सांगली शहरापासून जवळच असलेल्या नांद्रे या गावातील दर्गा अघोरी उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या दर्ग्यातील अघोरी उपचारासंदर्भात सांगली अं.नि.स.ने विशेष मोहीम राबविली आहे. याच दर्ग्यामध्ये भाविकांसाठी नमाजपठणाचे काम करणारा मौलवी जमीर मुजावर(वय 25 वर्षे) याने धंद्यात बरकत मिळवून देणे, हातामध्ये पैसा टिकवून देतो अशा बाता मारून एका हातगाडीवाल्याला ठकविले व त्याच्या घरी धार्मिक पूजा करण्याच्या नावाखाली त्याच्या तरूण पत्नीवर बलात्कार केला. याबाबत अधिक माहिती या महिलेने दिलेल्या पोलीस तक्रारातून देत आहे. ही पीडित महिला आपल्या तक्रारीत म्हणते, “समक्ष पोलीस ठाण्यात हजर होऊन लिहून देते वर्दी जबाब की, मी वरील दिलेल्या पत्त्यावर कायमस्वरूपी राहणेस असून घरी मी, माझा नवरा, नणंद, चुलत दिर, माझी लहान मुलगी (वय 10 महिने) असे एकत्रित राहतो. माझा नवरा गवंडी काम करतो व सायंकाळी गावातील दर्गा चौकात चिकन 65 चा गाडा चालवतो. माझे शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झालेले आहे.
आमचे गावातील जमीर अहमद मुजावर वय अंदाजे 25 वर्षे हा गावातील दर्ग्यामध्ये लोकांसाठी नमाज पठणाचे काम करीत असतो. शनिवारी माझा नवरा हा रात्री घरी परत आला व त्याने मला सांगितले की, मौलाना जमीर मुजावर हा माझे चिकन 65 चे गाड्यावर आला व त्याने मला ‘धंदा कैसे क्या चल रहा है’ असे विचारले. त्यावेळी मी त्यास धंदा व्यवस्थित चालू आहे परंतु पैसे हातात राहत नाहीत असे सांगितलेने; त्यावर उपाय म्हणून तो उद्या घरी दुवा पढणेसाठी येणार आहे असे मला सांगितले.
दुसरे दिवशी वार रविवार सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मी घरातील कामे आवरत असताना मौलाना जमीर अहमद मुजावर हा आमचे घरी आला. आमचे राहते घर एका खोलीचे आहे. त्या खोलीत मी एक बेडशीट खाली जमीनीवर बसणेसाठी आंथरले होती. तो मौलाना जमीर अहमद मुजावर हा मांडी घालून बसला. त्याने एका मोठ्या वाटीत खोबरेल तेल मागितले. त्याने मला तसेच माझा नवरा, नणंद व दोन दीर यांना बाहेर जाण्यास सांगितले व एक एक जण आत या असे त्याने सांगितलेने, पहिल्यांदा माझा नवरा हा आत गेला तो 15 मिनिटांनी बाहेर आला. त्याने मौलानाने तुला आत बोलावले आहे असे सांगितलेने. मी आत गेले ती वेळ अंदाजे 12 वाजणेची होती. त्यावेळी त्याने खोलीचा दरवाजा हाताचा इशारा करून पुढे करण्यास सांगितला. त्याप्रमाणे मी दरवाजा पुढे करताना तो अर्धवट उघडा ठेवला. त्याने मला त्याचे समोर बसण्याचा इशारा केला. तो काहीतरी मंत्र म्हटल्यासारखे पुटपुटत होता. त्याने मला ‘डरने का नहीं डॉक्टर जैसा इलाज करता है, वैसे मै तेरा इलाज करता हूँ’ असे म्हणून त्याने मला उभा राहणेस सांगितले. मी उभी राहिल्यानंतर त्याने माझे भुवयावर तसेच डोकीत खोबरेल तेल लावले, त्यानंतर माझे गळ्यातील ओढणी वर करून दोन्ही हातांना तेल लावले, माझे गाऊनची नाडी सोडून माझे दोन्ही छातीवर तेल चोळले. तसेच माझे अंगावरील गाऊन वर करून माझे कंबरेस तसेच पाठीस तसेच दोन्ही मांड्यांना खोबरेल तेल लावले. त्यावेळी तो तोंडातील तोंडात काही तरी मंत्र पुटपुटत होता. अंगास तेल लावत असताना ‘झीजकने का नही, डरने का नही!’ असे तो मला सांगत होता. मौलाना जमीर मुजावर याने त्यावेळी माझेशी जबरीचा संभोग केला. संभोग झालेनंतर त्याने मला ’बाहर जा के हात पाव धोने का, मरद को कुछ नही बोलने का, तु किसी को कुछ बोली तो, तेरे बच्चे को खल्लास करूंगा!’ असे मला धमकावले होते. मी बाहेर आले त्यावेळी तो लगेच निघून गेला. मी थोड्या वेळाने माझ्या नवर्यास मौलाना जमीर मुजावर याने माझे सर्व अंगास तेल लावून बलात्कार केला असे सांगितले. माझा नवरा ताबडतोब त्याचे घराकडे गेला व त्याने मौलानास माझे घरी बोलावून आणले. मी मागील खोलीत रडत बसले होते. आमचे घरी माझे चुलत दीर, त्यांचे दोन दोस्त असे आले होते. मलाही समोर बोलावून घेतले. त्यावेळी मला काय प्रकार घडला ते विचारले. मी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी मौलाना जमीर मुजावर यास विचारले असता त्याने उर्दू भाषेत माफीनामा कबुलनामा लिहून दिला. त्यावेळी त्याची आई, त्याचा भाऊ हेही हजर होते. मला तेथील जमलेल्या लोकांनी त्याला आपण गावाचे बाहेर काढू, तू बाहेर कुणास बोलू नकोस असे सांगितले. त्यामुळे मी लगेच पोलीस ठाण्यात त्याचवेळी आले नाही. परंतु मी यावेळी ठाणेत आज पोलीस सर्वांचा दबाव झुगारून आली आहे. तरी नांद्रे गावातील आमच्या राहत्या घरात मौलाना जमीर अहमद मुजावर याने तुमचे घरात बरकत येईल तुझ्या नवर्याचा धंदा चांगला चालेल असे म्हणून मला एकटीस खोलीत घेऊन माझे सर्व अंगास खोबरेल तेल लावून माझेवर बलात्कार केला आहे व कोणास काही सांगितलेस तर तुझे लहान मुलीस जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे म्हणून माझी त्याचेविरूद्ध फिर्याद आहे.
धार्मिक कर्मकांडांच्या नावाखाली आजही हे मस्तवाल मौलवी कसे असहाय्य महिलांचे लैंगिक शोषण करीत आहेत हे या महिलेच्या जबाबावरून स्पष्ट होतेच. या संदर्भात लगेच अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला व तिच्या पतीची भेट घेतली. त्या कुटुंबास मानसिक आधार दिला. पोलीस इन्स्पेक्टर जाधव यांना भेटून या मौलवीवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी असे सुचविले. सांगलीचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिगंबर प्रधान यांना या घटनेची भयानकता पटवून दिली. त्यांनी पोलिसांना मौलवीवर सक्त कारवाई करणेच्या सूचना दिल्या. पोलिसांनी मौलवीस अटक केली. मौलवी जमीर मुजावर यांचे विरूद्ध भा.दं.वि. कलम 376, 506 व जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम लावले आहे. सध्या तुरुंगाची हवा खात आहे.
पीडित महिलेस पुनर्वसन करणेकामी व तिला शासकीय मदत मिळवून देणेसाठी अं.नि.स.प्रयत्नशील आहे.
-राहुल थोरात