Categories
चळवळ

‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ डी.व्ही.डी.चे अमोल पालेकर यांचे हस्ते प्रकाशन

मार्च - २०१४

समाजातील अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अथक प्रयत्न केले. आपल्या तर्कशुद्ध मांडणीमुळे अनेकांचे प्रबोधन करण्यात ते यशस्वी ठरले. परंतु एकटे डॉक्टर सर्व दूर पोहचणे शक्य नसल्यामुळे त्यांचे विचार सी.डी./डी.व्ही.डी. स्वरूपात प्रकाशित करावेत अशी कल्पना ‘मॅग्नम ओपस’चे गिरीश लाड यांनी मांडली. आणि त्याप्रमाणे 7 एप्रिल 2013 रोजी पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात ‘प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे’ या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. अं.नि.स.च्या कार्यकर्त्यांना जे प्रश्न कायम विचारण्यात येतात अशा 26 प्रश्नांचा यात समावेश आहे. साधनेचे संपादक विनोद शिरसाट यांनी हे प्रश्न विचारले असून डॉ. दाभोलकरांनी आपल्या ओघवत्या शैलीत या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आहेत. तसेच या डी.व्ही.डी.त सुरवातीला शहाजी भोसले यांनी काही चमत्कारांचे सादरीकरण केले आहे. ही डी.व्ही.डी.अधिकच आकर्षक झाली आहे.

दि.20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टरांची निर्घृण हत्या झाली. आणि त्यानंतर आता म्हणजे 19 फेबु्रवारी 2014 रोजी या डी.व्ही.डी.चे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेता अमोल पालेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर होते. या प्रसंगी कार्याध्यक्ष, अविनाश पाटील, डॉ. शैलाताई दाभोलकर व डॉ. हमीद दाभोलकर उपस्थित होते. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना शैला दाभोलकर यांनी डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांचे कार्य एखादे विद्यापीठ स्थापन करण्याइतके मोठे होते. त्या विद्यापीठात सर्वांना प्रवेश होता. हत्या हा सर्वात मोठा रोग आहे. माणसाचा मेंदू फारसा विकसित झाला नव्हता त्यावेळी हा रोग मोठ्या प्रमाणात होता. विवेक विद्यापीठ स्थापन होणे हीच डॉक्टरांना खरी आदरांजली ठरेल.” डॉक्टरांच्या प्रत्येक कार्याच्या साक्षीदार असलेल्या शैलाताई यांचे भावोत्कट भाषण श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेले.

अमोल पालेकर यांनी विरोधी विचार संपविणे हा दहशतवादच आहे असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, “दुसर्‍याचे विचार शांतपणे ऐकून घेणे हे नामर्दपणाचे लक्षण समजले जात आहे. आक्रस्ताळ्या सुरात खोटे ऐतिहासिक दाखले देणार्‍यांना अधिक कौल मिळत आहे.” पुरोगामी, विवेकी मार्गापासून समाज दूर जात आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टरांची ही डी.व्ही.डी. इतर भाषांतही प्रकाशित करावी अशी सुचनाही त्यांनी मांडली व त्यासाठी खर्च करण्याची तयारीही दाखविली.

आपल्या अध्यक्षीय समारोपात दिलीप पाडगावकर म्हणाले, “या चित्रफितीत प्रश्नांची उत्तरे देताना डॉक्टरांच्या भाषेत अत्यंत स्पष्टता व सफाई दिसते. तर्कावर आधारित उत्तरे त्यांनी दिली आहेत. इंग्रजी व हिंदी सबटाईटल्स सहीत राज्याबाहेरही या चित्रफितीचा प्रसार व्हावा.” समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रफित पोहचली पाहिजे अशी अपेक्षा पाडगावकर यांनी व्यक्त केली.

गिरीश लाड यांनी प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ही चित्रफित आता सर्वत्र उपलब्ध असून अंनिसच्या कार्यकर्त्यांना अतिशय उपयुक्त आहे.

श्रीपाल ललवाणी, पुणे.