महाराष्ट्रात आणि देशात होणार्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत भविष्यवेत्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसारमाध्यमांद्वारे लोकांच्यासमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रद्धा निर्माण होतात, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणार्या अशा वृत्तींविरोधात ठाम भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले होते. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व खगोल अभ्यासक डॉ. नितीन शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र अंनिसतर्फे 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवून चमत्कार करणार्या आणि फलज्योतिष सांगणार्या बुवा-बाबांनी केलेल्या फसवणुकीविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र अंनिस) गेली अनेक वर्षेसातत्याने रचनात्मक संघर्ष करीत आली आहे. चमत्कार आणि फलज्योतिष यांच्यामधला फोलपणा महाराष्ट्र अंनिसने आपल्या शास्त्रीय मांडणीतून सिद्ध केला आहे. फलज्योतिष आणि बुवाबाजीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन समाजाचे आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी संघटनेने चमत्कार आणि फलज्योतिषाची वारंवार शास्त्रीय चिकित्सा केली आहे. या चिकित्सेमागे फलज्योतिषातील अवैज्ञानिक बाजू समाजासमोर यावी, असा प्रयत्न राहिलेला आहे.
2008 मध्ये महाराष्ट्र अंनिस, आयुका (Inter University Center for Astronomy and Astrophysics, Pune) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच संख्याशास्त्रीय निकषांनुसार ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याची अचूकता तपासण्यासाठी वैज्ञानिक चाचणी घडवून आणली होती. सदर चाचणीत एकाही भविष्यवेत्त्याला अचूक भविष्य नोंदवता आले नाही. तत्कालीन प्रथितयश ज्योतिषांनी तर या चाचणीकडे पाठ फिरवली होती. ज्योतिषाचा फोलपणा लक्षात यावा म्हणून 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही ही आव्हान प्रक्रिया राबवलेली होती; किंबहुना महाराष्ट्रातील स्वत:ला नामवंत म्हणवणार्या ज्योतिषांना ही आव्हान प्रक्रिया रजिस्टर पोस्टाने पाठवलेली होती; परंतु एकाही ज्योतिषाने महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान त्यावेळी स्वीकारले नव्हते.
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीही समितीमार्फत ही आव्हान प्रक्रिया लोकप्रबोधनाचा हेतू नजरेसमोर ठेवून राबवली जात आहे. जे ज्योतिषी या आव्हान प्रक्रियेत सहभागी होतील, त्यांना समितीमार्फत एक प्रश्नावली दिली जाईल. या प्रश्नावलीत एकूण पंचवीस प्रश्न असतील. लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणार्या जागा, निवडून येणार्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्त्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार, सर्वांत जास्त मताधिक्याने विजयी होणार्या उमेदवाराचे नाव, सर्वाधिक मताधिक्य मिळवणारी महिला उमेदवार, ‘नोटा’ पर्यायाचा सर्वाधिक वापर करणारा मतदारसंघ, अशा स्वरुपाचे प्रश्न प्रश्नावलीत असतील.
‘फलज्योतिष हे शास्त्र नाही; ते थोतांड आहे,’ ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणार्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे सातत्याने करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने दिलेले आव्हान ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याचा खरेपणा सिद्ध करण्याची नामी संधी मानून स्वीकारावे, असे जाहीर आवाहन आम्ही करीत आहोत.
या आव्हान प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेशिका, उत्तरासहित अधिकृत प्रश्नावली आणि ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’ या नावे काढलेला रुपये 1,000 (रुपये एक हजार) प्रवेश शुल्काचा धनाकर्ष (डी.डी.) सीलबंद पाकिटातून दि. 20 मे 2019 पर्यंत रजिस्टर पोस्टाने खालील पत्त्यावर मिळणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाने अधिकृतपणे सर्व निकाल त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत परीक्षक समितीच्या योग्य त्या तपासणीनंतर आव्हान प्रक्रियेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.
प्रवेशिका, प्रश्नावली आणि नियमावलीसाठी संपर्क व पत्ता :
–डॉ. नितीन शिंदे
‘कल्पतरू,’ कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजसमोर, इस्लामपूर,
ता. वाळवा, जि. सांगली (महाराष्ट्र) पिन कोड 415409.
मोबा. 9860438208
ईमेल : nsshinde66@gmail.com
आपले विनित
प्रकाश घाटपांडे
ज्योतिष विश्लेषक
डॉ. नितीन शिंदे
राज्य कार्यवाह
अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती