Categories
मुलाखत

‘अंनिस’चा लढाऊ कार्यकर्ता : विष्णुदास लोणारे

वार्षिकांक - २०१८

‘विवेकाचा आवाज, बुलंद करू या!’ या ‘महाराष्ट्र अंनिस’च्या घोषणेतील व या चळवळीतील महत्त्वाचा घटक ‘विवेक.’ उच्च शिक्षण किंवा चांगल्या संस्कारातूनच माणूस शिकतो, या समजुतीला तडा देणारे चालते-बोलते उदाहरण म्हणजे महाराष्ट्र अंनिसचे, भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास बाबुराव लोणारे. जेमतेम सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण (नाही म्हणायला बाहेरून एस.एस.सी. परीक्षा दिल्याने व ती अनुत्तीर्ण झाल्याने ‘नॉन-मॅट्रिक’ हे त्यातल्या त्यात सन्माननीय बिरूद लाभले आहे!) जादूटोणा करणारे वडील; तसेच बंधू, अ-शिक्षित आई, ग्रामीण वातावरणात फुललेले जीवन; अशी शैक्षणिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन ताठ मानेने उभे राहिलेले विष्णुदास लोणारे आज बुवा-बाबांचे कर्दनकाळ म्हणून भंडारा जिल्ह्यात ओळखले जातातच; पण शेती, व्यवसाय, कारखाने, आर्थिक संस्था यांतील अन्यायग्रस्तांना न्याय देणारे तारणहार म्हणूनही भंडारा परिसरात ओळखले जातात. अंनिसचे विविध कार्यक्रम राबवताना, विविध आंदोलने करताना त्यांचे अभ्यासपूर्ण व परिपूर्ण नियोजन, कामाच्या जबाबदार्‍या योग्य व्यक्तीला वाटून देण्याचे कौशल्य, नियोजनात कुठेही चूक राहू नये म्हणून त्यावर कायम बारकाईने ठेवलेली नजर, आंदोलनात स्वतः आघाडीवर राहून अन्य साथींना दिलेले बळ व प्रोत्साहन या त्यांच्यातील नेतृत्वगुणांमुळे त्यांची बहुतेक सर्व आंदोलने यशस्वी ठरलेली आहेत. पोलीस अधिकारी असोत, राजकीय नेते असोत, धार्मिक नेते अथवा अंधश्रद्धाळू-भावनाप्रधान जनता असो; सर्वांशी संवाद साधण्याचे व भडकलेली मने शांत करण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या या कार्याचा सर्वांना परिचय व्हावा, त्यातून महाराष्ट्रातील अन्य साथींना काहीतरी शिकायला मिळावे, प्रेरणा मिळावी म्हणून ही खास मुलाखत घेण्यात आली आहे. पत्नी व दोन मुलांचा संसार सांभाळून, पोटा-पाण्यासाठी शेतीत कष्ट करून अंधश्रद्धेविरोधात; तसेच सर्व क्षेत्रातील अन्यायास वाचा फोडण्यासाठी काम करणारे, अत्यंत साधी राहणी असलेले व नळदुर्ग येथील महाराष्ट्र अंनिसच्या विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्र अंनिसद्वारा पुरस्कार देऊन गौरविलेले विष्णुदास लोणारे यांचे संघर्षमय जीवन सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरेल.

विष्णुदासजी, आपले बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याबाबत जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.

माझा जन्म 5 जानेवारी 1969 रोजी भंडारा येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. वडील एक मांत्रिक होते व ते लिंबू भारून देणे, पाणी भारून देणे, कावीळ उतरवणे ही कामे करायचे; तर आई अत्यंत सरळ स्वभावाची, घरदार व्यवस्थित सांभाळणारी व देवा-धर्माविषयी काही विशेष देणे-घेणे नसलेली, अशी होती. शाळेत शिकत असताना माझे मन अभ्यासात चांगलेच रमायचे. चौथीपर्यंत मी वर्गात टॉपर असायचो; परंतु सातवीत असताना; म्हणजे मी तेरा वर्षांचा असताना मला एक विचित्र आजार झाला. त्यात माझे दोन्ही पाय निकामी झाले. पोलिओ झालेला आहे, असे डॉक्टर सांगत. चार वेगवेगळ्या डॉक्टरांकडे सहा महिने उपचार चालू होते. हा आजार तीन वर्षे चालू होता. घरच्यांनी तर माझी आशाच सोडून दिली होती. नंतर मला चालायला येऊ लागले; परंतु एवढा काळ गेल्यानंतर परत शाळेत जाऊन शिकावे, अशी इच्छा शक्तीच राहिली नाही व माझे शिक्षण तिथेच थांबले.

त्या काळी, माझ्या मोठ्या भावाच्या अंगात देव यायचा, दरबार भरायचा, 33 कोटी देवांची गादी आमच्या घरी असे. त्याच सुमारास वडिलांची- त्यांना ‘भजेवाला वहीद’ (मांत्रिक) असेही म्हणत- गावात तांत्रिक/जादूटोणा करणारा म्हणून बदनामी सुरू झाली. कुणाला भूत लागले, कुणाचे काही वाईट झाले की हे ‘भजेवाला वहीद’ याचेच काम आहे, असा आरोप केला जाऊ लागला. माझ्या दोन बहिणी लग्नाच्या होत्या; परंतु मुलीचा बाप ‘वहीद’ आहे, असे अन्य लोक स्थळे घेऊन येणार्‍या लोकांना सांगत व हे ऐकताच ते स्थळे घेऊन आलेले लोक पळून जात असत. मोठ्या बहिणीचे लग्न सहा महिन्यांच्या धडपडीनंतर लागले; परंतु गावातले लोक लग्नाला आले नाहीत. त्यानंतर दोन महिन्यांनी गावातील एका महिलेला भूत लागले. हे माझ्या वडिलांचेच काम आहे, असा आरोप करून एक दिवस गावातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले व आमच्या घरावर चालून आले, भीषण हल्ला केला, घर पेटवून द्यायचा प्रयत्न केला. (त्या वयात विष्णू लोणारे यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर गुदरलेला हा भयानक प्रसंग सांगताना आजसुद्धा विष्णुदास यांच्या अंगावर काटा येतो, त्यांना गहिवरून आले व अश्रू आवरता आले नाहीत. थोडा वेळ थांबून, त्यांचा आवेग ओसरल्यावर मुलाखत पुन्हा सुरू झाली.)

गावातील वातावरण अत्यंत स्फोटक व आमच्यासाठी धोकादायक झाले होते. सुमारे पाच-सहाशे लोकांनी पोलिसांत निवेदन देऊन माझ्या वडिलांना गावातून बाहेर काढून टाकण्यासाठी विनंती केली होती. अशा वातावरणात काही बरे-वाईट झाल्यास आपला एक तरी मुलगा आपल्यानंतर जिवंत राहावा म्हणून मला त्यांनी बहिणीकडे तुमसर येथे पाठवून दिले. तिकडे तीन वर्षे मी राहिलो. या काळात, गावाने केलेला तो हल्ला कायम डोळ्यांसमोर उभा राहत होता व तिकडे गावात आपल्या कुटुंबीयांचे काय झाले असेल, हा विचार मला कायम अस्वस्थ करायचा.

1994 साली माझ्या भावाचे निधन झाले. त्याच्या अंगात येत असे. तो वारल्यावर त्याचे सर्व देव व अन्य संबंधित सामान आम्ही फेकून दिले. मी ‘न्यारा धुलाई’ (पितळेचा कचरा आणून, त्यातून पितळ वेगळे काढून त्याची सिल्ली (वीट) बनवणे व विकणे) हा धंदा करू लागलो.

एके दिवशी गावात एका महिलेला भूत लागले. हे काम माझ्या वडिलांनीच केले आहे, असा आरोप करून तिचा शिक्षक असलेला भाऊ आमच्या घरी आला. वडील घरात नव्हते. मग त्या शिक्षकाने वडिलांना कापून काढण्याची धमकी दिली. संध्याकाळी वडील घरी आले व त्यांना हे कळले. त्यावेळी माझी तब्येत बरी नव्हती. हे नेहमी होणारे आरोप व धमक्या ऐकून मी धास्तावून व अत्यंत वैतागून गेलो होतो. तसाच उठून, पचखेडी गावात राहणारे माझे मानलेले भाऊ बाबूलाल मेश्राम यांच्याकडे सायकलवरून गेलो व ही सर्व हकिकत सांगितली. ते मला पांडुरंग वैद्य या शिक्षकांकडे घेऊन गेले. ते अखिल भारतीय अंनिसचे काम करीत. त्यांना सर्व हकिकत सांगितली. ती त्यांनी माझ्याकडून लेखी स्वरुपात घेतली. ते स्वतः गावात येऊन त्या ‘भूतबाधा’ झालेल्या महिलेला भेटले. त्या महिलेने तिला काय होते ते सांगितले. मग बाबूलाल मेश्राम घरी आले. त्यांनी वडिलांशी बोलून हे जादूटोण्याचे काम सोडून द्यायला सांगितले.

वैद्य गुरुजींचे हे काम तुम्हाला नक्कीच दिलासादायक वाटले असणार?

होय, खरे आहे. वैद्य गुरुजींकडून मग मला अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करायची प्रेरणा मिळाली व मी काम सुरूही केले. माझे शिक्षण कमी असल्याने मला काही मर्यादा जाणवत होत्या. त्यातील एक म्हणजे भाषण करणे जमत नव्हते. म्हणून मी चमत्कारांचे प्रयोग करून दाखवू लागलो; पण याचा उलटाच परिणाम झाला व माझी बदनामीच झाली. कारण मी बापाचेच जादूटोण्याचे काम करतो आहे, असा लोकांचा गैरसमज झाला. त्याच सुमारास या संदर्भातली सातारा येथील एक बातमी वाचनात आली व त्यानुसार ‘अंनिस’चे मच्छिंद्रनाथ मुंडे यांना मी पोस्टकार्ड लिहिले. त्यास मच्छिंद्रनाथ मुंडे यांच्या सहीने उत्तरही आले व ‘पुस्तके घेऊन त्यांचे वाचन करा,’ असे मला सुचविण्यात आले; परंतु आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने पुस्तके घेणे झेपत नव्हते. त्यामुळे पुस्तके घेतली नाहीत; परंतु मनात प्रचंड जिद्द होती की, या क्षेत्रात काहीतरी करीत राहावे. मग मी व माझे मित्र बंडू भोपे, अशोक कावळे, युवराज वहिले एकत्र आलो. वर्तमानपत्रातील अशा घटना वाचून त्यावर चर्चा, विचार करू लागलो.

मग हे काम करायचा तुमचा विचार प्रत्यक्षात कसा आला?

या काळात मी जिथे काम करीत होतो, ती नोकरी काही कारणाने सुटली होती आणि त्याच सुमारास कोठारी मेटल कंपनी या कंपनीजवळील एका जागेत मध्य प्रदेशातील काही ‘बाबा’ आले होते व त्यांनी दहा दिवस हवनाचा कार्यक्रम ठेवला होता. तिथे ‘चमत्कारी’ अंगठ्या विकल्या जात होत्या, असे समजले. त्या वापरल्यावर मुले होतात, जीवनाची दशा बदलते, असे सांगण्यात येत होते. भोपाळ येथील अशाच एका प्रकरणाचा भांडाफोड करणारी बातमी ‘नवभारत टाइम्स’ या वर्तमानपत्रातून आमच्या वाचनात आली होती. त्यावर खूप चर्चा केली व कोठारी मेटल कंपनीजवळ ठाण मांडून बसलेल्या या बाबांचा भांडाफोड कसा करायचा, यावर विचार केला. माझे मित्र अशोक व बंडू मंडपामध्ये गेलो. तिथे वाटली जाणारी पत्रके गोळा करून, अंगठी विकत घेऊन पुरावेही जमा केले; परंतु भांडाफोड नेमका कसा करावा, ते काही कळेना. मग आम्ही ज्येष्ठ पत्रकार व अ.भा.अंनिसचे कार्यकर्ते उमेश बाबू चौबे यांचा फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी नागपूरला भेटीला बोलावल्यावर आम्ही तिथे गेलो. त्यांनी आम्हाला पत्र बनवून दिले. ते घेऊन आम्ही भंडारा येथील पोलीस निरीक्षक सुभाष पानसे यांच्याकडे सोपविले. त्यांनी ते पत्र ठेवून घेतले व सांगितले की, यात चमत्कार तर काही दिसत नाही. आम्ही घरी परतलो. परंतु, नंतर पोलीस घरी आले व त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनवर बोलावले. तिथे गेल्यावर बसवून ठेवले, विचारपूस केली आणि त्याच वेळी, पोलिसांनी कारवाई करून त्या दहा बाबांना अटक केली, दहा हजार रुपये दंड केला व सामान जप्त केले. ‘10 बाबांचा भांडाफोड’ या बातमीने सगळीकडे खळबळ माजली व या यशाने माझ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला सुरुवात झाली. हे काम करीत असताना कुटुंबाकडे लक्ष देण्याची जबाबदारी सुद्धा होती. कारण त्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. एक वेळचे जेवण कसे मिळेल, ही भ्रांत होती. आता शेतीमध्ये लक्ष दिल्याने परिस्थिती आटोक्यात आलेली आहे व या कामात नीट लक्ष घालू शकत आहे.

लहान असताना ‘मी मोठा झाल्यावर’ काय करणार, कोण होणार, असे काही ठरवले होते का?

असे विशेष काही बनायचे मी ठरवले नव्हते; पण कोणतीही भाषणे ऐकून वक्ता, कार्यकर्ता व्हावे असे वाटायचे कधी कीर्तन पाहिल्यावर मलासुद्धा असे कीर्तन करता येईल का, असे विचार मनात यायचे. नोकरी वगैरे असे काही डोळ्यांसमोर नव्हते. थोडक्यात, लहानपणी माझ्या काही अशा उंच अपेक्षा, आकांक्षा नव्हत्या.

अंधश्रद्धा या प्रकाराबद्दल तुम्हाला लहानपणापासून काय वाटते?

या प्रकाराला माझा लहानपणापासून विरोधच होता. मला जसे कळू लागले, तेव्हापासून मी या प्रकाराची टिंगलच करायचो. याची मला कधीही भीतीसुद्धा वाटली नाही.

तरुण वयात प्रवेश केल्यावर व दुनियादारी कळू लागल्यावर आपण काही लक्ष्य समोर ठेवले होते का?

1994 सालापासून मी सामाजिक कार्यालाच वाहून घेतले होते. पितळ कामगारांवरील अन्याय व त्यांचे शोषण या विरोधात आंदोलने केल. मजुरांना रास्त मजुरी मिळावी व त्यांचे शोषण थांबावे म्हणून आंदोलने केली. 1996-97 या काळात मोर्चेकाढले, कंपनी 30 दिवस बंद पडूनसुद्धा आंदोलन यशस्वी करून दाखविले. हेच कार्य व नंतर अंनिसचे कार्य जोमाने करायचे, हेच माझे लक्ष्य होते.

आपल्या लग्नाविषयी, संसाराविषयी काय सांगाल?

माझी तर लग्न करायची इच्छाच नव्हती. मी स्वतःला पूर्णवेळ आंदोलनातच झोकून दिले होते. वय वाढत चालले होते. आई-वडिलांची इच्छा होती की, मी लग्न करावे. म्हणून, त्यांच्या समाधानासाठी मुली पाहायचो; पण काहीतरी कारण पुढे करून लग्न टाळायचो.

माझी पत्नी कविता हिच्या कुटुंबाशी तशी ओळख होती. तिच्या गावी व तिच्या घरी कामानिमित्त येणे-जाणे असायचे. तिच्या गावाजवळील ‘दुर्गाबाईचा डोह’ या ठिकाणी यात्रा भरत असते व अंगात देवी येणारे अनेक बुवा, बाबा, बाया, विदर्भ, छत्तीसगड येथून तिथे येत असतात. त्यास आळा घालण्यासाठी व जनजागरण करण्यासाठी आम्ही तिथे कार्यक्रम घेत असू. एकदा असाच कार्यक्रम संपवून तिच्या घरी गेलो. त्यावेळी तिची मोठी बहीण मला म्हणाली, ‘कवितासाठी मुलगा बघ.’ मी सहज हसत-हसत म्हणालो, ‘मीच हाव.’ ‘मजाक करतो का?’ तिने विचारले. आठ दिवस कोणीही हे गंभीरपणे घेतले नव्हते; पण नंतर लोकांना बोलावून रीतसर लग्न ठरले. मी तिला एकही प्रश्न विचारला नाही आणि लग्नाची तारीखही ठरली.

खरे तर माझे लग्न एक चॅलेंज या स्वरुपाचे होते. ते 20 मे 1999 रोजी झाले. त्या आधी ‘लोकसत्ता’ या दैनिकात ज्योतिषांच्या वतीने एक असे वृत्त प्रसिद्ध झाले होते की, अधिक मास सुरू होत असल्याने हा काळ लग्नासाठी चांगला नाही. माझ्या एका मित्राने तर अधिक मास सुरू व्हायच्या आधीच आपले लग्न उरकून घेतले होते. कारण अधिक मासात लग्न करायची रिस्क नको; परंतु मी ज्योतिषांना चॅलेंज देऊन मुद्दाम या अशुभ काळातच, म्हणजे, 20 मे रोजी लग्न केले व माझ्यावर काय मंत्र-तंत्र करायचे ते करा, असे आव्हान दिले. तसेच लग्नाच्या आधी हळद लावणे, लग्नात डोक्याला बाशिंग बांधणे, हे प्रकार अजिबात केले नाहीत. केवळ लोक नाराज होऊ नयेत म्हणून मी डोक्यावर लग्नापुरता टोप घातला. त्या दिवशी वादळ आलेले असतानासुद्धा, या ‘अनोख्या’ लग्नाला अनेक लोक व पत्रकारसुद्धा आले होते; परंतु हे आगळे वेगळे लग्न पाहून लोक अतिशय आनंदी झाले होते.

कविता वहिनींना आपल्या कामाविषयी काय वाटते?

तिचा माझ्या कामाला शंभर टक्के पाठिंबा आहे. लग्नानंतर तिचा लाभलेला पाठिंबा, अत्यंत कष्ट करून संसाराची तिने सांभाळलेली बाजू, दोन मुलांचे केलेले संगोपन, त्यांच्या शिक्षणाची तिने घेतलेली काळजी, केवळ यामुळेच मी आज इथपर्यंत पोचलो आहे. याचे संपूर्ण श्रेय मी तिला देतो.

त्या काळात माझी राहणी अत्यंत साधी होती. कपडे फाटके-तुटके असत. सायकलवर प्रवास करीत असे. एकीकडे सीआयडी व पोलीस माझ्या पाळतीवर असत, तर दुसरीकडे लोकांचे खूप सहकार्यही असे. अशा अत्यंत तणावपूर्ण वातावरणात सुद्धा माझ्या पत्नीने माझ्या कामाला कधीही हरकत घेतली नाही.

आपला अ.भा. अंनिस कडून महा. अंनिसकडे प्रवास कसा झाला, ते सांगा.

1996 पासून 2005 पर्यंत मी अ.भा. अंनिसमध्ये कार्यरत होतो. शिबिरे, दौरे, कार्यक्रम हे सर्व व्यवस्थित व जीव तोडून करत होतो; पण 2003 साली एका संघटकाशी वाद झाला. माझ्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप त्यांनी केला. या चळवळीत मुळात पैसाच येत नाही, तर पैसे खाणार कसे, हा माझा स्पष्ट व थेट प्रश्न होता. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, बैठका झाल्या. याविषयी उमेश चौबे यांच्याशी पत्रव्यवहार केला. या प्रकरणाने व्यथित होऊन काम न करण्याचे मी स्वतःच ठरविले. उमेश चौबे म्हणाले की, ‘काम चालूच ठेव;’ पण माझे मन खट्टू झाले होते. मग मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामावरील लक्ष कमी करून कामगारांच्या प्रश्नाकडे देण्याचे ठरविले. हिंद मजदूर किसान पंचायतचा भंडारा जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो व या कामात लक्ष केंद्रित केले, तरीही काही जादूटोण्याच्या, भांडणाच्या केसेस माझ्याकडे येत होत्याच. त्याच वेळी (साधारणतः 2005 साली) ‘लोकमत’चे प्रा. नरेश आंबिलकर यांच्या संपर्कात आलो. त्यांची व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची एक भेट झाली होती. त्यावेळी डॉ. दाभोलकर भंडारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. तेव्हा माझी व त्यांची धावती भेट झाली. मी त्यांना सांगितले की, सर लोक फक्त राबवून घेतात व काम झाले की लाथ मारून फेकतात. ते फक्त हसले, काहीही बोलले नाहीत. तेव्हापासून डॉ. दाभोलकर यांच्या संपर्कात होतो. 2005 ते 2013 या काळात महा. अंनिसचा स्थानिक स्तरावर पदाधिकारी होतो; परंतु फार मन लावून काम करीत नव्हतो; पण 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्याची बातमी माझे मित्र मदन बांडेबुचे यांनी सांगितली. प्रचंड मोठा धक्का बसला. या कामासाठी एवढ्या मोठ्या माणसाचा जीव जातो, हे भयावह वास्तव अस्वस्थ करून गेले आणि अंनिसचे काम पूर्ण वेळ पूर्णपणे झोकून देऊन करण्याचे ठरविले. तेव्हापासून भांडाफोड, प्रबोधनाचे सुमारे 300 कार्यक्रम केले. 1996 पासूनचा विचार केल्यास 312 बुवा, बाबांचा भांडाफोड केला आहे. भानामतीच्या अनेक केसेस सोडविल्या आहेत.

अंनिस’ व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातसुद्धा तुम्ही कार्यरत आहात, त्या विषयी सांगा.

जिथे-जिथे अन्याय होतो, तिथे-तिथे मी व माझी टीम धावून जाते व वंचितांना, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडते. हिवताप-मलेरिया विभागात काम करणार्‍या असंघटित कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आंदोलन यशस्वी झाले. मृद-जल संधारण विभागातील लोकांसाठी केलेला संघर्ष चंद्रपूर जिल्ह्यातील आमदारांमार्फत विधानसभेत लावून धरला. दारूभट्टी व दारूचे दुकान बंद करण्यासाठी आंदोलन केले व हायकोर्टाच्या वकिलाच्या विरोधात उभा राहून अनिल देशमुख अध्यक्ष असलेल्या मंडळासमोर बाजू मांडली व विजय देखील मिळवला. धुरपताबाई टेंबुर्णे यांचा जमिनीचा प्रश्न सोडवून जिंकून दिला. हमाल कामगार आंदोलन एक वर्ष चालवले व प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेले. तिथेही विजय झाला व 135 हमाल कामगार कायम झाले. न्याय मिळविण्यासाठी 300 उपोषणे आयोजित केली. दलित, शोषित, पीडित महिला व पुरुषांना, पोलिस-पाटलांना न्याय मिळवून दिला. यासाठी कोणत्याही संघटनेचे पाठबळ नव्हते.

सर्वांत मोठे प्रकरण आहे, जे. एस. व्ही. डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड व जय विनायक बिल्डकॉर्प्स या कंपन्यांचे. या कंपन्यांच्या संचालकांनी कोलकाता, भोपाळ व महाराष्ट्रातील लोकांना साडेतीन वर्षांत रक्कम दुप्पट करण्याचे प्रलोभन दाखविले व रक्कम परत करायची वेळ आली, तेव्हा मात्र या कंपन्या बंद पडल्या. कंपन्यांचे संचालक पळून गेले. या आर्थिक फसवणुकीने नाडल्या गेलेल्या लोकांचा पैसा परत मिळावा म्हणून, कोणत्याही संघटनेचा आधार न घेता, 2015 पासून लढा दिला. त्याचाच भाग म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनात दोन मोर्चे काढले, भंडारा येथे 5 धरणे आंदोलने केली, दोन वेळा उपोषण आंदोलन झाले. याचा परिणाम म्हणून या प्रकरणातील पाच आरोपींना अटक झाली. दिनांक 08 फेब्रुवारी 2018 रोजी शासनाने अप्पर जिल्हाधिकारी, भंडारा यांची नियुक्ती केली व ग्राहकांचे पैसे परत करण्याबाबत आदेश जारी केले. यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 25 हजार लोकांचे 25 कोटी रुपये अडकले आहेत. याबाबत विविध न्यूज वाहिन्यांवर माझी मुलाखत प्रसारित झाली होती.

महाराष्ट्र अंनिस’मध्ये तुम्ही केलेल्या कामांची माहिती द्या.

घराला अचानक आग लागणे, धानाच्या पुंजन्या (गंज) आपोआप जळणे, बंद दप्तरातील पुस्तके जळणे अशी भानामतीची प्रकरणे हाताळून सोडवली आहेत. ढोंगी बाबांचा भांडाफोड तर अनेक प्रकरणांत केला आहे. नवीन कायद्यानुसार एका ढोंगी महिलेलासुद्धा शिक्षा झालेली आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा, प्रबोधनाचे कार्यक्रम, अंनिसचे विविध उपक्रम वर्षभर चालूच असतात. बुवाबाजी प्रकरणात महिन्यातून एक दिवस तरी कोर्टाची तारीख ठरलेली असते.

अंनिस आणि अन्य विविध क्षेत्रात आपण भरीव कार्य गेली अनेक वर्षे केलेले आहे व अजूनही करत आहात. आपल्या या कार्याचे योग्य कौतुक झाले, असे आपणास वाटते का?

मी किंवा माझे साथी कौतुक व्हावे म्हणून अजिबात काम करत नाहीत. आम्ही काम करीत राहतो. त्यासाठी प्रसंगी पदरमोड सुद्धा करावी लागते; पण लोकांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान आम्हाला सर्व काही देऊन जाते व आम्हाला नवीन कामासाठी ऊर्जा देऊन जाते, तरीही काही संस्था, अधिकारी यांनी माझ्या व माझ्या टीमच्या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. त्यातील काही निवडक माहिती तुम्हाला देत आहे.

महाराष्ट्र अंनिसच्या कामाबद्दल 2014 साली राष्ट्रीय पत्रकार दिनी मराठी पत्रकार संघ, भंडारा यांच्या वतीने व खासदार नाना पाटोले यांच्या हस्ते सत्कार.

महाराष्ट्र अंनिसचे 85 कार्यक्रम राबविल्याबद्दल 24 मे 2017 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांच्या हस्ते सत्कार. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित.

महाराष्ट्र अंनिसतर्फे कृतज्ञता पुरस्कार सांगली येथे मे 2016 मध्ये देण्यात आला.

महाराष्ट्र अंनिसतर्फे जून 2018 मध्ये नळदुर्ग येथे आयोजित विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत ‘सुधाकर विठ्ठलराव आठल्ये अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार पुरस्कार’ रोख रक्कम व प्रमाणपत्रासह प्राप्त.

पोलीस विभाग, भंडारातर्फे अंनिसचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार दुग्धविकास मंत्री व हंगामी पालक मंत्री महादेवराव जानकर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2018 रोजी प्राप्त.

याशिवाय विविध कामांबद्दल पोलिस अधिकार्‍यांद्वारा अनेक प्रमाणपत्रे प्रदान.

या पुरस्कारांव्यतिरिक्त अन्य ‘पुरस्कार’ याविषयी सांगायचे झाले, तर जून महिन्यात नळदुर्ग येथे पुरस्कार प्रदान करताना अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी माझा उल्लेख ‘ढोंगी बुवांचा कर्दनकाळ’ असा केला, हाही एक मी पुरस्कारच समजतो. तसेच एका डॉ. आंबेडकर पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या विरोधात पुराव्यासह लिहिले म्हणून ‘उपद्रवी विष्णुदास लोणारे’ असा उल्लेख त्या पुरस्कार विजेत्याने केला होता. तोही मला पुरस्कारच वाटतो. कोका जंगलात कार्यक्रम केल्याबद्दल नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांनी ‘असामान्य व्यक्ती’ असा उल्लेख करून प्रमाणपत्र दिले. हा सुद्धा एक पुरस्कारच म्हणता येईल.

आपण एवढे कार्य करत असताना काही कटू अनुभव आले असतीलच. त्याविषयी माहिती द्याल का? नवीन व जुन्या कार्यकर्त्यांना ती उपयोगी पडेल.

होय, नक्कीच. काही कटू अनुभव आलेले आहेत. त्यातील काही मोजकेच तुम्हाला सांगतो. पहिला अनुभव आहे बीडगाव येथील ताज मेहंदीबाबाचा. दिवाळीच्या दिवसात या बाबाला पकडून दिले होते; परंतु एका आमदाराने फोन करून पोलिसांवर दबाव आणला व त्या बाबाला सोडून देण्यासाठी भाग पाडले. त्यावेळी खूप वाईट वाटले होते.

दुसरा प्रसंग आहे सिगरेटवाले बाबा उर्फ नन्हेशा बाबाचा. अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा केलेल्या या बाबाला पकडून पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. त्याच वेळी त्याच्या भक्तगणांनी घेराव घातला. पोलीस गायब झाले. नंतर रात्री चुपचाप एका ट्रकमधून आम्हाला पळून जावे लागले व आमचा जीव वाचवावा लागला. अजून एक प्रकार मुर्झा पारडी येथील. तेथील जत्रेत पाच हजार लोक जमा झाले होते. आणि तिथे जमिनीतून देवी वर निघत आहे, या चमत्काराबाबत माहिती तहसीलदारांनी कळवली. मी आणि चन्द्रशेखर भिवगडे असे दोघेच तिथे पोचलो. तिथे तीनच पोलीस उपलब्ध होते. दूरवर मूर्ती जमिनीतून वर येत असल्याचा चमत्कार ‘घडत’ होता. हा चमत्कार नव्हता, हे सांगायचा आम्ही प्रयत्न करीत होतो आणि त्याच वेळेस वातावरण तणावपूर्ण होत होते. मग त्या प्रकारामागील सूत्रधारास-जो एक गुराखी होता- पकडून पोलीसपाटलाच्या घरी आणण्यात आले. तिथे व्यवस्थित ‘विचारपूस’ केल्यावर या प्रकरणाचा भांडफोड झाला व वातावरण शांत झाले.

(मुलाखत चालू असताना अधून-मधून कार्यकर्ते त्यांना भेटायला येत होते. तसेच काही पीडित लोक मदतीसाठी येत होते. यात बायाबाई बनकर, कन्हैया नागपुरे-जिल्हा प्रधान सचिव, प्रा. नरेश आंबिलकर, चन्द्रशेखर भिवगडे, लीलाधर बनसोडे, हर्षल मेश्राम यांचा समावेश आहे. मुलाखती दरम्यान तेसुद्धा काही माहिती देत होते. प्रा. आंबिलकर यांनी एक आठवण सांगितली. ते प्राध्यापकी करायच्या आधी ‘लोकमत’चे शहर प्रतिनिधी होते. लोणारे त्या वेळी त्यांना अ. भा. अंनिसच्या कामाच्या बातम्या द्यायचे. एकदा त्यांच्या व लोणारे यांच्या असे लक्षात आले की, भंडारा परिसरात डायरियाने अनेक लहान मुलांचा मृत्यू होत आहे. खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा कळले की, विदर्भ भागातील एक जुमदेव नावाचे मुक्ती पंथ चालवणारे बाबा आहेत व त्यांचे ‘पक्की भक्ती’ नावाचे व्रत लोक करीत आहेत. हे व्रत बेचाळीस दिवसांचे असते व ते करताना कसलाही आजार झाल्यास बाबांवर शंभर टक्के विश्वास ठेवावा लागतो व कोणतेही औषध न घेता फक्त अगरबत्तीचा अंगारा पाण्यात टाकून ते पाणीच ‘तीरथ’ म्हणून प्यायचे असते. याची संपूर्ण माहिती काढून लोणारे यांनी ‘मुक्ती पंथ बनला मृत्युपंथ’ अशी बातमी दिली. त्यानंतर त्या पंथाचे भक्त आक्रमक झाले, धमक्या देऊ लागले व ते कार्यालयावर चाल करून आले. या प्रकाराची पोलिसांत नोंद झाली आणि एकूणच सामाजिक दबावामुळे ‘पक्की भक्ती’ या व्रताच्या नियमात बदल करणे, या पंथास भाग पडले. या कालावधीत आजारी पडल्यास औषधोपचार घ्यावा, अशी दुरुस्ती या पंथाने आपल्या नियमात केली. ही व अशा अन्य अनेक आठवणी प्रा. आंबिलकर यांनी सांगितल्या.)

अंनिसमधील काही प्रमुख नेत्यांशी तुमचा कामानिमित्त संबंध आला असेलच. त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले?

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी भेट 2005 साली झाली. त्यांच्याकडून संघटना कशी बांधावी, कामाचे नियोजन कसे करावे, व्याख्यान देताना कसे व काय बोलावे, आर्थिक मदत कशी मिळवावी, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे का व कशी गोळा करावीत, कोणत्या माणसाला कोणत्या कामासाठी कसे निवडावे, या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी मला शिकायला मिळाल्या. इकडे अंनिसचा चढता आलेख सुरू झाला व मी कार्यकर्ता म्हणून घडू शकलो, ते याच मार्गदर्शनातून. दुसरे नेते, आपले कार्याध्यक्ष अविनाश पाटील. एखाद्या कामात सातत्य कसे ठेवायचे, हे त्यांच्याकडून शिकलोच; पण त्यांनी मला आर्थिक मदतसुद्धा मिळवून दिली. माधव बावगे, गजेंद्र सुरकार यांच्याशी मी कधीही व कसलीही अडचण असेल तेव्हा संपर्क करतो व मला त्यांच्याकडून योग्य उत्तर/मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आलेले आहे. विस्तार भयास्तव सर्वच नावे देऊ शकत नाही. पण वेळोवेळी अनेक नेते व कार्यकर्ते यांच्याकडून मदत व पाठिंबा मिळत असल्याने आज भंडारा जिल्ह्यात अंनिसचे हे डोळ्यात भरणारे कार्य दिसून येत आहे.

जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून झालेले आंदोलन व तो झाला तोपर्यंतचा प्रवास आपण पाहिला आहे. त्याविषयी व त्यातील तुमच्या सहभागाविषयी ऐकायला आम्ही उत्सुक आहोत.

मी स्वतः कित्येक बुवा/बाबा यांचा भांडफोड हा कायदा नसतानादेखील केला होता. त्यावेळी हे काम करताना बर्‍याच मर्यादा येत असत. म्हणून हा कायदा व्हावा, यासाठी भंडारा जिल्ह्यातून अंनिसतर्फे आंदोलने करण्यात आली. रॅली काढणे, निवेदने देणे अशा प्रकारे केवळ संवैधानिक मार्गाने व शांततापूर्ण आंदोलने करण्यात आली. कायदा होईल असे वाटत असतानाच अचानक काही अडथळे निर्माण होऊन तो मागे पडत असे आणि अचानक डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची बातमी कळली. कार्यकर्ते क्षुब्ध झाले होते; परंतु सर्वांनी संयम राखला. एकंदरीत, सार्वत्रिक दबाव ओळखून सरकारने हा कायदा पास केला.

आपल्या जीवनावर प्रभाव टाकणार्‍या कुटुंबातील व कुटुंबाबाहेरील व्यक्ती कोण आहेत?

कुटुंबातील किंवा नातेवाईकांपैकी कोणीही नाही; पण अन्य लोकांपैकी प्रभाव पाडणार्‍या प्रमुख व्यक्ती म्हणजे पांडुरंग वैद्य हे शिक्षक. त्यांनी चमत्काराचे प्रयोग शिकवले. भूत, भानामती याविषयी मोलाची माहिती दिली. माझे मित्र बाबूलाल मेश्राम यांनी अंनिसचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी व अंनिसला जोडून घेण्यासाठी मोलाची मदत केली. ज्येष्ठ पत्रकार व अ.भा.अंनिसचे दिवंगत कार्यकर्तेउमेश चौबे यांनी पत्रव्यवहार कसा करावा, बातम्या कशा लिहाव्यात, भांडाफोड कसा करावा, भाषण कसे द्यावे हे शिकवले. आज मी जो आहे, त्याचा पाया उमेश चौबे यांनी घातला आहे.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतरचे तुमचे अनुभव सांगा.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची बातमी कळल्यावर जबरदस्त धक्का बसला. अक्षरशः स्तब्ध झालो होतो. मग विचार केला की यातून सावरले पाहिजे. स्वतःला सावरून व कार्यकर्त्यांना गोळा करून निषेध सभा घेतल्या आणि त्याच क्षणी मी ठरविले की अंनिसचे काम आता पूर्णवेळ व मन लावून करायचे. आर्थिक अडचणी असोत किंवा कसलीही संकटे असोत, न डगमगता अविरत काम करण्याचे ठरवले. ते आजतागायत चालू आहे व माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत चालूच राहणार आहे.

अंनिसचे काम करीत असताना आपण अनेक लोकांना जोडून घेतले आहे. त्यांच्याविषयी व त्यांच्याशी अंनिसमुळे निर्माण झालेल्या नातेसंबंधाविषयी सांगा.

अंनिसमुळे मला अनेक जीवाभावाचे लोक लाभले. हर्षल मेश्राम, प्रा. नरेश आंबिलकर, चन्द्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम कांबळे, पुरुषोत्तम गायधने, अश्विनी भिवगडे, त्रिवेणी वासनिक, बायाबाई बनकर, माझे बंधू सुधीर लोणारे (सर्वांचीच नावे देत नाही, लिस्ट मोठी होईल.) हे कायम संपर्कात असतात. केवळ एक फोन करताच कसलीही विचारपूस न करता प्रथम माझ्यासमोर हजर होतात. अगदी जीवाला जीव देणारी मंडळी आहेत. ही संघटनेचे काम असो वा माझी वैयक्तिक अडचण असो, हे कायम मदतीस तत्पर असतात. संघटनेच्या बाहेरील लोकसुद्धा मी डॉ. दाभोलकर यांच्या शिकवणुकीनुसार जोडून घेतले आहेत. त्यामध्ये कमल किशोर लाहोटी, द्वारकाप्रसाद सारडा, ईश्वर दयालाल काबरा, बसंत मंत्री, मधू चौधरी (माजी नगरसेवक), आश्विन बांगडकर, पप्पू भोपे हे मान्यवर आहेत. यांची वेळोवेळी आर्थिक मदत तर होतेच; पण बर्‍याच कार्यक्रमात ते सहभागीसुद्धा होतात.

येत्या काही महिन्यांत आपण आयुष्याचे अर्धशतक पूर्ण करीत आहात. त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा देत असतानाच हे जाणून घेऊन इच्छितो की, आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही यापुढील आयुष्य कसे बघता, तुमच्या पुढील योजना काय आहेत?

माझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर पोटापाण्यासाठी शेतीकडे लक्ष देणे, मुलांचे शिक्षण पूर्ण करणे व मुले नोकरी-धंद्याला लागल्यावर अंनिसच्या कामासाठी स्वतःला पूर्णतः झोकून देणे. संघटनेच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर संघटना बांधणी, बुवा-बाबांचा भांडाफोड, विविध उपक्रम, प्रबोधनाचे जाहीर कार्यक्रम यावर लक्ष पूर्वीप्रमाणेच केन्द्रित ठेवणार आहे. भंडारा जिल्ह्यात सध्या 9 शाखा आहेत, त्या वाढवायच्या आहेत. तसेच नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण आहे, ज्यामध्ये तरुण साथी नेतृत्व करतील.

आजची, विशेषतः गेल्या चारपाच वर्षांत बदललेली सामाजिक, राजकीय परिस्थिती याबाबत आपले मत काय आहे?

राजकीय परिस्थिती अशी झाली आहे की, आपल्या फायद्यासाठी राजकारणी काहीही करू शकतात. कार्यकर्त्यांना वापरून त्यांचा बळीसुद्धा देऊ शकतात. हे थांबले पाहिजे. बाकी, राजकीय परिस्थितीत आपल्यासाठी विशेष काही परिवर्तन झाल्याचे जाणवत नाही. लोक व राजकारणी यांची प्रवृत्ती आहे तशीच आहे. सामाजिक परिस्थितीबाबत सांगायचे झाले, तर अंनिसचा एक कार्यकर्ता म्हणून त्याकडे पाहताना, त्यातसुद्धा काही फरक जाणवत नाही. आपल्या अडचणी अगदी आहे तशाच आहेत. आपल्याला असलेला विरोधसुद्धा आहे तसाच आहे. सत्तेतली माणसे बदलून काही फरक पडत नाही, असे माझे मत आहे.

अंनिसच्या चळवळीचे भवितव्य काय, यावर तुमचे विचार सांगा.

अंनिस चळवळीला भविष्यकाळ चांगला आहे. शिकलेल्या लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारल्यास चळवळ चांगलीच पुढे जाईल. नवीन कार्यकर्ते जोडणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्या समस्या समजून घेणे याबाबत नियोजन करावे लागेल. कॉलेजच्या माध्यमातून काम केल्यास तरुणाईला अंनिस चळवळी सोबत जोडून घेता येईल. आजचे कॉलेज तरुण हे उद्याचा भारत घडविणारे नागरिक असल्याने त्यांच्या सहभागाने चळवळ पुढे जाईल व चळवळीचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल.

नवीन कार्यकर्त्यांना आपण काय सांगाल?

नवीन कार्यकर्त्यांनी चळवळ समजून घ्यावी, चळवळीची उद्दिष्टे, त्याचा परिणाम, राज्यघटनेतील कर्तव्ये समजून घेऊन उत्साहाने काम करावे लागणार आहे. कोणाचे शिक्षण कितीही असो; अशी कामे करताना आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासाच्या जोरावर केवळ आंदोलनातच नाही, तर आयुष्यातसुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता. संभाषण कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत व सर्वांना सोबत घेऊन चळवळ पुढे नेली पाहिजे. आपल्या कामातून देशाचे एक चांगले भविष्य घडवले जाणार आहे व त्यात आपला सहभाग असणार आहे, ही भावना मनात सदैव बाळगली पाहिजे. यासाठी मी स्वतः कार्यरत आहे व अडीअडचणीला त्यांना मदतसुद्धा करणार आहे.

आता आपली मुलाखत जवळजवळ संपली आहे. आपण अगदी मनमोकळेपणाने मुलाखत दिली आहे. आता याव्यतिरिक्त आणखी काही आपल्याला सांगावेसे वाटते का?

होय, दोन बाबींबद्दल सांगायचे आहे. पहिली म्हणजे आपल्या अनेक कार्यकर्त्यांना न्यायालयात साक्षीसाठी हजर राहावे लागते. त्यावेळेस न्यायालयात बर्‍याच वेळा आपला जात व धर्म विचारतात. अशा वेळी आपण आपला धर्म हा ‘मानवता धर्म’ सांगावा व जात ही ‘मानव जात’ म्हणून सांगावी. न्यायालयात अजिबात घाबरू नये, हसत-खेळत साक्ष द्यावी. दुसरे म्हणजे आपल्या संघटनेच्या कामाला विरोध हा होतच राहणार आहे, तो कधीही संपणार नाही. त्यास तोंड देत संविधानाच्या चौकटीत राहून, शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच ठेवायचे आहे व ही विवेकाची चळवळ पुढे नेऊन विवेकाचा आवाज बुलंद करायचा आहे, हे लक्षात ठेवावे.

विष्णूदास लोणारे संपर्क : 9226903733