Categories
इतर

निर्भया, बीबीसी व बलात्कारी मानसिकता

एप्रिल - २०१५

निर्भयाच्या मारेकर्‍यांची बीबीसी वाहिनीवर मुलाखत घ्यावी असे बीबीसीच्या प्रतिनिधीला वाटले, या मागची वाहिनीची कारणे जी काय असोत ती असोत. त्यामुळे भारतीय मनात जो भावनिक प्रक्षोभ उमटला त्याची पूर्ण जबाबदारीही बीबीसीने घ्यायला हवी. केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव वापरणे येथे चुकीचे आहेच. नोंदविलेल्या निषेधाला योग्य उत्तर मिळणे अपेक्षित आहे. त्याच बरोबर ही परवानगी देणार्‍या अधिकारी व्यक्तींनी ही मुलाखत प्रसिद्धीपूर्वी नीट पाहणे व सम्यक विचार करणेही अपेक्षित होते. निर्भयाचे नातेवाईक, या निर्घृण बलात्कारावेळी पळून न जाता जीव धोक्यात घालून तिची साथ देणारा मित्र, तिच्या मित्र मैत्रिणी या सर्वांची आजची मानसिक स्थिती जाणून घेण्यात वाहिनीला रस वाटत नाही काय? कि ह्या मुलाखती घेऊन नंतर त्यांनी आरोपीकडे लक्ष दिले आहे? बलात्कारी खुन्यांची आजची मानसिकता जाणून घेण्यांचा हा प्रयत्न समाजाची समाज वाढविण्यासाठी आहे कि टीआरपी वाढविण्याचा उद्योग आहे हे स्पष्ट होईलसे दिसत नाही.

या मुलाखतीत खुनी बलात्कारी माणसांनी जी विधाने केली आहेत त्याबद्दल संताप उचित आहे पण आश्चर्य वाटण्यासारखे त्यात नवीन काही नाही.त्या वेळी भारतातील अनेक अध्यात्मिक गुरुंनी, राजकीय नेत्यांनी स्त्रियांना जे उपदेश केले, तेही वैचारिक दिवाळखोरीचे नमुनेच होते. त्यामुळे पुनरावृत्तीचा दोष पत्करून मला येथे पुन्हा एकदा बलात्कारी खुनी माणसांच्या मानसिकतेविषयी काही गोष्टी स्पष्ट करणे जरुरीचे वाटते.

बलात्कार लैंगिक गुन्हा तर आहेच पण त्याही पेक्षा तो हिंसक गुन्हा म्हणून जास्त लक्षात घ्यायला हवा.संधी साधून, झडप घालून, लैंगिक गुन्हे, विशेषत: बलात्कार करणारी व्यक्ती, बळीवर अमानुष हल्ला करते, प्रसंगी खून करते, त्यानंतर त्या देहाची क्रूर वासलात लावते तेव्हा लक्षात घ्यायला हवे कि हा लिंगपिसाट खुनी वेगळ्या, भयंकर मनोवृत्तीचा आहे. छेडछाड ते बलात्कार व निर्घृण हिंसा हा लैगिक ते हिंसक वृत्तींच्या अभद्र युतीचा प्रवास आहे. सेक्शुअल सॅडीझम sexual sadism हा सामान्यत: आढळणारा असा गुन्हेगारी प्रकार नाही.तो वेगळा विशिष्ट उल्लेख करावा असा गुन्हेगारीचा विशेष प्रकार आहे.साधारणत: 5 ते 10% लैंगिक गुन्हेगार सॅडिस्टिक रेपिस्ट sadistic rapist असतात. रोजच्या जीवनात त्रस्त, सौम्य मनोविकाराने ग्रस्त सामान्य माणसाच्या मनोवृत्तीशी याची तुलना कुणीही करू नये. बलात्कारातील भीषण हिंसा हि विकृत गुन्हेगारी मनोवृत्तीचे लक्षण समजले जाते. तो तीव्र व्यक्तीमत्व दोष आहे. काही सिझोफ्रेनिक मनोरुग्ण अत्यंत विकृत हिंसा करताना आढळतात. त्यामुळे बलात्कारी व्यक्तीच्या हिंसाचाराचा शोध घेताना त्याची मनोचिकित्सा जरूर करायला हवी. पण त्यांना सरसकट मनोरुग्ण समजणे उचित नाही. तसे करणे त्यांचा बचाव करणे ठरू शकेल. शिवाय असे सरसकट विधान शांत, अहिंसक, निरुपद्रवी मनोविकार ग्रस्तांवर अन्याय करणारे आहे. बलात्कारी व्यक्तीतील काही मनोरुग्ण वा विकृत व्यक्तिमत्व दोषाचे असू शकतात. त्यात पुन्हा एकट्याने बलात्कार करणारा व गँगरेप gang rape मध्ये भाग घेणारे गुन्हेगार यांचा स्वतंत्र विचार व्हायला हवा. ग्यांगरेपमध्ये भाग घेणार्‍या गुन्हेगारांना सहकार्‍यांसमोर आपल्या नीच क्रूर मनाचे प्रदर्शन मांडण्यात चेव येतो. अशा वेळी दारू किंवा उत्तेजक अमली ड्रग्ज घेतल्यास त्यांना कसलाच विधी निषेध वा विवेकी नियंत्रण उरत नाही .

सोशियोपाथ,किंवा सायकोपाथ या प्रकाराला मनोविकारशास्त्रात antisocial personality disorder समाजविघातक व्यक्तिमत्व विकृती म्हणतात. या विकृत व्यक्तिमत्वाच्या माणसाला स्वार्थापलीकडे, स्वतःच्या प्रेरणा इच्छा आवेगांच्या शमनापलीकडे दुसरे काही दिसत नाही. इतरांचे नुकसान वा हाल करण्यात त्याला काहीच गैर वाटत नाही. कुमारावस्थेतच या सायकोप्याथ व्यक्तींची लक्षणे दिसून येऊ लागतात. दिसण्यात,वागण्यात चार्मिंग, देखणे, स्मार्ट वाटत असले तरी प्राण्यांशी क्रूर वागणे, मित्रांना फसवीत राहणे, चोर्‍या करणे, टिंगल टवाळ्या, छेडछाड करणे,आगी लावणे, गँग तयार करून गुन्हे करणे, शिक्षेतून काही न शिकणे, व्यसने करणे, खोटे बोलून फसवीत राहणे, दुसर्‍यांचे नुकसान करून स्वत:चा फायदा उपटणे, उथळ खोटे नाटकी प्रेम दाखविणे इत्यादी गुण त्यांच्या वागण्यातून दिसून येतात. उथळ अतिरेकी भावनाशुन्य अशा या माणसाना (माणूस म्हणावे तरी कसे यांना!) सहानुभूती, सहवेदना असे काही स्पर्शत नाही. सदसद्विवेकबुद्धी नसल्यामुळे केलेल्या वाईट कृत्याबाबत पश्चाताप होत नाही किंवा आपल्यामुळे दुसर्‍याच्या झालेल्या नुकसानीबाबत अपराधी वाटत नाही. उपदेशाने, मानसशास्त्रीय उपचारांनी किंवा शिक्षेने ही मंडळी सुधारताना दिसत नाहीत.समाजाच्या नीती नियमांना ते अजिबात विचारत नाहीत.ही मंडळी लैगिक गुन्हेगारीत अग्रेसर दिसतात. अंदाजे 5 ते 10% बलात्कारी सेक्शुअल sadist असतात. बळीचा आत्यंतिक छळ करण्याने, तिच्या विव्हळण्याने यांना लैगिक समाधान मिळते. लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांची मनोवृत्ती अशी का असते या बाबत अनेक स्पष्टी करणे दिली जातात. उदा. आनुवंशिकता, बालपणी तयार झालेला विकृत मानस आकृती बंध, वाईट संस्कार, दोषी गुणसूत्रे, टेस्टोस्टेरॉन संप्रेरकाचे जास्त प्रमाण, सिरोटोनिन न्यूरोट्रान्समीटरचे कमी असणे, मेंदूच्या रचनेतील दोष, त्याच्या कार्यपद्धतीतील बिघाड,व्यसने इत्यादी.

पण अजूनही आम्हा मनोविकार तज्ञांमध्ये कारणाबाबत अनभिज्ञता आहे एवढे खरे. या विकृत व्यक्तिमत्व दोषावर प्रभावी उपचारही नाहीत.सायकोथेरपी,वर्तन उपचार पद्धती, अपराधग्रस्तांचे पुनर्वसन काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते.यातील अति त्रासदायक गुन्हेगारांना/समाजकंटकाना समाजापासून दूर तुरुंगात ठेवणे एवढाच पर्याय न्याय व्यवस्थेकडे शिल्लक राहतो.

बलात्कारी व्यक्तीत पुरुष अधिक आढळतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्री उपभोग्य वस्तू ठरते, वाटेल तशी वापरली जाते, ती न्याय्य व समान स्थान मागू लागली तर पुरुषांना संताप येतो व जमेल तसे, जमेल तिथे तिला चिरडले जाते.हल्लीच्या बलात्काराच्या घटनानंतर स्त्रियांना समाजातील राजकारणी, धार्मिक व तथाकथित समाजधुरीणांनी जे उपदेश, सल्ले दिले त्यावरून या सर्वांच्या मनात स्त्रियांविषयी किती आदर, कळवळा, समताभाव आहे तेही सर्व स्त्रियांना कळले असेलच.जणू काही स्त्रियांनी लोकशाहीत निर्भय,मोकळे, जगावे म्हटले तर रेप होतील,असे म्हणून आपण कायदा व सुव्यवस्था यातील त्रुटीचे समर्थन करतो व तिच्यावरील हिंसक लैंगिक हल्ल्याचाही अप्रत्यक्ष (नाईलाजाने असेल पण) स्वीकार करू लागतो. पुरुषांच्या मुक्त जीवनात स्त्रीचा नकार स्वीकारला जात नाही व तिला हिसक मार्गांनी धडा शिकवला जातो.

बलात्कारात भीषण हिंसा केली जाते. उन्माद उत्तेजित मन,त्यात हिंसक व लैंगिक विकृत आवेगांचे तुफान, स्त्रियांबद्दल तुच्छतेचा दृष्टीकोन, कुठलाही गुन्हा पचविता येईल, तक्रार दाखल केली जाणार नाही हा विश्वास(!), सोबत इतर ग्यांगमेम्बर्स असतील तर मिळणार्‍या उत्तेजनाने विकृत पुरुषार्थ सिद्ध करण्याची मस्ती, गुन्हा गंभीर असल्याने पुरावा नष्ट करण्याचा सोपा उपाय म्हणून बळीची हत्या, अशा विविध कारणामुळे या भीषण हत्त्या घडताना दिसतात.अशा वेळी बळीने केलेला प्रतिकार गुन्हेगाराला अधिक चेव आणीत असेलही.पण अशावेळी त्याला भैया म्हणून दयेची भिक मागूनही काही उपयोग होणार नाही.इतकी दया अशा गुन्हेगाराच्या मनात मुळातच नसते. प्रथम रेपची संधी शोधणे,मग बेभान होऊन बलात्कार करणे, मग त्या शरीराचे विकृत हाल करणे, खून करून मृत देहाची विटंबना करणे हे सगळे ज्यांना जमते ते फारच पोहोचलेले मुर्दाड गुन्हेगार असतात.त्याच्या दृष्टीने बळी ही उपभोगाची,आपल्या लैंगिक उन्मादाच्या शमनासाठी सापडलेली एक वस्तू असते, व्यक्ती नसते,त्यामुळे माणूस म्हणून बळीकडे पाहायला तो तयार नसतो.मग त्याला 3 वर्षाची लहान मुलगी किवा 50 वर्षाची स्त्री, घरातली, नात्यातील, परिचयातील, मतीमंद, अपंग, असहाय, आजारी, दुर्बळ कुणीही स्त्री बलात्कारासाठी चालते.

अंधारलेली जागा, एकटेपण, लैंगिक भावना चाळविणारे कपडे असे दोष स्त्रियांमध्ये शोधणे थांबवून कायदा, सुव्यवस्थेचे कडेकोट संरक्षण सार्‍याच नागरिकांना कसे मिळू शकेल ह्याकडे लक्ष वळवायला हवे. विवेकाचे आवाहन अविवेकाला पोहोचत नाही, रुचत नाही, कायद्याची त्याला परवा नसते. त्याला फक्त रोखू शकते विवेकी समाजाचा सतत जागता, आश्वासक, धीट वावर आणि सजग शासनाची उत्तम संरक्षक व्यवस्था.तो पर्यंत काय करावे ?

जवळजवळ 80% बलात्कार परिचित व्यक्तींकडून होतात हे हि लक्षात घ्यायला हवे. घर, शेजार, नोकरी व व्यवहारात स्त्रियांना पुरुषांबरोबर मिसळावे लागते.त्यामुळे समोरच्या पुरुषाचे व्यक्तिमत्व त्यातील गुण व दोष- पारखणे,ओळखीतील मर्यादा नीट अधोरेखित करणे,विकृत मनोवृतीला वेळीच ओळखून त्या व्यक्तीपासून सावध राहणे,घरात स्त्रीपुरुष समानतेचे वातावरण जोपासणे,मुलांना पुरुष सत्तेच्या दम्भापासून दूर ठेवणे, प्रसारमाध्यमातील स्त्री प्रतिमेच्या विकृत चित्रणाचा जाहीर निषेध करणे, स्त्री संघटन मजबूत करणे, अशा अनेक उपायांनी आताच्या या संस्कृती संभ्रमात, प्राप्त परिस्थितीत, समाजमानस विवेकी, कायदा-न्याय-संरक्षण व्यवस्था प्रभावी होईपर्यंत,सर्वांना विशेष दक्षता घ्यावी लागेल. स्त्रीपुरुष समानता हाच समाजोन्नतीचा मार्ग आहे हे नव्याने सांगण्याची आता जरूर नाही.

बीबीसी सारख्या माध्यमाने आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी ओळखून अधिक सजग भूमिका वठविली पाहिजे. अविवेकाला संधी, अभय, उत्तेजन व अपराध्याला सुटका मिळणार नाही एवढी काळजी घ्यावीच लागेल.मात्र आपापली काळजी घेणे ही विवेकी कृती आहे, ते भीतीचे, भेकडपणाचे लक्षण समजू नये.

–डॉ.प्रदीप प.पाटकर

Email: patkar.pradeep@gmail.com

tel: 022-27451661