महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार
शुक्रवार, डिसेंबर 20, 2013/अग्रहायण 29, शके 1935
असाधारण क्रमांक 50
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रस्थापित केलेले अध्यादेश व केलेले विनिरन.
दि.10 डिसेंबर 2013 रोजी मा.राज्यपालांनी संमती दिलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.
ह. बा. पटेल,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र शासन
विधी व न्याय विभाग.
सन 2013 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 30
(मा.राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक 20 डिसेंबर 2013 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)
अज्ञानावर पोसल्या जाणार्या अनिष्ट व दुष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण
करण्याच्या दृष्टीने, आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे
समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत:
जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणार्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा अद्भुत
शक्तीच्या किंवा भूतपिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि
इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्याचे
समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व
सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच समाजात
निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता आणि
त्याच्याशी संबंधित किंवा अनुषंगिक बाबींसाठी
तरतूद करण्याकरिता अधिनियम.
ज्या अर्थी, नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा, आणि भोंदू लोकांकडून केले जाणारे जादूटोण्याचे व भूतपिशाच्चाचे प्रयोग यामुळे समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण होण्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत असून त्यांचे प्रमाण अत्यंत भयावह होते;
आणि ज्या अर्थी, अशा नुकसानकारक प्रथा, चालीरीती, जादूटोणा आणि इतर अमानुष, अनिष्ट, दुष्ट व अघोरी प्रथा व त्यांचे अनिष्ट परिणाम आणि त्यांचा प्रसार यांना परिणामकारक रीतीने प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि जादूटोणा करणार्या व्यक्ती व भोंदू लोकांचा आपल्याकडे अद्भूत किंवा चमत्कारी उपाय किंवा शक्ती असल्याचा खोटा दावा आणि त्यांची समाजविघातक व नुकसानकारक कृत्ये यांमुळे समाजाची घडीच विस्कटण्याचा आणि अधिकृत व शास्त्रीय वैद्यकीय उपाय व उपचार यांवरील सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला तडा जाण्याचा धोका निर्माण झाला होता. आणि अज्ञानामुळे ते अशा भोंदू लोकांचा व जादूटोणा करणार्या व्यक्तीचा आश्रय घेत होते, अशा परिस्थितीत, अशा जादूटोणा करणार्या व्यक्ती व भोंदू लोक यांच्या कुटिल कारस्थानांना बळी पडण्यापासून सर्वसामान्य लोकांना वाचविण्यासाठी उचित व कठोर सामाजिक व कायदेविषयक उपाययोजना करणे शासनाला अत्यावश्यक झाले होते;
आणि ज्या अर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते;
आणि ज्याअर्थी, उपरोक्त प्रयोजनांसाठी कायदा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती; आणि म्हणून, त्यांनी दिनांक 26 ऑगस्ट 2013 रोजी, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, 2013, हा प्रख्यापित केला होता;
आणि ज्याअर्थी, उक्त अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे;
त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या चौसष्टाव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-
1. (1) या अधिनियमास, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013 असे म्हणावे.
(2) तो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यास लागू असेल.
(3) तो दिनांक 26 ऑगस्ट 2013 रोजी अंमलात आला असल्याचे मानण्यात येईल.
2. (1) या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-
(क) “संहिता” याचा अर्थ, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 असा आहे;
(ख) “नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा” याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीने, या अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या किंवा वर्णन केलेल्या कृतींपैकी कोणतीही कृती स्वत: करणे किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे किंवा त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे, असा आहे;
(ग) “विहित” याचा अर्थ, या अधिनियमाखाली केलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे;
(घ) “प्रचार करणे” याचा अर्थ, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्याशी संबंधित किंवा त्याविषयी जाहिरात, साहित्य, लेख किंवा पुस्तक यांचे वितरण करणे किंवा ते प्रसिद्ध करणे, असा आहे आणि त्यामध्ये नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांच्या संबंधातील कोणतेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपातील सहाय्य, अपप्रेरणा, सहभाग किंवा सहकार्य देणे यांचा समावेश होतो :
(ङ) “नियम” याचा अर्थ, या अधिनियमांन्वये केलेले नियम, असा आहे.
(2) यात वापरलेल्या परंतु व्याख्या न केलेल्या शब्दांना व शब्दप्रयोगांना, औषधिद्रव्ये व जादूटोण्याचे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, 1954 व संहितेमध्ये जे ते अर्थ नेमून देण्यात आले आहेत, ते ते अर्थ असतील.
3. (1) कोणतीही व्यक्ती एकतर स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत, या अधिनियमास जोडलेल्या नरबळी आणि अनुसूचीमध्ये नमूद किंवा वर्णन केलेल्या, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा करणार नाही किंवा त्यांचे प्रचालन किंवा प्रचार किंवा आचरण करणार नाही किंवा प्रचालन, प्रचार किंवा आचरण करावयास लावणार नाही.
(2) हा अधिनियम अंमलात आल्याच्या दिनांकापासून कोणत्याही व्यक्तीने स्वत: किंवा इतर कोणत्याही व्यक्तीमार्फत नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अशा स्वरूपाची कोणतीही कृती केली असेल आणि अधिनियमाच्या तरतुदीचे उल्लंघन करून, नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांची जाहिरात, आचरण, प्रचार किंवा प्रचालन केले तर, तो या अधिनियमाच्या तरतुदींखाली अपराध ठरेल आणि अशा अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, दोष सिद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांहून कमी नसेल परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि पाच हजार रूपयांपेक्षा कमी नसेल, परंतु, पन्नास हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र असेल.
(3) जी कोणतीही व्यक्ती, पोट-कलम(2)अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही कृतीस किंवा अपराधास अपप्रेरणा देईल किंवा कोणतीही कृती किंवा अपराध करण्याचा प्रयत्न करील, तिने तो अपराध केला असल्याचे मानण्यात येईल आणि दोष सिद्ध झाल्यानंतर, तिला पोट-कलम(2) मध्ये अशा अपराधासाठी जी शिक्षा असेल तीच शिक्षा करण्यात येईल.
(4) पोट-कलम(2) खालील शिक्षापात्र अपराध हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.
4. कलम 3 अन्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाची न्याय-चौकशी, महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या न्यायालयात चालविण्यात येणार नाही.
5. (1) राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अटी व शर्तींना अधीन राहून, त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा, राज्याच्या कोणत्याही एक वा अनेक पोलीस ठाण्यात, दक्षता अधिकारी म्हणून ओळखले जाणारे एक किंवा अनेक पोलीस अधिकारी, नियुक्त करता येतील.
परंतु, असा पोलीस अधिकारी हा पोलीस निरीक्षक, याच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल.
(2) दक्षता अधिकार्याची कर्तव्ये पुढीलप्रमाणे असतील.-
(एक) त्याच्या अधिकारितेच्या क्षेत्रामध्ये या अधिनियमाच्या आणि त्याखाली केलेल्या नियमांच्या तरतूदीचे उल्लंघन किंवा भंग याचा तपास करणे व त्यास प्रतिबंध करणे, आणि त्याच्या अधिकारितेच्या क्षेत्रामधील जवळच्या पोलीस ठाण्याकडे अशा प्रकरणांची तक्रार दाखल करणे आणि अशा कृत्यास बळी पडलेल्या कुणाही व्यक्तीने अथवा तिच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कोणत्याही पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल केली असता, त्यावर योग्यरित्या व वेगाने कार्यवाही होईल याची खातरजमा करणे व आवश्यक तो सल्ला, मार्गदर्शन आणि मदत संबंधित पोलीस ठाण्याला करणे.
(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणार्या व्यक्तींचा खटला परिणामकारकपणे चालविण्यासाठी पुरावा गोळा करणे; आणि ज्या क्षेत्रामध्ये असे उल्लंघन झाले आहे किंवा केले जात आहे त्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यात त्याबाबतची तक्रार दाखल करणे.
(तीन) या संबंधात राज्य शासनाकडून, वेळोवेळी, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे त्याला नेमून देण्यात येतील अशी इतर कर्तव्ये पार पाडणे.
(3) पोट-कलम(1) अन्वये नियुक्त करण्यात आलेला दक्षता अधिकारी आपली पदीय कर्तव्ये किंवा कामे पार पाडत असताना त्यात अडथळे आणणार्या कोणत्याही व्यक्तीस, दोष सिद्धी झाल्यानंतर, तीन महिन्यांपर्यंत असू शकेल एवढ्या मुदतीच्या कारावासाची किंवा, पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल एवढ्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
(4) दक्षता अधिकारी, भारतीय दंड संहितेच्या कलम 21 च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.
6. (1) राज्य शासनाने, याबाबत वेळोवेळी दिलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांना अधीन राहून, दक्षता अधिकार्याला, त्याच्या अधिकारितेतील क्षेत्राच्या स्थानिक मर्यादेत, त्याच्या क्षेत्रातील पोलीस अधिकार्याच्या सहाय्याने….
(एक) या अधिनियमाखालील अपराध केला आहे किंवा करण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल तर, अशा कोणत्याही ठिकाणी, सर्व वाजवी वेळी, त्यास आवश्यक वाटेल अशा सहाय्यांसह, कोणतेही असल्यास, प्रवेश करता येईल व झडती घेता येईल.
(दोन) या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणतीही कृती किंवा गोष्ट करण्यासाठी जे वापरण्यात आले होते किंवा वापरण्यात येत आहे असे त्यास सकारण वाटत असेल, तर असे कोणतेही साहित्य, उपकरण किंवा जाहिरात जप्त करता येईल;
(तीन) खंड(एक) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही जागेत आढळलेल्या कोणत्याही अभिलेखाची, कागदपत्राची किंवा इतर महत्वाच्या वस्तुची तपासणी करता येईल आणि जर ती या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा पुरावा म्हणून सादर करता येईल असे त्यास सकारण वाटत असेल तर, तो जप्त करता येईल.
(2) संहितेच्या तरतुदी, संहितेच्या कलम 94 अन्वये काढलेल्या अधिपत्राच्या प्राधिकराखाली केलेल्या कोणत्याही झडतीस व जप्तीस जशा लागू होतील, तशाच त्या, वा अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही झडतीस किंवा जप्तीस, शक्य होईल तेथवर लागू होतील.
(3) जर एखाद्या व्यक्तीने, पोट-कलम(1) च्या खंड(दोन) किंवा (तीन) अन्वये काहीही जप्त केले असल्यास, ती व्यक्ती शक्य तितक्या लवकर, त्याबाबत दंडाधिकार्यास कळवील व त्याच्या अभिरक्षेसाठी दंडाधिकार्याचे आदेश घेईल.
7. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाची कलमे 159 व 160 च्या तरतुदी, दक्षता अधिकार्याने या अधिनियमांतर्गत सद्भावनापूर्वक केलेल्या कृतींना, असा अधिकारी हा जणू काही उक्त अधिनियमांतर्गत पोलीस अधिकारी असल्याचे समजून लागू असतील.
8. या अधिनियमाखालील अपराधांच्या अन्वेषणाला व न्यायचौकशीला संहितेच्या तरतुदी लागू असतील.
9. या अधिनियमाच्या तरतुदी, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यास पूरक असतील व त्याचे न्यूनीकरण करणार्या नसतील.
10. (1) कोणतीही व्यक्ती, या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेल्या कोणत्याही अपराधाबद्दल सिद्धापराध ठरली असेल त्याबाबतीत अशा अपराध्याला सिद्धापराध ठरविणारे न्यायालय, असा अपराध जेथे घडला असेल तेथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अशा व्यक्तीचे नाव व निवासाचे ठिकाण अशा अपराध्यास व अधिनियमाखालील अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आले आहे, ही वस्तूस्थिती, तसेच, जो तपशील प्रसिद्ध करण्याची परवानगी देणे न्यायालयास योग्य ते उचित वाटेल असा अन्य तपशील, पोलिसांकडून प्रसिद्ध करण्याची व्यवस्था करण्यास सक्षम असेल.
(2) अशा आदेशाविरूद्ध दाखल केलेले अपील, कोणतेही असल्यास, अंतिमत: निकाली काढण्यात येईपर्यंत,
पोट-कलम(1) अन्वये अशी कोणतीही प्रसिद्धी करण्यात येणार नाही.
11. (1) राज्य शासनास, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, आणि पूर्व प्रसिद्धीच्या शर्तीस अधीन राहून, या नियम अधिनियमाची प्रयोजने पार पाडण्यासाठी, नियम करता येतील.
(2) या अधिनियमाखाली करण्यात आलेला प्रत्येक नियम, तो करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू असताना, एका अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा त्याहून अधिक अधिवेशनात, मिळून एकूण तीस दिवसांचा होईल इतक्या कालावधीकरिता, राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल, आणि ज्या अधिवेशनात तो अशा रितीने ठेवण्यात आला असेल, ते अधिवेशन किंवा त्याच्या लगतनंतरचे अधिवेशन किंवा अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे सहमत होतील किंवा तो नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे सहमत होतील आणि असा त्यांचा निर्णय, राजपत्रात अधिसूचित करतील तर, असा निर्णय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्याच्या दिनांकापासून तो नियम अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येईल किंवा यथास्थिती, अंमलात येणार नाही; तथापि, असा कोणताही फेरबदल किंवा विलोपन यामुळे त्या नियमान्वये पूर्वी करण्यात आलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाध येणार नाही.
12. (1) शंका निरसनार्थ असे घोषित करण्यात येते की, या अधिनियमातील कोणतीही गोष्ट पुढील बाबींना लागू असणार नाही :-
(1) कोणत्याही धार्मिक वा अध्यात्मिक स्थळाच्या ठिकाणी घातलेल्या प्रदक्षिणा, यात्रा, परिक्रमा या प्रकारचे उपासनामार्ग तसेच वारकरी सांप्रदायाच्या व इतर वार्या.
(2) हरिपाठ, कीर्तन, प्रवचने, भजने व इतर धार्मिक व पारंपारिक शास्त्रांचे तसेच प्राचीन विद्या व कलांचे शिक्षण, आचरण, प्रचार व प्रसार.
(3) दिवंगत संतांचे चमत्कार सांगणे, त्यांचा प्रसार, प्रचार व साहित्य वितरण करणे, तसेच शारीरिक व आर्थिक नुकसान न करणार्या प्रकारचे धर्मगुरूंचे चमत्कार सांगणे, त्याचा प्रसार, प्रचार व साहित्य वितरण करणे.
(4) घर, मंदिर, दर्गा, गुरूद्वारा, पॅगोडा, चर्च किंवा इतर प्रार्थनास्थळ, अशा ठिकाणी व्यक्तींकडून किंवा व्यवस्थापनांद्वारे शारीरिक व आर्थिक नुकसान न करणारे अशा प्रकारचे केले जाणारे, प्रार्थना, उपासना व सर्व धार्मिक विधी.
(5) सर्व धार्मिक उत्सव, सण, विधी, प्रार्थना, मिरवणूक व त्यासंबंधातील इतर धार्मिक कृत्ये, अंगात येणे, कडकलक्ष्मी, व्रतवैकल्ये, उपवास, नवस बोलणे, मन्नत मागणे, मोहरम मिरवणूक इत्यादी सर्व धार्मिक विधी.
(6) धार्मिक विधीनुसार लहान मुलांचे कान व नाक टोचणे, जैन धर्मियांद्वारा करण्यात येणारे केशलोचन या सारखे धार्मिक विधी.
(7) वास्तुशास्त्रानुसार तसेच जोशी-ज्योतिषी, नंदीबैलवाले ज्योतिषी व इतर ज्योतिषांद्वारे दिला जाणारा सल्ला, जमिनीखालचे पाणी सांगण्याबद्दल सल्ला.
(8) राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करेल अशी वर नमूद केल्याव्यतिरिक्त कोणतीही परंपरागत धार्मिक विधी व कृत्ये.
(2) पोट-कलम(1) च्या नोंद क्रमांक 8 नुसार शासनाने काढलेली कोणतीही अधिसूचना ती काढण्यात आल्यानंतर, शक्य तितक्या लवकर राज्य विधानमंडळाच्या प्रत्येक सभागृहापुढे ठेवण्यात येईल.
13. (1) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश, 2013 हा, याद्वारे, निरसित करण्यात येत आहे.
(2) अशा प्रकारे निरसन झाले असले तरीही, उक्त अध्यादेशाद्वारे करण्यात आलेली कोणतीही कृती किंवा कोणतीही कार्यवाही(काढण्यात आलेली कोणतीही अधिसूचना किंवा दिलेला कोणताही आदेश यांसह) ही, या अधिनियमाच्या संबंधित तरतुदीन्वये करण्यात आलेली कोणतीही कृती, कार्यवाही किंवा, यथास्थिती, काढण्यात आलेली अधिसूचना किंवा दिलेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
अनुसूची
(कलम 2(1) (ख) पहा.
1. भूत उतरविण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला, दोराने किंवा साखळीने बांधून ठेऊन तिला मारहाण करणे, काठीने किंवा चाबकाने मारणे, तिला पादत्राणे भिजवलेले पाणी प्यायला लावणे, मिरचीची धुरी देणे, त्या व्यक्तीला छताला टांगणे, त्याला दोराने किंवा केसांनी बांधणे, किंवा त्या व्यक्तीचे केस उपटणे, व्यक्तीच्या शरीरावर किंवा अवयवांवर तापलेल्या वस्तूंचे चटके देऊन इजा पोहोचविणे, व्यक्तीला उघड्यावर लैंगिक कृत्य करण्याची जबरदस्ती करणे, व्यक्तीवर अमानुष कृत्य करणे, व्यक्तीच्या तोंडात जबरदस्तीने मूत्र किंवा विष्टा घालणे किंवा यासारख्या कोणत्याही कृती करणे.
2. एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून, त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे; आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे.
3. अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने, ज्यामुळे जिवाला धोका निर्माण होतो किंवा शरीराला जिवघेण्या जखमा होतात अशा अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथांचा अवलंब करणे; आणि अशा प्रथांचा अवलंब करण्यास इतरांना परावृत्त करणे, उत्तेजन देणे किंवा सक्ती करणे.
4. मौल्यवान वस्तू, गुप्त धन आणि जलस्त्रोत यांचा शोध घेण्याच्या बहाण्याने वा तत्सम कारणाने करणी, भानामती या नावाने कोणतेही अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य आणि जादूटोणा करणे, आणि जारणमारण यांच्या नावाने व त्यासारख्या अन्य कारणाने नरबळी देणे, किंवा देण्याचा प्रयत्न करणे, किंवा अशी अमानुष कृत्ये करण्याचा सल्ला देणे, त्याकरिता प्रवृत्त करणे, अथवा प्रोत्साहन देणे.
5. आपल्या अंगात अतिंद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतिंद्रिय शक्ती संचारली असल्याचा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न ऐकल्यास वाईट परिणाम होतील अशी इतरांना धमकी देणे, फसवणे व ठकवणे.
6. एखादी विशिष्ट व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचे दूध आटवते, असे सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजूत निर्माण करणे, किंवा त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अपशकुनी आहे किंवा रोगराई करण्यास कारणीभूत ठरणारी आहे असे भासवणे, अशा व्यक्तीचे जगणे मुश्किल करणे, त्रासदायक करणे वा कठीण करणे; एखादी व्यक्ती सैतान असल्याचे किंवा ती सैतानाचा अवतार असल्याचे जाहीर करणे.
7. जारणमारण, करणी किंवा चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्नावस्थेत धिंड काढणे, किंवा तिच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
8. मंत्राच्या सहाय्याने भूत पिशाच्चांना आवाहन करून, किंवा भूतपिशाच्चांना आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात घबराट निर्माण करणे, एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भूताचा किंवा अतिंद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून घेणे, आणि तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून, त्याऐवजी तिला अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्य वा उपाय करण्यास प्रवृत्त करणे, जादूटोणा अथवा अमानुष कृत्ये करून किंवा तसा आभास निर्माण करून एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती घालणे, शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे.
9. कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदारे किंवा यासारखे उपचार करणे.
10. बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदल करून दाखवतो असा दावा करणे.
11. (क) स्वत:च विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाचातरी अवतार असल्याचे वा स्वत:च पवित्र आत्मा असल्याचे भासवून किंवा त्याच्या नादी लागलेल्या व्यक्ती पूर्वजन्मी तू माझी पत्नी, पती वा प्रेयसी, प्रियकर होता असे सांगून, अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे.
(ख) मूल न होणार्या स्त्रीला अलौकिक शक्ती द्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
12. एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची लुबाडणूक करणे.