9 मार्च ते 1 जून या काळात महाराष्ट्रभर अंनिसने जादूटोणाविरोधी कायद्याविषयी प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र व्यापी जनसंवाद यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये भगवान रणदिवे हे सातारा शाखेचे कार्यकर्ते पूर्णवेळ म्हणजे 85 दिवस सहभागी झाले आणि नंदिनी जाधव या पुणे शाखेच्या कार्यकर्त्या 55 दिवस सहभागी झाल्या. डॉक्टर दाभोलकर असते तर हे बघून विलक्षण आनंदाने म्हणाले असते की, ‘हे सारे कुठून येते?’ ही उर्मी ही ऊर्जा माणसात कशी निर्माण होते?’ या दोघांमध्ये ही उर्मी कोठून आली, कार्यकर्ता म्हणून त्यांची जडण–घडण कशी झाली हे आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत.

भगवान रणदिवे (वय 56 वर्षे, शिक्षण: इ.10 वी)
प्रश्न : तुम्ही विवेकवादी विचारांकडे कसे ओढले गेलात?
रणदिवे : सातारा जिल्ह्यातील औंध हे माझे मूळ गाव. तरूणपणी मी बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचे विचार वाचले होते आणि या विवेकवादी विचारांचा माझ्या मनावर परिणाम झाला होता. सातारा शहरातील महाराष्ट्र स्कूटर्स या कंपनीत मी नोकरी करत होतो, दोन वर्षांपूर्वी मी स्वेच्छा निवृत्ती घेतली. या कंपनीत मला अनंत माने हे समविचारी गृहस्थ भेटले, त्यांच्याकडून मला अं.नि.स.च्या कामाविषयी समजले. सुरवातीला मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा वर्गणीदार झालो; पण मला कामाची नुसती माहिती घ्यायची नव्हती तर प्रत्यक्ष काम करायचे होते म्हणून मी अंनिसच्या सातारा शाखेच्या साप्ताहिक बैठकांना नियमितणे जाऊ लागलो.
प्रश्न : अंनिसच्या संपर्कात आल्यानंतर या कामात सक्रीय होत जाण्याच्या तुमच्या प्रवासाविषयी थोडे सांगा
रणदिवे : बुवाबाजी संघर्ष हा माझा आवडीचा विषय आहे. सध्या सातारा शाखेच्या बुवाबाजी संघर्ष विभागाचा मी प्रमुख आहे. सातारा शाखेच्या बैठकांना नियमितपणे उपस्थित राहू लागल्यानंतर माझा डॉ. दाभोलकरांबरोबर अधिक संपर्क येऊ लागला. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर मी त्यांच्यासारखे शांतपणे, समोरच्याचे पूर्ण ऐकून घेऊन माझी मते लोकांच्यापर्यंत पोहोचवू लागलो, त्यामुळे लोक माझे म्हणणे ऐकून घेऊ लागले. अंनिसमध्ये येण्याआधी घरी माझे बायकोशी खूप वाद व्हायचे; कारण माझी बायको खूप उपास-तपास करायची, त्याचा तिच्या प्रकृतीवर परिणाम व्हायचा. तिला मी ते सगळे सोड असे सांगितले की, मी देवा धर्माला विरोध करतो असे वाटून तिला राग यायचा. पण डॉक्टरांनी मला समजावून सांगितले की, देव आणि धर्माच्या उपासनेचे स्वातंत्र्य हे प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य आहे. त्यानंतर नवरेशाहीच्या भूमिकेतून तिला विरोध करणे मी बंद केले. समजून घेणे, संवाद यावर भर दिला आणि हळूहळू माझी बायकोही बदलली. तिचा माझ्या विचारांना असलेला विरोध मावळला.
प्रश्न : ऐन उन्हाळ्यात जनसंवाद यात्रेबरोबर सलग 85 दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याचा निर्णय कसा घेतलात?
रणदिवे : डॉक्टरांच्या खुनानंतर स्वत:चे वडील गेल्यासारखे वाटत होते. त्यांचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे मी हातभार लावला पाहिजे असे मनात येत होते. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायदा जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या या कामात पूर्णवेळ सहभाग द्यायचा असे मी ठरवले. महाराष्ट्रभर फिरल्याने अनेक नवीन गोष्टी समजतील, शिकता येतील, कार्यकर्ता म्हणून आपली अधिक जडणघडण होईल असे वाटले.
प्रश्न : जनसंवाद यात्रेबरोबर प्रवास करतानाचे तुमचे अनुभव सांगा
रणदिवे : आम्ही लोकांना जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती सांगत असू. वकील, पोलिस यांना माहिती सांगताना माझ्यासारखा विशेष न शिकलेला कार्यकर्ता चळवळीमध्ये काम करत करत कसा तयार होऊ शकतो हे जाणवून मला स्वत:चा आणि चळवळीचा अभिमान वाटत असे. आम्ही अनेक ठिकाणी बुद्धविहारात कार्यक्रम केले, तेथे भेटलेले काहीजण म्हणाले की, बाबासाहेबांनी एवढे सांगूनसुद्धा अनेक लोकांनी विचारात आणि वागण्यात बदल केलेला नाही, दाभोलकरांनी सुरू केलेल्या चळवळीमुळे आपल्याला परत एकदा ही संधी मिळाली आहे. आम्ही ज्या ठिकाणी गेलो तेथे डॉक्टर दाभोलकर कधी न कधी गेलेले होते. कार्यकर्ते, गावातील लोक आमचे प्रेमाने स्वागत करत; डॉक्टर इथे बसले होते इथे जेवले होते अशा आठवणी सांगत. यात्रेला ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांची चांगली साथ होती. अनेकजणांनी कामाशी जोडून घेण्याची इच्छा व्यक्त केली. सभासदत्वाचे फॉर्म्स भरले त्यामुळे मनाला अधिक उभारी मिळाली.

नंदिनी जाधव (वय 50 वर्षे),
शिक्षण : बी.ए., एम.एस.डब्ल्यू.
प्रश्न : अं.नि.स.च्या कामाशी तुम्ही कशा जोडल्या गेलात?
नंदिनीताई : मुलीच्या शिक्षणासाठी मी पुण्याला राहते. माझे पती पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन कराडजवळच्या आमच्या गावी राहून शेती बघतात. मला सतत कामात गुंतलेले राहायला आवडते, त्यामुळे पुण्यात 2000 चौ. फूट जागेत मी स्वत:चे ब्युटी पार्लर चालवत होते; लग्नातले मेक्अप, मेंदी अशा ऑर्डर्स घेत होते. मला कलेची वेगवेगळी माध्यमे हाताळण्याची हौस आहे. त्यामुळे मी म्युरल्स, फायबर मोल्डच्या वस्तू तयार करण्याच्या आर्डर्स घेत असे, हॉबी क्लासेस चालवत असे. या सगळ्या कामात पैसे चांगले मिळत असत पण मला एक साचलेपण जाणवत होते. सामाजिक कार्यात सहभागी होण्याचीही मला आवड होती, त्यामुळे वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांशी काही ना काही निमित्ताने माझा संपर्क आला होता. अंनिसच्या पुणे शाखेशी संपर्क आल्यानंतर मी नियमितपणे बैठकांना जाऊ लागले. डॉक्टरांकडून चळवळीचे काम समजून घ्यावे, शिकावे अशी माझी इच्छा होती पण मला दीड दोन वर्षे एवढाच काळ ही संधी मिळाली.
प्रश्न : सामाजिक कार्य करणार्या जोडीदाराला समजून घेणे, साथ देणे ही नोकरी करणार्या जोडीदाराला समजून घेण्यापेक्षा वेगळी बाब आहे. नोकरीमध्ये घराबाहेर घालवलेल्या वेळेचा आर्थिक मोबदला मिळत असतो, तो घरातील व्यक्तींसाठी वापरता येत असतो. पण सामाजिक कामासाठी घराबाहेर राहणारी व्यक्ती आर्थिक मोबदला न घेता स्वत:चा वेळ समाजासाठी देत असेल तर कुटुंबियांच्या मनात आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. बाईच्या वेळेवर तर पहिला हक्क घराचा असे समजण्याची सामाजिक रीत आहे. या पार्श्वभूमीवर तुमच्या घरातील लोकांची तुमच्या कामाविषयी काय भूमिका आहे?
नंदिनीताई : तुम्ही माझ्या पतीशी स्वत:च बोला असे म्हणून नंदिनीताईंनी त्यांना फोन लावून दिला. ते म्हणाले की, ‘माझा स्वत:चा कुठल्याही कर्मकांडावर विश्वास नाही, लहान असतानासुद्धा कावीळ उतरवण्यासाठी गळ्यात माळ घालण्यासारख्या गोष्टी मला पटायच्या नाहीत. मी ती माळ खुंटीवर टांगून ठेवाययचो.’ ‘मला वाटते की, स्त्रियांनादेखील घराबाहेरच्या जगात त्यांच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना मोकळीक देणे खूप महत्वाचे आहे. सामाजिक कामाच्या बाबतीतही प्रत्येकाने या कामात स्वत:चा वाटा उचलला पाहिजे. नंदिनी प्रत्यक्ष हे काम करते. याचा मला आनंद आहे.
प्रश्न : अं.नि.स.च्या कामात सक्रीय होण्याचे तुमचे काही अनुभव सांगा.
नंदिनीताई : डॉक्टर दाभोलकर असताना कायद्यासाठी उपोषणाला बसण्याची चर्चा चालू होती तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, मी तुमच्याबरोबर उपोषणाला बसेन; पूर्वी मी नवरात्राचे नऊ दिवस उपास करायचे, त्यामुळे मला उपासाची सवय आहे, डॉक्टर गेल्यानंतर जादूटोणाविरोधी कायद्याचा वटहुकूम निघाला होता पण विधीमंडळात कायदा मंजूर होईल याची शाश्वती नव्हती. त्यासाठी उपोषणाला बसायचे ठरले तर त्यात सहभागी होण्यासाठी म्हणून मी अधिवेशन काळातील हे सगळे दहा दिवस नागपूरला जाऊन राहिले होते. गरज पडली तर डॉक्टरांना दिलेला शब्द आपण खरा केला पाहिजे ही भावना मनात होती. दोन महिन्यांनी मुलीची बारावीची परिक्षा होती. पण तिने समजून घेतले आणि हे सगळे दिवस माझी आई आणि नणंद तिच्याबरोबर येऊन राहिल्या.
जनसंवाद यात्रेच्यावेळी माझे कुटुंबीय 15 दिवसांच्या कौटुंबिक सहलीला जाणार होते. त्यांच्या संमतीने मी अंनिसच्या जनसंवाद यात्रेत सहभागी व्हायचे असे ठरवले. या 15 दिवसांच्या अनुभवानंतर मी माझा सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला आणि एकूण 55 दिवस यात्रेत सहभागी झाले. वेगवेगळ्या समुदायांसमोर सप्रयोग व्याख्यानाचे कार्यक्रम केल्याने माझा आत्मविश्वास वाढला. मी राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलची खेळाडू असल्याने मला वाटते उन्हाळ्यातील एवढा प्रवास मला आजारी न पडता सुरळीतपणे पार पाडता आला. मी ब्युटीशियन असल्याने महिलांच्या जटा सोडवण्याचे कामही मी कौशल्याने करू शकते. शरीर सुंदर करण्याचे काम अनेक वर्षे केले आता माणसाचे मन सुंदर करण्याचे हे काम मला करायचे आहे.
मुलाखतकार : मुक्ता दाभोलकर