Categories
अभिवादन

हा कायदा देशभर लागू करण्यासाठी प्रयत्न करू – खा.जनार्दन वाघमारे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

वैचारिक सुस्पष्टता, उत्कृष्ट संवाद कौशल्य, सर्वोत्कृष्ट संघटन कौशल्य अशा बुहविध गुणांचे डॉ.नरेंद्र दाभोलकर हे समाजमन बदलणारे सुधारक होते. त्यांची हत्या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी आहे. महाराष्ट्राच्या थोर वैचारिक परंपरेतील डॉ.दाभोलकर महत्वाचे शिलेदार होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलन कार्यासाठी वाहिले. त्यासाठी टोकाचा वैचारिक संघर्ष करावा लागला. विचारवंत आणि कृतीवंत अशा दोन्ही भूमिकेत डॉ.दाभोलकर परिपूर्ण होते. अंधश्रद्धेच्या जोखडात अडकलेल्या बहुजन समाजाला ज्ञानाची वहिवाट दाखवित त्यांनी राज्याच्या कानाकोपर्‍यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली. विचाराला संख्यात्मक कार्याची जोड देऊन विवेकवादाचा प्रचार आणि प्रसार केला. ते बुद्धीवादाचे पुरस्कर्ते होते. वैज्ञानिक दृष्टिकोन अडाणी माणसाच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे सहकार्य त्यांनी केले.

डॉ.दाभोलकर यांचे कार्य राज्य, देश नव्हे तर आंतरराष्ट्रीय किर्तीचे राहिले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद उराशी बाळगून संघर्ष करणारा, प्रसंगी बलिदान देणारा असा कार्यकर्ता होणे नाही. त्यांची दखल केवळ राज्यापुरती मर्यादित नाही. म्हणूनच भविष्यात हा कायदा देशभर लागू करण्यासाठी माझ्यासह सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

शब्दांकन : धर्मराज हल्लाळे