Categories
अभिवादन

धर्मांधांच्या या हल्ल्याचा खंबीर प्रतिकार केला पाहिजे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, जादूटोणाविरोधी विधेयकाचे जनक, ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक, ‘एक गाव एक पाणवठा’सारख्या सामाजिक न्यायाच्या चळवळीतील कार्यकर्ते, विज्ञान आणि विवेकावर आधारित मूल्यांचे खंदे पुरस्कर्ते आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे एक उत्तुंग नेते डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यात झालेल्या भ्याड आणि निर्घृण हत्येचा धिक्कार मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे करतो आणि केवळ त्यांच्या मारेकर्‍यांवरच नव्हे तर त्यांच्यामागील जातीय धर्मांध शक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.

गेल्या 15-20 वर्षांत वाढलेल्या धर्मांध शक्ती व त्यांच्याशी हातमिळवणी करीत त्यांना पाठीशी घालणारे शासन व सत्ताधारी पक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला जबाबदार आहेत. धर्मनिरपेक्षतेची टिमकी वाजविणार्‍या या सरकारने 1999 पासून गेली 14 वर्षे अंधश्रद्धाविरोधी किंवा त्याची मवाळ आवृत्ती असलेल्या जादूटोणाविरोधी-विधेयकाची ज्या प्रकारे विल्हेवाट लावली, ‘अंनिस’च्या कार्यक्रमांवर भोंदू धर्मांधांनी हल्ले केले तेव्हा या सरकारने ज्या प्रकारे सतत बोटचेपी भूमिका घेतली, त्यातूनच या प्रतिगामी शक्तींना बळ मिळाले व त्यांची मजल डॉ.दाभोलकरांचा खून करण्यापर्यंत गेली, हे उघड आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर सर्वच डाव्या, लोकशाही व धर्मनिरपेक्ष शक्तींना आपलेसे वाटत असत. महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी चळवळीत अथवा विधायक कार्यात त्यांचा सहभाग असे. मितभाषी, समंजस आणि लोकप्रिय असे व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. नरबळी, भानामती, भूतप्रेत, जादूटोणा, कर्मकांड आणि हे सर्व पसरवणारी बाबागिरी व बापूगिरी याविरूद्ध दाभोलकरांच्या नेतृत्वाखालील ‘अंनिस’ सातत्याने लढत राहिली. त्यामुळे धर्मांध आणि सनातनी विचारांच्या शक्तींनी पूर्वनियोजित कट करून दाभोलकरांचा अमानुष खून केला. सत्तरीच्या दशकात महाराष्ट्रात शिवसेनेच्या गुंडांनी कॉम्रेड कृष्णा देसाईंची केलेली हत्या आणि नथुराम गोडसे व त्याच्या सहकार्‍यांनी महात्मा गांधींची केलेली हत्या यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या.

अशा या असामान्य व तत्वनिष्ठ नेत्याच्या कुटुंबियांच्या व कार्यकर्त्यांच्या तीव्र दु:खात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहभागी होत आहे. त्याचबरोबर हत्येला ज्या शक्ती जबाबदार आहेत, त्यांच्याविरूद्ध लढण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अंनिसला पूर्णपणे सहकार्य करेल, अशी ग्वाही पक्षातर्फे मी देतो.

त्यासाठीच राज्यसभेत डॉ.दाभोलकरांना आदरांजली वाहण्याची मागणी आम्ही केली व सभापतींनी ती मान्य करून राज्यसभेत डॉ.दाभोलकरांच्या आदरांजलीचा ठराव मांडला व डॉ.दाभोलकरांना सर्व पक्षांतर्फे राज्यसभेत आदरांजली देण्यात आली. अशा पद्धतीने खासदार नसलेल्या व्यक्तीला आदरांजली वाहण्याची घटना राज्यसभेच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. यावरूनच डॉ.दाभोलकरांच्या निर्घृण खूनाच्या घटनेची देशाने घेतलेली गंभीर दखल अधोरेखित होत आहे.

–खा. सिताराम येचुरी