Categories
व्यक्तिविशेष

आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सद्यःस्थितीत महत्त्वाचा

एप्रिल – २०१६

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय व मानवी प्रतिष्ठा याबाबत आज सुरू असलेले चर्चाविश्वातील वादविवाद आणि संवाद आंबेडकरांचा संदर्भ दिल्याखेरीज होऊच शकत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेला आणि व्यवस्थेच्या समर्थकांना प्रश्न विचारण्याचे, त्यांना निरुत्तर करण्याचे आणि नव्या मानुषी व्यवस्थेसाठी राजकारण करण्याची प्रेरणा आंबेडकर देतात.

समाजपरिवर्तनाचे कार्य राजकीय-वैचारिक सुस्पष्ट आकलनाशी निगडित असावे लागते. इतकेच नव्हे, तर हे आकलन निरंतरपणे प्रगल्भतेकडे आगेकूच करणारे असावे लागते. अन्यथा हे कार्य करू पाहणार्‍या कार्यकर्त्याची स्वत:ची जशी फसगत होते, तशीच तो/ती इतरांची देखील फसगत करू शकतो/शकते. इतकेच नव्हे, तर करत राहिलेल्या कामाची दिशा अशा सखोल आकलनाखेरीज भलतीकडेच वळण्याची दाट शक्यता असते. विशेषत: आपल्या देशात/महाराष्ट्रात मूलभूत समाजबदलाची प्रक्रिया गुंतागुंतीच्या सामाजिक-आर्थिक वास्तवात करावयाची असते, याचे नीटसे भान असणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या सहकारी कार्यकर्त्यांसह मी जे काही जनहिताचे सामाजिक-राजकीय काम करत आलो, त्यामधून हाच धडा शिकायला मिळाला. हे शिकतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, चरित्र आणि संघर्षशील जीवनकार्य यांचा खोलवर परिणाम माझ्यावर झाला आहे.

1971-72 साली मुंबईच्या माटुंगा लेबर कँपमधील झोपडपट्टीत आम्ही जात असू. तिथे कापड गिरणी कामगारांनी प्रथितयश साहित्यकार बाबूराव बागुल यांचा परिचय करून दिला. तोपर्यंत जे काही वैचारिक-राजकीय वाचन आणि चर्चा केली होती, त्यामधून समाजक्रांतीविषयी एका धारणेने आकार घेतला होता. उत्पादनाच्या साधनांची खासगी मालकी नष्ट करून सर्वाहारा वर्गाच्या ताब्यात उत्पादन-वितरणाचे हक्क देणारी राजकीय क्रांती झाली की, समाजातील सर्व भेदाभेद आपोआप हळूहळू लयास जातील, अशा प्रकारची ती धारणा होती. श्रीमंत आणि गरीब यामधील दरी नष्ट होईल. सर्वांना काम करावे लागेल. सर्वांच्या गरजा भागतील. वरिष्ठ ऐतखाऊ वर्गांची सत्ता संपुष्टात येईल. कामगार-शेतकर्‍यांचे राज्य येईल. म्हणजेच भांडवलशाहीने नाकारलेले लोकशाहीचे हक्क श्रमिकांना मिळतील. मात्र हे ध्येयस्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व श्रमिक जनतेची भलीमोठी एकजूट उभारावी लागेल.

बाबूराव बागूल यांनी मला वाचायला त्यांच्याकडची पुस्तके दिली. झोपडपट्टीतील श्रमिकांचे जीवन जवळून अनुभवत असतांना, ही पुस्तके वाचली, तेव्हा माझ्या क्रांतीविषयीच्या ठोकळेबाज धारणांना धक्के बसले. देशातील जातिव्यवस्थेने आणि तिचेच अपत्य असलेल्या अमानुष अस्पृश्यतेने माणसा-माणसात दृढ केलेली विषमता नष्ट करण्याचे कार्य, केवळ उत्पादन साधनांची खासगी मालकी नष्ट करून कदापि तडीस नेता येणार नाही, हे उमगू लागले.

नंतरच्या काळात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर, ग्रामीण श्रमिक जनतेत काम करताना महाराष्ट्रात त्यावेळी चालू असलेल्या विविध संघटना-चळवळींचा संबंध येत गेला. दलित पँथर्सचे नेते आणि बाबा आढाव यांच्याशी मैत्री झाली. मागोवा मंडळाच्या मित्रांबरोबर वाचन-चर्चा होतच होत्या. या काळात मार्क्सवादी अन्वेषण-विश्लेषण विचार पद्धतीची चांगली ओळख होत होती. त्याच बरोबर महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे जास्तीत जास्त साहित्य वाचण्याची सवय अंगी बाणली गेली. आजपर्यंत आंबेडकरांच्या ग्रंथांचे आणि त्या संदर्भातील इतर विचारवंतांनी केलेल्या लेखनातील मर्म समजून घेण्याचा आम्ही मन:पूर्वक प्रयत्न करत आलो. राजकीय-वैचारिक प्रगल्भता कमावण्यासाठी आंबेडकरांना वगळून वा टाळून पुढे कधीच जाता येत नाही. आज देशातील सद्य:स्थिती संघपरिवाराच्या फॅसिस्ट षड्यंत्रांनी सत्तास्थाने काबीज केल्याने अतिशय संतापजनक आणि चिंताजनक झाली आहे. अशा वेळी आंबेडकरांनी क्रांतिकारी परिवर्तनासाठी मांडलेल्या विचारांचा प्रभाव किती महत्त्वाचा आहे, हे मुद्दाम सांगण्याची गरज नाही. तथापि त्यांच्या प्रतिपादनातील काही मुद्द्यांचा उल्लेख करणे उचित होईल.

1936 दरम्यान प्रसिद्ध केलेला रिडल्स, स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा, अनिहिलेशन आफ कास्ट, राज्यघटना आणि हिंदू कोड बिल संदर्भातील त्यांची भाषणे तसेच बहिष्कृत भारतातील लेख इत्यादी लेखन-भाषणातील त्यांच्या सडेतोड आणि बिनतोड मांडणीचा विलक्षण प्रभाव माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर पडलेला आहे. परंपरागत हिंदू धर्माचा हजारो लोकांसह त्याग करून, माणसा-माणसातील नीतीवर आधारलेला बौद्ध धम्म स्वीकारण्याची दीक्षाभूमीवर घडलेली घटना आणि राजर्षी शाहू महाराजांच्या बरोबरीने हजारो महिलांच्या परिषदा संघटित करून केलेली भाषणे यांचा जबरदस्त प्रभाव आमच्यावर झाला आहे.

एतद्देशिय वरिष्ठ वर्गजातीविरुद्धचा लढा कसा लढविता येतो, ते आंबेडकरांनी व्यावहारिक (प्रॅक्टीस) पातळीवर जे संघटित संघर्ष केले, त्यातून समजते. त्यांनी सामंती-ब्राह्मणी सत्तेविरुद्धच्या लढाईकडे लक्ष केंद्रित केले. त्यासाठी काँग्रेस, समाजवादी, कम्युनिस्ट यांच्यावर त्यांनी केलेली टीका डोळ्यात अंजन घालणारी आहे. ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्व आणि जातिसंस्थेच्या सर्व तर्‍हेच्या अमानुष व्यवहाराविरुद्ध लढताना मनुस्मृतीच केवळ नव्हे, तर इतर धर्मग्रंथांतील वर्ण-जातीच्या समर्थनाला पूर्णपणे झिडकारणे किती आवश्यक आहे, ते त्यांनी मांडले. भेदभाव आणि विषमता यांचा सर्वस्वी निखालस पराभव करून समताप्रधान समाजव्यवस्थेकडे जाण्यासाठी ब्राह्मणशाही, सावकारशाही आणि भांडवलशाही व्यवस्थेचा बीमोड कसा आवश्यक आहे, ते त्यांनी मनमाड येथील रेल्वे कामगारांसमोर केलेल्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. श्रमजीवी वर्गजातींच्या आणि दलितांच्या राजकारणाचे अव्वल दर्जाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यात त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम आमच्या कार्यावर झालेला आहे.

डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रवादाविषयी श्रमिकांची भूमिका कशी असायला हवी, याविषयी केलेले मर्मभेदी विवेचन किती समर्पक आहे पाहा. ते म्हणाले की, श्रमिक समुदायांच्या जीवावर आणि समर्पणावर प्रस्थापित होणारा (वरिष्ठ वर्गांचा) राष्ट्रवाद श्रमिकांना आर्थिक-सामाजिक समता कधीच अर्पण करीत नाही. तो राष्ट्रवाद वरिष्ठ मालकवर्गाच्या वर्चस्वाखालील श्रमिकांचा शत्रू बनतो.

पूर्वास्पृश्य जातींचे वेगळेपण स्पष्ट करताना डॉ. आंबेडकरांनी दलितांना हिंदू आचारसंहितेने कसे जखडून टाकले होते ते सोदाहरण स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, अस्पृश्य हिंदू समाजातच राहतात. त्यांना आदिम जमाती पासून पूर्णपणे निराळी करणारी काहीएक संस्कृती आणि नैतिकता ते बाळगतात. अस्पृश्यांकडे हिंदू समुदायाची संस्कृती आहे. ते हिंदू समुदायांचे धार्मिक रीतिरिवाज पाळतात. हिंदूंचे पवित्र व इतर नियम मानतात. ते हिंदूंचे सण साजरे करतात. पण यापासून त्यांना काहीही लाभ होत नाहीत. उलट त्यांना बहिष्कृत केले जाते. कारण त्यांचा स्पर्श हिंदूंना विटाळ घडवितो, असे मानले जाते. सर्व प्रकारच्या सामाजिक अभिसरणावर त्यामुळे निर्बंध आहेत. प्रत्येक गावात अस्पृश्य वस्ती असते. ते गावांशी संलग्न असतात; पण गावाचा भाग नसतात. इतर हिंदू समाजापासून विभक्त करून त्यांना गुलामीच्या अवस्थेला पोचविणार्‍या आचारसंहितेचे पालन करावे लागते.

अनुवंशिक श्रेणीबद्धता आणि जन्मसिद्ध अधिकारभेद यावर आधारलेल्या समाजरचनेला दिले गेलेले धार्मिक व दैवी अधिष्ठान संपविल्याखेरीज भारतीय समाजमनाची रोगग्रस्त मानसिकता बदलणार नाही, असे ठामपणे सांगतानाच आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाची महत्ता वर्णन केली. असे विवाह समाजातील सहज संबंध जुळणीचा स्वाभाविक आविष्कार व्हायला हवेत, हे त्यांनी आवर्जून म्हटले आहे.

राजकारणाचा अर्थ सत्तेसाठी/हक्कांसाठी संघर्ष असा असतो. असलेली सत्ता टिकविणे किंवा नसलेली सत्ता मिळविणे, यासाठी राजकीय संघर्ष चालू असतात. दलित-श्रमिकांनी या सत्तासंघर्षात झोकून दिल्याखेरीज शोषण-छळ लादणारी आजची व्यवस्था बदलता येणार नाहीत, हे आंबेडकरांनी वारंवार सांगितले.

राजकारण ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे, असे आंबेडकर म्हणाले होते. पण त्यांनी केलेले राजकारण कसेही करून खुर्चीचा अट्टाहास धरणारे नव्हते. संसदीय संधिसाधूपणाचा लोचटपणा डॉ. आंबेडकरांच्या राजकीय अजेंड्याला दुरान्वयानेही स्पर्श करू शकत नाही. एवढेच नव्हे, तर अगदी महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी आणि गोलमेज परिषदेच्या वेळी सुद्धा त्यांनी जे पवित्रे घेतले, ते जनहिताचे संघर्ष तडीला नेण्यासाठी वस्तुस्थिती काळजीपूर्वक लक्षात घेऊन चतुराईने आखलेले राजकीय डावपेच होते. मुख्य राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी कुणाबरोबर किती, कशी व कितीकाळ दोस्ती/समझोता करावयाचा आणि कुणाबरोबर कशी व किती कडवी झुंज द्यायची, याचे वस्तुपाठ आंबेडकरांना दिले आहेत. छोटे लढे आणि मुख्य लढाई जिंकण्याचा मार्ग अतिशय बिकट व खडतर असतो, हे त्यांनी ओळखले होते. इतिहासातील घटनांचा मागोवा घेऊन झालेल्या चुका टाळणे आणि दलित-श्रमिकांच्या राजकारणाचे आकलन करण्याकरिता आंबेडकरांचे कार्यचरित्र फार मोलाचे आहे, यात शंका नाही.

दलित जनतेचे पुढारपण करणार्‍या आंबेडकरांना पूर्वापार चालत आलेल्या कपट-कारस्थानांचे संपूर्ण भान होते. मध्यमवर्गीय भांडवली नेतृत्वाची नाळ सरंजामी विचार-व्यवहारांशी जखडली आहे, हे त्यांना पुरेपूर माहीत होते. ही नाळ तोडून टाकण्याची हिंमत आणि कर्तृत्व हा वर्ग दाखवू शकत नाही, हे त्यांनी जाणले होते. अशा वेळी सामाजिक मुक्तीसाठी करावयाच्या लढ्यात ‘एकला चलो रे’ ची भूमिका निभवावी लागेल, हे सुद्धा त्यांनी स्वीकारले होते. भारतीय राज्यघटनेने मिळालेले मूलभूत नागरी हक्क आणि राज्यकर्त्यांनी धोरणविषयक टाकावयाची पावले अधोरेखित करणारी घटनेतील दिशादर्शक तत्त्वसूत्रे यांची पार्श्वभूमी डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेल्या या असाधारण झुंजीतच शोधता येतात. ती शोधल्यामुळेच आमच्या वैचारिक-राजकीय आकलनावर आणि कामावर आंबेडकरांच्या विचारव्यूहाचे ठसे उमटले आहेत.

आज जनवादी पर्यायी विकास धोरणांचा आग्रह धरणार्‍या कार्यकर्त्यांना आंबेडकरांनी पुरविलेली शिदोरी उपकारक ठरत आहे. आर्थिक शोषण, जातिव्यवस्थेने लादलेले जुलूम व भेदाभेद, पितृसत्ताक आणि पुरुषप्रधान वर्चस्व आणि धर्मद्वेषावर आधारित फॅसिस्ट झुंडशाहीचे आव्हान परतवून लावण्याकरिता जे निकराचे लढाऊ बळ आवश्यक आहे, ते आंबेडकरांकडून निश्चितच मिळते. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय व मानवी प्रतिष्ठा याबाबत आज सुरू असलेले चर्चाविश्वातील वादविवाद आणि संवाद आंबेडकरांचा संदर्भ दिल्याखेरीज होऊच शकत नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेला आणि व्यवस्थेच्या समर्थकांना प्रश्न विचारण्याचे, त्यांना निरुत्तर करण्याचे आणि नव्या मानुषी व्यवस्थेसाठी राजकारण करण्याची प्रेरणा आंबेडकर देतात. पढित-पंडित, पोथीनिष्ठ आणि झापडबंद विचारव्यूहातून बाहेर खेचून काढतात. महापुरुषांपासून सावध राहण्याचा इशारा देतात. अगदी आंबेडकरांचे स्वत:चे म्हणणे देखील कुणी साधार मांडणी करून खोडून काढले, तर माझ्या इतका आनंद कुणालाच होणार नाही, असे म्हणण्याचे असीम धैर्य, प्रांजळपणा आणि पारदर्शकता आंबेडकरांची आहे. आज हे गुण दुर्मिळ झाले आहेत. हेकेखोरपणा आणि प्रत्येक बाबतीत विसंवादी विद्वेषी भेसूरपणा सर्वदूर पसरला आहे. डॉ. आंबेडकरांच्या 125 व्या जन्मवर्षात हा विद्वेष रसातळाला गाडण्याचे कार्य अधिकाधिक जोमाने आपण सर्वांनी एकत्रितपणे करायला हवे.

-कुमार शिराळकर