीर झाले. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याकरता शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ स्वभाव घडविणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरून आज विविध संस्थांकडून अध्यात्माच्या नावाने साधकांना जे बौद्धिक डोस पाजले जात आहेत, ते सामाजिक प्रगतीला खरोखरच पोषक आहेत काय? याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
‘त्सुनामी लाटेच्या प्रसंगी तडाख्यापासून सुरक्षा मिळविण्यासाठी समुद्रकिनार्यांवर बैठक मारून विष्णूसहस्त्रनाम स्तोत्राची आवर्तने करा त्सुनामी निष्प्रभ होईल, एवढेच नव्हे तर ती पुन्हा केव्हाच येणार नाही.’ अशा शब्दांतून एका अध्यात्मिक संस्थेकडून ‘मौलिक मार्गदर्शन’ केले जाते. गंमत म्हणजे तिचे साधक दर्याकिनारी बैठक मारून या स्तोत्राच्या आवर्तनांचे घाण्यावर घाणे घालतात, ही चक्क बनवेगिरी आहे; कारण विष्णूसहस्त्रनामाच्या आवर्तनाचा त्सुनामी लाटेच्या तीव्रतेशी अथवा सौम्यपणाशी दुरान्वयानेदेखील संबंध पोहोचत नाही. याच सदरात समाविष्ट होणारी दुसरी एक तथाकथित अध्यात्मिक संस्था आहे. जनमानसामध्ये खोलवर रूजलेल्या भूतपिशाच्चादी संकल्पनांचा आधार घेऊन ही संस्था भाविक वृत्तीच्या भोळ्या भाबड्या साधकांच्या मनात सत्संगांच्या माध्यमातून भयगंड निर्माण करीत आहे. पिशाच्च योनी ही मानवाच्या सुपीक मेंदूतून निर्माण झालेली कपोलकल्पित अशी एक भ्रामक समजूत आहे. भूत, हडळ, ब्रह्मसमंध इत्यादी सर्व काल्पनिक निर्मितीला अस्तित्वाचा आधार नाही. ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झालेली गोष्ट आहे. भुताखेतांबद्दल लोकांच्या मनात भीती असते आणि ती संस्कारातून नवीन पिढीमध्ये संक्रमित होत असते. ही भीती दूर करण्याच्या दृष्टीने भूतयोनीला अस्तित्वाचा आधार नाही, हे लोकांना पटवून देणे गरजेचे आहे. तसे करणे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा एक भाग होय. प्रस्तुत संस्थेच्या सत्संगातून भूतपिशाच्चांचे चाळे, समंधाची बाधा, ब्रह्मराक्षसाची पीडा इत्यादी भ्रामक समजुतींचे समर्थन करणार्या भाकडकथांची रेलचेल असते. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही अप्रिय किंवा अहितकारक घटना घडल्यास या संस्थेचे अध्वर्यू त्याचा संबंध पूर्वजन्मातील पापांशी जोडून मोकळे होतात आणि या तथाकथित पापांच्या क्षालनार्थ कुलदेवतेचे नाव घेऊन जपमाळा ओढत बसण्याचा सल्ला देतात. जोडीला कैक अनुष्ठानांचे कर्मकांडही असते! त्यात सत्यनारायण, नागबळींच्या खर्चिक अनुष्ठानाचा प्रामुख्याने समावेश असतो.
या संस्थेच्या आध्यात्मिक मार्गदर्शनानुसार नारायण नागबळीचे अनुष्ठान त्र्यंबकेश्वर, गाणगापूर, गोकर्ण इत्यादी पुण्यक्षेत्री जाऊन करायचे असते. यातून भोळ्या भाविकांची दुहेरी हानी होते. एक तर जिचे मुळातच अस्तित्व नाही अशा भूत योनीच्या अस्तित्वाबद्दल माणसाला खात्री वाटू लागते. दुसरी गोष्ट म्हणजे कर्मसिद्धांताचे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे उपसिद्धांत स्वीकारले की मग कारणाच्या सिद्धांताशी दुरान्वयानेदेखील संबंध राहत नाही. चिकित्सक बुद्धी खुंटीला टांगून ठेवली जाते आणि मग आपण आपल्या कोणत्याही कौटुंबिक समस्येवर इलाज म्हणून जपमाळा ओढीत नारायण नागबळीचे अनुष्ठान करण्याच्या तयारीला लागतो. आजच्या उथळ अध्यात्माने भाविकांना बहाल केलेली ही अध्यात्म उपचारपद्धती आहे! तिचा अवलंब करणार्या भाविकांच्या अध्यात्मिक पातळीमध्ये किती प्रतिशत वाढ होते, हे त्या अध्यात्मिक संस्थेलाच ठाऊक! परंतु शुन्यापर्यंत आर्थिक पातळी पोहोचल्याने बिचार्यांची कौटुंबिक समस्यांना तोंड देता देता त्रेधातिरपीट उडून जाते, हे कटू सत्य आहे. वैज्ञानिक निकषांवर पुनर्जन्म अथवा पूर्वजन्माचे अस्तित्व सिद्ध झाले आहे काय? पूर्वजन्मी केलेल्या तथाकथित पापाची गणती कोणत्या मोजमापाने करता येते? महापापी, दुष्ट राक्षस म्हणून गणले गेलेल्या अजामिळ, अधासूर, व्रज इत्यादींचे पापक्षालन केवळ ईश्वराच्या नामस्मरणाने झाले, असे संतमंडळींनी सांगून ठेवले आहे. तर मग या सोप्या व बिनखर्चाच्या मार्गाचा अवलंब करण्याऐवजी आपल्याला पापक्षालनासाठी नागबळीचे खर्चिक अनुष्ठान करण्याचा सल्ला का दिला जातो? अशा प्रकारचे विवेकनिष्ठ सवाल जोपर्यंत आपण अध्यात्मिक गुरूंना विचारत नाही, तोपर्यंत आपले आर्थिक शोषण होतच राहणार यात शंका नाही.
वस्तुस्थिती ही आहे की, अशा प्रकारचे सवाल कोणीही साधक आपल्या गुरूला विचारत नाही आणि एखाद्या चिकित्सक वृत्तीच्या साधकाने हे सवाल विचारण्याचे धाडस केलेच तरीही त्याला समाधानकारक उत्तर मिळणार नाही. उलट आपण उघडे पडू या भीतीने गुरू क्रोधायमान होतील! भारतीय परंपरेतील थोर तपस्वी संतांनी क्रोधावर ताबा मिळविला होता. जनजागरणाचा हेतु मनात बाळगून हे सर्व संत काट्याकुट्यांतून पायी चालत, भोळ्या भाबड्या लोकांशी संपर्क साधायचे. याउलट धर्मरक्षणाचा बुक्का लावून आणि अध्यात्म साधनेची शाल पांघरून मिरवणार्या आधुनिक संताचे चित्र नेमके उलटे आहे. सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक चार चाकी वाहनाशिवाय यांचे पाऊल पुढे पडत नाही. नम्रतेची नावनिशाणी नाही. अहंकाराचा नाग फणा काढून जिज्ञासूंना डसायला सदैव सज्ज असतो. अशा प्रकारच्या संस्था अध्यात्माचा वापर केवळ गोरगरिबांना फसविण्यासाठी करतात. खेदाची गोष्ट ही की या बोगस संस्थांकडून फेकण्यात येणार्या जाळ्यात युवा पिढी गुरफटत चालली आहे, हे आजचे चित्र खेदजनक आहे. युवकांनी वेळीच सावध होऊन या संस्थांच्या अध्वर्यूंना आणि त्यांच्या दलालांना चार हात दूर ठेवणे श्रेयस्कर ठरेल.
– यज्ञेश्वर निगळे

प्रेम म्हणजे काय : सांगलीच्या डॉ.प्रदीप पाटील यांनी ‘प्रेम’ या विषयावर एक छान पुस्तक प्रसिद्ध केलंय. ‘प्रेम’ या विषयाकडे मानसशास्त्रज्ञ अधिक गंभीरपणे पाहू लागलेत. कारण? प्रेमामुळे नाती घडतात तशी बिघडतात. प्रेम जोडते तसे तोडते व संपवतेसुद्धा. एकतर्फी प्रेमाचा जो आविष्कार सध्या तरूणांमध्ये वाढताना दिसतोय तो तर पालकांना व समाजाला चिंतीत करतो आहे. ‘आकार फाऊंडेशन’ या मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्या संस्थेचे डॉ.प्रदीप पाटील हे संस्थापक आहेत. समुपदेशन व मानसोपचार या क्षेत्रात ते सध्या बहुमोल सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांना ‘प्रेम’ ह्या विषयावर लिहावेसे वाटले कारण साठी ओलांडलेल्या लोकांनासुद्धा प्रेम भावनेचे स्वरूप नीट कळलेले नसते असे त्यांचे निरीक्षण आहे. प्रेमाचा उगम कुठून होतो? तिला आणि त्याला काय हवे असते? सर्व वयातले प्रेम कसे असते? प्रेमविवाह करावा की न करावा? विवाहपूर्व आणि विवाहबाह्य प्रेमाचे स्वरूप कसे असते? प्रेमभंग, एकतर्फी प्रेम यांचे काय करावे? प्रेमाविषयी कायदा काय म्हणतो? वरील व अशाच इतर ‘प्रेम’ विषयक प्रश्नांचा उहापोह करणारे ‘प्रेम म्हणजे काय?’ हे पुस्तक तरूण, तरूणी व पालक यांच्या अनेक गैरसमजुती दूर करणारे आहेच पण संभ्रमाचे वेळी दिशादर्शक ठरणारे आहे. लेखक म्हणतात ‘प्रेम’ या विषयावरील हे पहिलेच पुस्तक आहे. प्रेम म्हटले की, बहुतेक जण नाक मुरडतात. पण सर्वांच्या जिव्हाळ्याच्या या विषयाचे स्वरूप धिटाईने समजावून घेण्यात शहाणपणा आहे. ही गरज हे पुस्तक नक्कीच भागवील. अंनिवा वाचकांसाठी हे पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. मोबा.: 9890844468
‘प्रेम म्हणजे काय?’
लेखक : डॉ.प्रदीप पाटील, प्रकाशक : आकार फाऊंडेशन, सांगली.
किंमत : 130 रू.