महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नाशिक येथे 8 ऑगस्ट 2013 रोजी सदर परिषद समितीच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित करण्यात आली होती. जातपंचायतीच्या प्रभावाखाली येऊन नाशिकमध्ये एका पित्याने त्याच्या गर्भवती मुलीचा गळा आवळून जीव घेतल्याची घटना 29 जून 2013 रोजी नाशिकमध्ये घडली. विविध प्रसारमाध्यमांतून याबाबत निषेध आणि चौकशीचा सूर उमटला ‘दै.सकाळ’ने ह्याबाबत विशेष बाजू मान्यवरांच्या प्रतिक्रियांसह मांडली. ‘सकाळ’ समूहाचे समन्वय संपादक उत्तम कांबळे यांच्याशी नाशिकच्या अंनिस कार्यकर्त्यांसह राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी याबाबत सखोल चर्चा केली. दरम्यानच्या काळात निषेध मोर्चा, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणे, विविध समाजातील जातपंचायती व त्यांच्या कारभाराची माहिती मिळवणे, बहिष्कृत कुटुंबांचा, व्यक्तींचा शोध घेणे असे कार्यक्रम अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जिद्दीने चालू ठेवले. या सर्वांमध्ये कृष्णा चांदगुडे यांचा विशेष पुढाकार होता.
एकेकाळी पोलीस, कायदा, न्यायालय अशी कशाचीच सोय नसताना समाजातील सुव्यवस्थेसाठी सुरू झालेल्या जातपंचायत व्यवस्थेने भलेही समाज टिकविण्यात महत्वाची भूमिका वठवली असेल मात्र याच जातपंचायतींची वाटचाल प्रतिगामित्वाच्या दिशेने सुरू आहे. हे भयानक वास्तव सखोल चौकशी, पाठपुरावा केल्यानंतर कार्यकर्त्यांच्या लक्षात आले याबाबत अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर व उत्तम कांबळे यांच्याशी वारंवार कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला. भटक्या विमुक्त समाजासह उच्चवर्णीय समाजातही जातपंचायतीची अमानुष, अन्याय कठोर न्यायनिवाडा करण्याची समांतर न्यायव्यवस्था कार्यरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. जातपंचायतींची वाळीत टाकलेली, बहिष्कृत केलेली, आर्थिक दंड ठोठावलेली व असा दंड बळजबरीने वसूल केलेली कुटुंबे व व्यक्ती ‘अंनिस’चा पुढाकार पाहून पुढे येण्यास सरसावली. त्यामध्ये अण्णा हिंगमिरे यांनी मोठे धाडस दाखविले. त्यामुळे जातपंचायत सदस्यांना 4 जुलै 2013 रोजी अटक झाली. पुढील चौकशी, तपास आणि घटनेशी संबंधित व्यक्तींना अटक करण्याचे सत्र नाशिकच्या पोलिसांनी सुरू केले. त्यामुळे इतर समाजातील जातपंचायतींनी पिडलेल्या व्यक्ती ‘अंनिस’शी संपर्कात येऊ लागल्या. काहींनी पोलिसात तक्रार करण्याचे धाडस दाखविले.
काही ठिकाणी पोलिसांनी कायद्याबाबत तरतूद नसल्याचे सांगून पीडित व्यक्तींच्या तक्रारी दाखल करून घेण्यास नकार दिला. अशा प्रसंगात अंनिसचे कार्याध्यक्ष (नाशिक शहर) यांनी समन्वयाची भूमिका घेऊन तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांना प्रवृत्त केले. लासलगावच्या मालतीबाई गरडे हे त्यातील एक उदाहरण आहे.
एकूणच सर्वांच्या विचारविनिमयातून जातपंचायतीला मूठमाती देण्यासंबंधीची परिषद घ्यावी, यावर सर्वांचे एकमत झाले. अशी राज्यस्तरीय परिषद नाशिक येथेच घ्यावी आणि 15 ऑगस्टपर्यंत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्रात शक्य तेवढ्या ठिकाणी अशी परिषद, परिसंवाद, व्याख्याने अशा स्वरूपात कार्यक्रम घ्यावेत असे ठरले. यासंदर्भात डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि अविनाश पाटील यांनी पाठविलेल्या प्रेसनोटच्या आधारे दि.3/8/2013 रोजी नाशिक येथे कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेत, नाशिक येथे 8/8/2013 रोजी जातपंचायत मूठमाती राज्यस्तरीय परिषद घेण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन करून, डॉ.दाभोलकर, उत्तम कांबळे, अविनाश पाटील यांच्याशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची तयारी सुरू केली. त्याचाच परिपाक म्हणून दि.8/8/2013 रोजी नाशिक येथे जातपंचायत मूठमाती राज्यस्तरीय परिषद घडून आली. परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.नागनाथ कोतापल्ले यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जातपंचायत मूठमाती राज्यस्तरीय परिषद आयोजित केल्याबाबत महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात हा प्रसंग एक मैलाचा दगड ठरेल असा आशावाद व्यक्त केला. 800 वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनाही जातपंचायतींनी अशाच प्रकारे बहिष्कृत केले. महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे अलिकडच्या काळातील उदाहरण. भारताचे माजी राष्ट्रपती झैलसिंगांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींनांही जातपंचायतीचे अत्याचाराचे, बहिष्काराचे चटके सहन करावे लागले. अशा जात पंचायतींना मूठमाती देण्याचा एल्गार महाराष्ट्र अंनिस, इतरांच्या मदतीने करीत आहे. अशा प्रचंड सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम अंनिसने सुरू केले. त्याबाबत सर्वांचा त्यांना पाठींबा मिळावा, असे प्रतिपादन डॉ.नागनाथ कोतापल्ले यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. नाशिकमध्ये ज्या ठिकाणी गर्भवती मुलीचा गळा आवळून तिच्या पित्याने तिचा जीव घेतला, त्या ठिकाणची माती आणून, नुकत्याच उगवलेल्या रोपट्याच्या मुळांना मान्यवरांनी मूठ-मूठ माती देऊन समतेचा पुकार दर्शवित, एका अनोख्या पद्धतीने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कामगार नेते कॉम्रेड डॉ.डी.एल.कराड, नाशिकचे पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते.
नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे झालेल्या ह्या परिषदेला ज्येष्ठ संपादक व साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, राम भायटे, कॉम्रेड राजू देसले, विविध समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींसह राज्यभरातून आलेले, जातपंचायतीने बहिष्कृत केलेले, पीडित बांधव एकएकटे तसेच कुटुंब, नातेवाईक यांच्यासह परिषदेला हजर होते. पीडित व्यक्तींचे अनुभव कथन अत्यंत दाहक, चीड आणणारे, काळीज पिळवटून टाकणारे होते. नाशिकच्या अण्णा हिंगमिरेने कथन केले की, त्यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने त्यांच्या जोशी भटक्या समाजाच्या जातपंचांनी त्यांना बहिष्कृत केले. जातपंचायत ही हितसंबंधी राजकारणाला बढावा देते म्हणून अशा जातपंचायतीला नकार देऊन, त्यांच्या हिंस्त्रतेला, क्रूरतेला, अमानुषपणाला कायद्याच्या चौकटीतून, प्रशासकीय अधिकार्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कडक कारवाई करावी असे प्रतिपादन हिंगमिरे यांनी केले. पुण्याच्या काका धर्मावत यांनी सांगितले की, पंडीत मदनमोहन मालवीय यांना सुद्धा जातपंचायतीने बहिष्कृत केले होते. जातपंचायत केवळ पैसा उकळविण्यासाठी गौड ब्राह्मण समाजातील कुटुंबांना वेठीस धरते असा माझा अनुभव आहे. आणि त्यांच्या विरोधात बिबवेवाडी, पुणे येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे धर्मावत यांनी सांगितले.
लासलगावच्या मालतीबाई गरड म्हणाल्या की, त्या मराठा समाजाच्या आहेत. चाळीस वर्षांपूर्वी जोशी भटक्या समाजातील व्यक्तीशी प्रेमविवाह झाला. पण अशा विवाहाला त्या समाजात मान्यता नसल्याने बहिष्कृत केले. पतीचे निधन झाले तरी अंत्यविधीलाही त्या समाजातील लोक आले नाहीत. हे सगळे जातपंचायतीच्या दहशतीमुळे घडले. पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यासाठी गेले तर तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती. कृष्णा चांदगुडे यांनी मदत केली तेव्हा तक्रार दाखल करून घेतली.
अकोल्याच्या रमेश जाजू यांनी सांगितले की, समाजवास्तूच्या वादातून बहिष्कृत केले. मुलांमुलींचे लग्न जमविण्यात अडथळे आणले गेले. शेवटी मुलीच्या आंतरजातीय विवाह करून दिला. माहेश्वरी समाजात त्यांच्या मुला-मुलींची लग्न जातपंचायतीने होऊ दिली नाहीत.
भगवान गवळी हे पुण्याचे असून लिंगायत गवळी समाजाचे आहेत. त्यांनी ब्राम्हण समाजातील मुलीशी विवाह केला त्यामुळे त्यांच्यासह आई-वडिलांनाही जातीबाहेर पडण्याची वेळ आली. मात्र आईवडिलांना भेटणार नाही ह्या अटीवर बहिष्कृतपण टाळले. तब्बल वीस वर्षांनी आई-वडिलांची भेट झाली.
प्रमिलाताई चौरे यांनी कोकणा समाजातील व्यक्तीशी विवाह केला. माहेर-सासरकडून विरोध झाला. अंनिस कार्यकर्ते व राजू देसले यांनी मोठा धीर दिला. मुलींच्या लग्नासाठी कोकणा वधू-वर मंडळाकडे गेले तर त्यांनीही नकार दिला. आंतरजातीय विवाह केला, हा काय गुन्हा केला काय? माणूस हीच जात आणि माणुसकी हाच धर्म असं मी समजते. असे प्रमिलाताई चौरे म्हणाल्या.
शिवाजी भरड हे लातूर येथील जोशी समाजाचे. जातपंचायतीने मुलीच्या लग्नाला विरोध केला. ज्या जातपंचायत सदस्यांना अटक झाली, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मर्डर झालेल्या मुलीच्या घटनेत इतर पंचांना सहआरोपी करावे. त्यासाठी उज्ज्वल निकम सारखे वकील मिळावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या गुलबर्गा भागात ह्या समाजात 52 जातपंचायती आहेत. त्यांनी तेथील 108 कुटुंबांना जातीबाहेर काढले होते. मात्र नाशिकच्या घटनेनंतर लगेच ह्या 108 कुटुंबांना जातीत घेण्याचा निर्णय जात पंचायतींनी घेतला. असेही शिवाजी गरड यांनी सांगितले. सर्वच जातींतील जातपंचायती संपविण्यासाठी सर्वांनी जाणिवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
नाशिकचे हिरामण लोखंडे यांनी जातपंचायतीच्या आदेशान्वये सात हजार दंड भरल्याचे सांगितले.
रोहिणीताई ससाणे यांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह झाला. म्हणून नातेवाईकांनी छळ केला. मोठा भाऊ पंचांतील एकाचा जावई आहे. त्याला मात्र जातीबाहेर टाकले नाही. उरलेल्या आम्हां भाऊ-बहिणींना जातीबाहेर टाकले. मुलीचे लग्न मुंबईला जमविले तर जातपंचायतीने उलट आरोप केला की, मुलीला मुंबईला नेऊन विकून टाकले. पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी माझ्या विरोधात असा आरोप माझ्यावर ठेवला. मला दोन अॅटॅक येऊन गेल्याचेही रोहिणीताई ससाणे यांनी सांगितले. जातपंचांनाच आम्ही जातीबाहेर टाकतो असे उद्गार ससाणे यांनी काढले.
उरळी कांचन येथील पारधी समाजाचे भास्कर भोसले यांनी सांगितले की, ह्या समाजात अजूनही स्त्रीला लग्नानंतर देवपूजा करण्याचा अधिकार नाही.
जोशी समाजाच्या एका शिक्षकाने सांगितले की, माझ्या मुलीचे लग्न मुंबईकडील जोशी समाजातील मुलाशीच केले. मात्र जातपंचायतीने सांगितले की, मुंबईकडील ते लोक आपल्या समाजाचे नाहीत. मी त्याबाबत पुरावेही सादर केले. मात्र त्यांनी मानले नाही. 10 वर्षांपासून मला जातीबाहेर काढले आहे. समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात मला आमंत्रण नसते. माझा भाऊ रेंजर आहे तरीसुद्धा याबाबत तो जातपंचायतीला जाब विचारू शकत नाही. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याबाबत केलेल्या धाडसाचे त्यांनी कौतुक केले.
पुण्याचे जगदीश उणेया यांनी सांगितले की, जातीत पुन्हा यायचे असेल तर एक लाख दंड भरा. सर्व समाजाला बोलवा, त्यांना जेवण द्या. मग समाजात पुन्हा घेण्याचा विचार करू. 50 कुटुंबांना जात पंचायतीने बहिष्कृत केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांमधूनही जातपंचायतीबाबत प्रबोधन, सुसंवाद प्रसंगी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा सूर उमटला. नाशिकचे पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी याबाबत नाशिकमधील घडलेल्या घटनेची थोडक्यात माहिती देऊन नमूद केले की, ह्या देशात राज्यघटना ही सर्वोच्च असून कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कॉम्रेड डॉ.डी.एल.कराड म्हणाले की, महागाई वाढली, सर्वच वस्तूंच्या किंमती वाढलेल्या पण माणसाची किंमत मात्र कमी झाली. घटली. नाशिकमधील घटना घडेपर्यंत जातपंचायतीच्या दहशतीबाबत आपण सर्वच अनभिज्ञ होतो. मात्र अंनिस व इतर काही संघटनांनी हे प्रकरण लावून धरले. पाठपुरावा केला. म्हणून हा ज्वलंत सामाजिक प्रश्न समोर आला. म्हणून आता ही एका चळवळीची जबाबदारी उरली नाही. जातपंचायतीला मूठमाती हे पाऊल, जातीला मूठमाती असे आपण सर्वजण करू शकतो. असे डॉ.कराड यांनी सांगितले.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी यापुढील ‘जात पंचायतीला मूठमाती अभियान’ कसकसे राबविले जाणार आहे ह्याविषयी माहिती दिली. अंनिसने यापूर्वीच ‘जोडीदाराची विवेकी निवड’ उपक्रम-मोहिम सुरू केली असून ठिकठिकाणी त्याबाबत चर्चा, परिसंवाद, व्याख्याने होत असल्याची माहिती त्यांनी परिषदेत दिली.
अंनिसचे नाशिक शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनीही मागील महिना-दीड महिनाभरात झालेल्या घटनांची माहिती परिषदेला करून दिली. जवळजवळ महिनाभर ते स्वत: घराबाहेर राहून पीडितांच्या सतत संपर्कात राहिले. त्यांना धीर दिला. परिषदेला येण्यासाठी प्रवृत्त केले. पोलिसांना तक्रारी नोंदवून घेण्यासाठी विनंती केली. नाशिकच्या इतर सर्व कार्यकर्त्यांनीही ह्या कामी सर्वतोपरी मदत, सहकार्य केल्याचे चांदगुडे यांनी नमूद केले.
महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष व परिषदेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी प्रथमत: नाशिकच्या सर्व कार्यकर्त्यांना अशी परिषद आयोजित केल्याबाबत आपल्या अध्यक्षीय भाषणात धन्यवाद दिले. उत्तम कांबळे यांनीही कार्यकर्त्यांना मोठी मदत व मार्गदर्शन केल्याबाबत त्यांना धन्यवाद दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जातनिर्मूलनाची त्रिसूत्री नमूद करताना डॉ.दाभोलकरांनी सांगितले की, उत्पादनांच्या साधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह अशी ही त्रिसूत्री आहे. यापैकी आंतरजातीय विवाह लावणे आणि तोही साध्या पद्धतीने करणे हे काम अंनिसने मोठ्या प्रमाणावर सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. समितीचे राज्यप्रधान सचिव माधव बावगे यांनी याबाबत मोठे काम सुरू करून, चालू ठेवल्याचे सांगितले. जातपंचायतीला मूठमाती देण्याचा संघर्ष हा मानवमुक्तीचा लढा असून, त्याला नाशिक मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाच्या संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचे ते म्हणाले. संविधान आपण सर्वजण मान्य करतो तर जातपंचायत त्याच्याविरोधात कसे काय वर्तन करते? असा प्रश्न करून, ह्या जातपंचायतींविरूद्ध त्यांना मूठमाती देण्यासाठी अधिक सक्षमतेने लढाईची तयारी आपणांस करावी लागणार आहे, असा आशावाद डॉ.दाभोलकरांनी व्यक्त केला.
जातपंचायत मूठमाती राज्यस्तरीय परिषद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना दोन प्रमुख गोष्टी कराव्या लागल्या. त्या म्हणजे एक सदर परिषदेसाठी जातपंचायतींनी पीडित असलेल्या विविध समाजातील बांधवांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटणे, त्यांच्या व्यथा-प्रथा जाणून घेणे, त्यांना धीर-धाडस देऊन परिषदेसाठी आणणे, येण्यास परावृत्त करणे, जमले तर विविध जातपंचायती सदस्यांनाही परिषदेस येण्यास, त्यांचे मन वळविणे आणि दुसरी बाब निधी संकलनाची! नाशिकच्या सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्व क्षमता, मर्यादा वापरून आपले योगदान दिले. त्यामध्ये समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही मोलाची साथ दिली. अंनिसचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे, प्रधान सचिव सुधीर धुमाळ, शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे, प्रधान सचिव प्रा.डॉ.लक्ष्मीकांत कावळे, अध्यक्ष वि.तु.जाधव, राज्य सदस्य व राष्ट्रीय अनुसंधान कार्यवाह प्रा.डॉ.सुदेश घोडेराव, सिन्नरहून अरूण घोडेराव, ना.रोड्ये, प्रा.इंदवे, जितेंद्र भावे, युवराज बावा, डॉ.अशोक गोसावी, राजू देसले, छात्रभारतीचे अॅड.शरद कोकाटे, अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.शशांक कुलकर्णी, प्रा.डॉ.मिलिंद वाघ, मंगला गोसावी, डॉ. गोसावी, विजया गोराणे, सौ.धुमाळ आदीं कार्यकर्ते परिषदेत सहभागी होते.
– डॉ. टी. आर. गोराणे
9403551345