Categories
अभियान

जनसंवाद यात्रेचा कोल्हापूरात समारोप

जुलै - २०१४

18 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हौतात्म्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दि.22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याचा वटहुकूम काढला आणि दि. 18 डिसेंबर नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. या कायद्यामुळे अंधश्रद्धेमुळे घडणार्‍या काही विशिष्ट कृती या गुन्हा ठरवल्या असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. वटहुकुमानंतर लागलीच या कायद्यानुसार गुन्हे नोंद होण्यास सुरवात झाली. आतापर्यंत महाराष्ट्रातून 65 हून अधिक गुन्हे नोंद झाले आहेत. अजूनही हा कायदा प्रभावीपणे अंमलात आणला तर अनेक गुन्हे पुढे येतील. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या विविध खात्यांमार्फत कोणती भूमिका घ्यावी यासंदर्भात अंनिसने शासनाला सूचना कळवल्या आहेत. मात्र हा कायदा राबवण्याची जबाबदारी केवळ शासनावर टाकली तर इतर अनेक लोकोपयोगी कायद्यांप्रमाणे, (उदा. देवदासी प्रथा विरूद्धचा कायदा) तो निष्प्रभ ठरेल. यासाठी अंनिसने लोकांना हा कायदा समजून सांगण्याची आपली जबाबदारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून काही कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार ‘जादूटोणाविरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणी जनसंवाद यात्रा’ काढण्याचे ठरले. समता संघर्षाचे ठिकाण असणार्‍या महाडच्या चवदार तळ्यापासून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या उपस्थितीत या जनसंवाद यात्रेस दि.9 मार्च रोजी सुरवात झाली आणि सलग 25 दिवस एकही दिवस खंड न पाडता महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांतून 10,500 प्रवास करून सुमारे 40,000 लोकांपर्यंत प्रत्यक्ष आणि लाखो लोकांपर्यंत अप्रत्यक्ष रित्या हा कायदा पोहोचवण्याचे काम या यात्रेद्वारे झाले. या यात्रेचा समारोप दि.1 जून रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या म्हणजे समता प्रस्थापनेच्या भूमीत छ.शाहू स्मारक भवन येथे झाला. या समारोप समारंभाचा वृत्तांत….

समारोप समारंभाच्या कार्यक्रमाचे तीन सत्रात नियोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात उद्घाटन आणि जनसंवाद यात्रेचा अनुभव असा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचे सचिव मा.आर.डी.शिंदे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. चमत्कार भांडाफोड सादरीकरणातील रॉकेलसारख्या इंधनाऐवजी पाण्याचा दिवा पेटवणे या प्रयोगाद्वारे उद्घाटन झाले. यावेळी विचारमंचावर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शैला दाभोलकर, जिल्हा सचिव उमेश सूर्यवंशी आणि जिल्ह्यातील अन्य शाखांचे सचिव उपस्थित होते. अविनाश पाटील यांच्या हस्ते मा.आर.डी.शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. उमेश सूर्यवंशी यांनी उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक केले. या जनसंवाद यात्रेत सहभागी जाधव, श्रीनिवास जांभळे, भारत विठ्ठलदास यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रशांत पोतदार यांनी या यात्रेद्वारे आलेले अनुभव सांगताना कायद्याबद्दल असणारे प्रशासकीय पातळीपासून जनसामान्यांपर्यंतचे अज्ञान आणि त्यांना काम समजून सांगण्याची गरज विषद केली. विविध शाखांच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

नंदिनी जाधव या महिला कार्यकर्त्या यात्रेत सलग 45 दिवस सहभागी होत्या. अंनिसमधील महिलांची धडाडी आणि अंनिसचा महिलांच्या कार्यावरील विश्वास याचे हे उत्तम उदाहरण आहे. सातार्‍याचे भगवान रणदिवे यांनी एकही दिवस घरी न जाता 85 दिवस यात्रेत राहून चमत्कार सादरीकरणाद्वारे कायद्याचे महत्व पटवून देण्याचे काम केले याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. नंदिनी जाधव आणि भगवान रणदिवे यांनी अनुभव कथन केले.

समाजकल्याण विभागाचे सचिव मा.आर.डी. शिंदे यांचे मनोगत

‘महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या जादूटोणाविरोधी कायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाचे मन:पूर्वक कौतुक करतो. जनसंवाद यात्रेत सहभागी व्यक्तींचे अभिनंदन करतो. शासनपातळीवर हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’

ते पुढे म्हणाले, ‘डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद दिवस आहे. आणि जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला तो दिवस सर्वात आनंदाचा दिवस आहे.’ त्यांनी कायदा मंजूरीसाठी दाभोलकरांच्या प्रयत्नाच्या आठवणी जागवल्या. जनसंवाद यात्रेतून किंवा येथून पुढे होणार्‍या प्रबोधनातून या कायद्या संदर्भात काही सुधारणा होण्यासाठी सूचना आल्यास त्या शासनाकडे पाठवाव्यात असेही ते म्हणाले. उद्घाटनाच्या सत्रात मनोगत व्यक्त करताना शैला दाभोलकर म्हणाल्या, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची प्रेरणा घेऊन कार्यकर्ते मेहनत करीत आहेत. त्यांनी पेरलेला विवेकवाद उगवण्याच्या तयारीत आहे. आता त्यासाठी कार्यकर्त्यांनी जनमानसाशी विचार संवाद ठेवला पाहिजे, कृतीशील राहिले पाहिजे.’ अंधश्रद्धा दूर होऊन विवेकनिष्ठ समाज होण्यासाठी प्रखर धर्मचिकित्सेची गरज असून केवळ मानवता धर्माची आज गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. स्वाती कोरे यांनी परिचय करून दिला. सीमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

दुसरे सत्र : परिसंवादाचा विषय होता ‘लोकशाही व्यवस्थेत कायद्याचे महत्व’ यामध्ये अ‍ॅड.के.डी.शिंदे आणि राज्यशास्त्राचे जाणकार मा. अशोक चौसाळकर यांनी सहभाग घेतला. प्रमिला बत्तासे यांनी स्वागत केले. अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे यांनी प्रास्ताविक केले. संघसेन जगतकर यांसी सूत्रसंचालन केले. विचारमंचावर संजय बनसोडे, मुक्ता दाभोलकर आदी उपस्थित होते. यावेळी मांडणी करताना आपल्या खुमासदार शैलीत अ‍ॅड. के. डी. शिंदे म्हणाले, ‘लोकशाहीचा खरा अर्थ कायद्याने राज्य असा असून कायदा करण्यासाठी लोकांची ताकद लावावी लागते. राजेशाहीमध्ये, हुकूमशाहीमध्ये कायद्याने राज्य असले तरी सर्व कायदे राजे किंवा हुकुमशहाच्या सोयीचे असतात. लोकशाहीतील कायदे मात्र लोकांच्या सोयीचे असले पाहिजे अशी अपेक्षा आहे. तरीही राज्यकर्ते आपले हितसंबंध जपतात तेव्हा कायद्यासाठी चळवळ उभारावी लागते. कायदा होऊनही तो अंमलात आणला जाईल याची गॅरंटी नसते. त्यासाठी जनतेला सारखे जागे रहावे लागते. जादूटोणाविरोधी कायदा प्रस्तावनेपासून वाचला पाहिजे. प्रस्तावनेमध्ये शासनाचे समाजात अज्ञान, अंधश्रद्धा बजबजलेली असल्याची कबुलीच दिली आहे. या कायद्यामध्ये कोणत्या गोष्टी येत नाहीत हे सांगणारे परिशिष्ट हे कायदा विरोधकांना संतुष्ट करण्याचा फसवा प्रयत्न आहे. कायद्यामध्ये त्या गोष्टींवर कारवाई व्हावी अशी अजिबात मागणीच नव्हती. तसेच थर्ड पार्टीला गुन्हा नोंदवता येणार नाही अशी तडजोड जरी केली गेली असली तरीही या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे हा कायदा स्वतंत्रपणे वाचता येणार नाही. तो इतर कायद्यांसह वाचला पाहिजे असे म्हटले आहे. त्यामुळे फोनवरून दिलेल्या माहितीवरूनही पोलिसांना या कायद्याविषयी दखल घ्यावीच लागेल. कारण या कायद्यातील सर्व कलमे ही दखलपात्र गुन्हा आहेत. शासनाने हा कायदा नाईलाजाने केला असल्याने त्याची नीट अंमलबजावणी ते करतील याची शाश्वती नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे.

डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले की, नोंद झालेल्या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये जरी गुन्हेगारास शिक्षा झाली तरीही या कायद्याचे महत्व अधोरेखीत होईल मात्र केस उभी राहणे, खटला चालवणे आणि गुन्हेगारास शिक्षा मिळणे हा दीर्घ मुदतीचा प्रवास असून त्यासाठी प्रशासनावर विसंबून चालणार नाही. कार्यकर्त्यांना त्याचा पाठपुरावा करावा लागेल.

अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे म्हणाले, ‘पोलिसांनी पकडलेल्या बुवाच्या ठिकाणाचा पंचनामा पोलीस करतील तेव्हा कार्यकर्त्यांनी पंच किंवा साक्षीदार व्हायला हवे.’

समारोपाच्या सत्राचे प्रमुख वक्ते होते गोविंद पानसरे आणि अविनाश पाटील. कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष सुजाता म्हेत्रे यांनी स्वागत केले. जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. कृणात कोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बोलताना डॉ. पानसरे म्हणाले, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर अंनिसचे कसे होणार अशी माझ्या मनात शंका होती. मात्र गेल्या नऊ महिन्यात कार्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे काम केले आहे त्यावरून माझी शंका पूर्णपणे नाहीशी झाली आहे. जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. पुढे ते म्हणालो, ‘देशात नेहमीच हितसंबंधांचे राजकारण सुरू असते. चाणक्याने राजकारण यशस्वी होण्यासाठी लोकांना अंधश्रद्धाळू, अज्ञानी ठेवण्याचा तेव्हा चंद्रगुप्ताला सल्ला दिला होता. सध्याही तेच चालू आहे. त्यामुळे अंनिसच्या कार्यकर्त्यांना हे राजकारण समजून घ्यावे लागेल आणि लोकांना ते समजून सांगावे लागेल. राजकारणी बदमाश असले म्हणून राजकारण वाईट असे मानणे चुकीचे आहे. परिस्थितीने आपल्यापुढे गंभीर आव्हान उभे केले आहे. परिस्थिती अधिक प्रतिकूल होणार आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी आपल्या तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करावा. इतिहास पुन्हा वाचावा, गाणी, नाटकं इत्यादींची नवनिर्मिती करावी. बदल हा विश्वाचा नियम आहे. आज जे आहे ते तसेच राहणार नाही. सनातन असे जगात काहीही नाही. गौतम बुद्धाच्या काळापासून सुरू असलेली परिवर्तनाची चळवळ सतत यशस्वीच होत गेली असा इतिहास नाही. ती चार पायर्‍या वर सरकते, एखाद-दुसरी पायरी मागे येते पुन्हा चार पायर्‍या वरती सरकते असा इतिहास आहे हे लक्षात होऊन अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्याने विचलित होता कामा नये. वाचन चिंतन आणि कृती करत राहिले पाहिजे.’

महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सहकार्य करणार्‍या सर्व संघटना चळवळींप्रती ऋण व्यक्त केले. जादूटोणाविरोधी कायदा जनसंवाद यात्रा सुरू करण्याचा उद्देश सांगितला. आणि त्याची परिपूर्ती केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, नंदिनी जाधव यांचे विशेष कौतुक केले. संघटनेवरील आघातानंतर महाराष्ट्रभरातून चळवळीस भक्कम पाठींबा मिळत असल्याचे सांगितले. जनसंवाद यात्रेनंतरही कायद्याबाबत जनसंवाद ठेवावा लागेल असे सांगून त्यासाठी यापुढील कामाची जबाबदारी, गुन्ह्यासंबंधी पाठपुरावा याविषयी मार्गदर्शन केले. समारोप समारंभाच्या नियोजनाबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.

या समारोप समारंभाचे आकर्षण होते स्टेजवरील नेपथ्य आणि स्टेजची मांडणी. यासाठी संघसेन जगतकर आणि कोमल मुदे यांनी कल्पकतेने सर्व रचना केली. प्रत्येक सत्राच्या सुरवातीस शाहीर सदाशिव निकम यांनी आणि शोभा स्वामी, भोसले, गीता कुलकर्णी, मयुरी निकम आदी कार्यकर्त्यांनी परिवर्तनाची गाणी सादर केली.

अंधश्रद्धेच्या सर्वात प्रथम बळी ठरणार्‍या लिंबूची रोपे देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येत होते. उपस्थित सर्व श्रोत्यांना व कार्यकर्त्यांनाही रोपांचे वाटप करण्यात आले. जनसंवाद यात्रेतील काही क्षणचित्रे, एल.सी.डी.प्रोजेक्टरच्या सहाय्याने दाखवण्यात आली. वाकरे, ता. करवीर येथील दिलीप कांबळे, निखील कांबळे कार्यकर्त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने सर्व उपस्थितांसाठी जेवण बनवले. स्नेहभोजन झाले. या कायद्यातील कलमांनुसार कोल्हापूर जिल्ह्यातून पहिला गुन्हा दाखल होण्यासाठी कार्य केलेल्या सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, सतीश पाटील आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘हम होंगे कामयाब!’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी सचिन ओतारी, संघसेन जगतकर, कपील मुळे, सीमा पाटील, विष्णू काटकर, संजय सुळगावे, प्रतिला बत्तासे, कविचा जांभळे, सागर कदम, दिलीप कांबळे, निखील कांबळे, पंडीत ढवळे, रमेश वडणगेकर, माणिक यादव, शीतल पवार, अरूण पाटील, धनाजी जाधव यांचे सहकार्य लाभले.

सुनील स्वामी, संजय रेंदाळकर