आरक्षणविरोधाची एक सुप्त तेढ आता उघडउघड दृश्यमान होत आहे. हे पाहता आंबेडकरांचे हिंदू धर्मविषयक व आरक्षणविषयक चिंतनही किती महत्त्वाचे होते, हे लक्षात येते. आंबेडकरांनी फाळणीबाबत पाठिंबा दिला म्हणून हिंदू राष्ट्राचे वा राष्ट्रवादाचे समर्थन केले नाही. उलट हिंदू राष्ट्र ही घोर आपत्तीच असेल, असाच निर्वाळा त्यांनी दिला. त्यांचे द्रष्टेपण आता अधोरेखित होते आहे.
1972 साली मी समाजपरिवर्तनाच्या चळवळीत दाखल झालो. त्यावेळी सातार्यात डॉ.नरेंद्र दाभोलकर, विलास ढाणे आदी कार्यकर्तेसमाजवादी युवक दल नावाची संघटना चालवत होते. माझे महाविद्यालयीन मित्र व आजचे ज्येष्ठ कवी श्री. प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्याबरोबर मी डॉ. दाभोलकरांना भेटलो व तिथपासूनच चळवळीचा भाग झालो. समाजवादी युवक दलाच्या वतीने त्याकाळी अभ्यास मंडळ चाले, अभ्यास शिबिरेही होत होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरूंदकर, वसंत पळशीकर, देवदत्त दाभोलकर, मे. पु. रेगे, विनायकराव कुलकर्णी, अ. भि. शहा, गं. बा. सरदार, भा. शं. भणगे अशा अनेक विचारवंतांचे मार्गदर्शन मिळे. राजकीय-सामाजिक समस्यांचे विविधांगी आकलन त्यामुळे होई. त्याकाळी समाजवादी, साम्यवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी अशा प्रमुख विचारप्रणाली होत्या. आमच्या संघटनेत प्राधान्याने लोकशाही समाजवादी प्रणालीचा खल होत असे व इतर प्रणालींच्या मर्यादांचा. तरीही फुले-आंबेडकरांचा विशेष अभ्यास होत नव्हता. महाराष्ट्रातच या दोन्ही विचारवंतांचा अभ्यास साठोत्तर काळात सुरू झाला. तरीही प्रत्यक्षात त्याला गती 1974-75 नंतर विशेषत: 1980 नंतर मिळाली. डॉ.बाबा आढावांनी म. फुले समता प्रतिष्ठानची स्थापना करून, फुले वाङ्मय, सत्यशोधक चळवळ यांचा व्यापक अभ्यास व संशोधन सुरू केले. त्याने महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील फुल्यांचे महत्व, आधत्व अधोरेखित केले. त्यामुळे आम्हा सर्वांच्या विचारविश्वात म. फुल्यांची चिकित्सा सुरू झाली. पुढे प्रा.रावसाहेब कसबे यांचे ‘आंबेडकर आणि मार्क्स’ व शरद पाटलांचे ‘मार्क्स-फुले-आंबेडकरां’च्या वरील पुस्तकाने एक वेगळाच दृष्टिकोन पुढे आला. त्याने धनंजय कीर प्रणीत फुले-आंबेडकरांच्या चरित्राच्या मर्यादा उघड झाल्या. तत्कालीन चर्चा विश्वात वर्गलढा की वर्णलढा अशा दोन प्रवाहांची चर्चा चाले. व्यवहारात मार्क्स की बुद्ध(यात आंबेडकर आलेच) असाच पेच होता. श्रमिक चळवळ व दलित चळवळीचे समांतरत्व तेव्हाच अधोरेखित झाले. भारतात हे समांतरत्व परवडणारे नाही. त्याने क्रांती तर सोडाच; पण क्रांतिकारी शक्तींचेच विभाजन होऊन नुकसान होईल म्हणून वर्गलढा व वर्णलढा हातात हात घालून लढला पाहिजे, यावर आम्हा कार्यकर्त्यांचा जोर होता. यातूनच डॉ.आंबेडकरांच्या लेखनाचा अभ्यास सुरू झाला.
डॉ.आंबेडकरांचे स्वातंत्र्यलढ्यापासून फटकून राहणे पटत नव्हते. किंबहुना तसाच समज झाला होता. फाळणीविषयक त्यांची मते, गांधी विरोध, काँग्रेसविरोध या सार्या गोष्टींनी मनात गोंधळ होत होता. जेव्हा प्रत्यक्षात डॉ.आंबेडकरांच्या लेखनाचा ऐतिहासिक पद्धतीने अभ्यास सुरू झाला, त्यातून अनेक नवे आयाम व डॉ.आंबेडकरांचे बुद्धिवैभव खुणावू लागले. आमच्या मानेवर धार्मिक, सामाजिक गुलामगिरी व राजकीय गुलामगिरी अशा दोहोंचे जोखड आहे. सवर्णांवर फक्त राजकीय गुलामगिरीचेच जोखड आहे. ते फेकून द्यायचे असेल तर आमच्या मानेवरील अस्पृश्यतेचे जोखड दूर करा, तरच एकत्रितपणे लढून राजकीय गुलामगिरी विरूद्ध लढता येईल, हे आंबेडकरांचे प्रतिपादन आजवरची वैचारिक भूमिका हलवून गेले. आंबेडकरांची राजकीय-सामाजिक उद्दिष्टे, स्वतंत्र मजूर पक्षाचे राजकारण, कधी स्वतंत्र, तर कधी संयुक्त मतदारसंघाच्या भूमिका, स्वातंत्र्योत्तर काळात संविधान बनवण्याची त्यांनी पेललेली कामगिरी हे सारे पाहिल्यावर त्यांच्या भूमिका, रणनीती यांचे नव्याने आकलन झाले. भारतासारख्या समाजात समतेची घट्ट रूजलेली परंपरा नसल्याने लोकशाहीचा मूलाधारच कसा कच्चा राहतो, हे त्यांच्या लेखनाचे (खरेतर जीवनाचेही) सूत्र लक्षात आल्यावर केवळ राजकीय लोकशाहीचा विचार व चिंतन करून उपयोग नाही, हेही समजले. आंबेडकरांनी हिंदू धर्माची केलेली चिकित्साही त्यांचे वेगळेपण अधोरेखित करून गेली. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजसुधारकांची; विशेषत: केतकर, राजवाडे, आगरकर यांची मीमांसा आंबेडकरांना पटली नाही. अस्पृश्यता विरोधी ही मीमांसा होती, तरीही ती आंबेडकरांना का पटली नाही, असा प्रश्नही मनात येई. आंबेडकरांचे लेखन वाचल्यावर हे लक्षात आले की, ते अस्पृश्यतेचा विचार इतर सुधारकांसारखा सुटा करीत नाहीत. हिंदू धर्मातील विकृती वा दुष्ट रूढी असा विचार करून हिंदूइझम वेगळा व अस्पृश्यता वेगळी असे ते मानत नाहीत. अस्पृश्यता हा हिंदू धर्माचा अटळ भाग आहे. लोक अस्पृश्यता पाळतात (व एका टप्प्यावर आंबेडकरपूर्व काळात पूर्वास्पृश्यही हे मान्य करत). ते धर्माचा भाग म्हणून हे आंबेडकरांचे विश्लेषण अधिक मूलगामी होते. केवळ रूढी म्हणून अस्पृश्यता असतील तर ती कधीच गेली असती कारण अशा अनेक ‘आधुनिकता’ आल्यावर बाद झाल्या; पण अस्पृश्यता नाही, याचे कारणच ते आहे. म्हणूनच हिंदू धर्म त्याग हा त्यांचा थेट निष्कर्ष अस्पृश्यता निर्मूलनासाठीचा होता. आपण जोवर हिंदू आहोत तोवर आपण अस्पृश्यच राहणार, ही त्यांची पक्की खात्री होती व तत्कालीन समाजही याचीच प्रचिती मंदिरप्रवेश, पाणवठे खुले करणे या प्रश्नांवर देत होता. म.गांधींचे प्रयत्नही अपुरे पडत होते. अस्पृश्यता निर्मूलन ही अन्य कोणाची एकमेव प्रायोरिटी नव्हती. (महर्षि वि.रा.शिंदे यांचा अपवाद वगळता) तत्कालीन लोकसंख्येचा 1/6 समाज स्वकियांच्या गुलामगिरीत आहे, हे वास्तव ऐकता-वाचताना आंबेडकरांच्या मनाच्या तडफडीचा अंदाज येतो. टोकाच्या विषम सामाजिक परिस्थितीने त्यांच्या भूमिका, डावपेच ठरले, केवळ कुणाला तरी खूष करण्यासाठी नाही, हे लक्षात आल्यावर त्यांच्याबद्दलच्या समज-गैरसमजांचे धुके वितळायला लागले. हिंदू कोड बिलामागची त्यांची कळकळ पाहिली की, त्यांच्या व्यापक विचारांचा प्रत्यय येतो. केवळ आकड्यांच्या आरक्षणापेक्षा सामाजिक दर्जा सुधारणांशी आरक्षणाची योजना त्याला हवी होती. सोशल स्टेटस विरुद्ध रिप्रेझेंटेशन याचा पेच त्यांच्या समोरही होता. आजच्या सारखा आरक्षणाच्या टक्केवारीत त्यांना रस नव्हता. सत्ताधार्यांनी व समाजाने आरक्षणाकडे या दृष्टीने पाहिले नाही. नोकरशाहीने यांत्रिक पद्धतीने. सवर्णांनी उदासीनतेने व सत्ताधार्यांनी मतपेटी म्हणून आरक्षणाची अंमलबजावणी केली, तीही पूर्ण नाहीच. शिवाय प्रबळ जातींचे दावे आज घटनात्मक नसतानाही ज्या पद्धतीने तत्वत: मान्य होताहेत ते लक्षात घेता आंबेडकरांच्या ‘सामाजिक दर्जाच्या’ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, हे सांगायला नकोच. आरक्षणाविरोधाची एक सुप्त तेढ आता उघडउघड दृश्यमान होत आहे. हे पाहता आंबेडकरांचे हिंदूधर्मविषयक व आरक्षणविषयक चिंतनही किती महत्त्वाचे होते, हे लक्षात येते. आंबेडकरांनी फाळणीबाबत पाठिंबा दिला म्हणून हिंदू राष्ट्राचे वा राष्ट्रवादाचे समर्थन केले नाही. उलट हिंदू राष्ट्र ही घोर आपत्ती (Greatest Calamity) च असेल, असाच निर्वाळा त्यांनी दिला. त्यांचे द्रष्टेपण आता अधोरेखित होते आहे.
बुद्धधम्माचा स्वीकार करून आंबेडकर शेवटी धर्मचक्रातच अडकले, असे साम्यवाद्यांप्रमाणेच आम्हालाही वाटले होते. आंबेडकरोत्तर धम्म व्यवहार पाहताना ते वाटणे अगदीच अनाठायी होते, असे नाही. पण आंबेडकरांचा Buddha & his Dhamma वाचल्यावर त्यांची वेगळी दृष्टी प्रतीत झाली. धम्म म्हणजेच सामाजिक नीती, ही त्यांची भूमिका केवळ धम्म व व्यक्ती यांच्या संदर्भात नाही, तर आंबेडकरांनी ज्या संविधानिक नीतिमत्तेची गोष्ट केली होती, त्याचा एका अर्थाने पायाच होता. हीच संविधानिक नीतीमत्ता खरेतर भारताच्या नागरी समाजाचा पाया व्हायला हवा होता; पण तसे झाले नाही. सामाजिक नीतीशी धम्म सुसंगत करणे व बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा याचे त्याला अधिष्ठान असणे, ही आंबेडकरीदृष्टी लक्षात घेतली तर विज्ञानयुगाला साजेसा बुद्धिवादी नागरिक ही भारतीयांची ओळख ठरली असती. या ओळखीचा आधार समता-बंधुता हाच असता. आंबेडकरांनी कायमच स्वातंत्र्य व समता या मूल्यांमध्ये तोल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केवळ स्वातंत्र्य वा राजकीय समता या संकल्पना त्यांनी सुट्या पाहिल्या नाहीत म्हणून उदारमतवादी लोकशाहीतून निर्माण होणार्या विषमतेचे त्यांना भान होते. व्यक्तिस्वातंत्र्य, खासगी मालमत्तेचा हक्क व करार स्वातंत्र्य हा उदारमतवादाचा गाभा. केवळ समान संधी उपलब्ध होऊन साधन-संपत्तीचा रास्त वाटा दलित, पीडितांना मिळणार नाही, हे त्यांनी ओळखले होते, त्यांचा राज्य समाजवादाचा आग्रह त्यातूनच येतो. उदारमतवादातून न्याय्य वाटणार्या विषमतेला मान्यता मिळते; पण त्यातूनच विषमतेमुळे सामाजिक असंतोष वाढीला लागतो. आंबेडकरांच्या लेखनातून एका बाजूला लिबरल लोकशाहीचा विचार व दुसर्या बाजूला घटनात्मक समाजवादाचा विचार, यातील घट लक्षात येते. संविधान बनवताना त्यांना दुर्दैवाने उदारमतवादालाच पाठिंबा द्यायला लागला; पण त्यातही सार्वजनिक क्षेत्र बळकट करण्याच्या तत्कालीन सरकारच्या निर्णयामुळे शेती सोडून महत्त्वाचे उद्योगधंदे सरकारच्या ताब्यात राहिले, हेही नसे थोडके!
बाबासाहेब आंबेडकरांचा चौरस व्यासंग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा संदर्भ व विश्लेषण, जगभरच्या राजकीय-सामाजिक प्रवाहांचं भान, निर्भिडतेने विश्लेषण करण्याची हातोटी, कोणाही मोठ्या व्यक्तीसमोर मान न तुकवण्याची कृती व विचार व विचारस्वातंत्र्यावरचा विश्वास, निष्ठा या त्यांच्या वैशिष्ट्याने आणि स्वतंत्र विचार करणे व अन्यायविरुद्ध पेटून उठणे हे माणसाचे उन्नत रूप आहे, या त्यांच्या धारणेने मी व माझे मित्रही घडलो. कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात आंबेडकर काय म्हणतात, हा आता आमच्या विचारप्रक्रियेचा भागच झाला आहे. बाबासाहेबांच्या सर्वच मतांशी सहमती माझी आजही नाही; पण ही असहमती मला बाबासाहेब समजून घेण्याच्या आड आली नाही. त्यांचे माझ्या लेखी असलेले महत्त्वही त्याने कमी होत नाही. आंधळा पराक्रम व निर्बुद्ध प्रामाणिक निष्ठा या इतिहास घडवत नाहीत, इतिहास घडवतात ते ‘विचार’, हे बाबासाहेबांचे म्हणणे मला उच्चतर मानवी संस्कृतीचे ‘सार’ वाटते. म्हणूनच संविधानिक नीतिमत्तेचा आग्रह, विचारस्वातंत्र्याची जपणूक, स्वातंत्र्य व समता यात समतोल साधण्याची विचारपद्धती, तर्कशुद्ध चिकित्सा व मूलगामी विश्लेषण, प्रथम व अंतिमत: भारतीय असण्याची भूमिका व बहुसंख्यांकांच्या राष्ट्रवादाला विरोध, जमातवादी (हिंदू) राष्ट्रवादाला विरोध, दलित-बहुजनकेंद्री आर्थिक सामाजिक रचना ही बाबासाहेबांच्या विचारांची वैशिष्ट्ये बघता बघता माझ्या व कार्यकर्त्यांच्या पिढीच्या विचारधनाचा भाग झाली व परिवर्तन चळवळीचा ‘निकष’ झाली.
बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीपासून आता सुटका तर नाहीच; उलट माझ्या विचारप्रक्रियेचा फुले, मार्क्स, गांधी इतकाच महत्त्वाचा भाग तेही आता आहेत. मी व माझ्या मित्रांनी महाराष्ट्रातील नव्वदोत्तर काळातील प्रबोधनासाठी चालविलेल्या संस्थेला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे हे मग ओघानेच आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी ही आता आम्हा सार्यांचीच ओळख आहे. बाबासाहेब हे असे व्यापून राहिलेत आम्हा सर्वांनाच.
-किशोर बेडकीहाळ
संपर्क : मोबा. 9423012877