जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी खालील दोन बाबी समजून घ्याव्यात.
1) दक्षता अधिकारी यांची जबाबदारी व कर्तव्ये
जादूटोणा विरोधी कायद्याखाली नियुक्त केलेला एक विशेष राजपत्रित अधिकारी असतो. कलम 5 खाली राजपत्रात प्रसिद्धी करून नेमणूक होते. या अधिकार्याचा दर्जा पोलीस निरीक्षक गट ब या दर्जाच्या अधिकार्याला जो दर्जा असतो तोच ‘दक्षता अधिकार्याचा दर्जा असतो’ दक्षता अधिकार्याकडे या कायद्यात केलेल्या तरतुदी आणि त्याखाली केलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम दिलेले आहे. त्यासाठी या अधिकार्यास खाली दिलेले विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
1) दक्षता अधिकार्याचे अधिकार क्षेत्र निश्चित केले जाईल. त्या अधिकार क्षेत्रामध्ये एक किंवा अनेक पोलीस ठाणे असू शकतात. या कायद्यातील तरतूदी किंवा नियम यांचे उल्लंघन होऊन गुन्हा घडल्यास त्याची तक्रार या कायद्यातील अनुसूचित नमूद केलेल्या कृत्यास बळी पडलेली व्यक्ती किंवा तिच्या वतीने अन्य कोणतीही व्यक्ती ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात किंवा हद्दीत तो गुन्हा घडला असेल त्या पोलीस ठाण्याच्या अंमलदाराकडे किंवा पोलीस अधिकार्याकडे आपली तक्रार नोंदवू शकतो. अशा तक्रारींची माहिती घेत राहणे, त्या तक्रारींची कार्यवाही तात्काळ सुरू झाली किंवा नाही, तिचा पोलीस तपास हाती घेऊन, त्याची विना विलंब कार्यवाही होत आहे किंवा नाही, त्या पोलीस तपासाची दैनंदिन प्रगती, तपासादरम्यान अटक केलेले आरोपी व त्यांची माहिती, त्यांच्यावर केलेली कारवाई, त्या पोलीस ठाण्याच्या तपास अधिकार्याने केलेले जप्ती पंचनामे, जागेचे पंचनामे, साधनांची जप्ती, व्हिडीओ चित्रीकरण इत्यादीची माहिती दक्षता अधिकार्याने घेत राहणे व ती अद्ययावत ठेवणे तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत तपास अधिकार्यापुढे निर्माण होणार्या अडचणी दूर करणे, त्याला सल्ला व मार्गदर्शन देणे इत्यादी महत्वाचे कर्तव्य दक्षता अधिकार्याने पार पाडावयाचे आहे.
त्याच्या हद्दीत असणार्या पोलीस ठाण्यामध्ये एकाच गुन्ह्याच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी काही घटना घडल्या असतील तर त्याबाबत त्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये समन्वय साधून पोलीस तपास सुरळीत चालू ठेवण्यास मदत करणे.
दक्षता अधिकार्याकडे जर पीडित व्यक्ती किंवा तिच्या वतीने कोणीही सरळ तक्रार केल्यास दक्षता अधिकार्याने संबंधित व्यक्तींना, संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करण्याविषयी मार्गदर्शन करणे किंवा गुन्हा घडला असेल, त्याची माहिती दक्षता अधिकार्याला मिळाली असेल. परंतु तक्रार करण्यास कोणी पुढे आलं नसेल तर दक्षता अधिकार्याने त्यावेळी स्वत: दखल घेऊन संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार दाखल करावी.
सूचना :-
शासनाने हा कायदा नवीन असल्यामुळे व या कायद्याची जादूटोणा, मंत्रोपचार, अनिष्ट प्रथा, अघोरी कृत्ये इत्यादीबाबत अंमलबजावणीत अडथळा निर्माण करण्याच्या दृष्टीने काही हितसंबंधी लोक तक्रार दाखल करून घेतांना किंवा तिचा तपास करताना पोलिसांच्या कायदेशीर कर्तव्यात अडथळा आणऊ शकते. म्हणून पोलीस ठाण्यांना सल्ला, मार्गदर्शन करणारे व त्यांचा तपास यंत्रणेवर देखरेख करणारे दक्षता अधिकारी हे उत्तम प्रकारे प्रशिक्षित असले पाहिजे. या अधिकार्यांना त्या कायद्याचे ज्ञान, त्याखाली तक्रार करण्यात आलेले नियम, त्यासंबंधीत आय.पी.सी.सारख्या किंवा भ्रूणहत्या किंवा महिलांचा छळ इत्यादीसंबंधी असणार्या तरतूदी यांचेही ज्ञान असले पाहिजे. या कायद्यातल्या अनुसूचित नमूद केलेल्या अनिष्ट अघोरी व मनुष्य प्राण्याच्या जीवास व संपत्तीस धोका पोचविणार्या ज्या ज्या कृती नमूद केल्या आहेत. त्या प्रथा व कृती यांचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. त्याची वैज्ञानिक कारणमीमांसा माहिती असली पाहिजे. त्याचप्रमाणे अज्ञानी, अशिक्षित किंवा विशेषत: ग्रामीण भागातील व काही ठिकाणी शहरी भागातील सुद्धा सुरू असलेल्या अशा प्रथांची व त्यामुळे होणारी जीवीत, संपत्तीच्या हानीची, फसवणुकीची माहिती व ज्ञान असणे आवश्यक आहे.
तरी वरील संदर्भ लक्षात घेऊन तज्ञ व्यक्तींकडून याबाबत तसेच कायदेतज्ञांकडून दक्षता अधिकार्यांचे प्रशिक्षण गांभीर्याने केले पाहिजे. वर्षातून एकदा तरी रिफ्रेशर कोर्स झाले पाहिजे.
2) तक्रार कशी व कुठे करावी?
तक्रार करताना –
1) ती कुठल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा घडला आहे त्याची माहिती घेणे.
2) गुन्ह्यात सहभागी असलेल्या वा व्यक्तींची जेवढी माहिती तक्रारकर्त्यांना मिळेल तेवढी तात्काळ गोळा करणे. त्यात 1) नाव, टोपण नाव, 2) व्यक्तीचे वर्णन, 3) अंदाजे वय, 4) त्याचे नेहमी राहण्याचे ठिकाण, 5) त्याच्यासोबत राहणारे, त्याचे भक्त, सहकारी, मदतनीस, त्यांची संख्या व तयंची ओळख पटेल एवढी माहिती, 6) त्यांनी केलेल्या अघोरी व अनिष्ट कृत्याचे थोडक्यात परंतु सुस्पष्ट वर्णन, 7) पिडिताचे नाव, वय, ओळख पटेल एवढी माहिती, 8) पीडिताच्या कुटुंबीय, पालक किंवा नातेवाईकांची नावे, 9) पीडित कुठे आढळून येईल त्याची माहिती.
3) गुन्ह्यात वापरलेली साधने, उदा.विविध प्रकारची जडीबुटी, अग्नीकुंड, पुजेचे साहित्य, हत्यार(काठी, चाबुक, इतर पारंपरिक साधने)
4) प्रत्यक्षदर्शींची नावे, ओळख व पत्ते.
5) पीडिताचे झालेली शारीरिक व सांपत्तिक हानी, मृत्यू, छळामुळे झालेल्या जखमा व इजा, डांबून ठेवले असल्यास त्या जागेची माहिती व वर्णन, वाहनांचा वापर केला असल्याने वाहनांचा नंबर व वर्णन, व्हिडीओ चित्रीकरण किंवा फोटो काढले असल्यास त्याच्या सीडी किंवा पेनड्राईव्ह याची माहिती तक्रारीत आवश्यक.
6) फसवणूक झाल्याचे स्पष्ट नमूद केले पाहीजे.
7) तक्रारीवर शक्यतो पीडिताची सही, ते शक्य नसल्याचे त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व त्यांच्या वतीने सहानुभूतीदार किंवा मदत करणारे समाजसेवक त्यांची नावे-सही देणे आवश्यक.
8) तक्रार थोडक्यात स्पष्ट व ठळक असावी. गुन्हेगारांची नावे, ओळखीच्या खुणा, साक्षीदारांची नावे, त्यांची ओळख, गुन्ह्यांचे ठिकाण, वापरलेली साधने, गुन्ह्याची वेळ व गुन्ह्यात सहभागी, मदत करणार्यांची नावे वर्णनासह, पीडिताचा झालेला छळ, शारीरिक व सांपत्तिक हानी, अत्याचार व अघोरी कृती या सर्वांची तक्रारीत माहिती द्यावी.
9) कलम 154 खाली तक्रारींची फिर्यादीस त्याच ठिकाणी नक्कल देणे पोलीस अधिकार्यावर बंधनकारक आहे. त्याचा आग्रह धरावा.
10) तसेच 24 तासाच्या आत सदरहू तक्रारीची प्रत पोलीस ठाणे ज्या न्यायदंडाधिकार्याच्या न्यायालय अधिकार कक्षेत असेल, त्याच्याकडे पोलीसांनी जमा करणे सक्तीचे आहे. ती जमा झाली किंवा नाही त्याची दुसर्या दिवशी खात्री करून घेणे आवश्यक आहे. याही ठिकाणी विनंती अर्ज करून फिर्यादीची नक्कल मिळू शकते.
– अॅड. रंजना गवांदे
(मोबा.9850491611)