Categories
जात पंचायत

…अखेर 40 वर्षांनी मरीआई समाजाने मारुती कोळी यांच्यावरील बहिष्कार उठवला

ऑक्टोबर - २०१८

अंनिस व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या प्रयत्नाला यश

मारुती कोळी, रा.जत यांना त्यांच्या मरीआई समाजाने तब्बल 40 वर्षे बहिष्कृत केले होते. अंनिस व भटक्या समाज संघटनेच्या प्रयत्नामुळे जत पोलिसांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा बडगा उगरला. तेव्हा पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती यांना समाजात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पंचांच्या हस्ते पान-सुपारी देऊन मारुतींच्या कुटुंबास मरीआई समाजात 40 वर्षांनी घेतले गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मारुती कोळी यांना, 40 वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाच्यावेळी पंचांचे ऐकले नाही म्हणून त्यांना 1 लाख रुपये दंड ठोठावला व त्यांना समाजातून बहिष्कृत केले. रुपये 1 लाख दंड भरूनही त्यांना समाजात घेतले नाही; उलट परत त्यांना रुपये 2 लाखांचा दंड केला. एवढा दंड भरण्याची त्यांची आर्थिक क्षमता नव्हती, त्यामुळे त्यांच्यावरील बहिष्कार आजपर्यंत सुरूच राहिला. त्यांच्या दोन मुलींचे लग्न ठरवताना पंचांकडून मुद्दामहून अडथळे आणले जात होते. मारुती कोळी यांनी या अन्यायाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भटक्या विमुक्त हक्क परिषदेशी संपर्क साधला. अंनिसने त्यांना घेऊन जिल्हा पोलिस प्रमुखांकडे याबाबत तक्रार दिली. त्यांनी जत पोलिसांना याबाबत कारवाई करण्याचा आदेश दिला. याबाबत सांगलीतील वर्तमानपत्रांनी मोठा आवाज उठवला. मोठ्या बातम्या लावल्या. त्यामुळे जत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजू तासिलदार यांनी जातपंचांना बोलावून घेतले. त्यांना नुकत्याच झालेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची माहिती दिली. या कायद्यानुसार आता कोणाही व्यक्तीस, कोणत्याही कारणाने स्वजातीतून बहिष्कृत करता येणार नाही, असे सुनावले. त्यामुळे पंचांनी नरमाईची भूमिका घेऊन मारुती कोळी यांच्या कुटुंबावरील बहिष्कार उठवला. दोन्ही मुलींची लग्ने समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पाडू, असे आश्वासन पंचांनी दिले; तसेच कोळी यांच्या कुटुंबास समाजाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात योग्य तो मान देऊ, असे पंचांनी लेखी दिले.

पंचांच्या हस्ते पान-सुपारी देऊन कोळी यांचा सन्मान केला गेला. यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांचा 40 वर्षांचा वनवास संपला. त्यांनी यावेळी अंनिस व भटक्या समाज संघटनेचे मन:पूर्वक आभार मानले.

या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे काम भटक्या-विमुक्त हक्क परिषदेचे विकास मोरे, गणेश निकम, नितीन मोरे, अतुल कांबळे, दयानंद मोरे, हवालदार विजय वीर, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, कार्यवाह राहुल थोरात यांनी केले.