डॉ.नरेद्र दाभोलकरांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागेल. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. दाभोलकरांचा आणि माझा बराच जुना परिचय. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक खंबीर कार्यकर्ता गमावलाय; पण व्यक्तीश: मी एक जवळचा मित्र गमावलाय. त्यांच्यावरील भ्याड हल्ल्यानं मी व्यथित झालोय. मात्र, हे कृत्य करणार्यांचा मूर्खपणा म्हणायचा, दुष्टपणा म्हणायचा, अविवेक म्हणायचा की अविचार हेच समजत नाही. हिंसेनं विचार दडपून टाकता येत नाहीत. महाराष्ट्रानं आजवर अनेक पुरोगामी विचाराची माणसं पाहिली आहेत. त्यांच्या विचारांनी समाजात परिवर्तनही घडवून आणलंय. अशा माणसांमध्ये नरेंद्र दाभोलकर हे नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. दाभोलकरांचं एका शब्दात वर्णन करायचं झाल्यास ‘माणूस असावा तर असा’ असंच म्हणावं लागेल. मी देव मानत नाही मात्र तरीही म्हणतो की काही माणसं देवासारखी असतात, त्यात दाभोलकर होते. त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होती. विलक्षण संघटनकौशल्य होतं. सकारात्मक विचारांच्या जोरावर ते समाजात परिवर्तन घडवू इच्छित होते. त्यासाठीच त्यांनी आयुष्य वेचले. अशा माणसाचा इतक्या निर्दयपणे खून होणं संतापजनक आहे.
दाभोलकरांची आणि माझी प्रवृत्ती निराळी. आमची सगळीच मतं जुळणारी नव्हती. आमची कार्यक्षेत्रंही निराळी होती. डॉक्टरी व्यवसाय आणि समाजोन्नतीचे विचार हे समधागे असले तरीदेखील माझ्या व्यक्तिमत्वातील अनेक कंगोरे त्यांच्यासारख्या शिस्तप्रिय आणि आदर्शवादी माणसाला पटणारे नव्हते. व्यक्तिश: मला त्यांच्या स्वभावात काही वैगुण्य अथवा दोष आढळण्याची शक्यताच नव्हती. कारण त्यांची संपूर्ण जीवनशैलीच अतिशय साधी आणि सरळ. त्यांचे विचारही अत्यंत रोखठोक आणि कार्यप्रणालीही तितकीच सोपी. मात्र माझं व्यक्तिमत्व यापेक्षा बरंच भिन्न आहे. मी अभिनयक्षेत्रात वावरणारा माणूस. त्यामुळे शिस्त हा आमच्या आयुष्यात नसलेला भाग; पण तरीही त्यांनी माझ्यासारख्या आळशी आणि बेजबाबदार माणसाला सांभाळून घेतलं. त्यामुळेच आमचं मेतकूट असं काही जमलं की दीर्घकाळ एकमेकांच्या सहवासात राहिलो. चळवळीच्या कामानिमित्त मी दाभोलकरांबरोबर महाराष्ट्र पालथा घातला. त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी झालो. या दीर्घ प्रवासात नरेंद्र दाभोलकर नावाचा कार्यकर्ता आणि नरेंद्र दाभोलकर नावाच्या माणसाची जवळून ओळख झाली. तो एक विलक्षण ध्येयानं झपाटलेला माणूस होता. खरं तर ‘अंनिस’च्या माध्यमातून केलेल्या कामामुळे उभा महाराष्ट्र त्यांना ओळखत होता; पण याविषयी किंचितही गर्व नसणारा हा माणूस. ‘साधना’सारखं साधन हातात असताना एखादा माणूस स्वत:चं किती स्तोम माजवू शकला असता, हे आपण जाणू शकतो. मात्र, दाभोलकरांनी कधीच आपल्या पदाचा आणि प्रसिद्धीचा गैरवापर घेतला नाही. त्यांच्या वागण्या-बोलण्यात आत्मप्रौढीचा लवलेशही नसायचा. आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. कित्येक दुर्गम ठिकाणं पालथी घातली. बरेचदा माझ्या गाडीनं प्रवास व्हायचा; परंतु एस.टी.अथवा रेल्वेनंही बर्याच ठिकाणी फिरण्याचा योग आला. प्रवासादरम्यान अनेक अडचणीही यायच्या. मात्र दाभोलकरांनी कधीच त्याचा बाऊ केला नाही. उलटपक्षी मला सुखकर होईल त्या सर्व मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार केला.
चळवळीच्या कार्यासाठी माझ्या प्रसिद्धीवलयाचा उत्तम उपयोग करून घेण्याचं कौशल्य दाभोलकरांनी दाखवलं. समाजामध्ये मनोरंजनविश्वातील व्यक्तीचं आगळं स्थान असतं. त्यांचा वेगळा पगडा असतो. दाभोलकरांनी हे नेमकं जाणलं होतं. त्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक मला बरोबर घेऊन काम केलं. अर्थात, या संपूर्ण प्रवासात त्यांनी मला कुठलीही तोशिस पडणार नाही याची काळजी घेतली. मी तसा खुशाल चेंडू माणूस. दाभोलकरांच्या दृष्टीनं बघायचं तर मला अतिरेकीच म्हणायला हवं. मी सिगारेट ओढायचो. खायचे चोचले होते; परंतु दाभोलकरांनी कधीच यावर निषेध नोेंदवला नाही. उलटपक्षी, एखाद्या ठिकाणी धुम्रपानास मज्जाव असला तर विशिष्ट ठिकाणी सोय आहे, असं ते आवर्जून सांगायचे. एका मित्राला असणारं हे प्रोटेक्शन होतं. खरं तर माझ्या व्यक्तिमत्वातील अनेक मुद्दे त्यांच्या मतांविरूद्ध होते. हे मुद्दे आम्हाला सहज वेगळं करू शकले असते. मात्र दुसर्यातील चांगल्या गुणांचा उपयोग करून घ्यावा आणि अन्य बाबींकडे दुर्लक्ष करावे, हा समजूतदारपणा दाभोलकरांकडे होता. म्हणूनच त्यांनी चळवळीच्या उभारणीसाठी माझ्या प्रसिद्धीवलयाचा छान उपयोग करून घेतला.
दाभोलकरांनी मला भरपूर हिंडवलं. त्या निमित्तानं मला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात फिरण्याचा योग आला आणि समाजजीवन जवळून पाहता आलं. या भ्रमंतीत त्यांनी केलेली संघटनेची बांधणीही अनुभवायला मिळाली. त्यांनी महाराष्ट्रभर खंद्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली होती. प्रत्येक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते उभे केले होते. जाऊ तेथे याचा अनुभव यायचा. कुठल्याही कार्यक्रमाचं उत्कृष्ट संयोजन हे त्यांचं आणखी एक विशेष होतं. दौर्यामधील एखादा कार्यक्रम रहीत होतोय असं कळल्यास ते लगेच फोनवर आगाऊ सूचना द्यायचे. थोडंसं निवांत असलो की विचारायचे, ‘चला निघायचं का?’ आणि आम्ही बाहेर पडायचो. आमचे महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले; पण जनमानसावर त्याचा प्रभाव अजमावण्याची संधी मिळाली नाही. झालेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. एके ठिकाणी शिबिरं घ्यायची आणि लगेचच पुढे सरकायचे, अशा व्यस्ततेचा तो काळ होता. मीही अभिनयक्षेत्रात व्यस्त होतो; पण त्यांच्याबरोबर घालवलेले दिवस विलक्षण भारलेले होते.
आम्ही दोघंही व्यवसायानं डॉक्टर. दाभोलकरांनी फारशी प्रॅक्टीस केली नव्हती; पण ते उत्तम डॉक्टर असल्याचे बरेच दाखले बघायला मिळाले. कारण जाऊ तिथे वैद्यकीय सल्ला विचारायला लोक यायचेच. दाभोलकरांनीही यावर आक्षेप घेतला नाही. कधी कधी ते एखाद्या केसविषयी माझाही सल्ला घ्यायचे. दोघेही डॉक्टर असल्याचा त्यांनी छान उपयोग करून घेतला होता. एक व्यक्ती म्हणून ते अत्यंत साधे होते. सकाळी उठल्यावर दणकून व्यायाम करणं ही त्यांची खासीयत. पहिल्या वेळी दौर्यावर गेलो तेव्हा सकाळी उठल्यावर दाभोलकर जोर-बैठका काढताना दिसल्याचं आजही आठवतंय. ते दृश्य पाहून मी चाटच पडलो होतो. दौर्यावर असताना जेवणाच्या वेळा अनियमित असत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या यजमानांकडे जेवण्याचा योग येत असे. ते इतक्या रसिकतेनं जेवायचे आणि स्वयंपाक रांधणार्या महिलेला प्रशस्तीपत्रक द्यायचे की, विचारू नका. साध्या लोणच्याचाही ते चवीनं आस्वाद घ्यायचे. मी थोडं लाडावलेलं प्रकरण आहे हे त्यांना ठाऊक होतं. म्हणूनच माझी उत्तम बडदास्त राखायचे. मला काय झेपणार नाही, हे त्यांना नेमकं माहीत होतं. असे सूर जुळल्यामुळेच आम्ही दीर्घकाळ एकत्र राहू शकलो.
आज दाभोलकर आपल्यात नाहीत, मात्र अशा भ्याड हल्ल्यांमुळे त्यांचे विचार संपणार नाहीत. दाभोलकरांनी त्यांच्यासारखेच असंख्य कार्यकर्ते घडवले आहेत. अहंभाव आणि गर्विष्ठपणाचा स्पर्शही होऊ न देता काम करण्याचे संस्कार दिले आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांची ही नवी पिढी त्यांच्या विचारांची धुरा निश्चितच पुढे नेईल.
–डॉ.श्रीराम लागू
नरेंद्रचं मरण वीरमरण!
नरेंद्रच्या निधनाची बातमी अमेरिकेत ऐकून मी पुरता हादरलो आहे. नरेंद्र व माझा 30 वर्षांपासूनचा स्नेह होता. तो सातार्यात समाजवादी युवक दलाचे कार्य करत असे. एक गाव-एक पाणवठा या चळवळीतही तो माझा सहकारी होता. आम्ही दोघांनी आळंदी येथे वारीच्या वेळी दलित व सवर्णांची घोडी बरोबरीने चालवावीत यासाठी आंदोलन केले. त्यावेळी वारकर्यांचा आम्हाला विरोध झाला होता.
नरेंद्रनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आपले जीवन वाहिलेले होते; त्याला तोड नाही. त्याने आपल्या चळवळीमध्ये तरूणांना ज्या प्रकारे सहभागी करून घेतले होते त्यातून त्याचे संघटनकौशल्य सिद्ध होते.
जादूटोणाविरोधी विधेयकाला वारकर्यांनी विरोध करणे अनाकलनीय आहे. कायद्याबद्दल गैरसमज पसरविले जातात ते सरकारने थांबविले पाहिजे. पूर्वी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा करतानाही ‘आता दलित आपल्या घरात येऊन पाणी घेऊन जातील.’ असा खोटा प्रचार करण्यात हीच सनातनी विचारांची मंडळी पुढे होती.
ज्या क्रूरपणे नरेंद्रची हत्या होते. त्यावेळी गृहमंत्री आर.आर.आबा करतात तरी काय? मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो.