डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि त्यांचे अंधश्रद्धाविरोधी कार्य दिल्लीत अनेकांना ठाऊक आहे, याची जाणीव डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची बातमी वृत्तवाहिन्यांरून प्रसारित व्हायला सुरुवात झाली तेव्हा आली होती. सेवानिवृत्त ज्येष्ठ वृत्तनिवेदिका व स्तंभलेखिका माधुरी लिमये फोनवर बोलताना विलक्षण कासावीस झाल्या होत्या. ‘अहो, मी दाभोलकरांना कधी भेटले नाही. पण, माझं नात्याचं कोणी गेलय असंच वाटतं आहे,’ अशा त्यांच्या भावना होत्या.
दिल्लीतले प्रफुल्ल पाठक, आनंद बंग, टेकचंद सोनवणे असे एक ना अनेक जण त्या बातमीने मनातून हळहळले होते. मात्र, डॉ. दाभोलकर यांच्या अंधश्रद्धाविरोधी कार्याला राष्ट्रीय पातळीवर किती महत्वाचे स्थान होते, याचे दर्शन राज्यसभेत घडले आणि त्यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या आठवणींनी खिन्नतेच्या वाटा आणखी अंधारून आल्या.
आपल्या कार्याचे हे राष्ट्रस्तरीय मोल देश एकमुखाने मान्य करतो आहे हे पाहण्यासाठी डॉ. दाभोलकर यांना प्राणाचे मोल द्यावे लागले. आयुष्यभर व्रतस्थपणे वावरणार्या कार्यकर्त्यांचे जीव खरेच या देशात आणि विशेषतः पुरोगामी समजल्या जाणार्या महाराष्ट्रात सुरक्षित आहेत किंवा नाहीत हीच चर्चा मग नवी दिल्लीत सुरु झाली. यापैकी बहुतेकांचा डॉ. दाभोलकर यांच्याशी थेट परिचय होता, तर अनेकांचा नव्हता, तरीही आपण एक व्रतस्थ माणूस गमावला, अशीच भावना सर्वांच्या बोलण्यात मनापासून होती. त्यांच्यातल्या तळमळीचा तसेच व्रतस्थ कार्यकर्ता, सर्व जाती-धर्मातल्या अंधश्रद्धांच्या विरोधात एक तात्विक भूमिका घेऊन महाराष्ट्रात गेली 40 वर्षे अविरत लढत होता. ते एक अविचल कार्यकर्ता, संपादक, निष्कपट आणि निर्मळ माणूस होते. यावर बरेच लिहिले गेले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या नृशंस हत्येचा महाराष्ट्राने एकमुखी निषेध केला आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती नको, पण त्यांनी हाती घेतलेले अंधश्रध्दाविरोधी कार्य राष्ट्रीय पातळीवरही किती महत्वाचे होते याची जाणीव राज्यसभेने करून दिली; त्यातून या सर्वार्थाने लोकहिताचाच विचार करणार्या माणसाचे काम किती अनमोल होते हे जाणवते.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करताना काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी अत्यंत वास्तववादी तसेच धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली आणि चर्चेला वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवले. त्यांच्या या भूमिकेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला हेही आवर्जून नमूद करायला हवे. केवळ सनातन किंवा अभिनव भारत याच संस्थांचा कडव्या, धार्मिक, हिंस्त्र आणि देशविघातक उच्छाद मांडणार्या संघटना म्हणून उल्लेख केला नाही तर त्या यादीत इंडियन मुजाहिदीन आणि नक्षलवादी चळवळीचा समावेश करून या हिंस्त्र चळवळी देशासमोर कोणते आव्हान उभे करत आहेत आणि त्यातून कोणत्या धोकादायक वळणावर देश येऊन पोहोचला आहे याची जाणीव देशाला करून दिली. राजकीय विचार आणि मतभेद बाजूला ठेवून भाजप, लोकशाही जनशक्ती पार्टी, मार्क्सवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, अण्णा द्रमुक अशा विविध राजकीय पक्षाच्या सदस्यांना डॉ. दाभोलकर यांची हत्या हा देशाच्या सेक्युलर विचाराला कसा धोका आहे अशीच भूमिका घेतली. धार्मिक अंधश्रद्धा ही काही केवळ महाराष्ट्र या एका राज्याची समस्या नाही, तर तो देशासमोर आक्राळविक्राळ होऊन उभा ठाकलेला प्रश्न असून त्याचा समाजाला धोका कसा आहे हे मांडून डॉ. दाभोलकर यांच्या कार्याचे देशव्यापी स्वरूपच उलगडून ठेवले. डॉ. नरेंद्र दाभोलकर राज्यसभेचे सदस्य कधीच नव्हते आणि त्यांना ते मिळण्याची भविष्यात कधीही संधी नव्हती. पण देशाच्या सर्वोच्च सभागृहातील सदस्यांनी एकमुखाने डॉ. दाभोलकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली, ती सत्ताधारी पक्षाने मान्य करून डॉ. दाभोलकर यांच्या कार्याला मानाला मुजराच केला… भारतीय लोकशाहीचे हे प्रगल्भ आणि विशालपण अनुभवणे एकाचवेळी अंगावर रोमांच उभे कराणारे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमुळे दाटून आलेले गडद मळभ काहीसे दूर करणारे होते.
-प्रवीण बर्दापूरकर