डॉ.नरेंद्र दाभोलकरांची माझी पहिली भेट 1970 च्या आसपास सातारा येथे झाली. त्यावेळी मी दलित साहित्यावर लिहित होतो. विचारांमधली समानता आम्हाला जवळ घेऊन आली; परंतु नंतरच्या काळात मात्र आमचा संपर्क राहिला नाही. पुढे मी विश्वकोशाच्या कामामध्ये व्यस्त झालो. यानंतर आमची भेट 1998 मध्ये दाभोलकर साधनेचे संपादक झाले तेव्हाच झाली. तेव्हा मी सदाशिव पेठेतील एका हॉस्टेलमध्ये राहत होतो. तेथे ते दर सोमवारी आणि मंगळवारी येत असत. आम्ही एकत्र चहा घ्यायचो, जेवायचो आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो. वेगवेगळ्या लिखाणांवर बोलायचो. 1998 साली सानेगुरूजींची जन्मशताब्दी होती. तेव्हा ते मला म्हणाले, ‘साधनेतर्फे सानेगुरूजींच्या विशेषांकाचे प्रकाशन आपण करणार आहोत. तेव्हा त्याचे संपादन तुम्ही करा.’ त्यामुळे आमच्या गाठीभेटी वाढल्या; स्नेहबंध निर्माण झाले. यानंतरच्या काळात ते पुण्यात आले म्हणजे बहुतेक वेळा माझ्याकडे येत असत.
दाभोलकरांच्या बुद्धीप्रामाण्यवादाबाबत किंवा निरीश्वरवादाबाबत बोलले जाते; पण माझ्या दृष्टीने ते अतिशय विज्ञाननिष्ठ विवेकवादी होते. विज्ञानावर आधारित विवेकदृष्टीचा पाठपुरावा करणारे होते आणि त्यांनी सतत तो केला. त्यांच्यामध्ये अंधश्रद्धेसारख्या गोष्टी बसतच नव्हत्या. सुरवातीला त्यांनी काही प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांना जाणवले की हेच माझे ध्येय आहे, मिशन आहे. ज्या क्षणी त्यांना हे जाणवले तेव्हापासून ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आपली वाटचाल करू लागले.
दाभोलकरांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे ‘तिमिरातून तेजाकडे’ हे जे पुस्तक आहे ते म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचा आणि कार्याच्या वाटचालीचा अजेंडाच आहे. एका बाजूला कार्य करताना कार्यकर्त्यांना बौद्धिक, मानसिक सामर्थ्य द्यावे लागते. चळवळ रात्रंदिवस सुरू हवी असते. कार्यकर्ता सतत व्यस्त असावा लागतो. त्याला मानसिक, बौद्धिक दृष्टीने व्यस्त ठेवण्यासाठी लेखन लागत असते. त्यादृष्टीने दाभोलकरांनी त्यांचे लेखन केले. अतिशय सकस आणि तत्त्वज्ञानाचा आधार असणारे हे लेखन आहे. विशेष म्हणजे दाभोलकर हे स्वत: डॉक्टर म्हणजे विज्ञानशाखेचे विद्यार्थी असूनही मराठीत त्यांनी चांगल्या दर्जाचे लेखन केले ही साधी गोष्ट नाही. त्यांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम त्यांचे लेखनच करेल, याची मला खात्री आहे. या लेखनातून त्यांनी चळवळीचा मार्ग अतिशय सुस्पष्टपणे मांडला आहे.
दाभोलकरांच्या लेखनामध्ये विधानांचा काटेकोरपणा दिसून येतो. त्यामध्ये अतिशय सुस्पष्टता आहे. साधेपणाने ते बोलत, लिहित आणि विचारही करत असत. त्यांची आंतरीक शक्ती किंवा विचारशक्ती सदैव जागृत होती. एकावेळी शेकडो विचार त्यांच्या डोक्यात असायचे. व्यक्तीशी बोलतानाही त्यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू असायचे; पण त्यांच्या विचारात अतिशय पारदर्शकता होती. संदिग्धता किंवा दांभिकता नव्हती. ते नेहमी पुराव्यानिशी बोलत असत. त्यांच्या लेखनाचे वैचारिक वाङ्मयात फार महत्वाचे स्थान आहे. भविष्यात हे लेखन विद्यापीठांमध्ये अभ्यासाला ठेवले पाहिजे. म्हणजे पुढच्या पिढीमध्ये त्या दृष्टीने वैचारिक प्रगल्भता आणि सुस्पष्टता निर्माण व्हायला मदत होईल. चळवळीचे काम करणारे अनेक नेते दिसतात; पण चळवळीचे आणि चळवळीसाठी लेखन करणारा हा एकमेव नेता होता. चळवळीचे एवढे मोठे काम करून आणि त्यादृष्टीने मौल्यवान असे लेखन करून त्यांनी एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट करून दाखवली आहे. माणसाला आपल्या आयुष्यात ध्येयाचा रस्ता सापडण्यासाठी कमी-अधिक वेळ लागतो हे खरे आहे. नेमका रस्ता सापडणे हे कठीणही आहे; पण एकदा तो सोडल्यानंतर दाभोलकर त्यावरून अतिशय डोळसपणाने गेलेले आहेत. त्यांना मध्ये थांबणे माहीतच नव्हते. दाभोलकरांना मराठीच्या कविता खूप आवडत असत. त्यांचे पाठांतर खूप दांडगे होते. अनेकदा त्यांच्या लेखनातून आणि बोलण्यातून वेगवेगळ्या कवितांचा उल्लेख होत असे. थोडक्यात, ते एक परफेक्ट मॅन होते.
‘साधना’ मासिकासाठी त्यांनी खूप काही केले आहे. साधनेचे काम त्यांनी अतिशय अद्ययावत केले आहे. हे साप्ताहिक सुशोभित केले. मला प्रश्न पडला होता की, त्यांच्यानंतर ‘साधने’चे काय होईल? पण दाभोलकरांनी विनोद शिरसाट यांची निवड करून हा प्रश्न आधीच मार्गी लावला आहे. विनोद शिरसाट म्हणजे दाभोलकरांनी साधनेला दिलेली मोठी देणगीच आहे. परवा दाभोलकरांच्या हत्येनंतरही साधनेचा अंक प्रेसमध्ये छपाईला गेला. या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. या सर्वातून एक गोष्ट स्पष्ट होते की, दाभोलकरांना माणसांची अचूक पारख होती. आज आम्हाला ‘साप्ताहिक साधना’ची काळजी नाही. दाभोलकरांचे हे जे योगदान आहे ते अतिशय मौल्यवान आहे. कारण संस्था ही इमारतीमुळे किंवा अन्य वस्तूंमुळे चालत नाही तर तुमचे काम किती उत्तम दर्जाचे आहे त्यावर चालत असते. मला आठवतंय, दाभोलकर दोन दिवसांसाठी जरी पुण्यामध्ये साधनेच्या कामासाठी येत असले तरी तेवढ्या वेळात ते आठ दिवसांचे काम करून जात असत. शिवाय या कामासाठी त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत. त्यांचे साहित्यसृष्टीशी जवळचे नाते होते. सर्व साहित्यिकांशी व समीक्षकांशी अतिशय चांगले संबंध होते. माझ्यावर त्यांचा अतिशय जीव होता. मला त्यांनी राहायला जागा दिली. मी हॉस्टेलमधून बाहेर पडण्यामध्ये त्यांचा वाटा मोठा होता. दाभोलकरांचे वाचन अफाट होते. माझ्याकडे असणारी पुस्तके ते नेहमी वाचत असत, चाळत असत. त्यांचा जनसंपर्कही खूप मोठा होता; पण एवढे असूनही, हा या जगातील माणूस असूनही, तो मुलखावेगळा होता, खूप वेगळा होता.
– रा. ग. जाधव