“जातपंचायतीविरूद्धच्या संघर्षात उत्साह नकोच. फार विचारपूर्वक पुढे नेण्याचा हा लढा आहे. जातपंचायतींच्या तळाशी काय आहे, त्याचा विचार या संघर्षात करावाच लागेल”, अशी अपेक्षा ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी जळगाव येथे व्यक्त केली.
‘जात पंचायतीला मूठमाती’ संघर्ष परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांतर्फे कांताई सभागृहात ही परिषद सुरू झाली. कुंडीतील रोपाला कांबळे यांच्या हस्ते पाणी घालण्यात येऊन परिषदेचे उद्घाटन झाले. ‘अंनिस’चे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते. मानसोपचारतज्ज्ञ डॉ.हमीद दाभोलकर, डॉ.प्रदीप जोशी, प्राचार्य डॉ.अनिल लोहार, जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उत्तम कांबळे म्हणाले, की ज्या जातीमध्ये जातपंचायती अस्तित्वात आहेत, अशा बहुतांश जातींना प्रचलित व्यवस्थेत प्रतिनिधित्वच नाही. भटक्या-विमुक्तीतून निवडून येणार्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. सत्तेची संधी मग मिळवायची कुठे, असा प्रश्न या जातपंचायतीतील नेत्यांसमोर आहे. धर्मसंस्थेचा जातपंचायतींना जसा पाठींबा आहे, तसा तो राजकारण्यांतूनही आहे. मतांचे गणित त्यामागे आहे. जातपंचायतींना बळकट करणार्या अशा सर्वच वाहिन्या तोडत जावे लागेल. जातींनाच पंचायतींविरूद्ध बंड पुकारण्यासाठी प्रवृत्त करावे लागेल. आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायतींकडून बहिष्कृत झालेत, अशांना मदतीचा हातही द्यावा लागेल. जात बदलू नये, सुधारू नये, प्रगतीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून जातपंचायतीच प्रयत्नशील असतात. जातींना जेव्हा हे कळेल, जाती जेव्हा हा विचार करू लागतील, तेव्हा या पंचायतींची हंडी फुटलेली असेल. पंचायती असलेल्या जातींमध्ये प्रत्यक्ष जाऊन जाती कशा अनैसर्गिक आहेत, हे पटवून द्यावे लागणार आहे.
डॉ.दाभोलकरांचे स्वप्न जिवंतच
“डॉ.दाभोलकरांनी लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी हेच काम केले. चिकित्सा करायला शिकवले. नव्या युगाचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. ज्यांना विचारांची लढाई करता येत नाही, ते विकारांच्या मार्गाने जातात. दाभोलकरांची हत्या विकारातून झाली तरी दाभोलकरांनी पाहिलेले चिकित्सक समाजाचे स्वप्न जिवंतच आहे, कारण त्यामागे विवेकी विचार आहे. जातपंचायतीविरोधी परिषदांना प्रचंड उपस्थिती लाभते आहे. दाभोलकर गेले म्हणून कोणतीही पोकळी दिसत नाही कारण त्यांचे स्वप्न समोर उपस्थित नि:स्पृह कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत जिवंत आहे!” कांबळे यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
जातपंचायतींतून निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूकही करायला हवी.
जातपंचायतीला विरोध झालाच पाहिजे. पण, जात पंचायतींतून निर्माण होणार्या प्रश्नांची सोडवणूकदेखील झाली पाहिजे, असा सूर ‘जात पंचायत वास्तव व फायदे’ या विषयावरील परिसंवादातून उमटला. जळगाव येथील कांताई सभागृहात आयोजित ‘जात पंचायतीला मूठमाती’ संघर्ष परिषदेच्या दुसर्या सत्रातील परिसंवादात अॅड.असीम सरोदे, अॅड.पल्लवी रेणके यांनी मार्गदर्शन केले. नाट्य कलावंत शंभू पाटील अध्यक्षस्थानी होते.
अॅड.सरोदे म्हणाले, की सामाजिक अपात्रता कायदा नसताना पोलिसात गुन्हे नोंदविले जातात. जात पंचायतीचे पुरावे नष्ट केले जात असल्याने केस दाखल होऊ शकत नाहीत.
भटक्या विमुक्त संघटनेच्या नेत्या अॅड.पल्लवी रेणके म्हणाल्या, की आंतरजातीय विवाहाला प्रत्येक समाजात विरोध होतो. विरोध करणारे घटनाविरोधी आहेत. आंतरजातीय विवाह कायदा व्हायला पाहिजे. शंभू पाटील म्हणाले, की जे कलावंत भटके विमुक्त होते, त्यांना गावकुसाबाहेर ठेवले जात होते. त्यांना समाजाने नाकारणे यापेक्षा दुसरा अपराध असूच शकत नाही. जात पंचायत मोडीत काढली पाहिजे. जात पंचायतीला बळी पडलेल्यांचे अनुभवकथनही परिषदेत झाले. अण्णा हिंगमिरे(नाशिक), मालती गरड(लासलगाव), प्रमिला चौरे (नाशिक), अलका ससाणे(नाशिक), उत्तम शिंदे(नाशिक), अरूणा कुंभारकर (नाशिक), जिजा राठोड (जळगाव) यांनी अनुभवकथन केले. फारूक शेख अध्यक्षस्थानी होते.
पहिल्या सत्रात डॉ.हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत अनुवंशशास्त्र झपाट्याने विकसित झाले आहे. जातीच्या निरर्थकेतेचे पुरावे ठोसपणे पुढे येत आहेत. आज जातीच्या नावावर समाजकारण, राजकारण करणार्या संघटना हे का जाणून घेऊ इच्छित नाहीत. आंतरजातीय विवाह हाच जातीनिर्मूलनाचा प्रभावी उपाय आहे. अशा विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
वासंती दिघे म्हणाल्या, की जळगावात एका प्रेमी युगुलाला वेगवेगळ्या जातींतून असल्याने विवाहाला विरोध झाला. युगुलाने अखेर रेल्वेखाली आपले जीवन संपवले. जळगावच्या अगदी जवळ असलेल्या एका गावात मुलीला अन्य जातीतील युवकाशी लग्न करायचे असल्याने व ती आपल्या निर्णयावर ठाम असल्याने जन्मदात्याने मारून ओळख पटणार नाही, अशी अवस्था करून नंतर रेल्वेखाली टाकले. माणसाला असे क्रूर बनवणारी, माणसाला मारून टाकणारी जातच मारून टाकण्याची वेळ आलेली आहे.