मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जेव्हा जेव्हा राज्यसत्ता भ्रष्ट होते, तेव्हा धर्मसत्ता तिला जागेवर आणते; राजसत्तेवर धर्मसत्ता अंकुश ठेवते,’ असे विधान केले. त्यांचा हा विचार नेमका कुठून आलेला आहे? त्या धारणेचे मूळ नेमके कुठे आहे?
फडणवीसांची संघाच्या गणवेशातली छायाचित्रे आपण बघितलेली आहेत. त्यामुळे जे अंगावर आहे, ते डोक्यामध्येही असणार. त्यांची भाषाच पाहाना. ती अजूनही धर्मसत्ता, राज्यसत्ता अशी येते. प्रजासत्ताकात जगणार्यांच्या तोंडी अशी भाषा? उघड आहे, संघ प्रजासत्ताक मानत नाही आणि त्याच्या मनात आजही मध्ययुगीन अथवा वेदकालीन समाजव्यवस्था टिकून आहे, याचे हे निदर्शक. फडणवीसांचे गृहितक किती धोकेबाज आणि लोकविरोधी आहे, ते पाहूया. ते म्हणतात त्याप्रमाणे राज्यसत्ता भ्रष्ट होते, तेव्हा धर्मसत्तेने पुढे येऊन ती ताळ्यावर आणावी. या गृहितकात धर्मसत्ता श्रेष्ठस्थानी तर आहेच; पण ती पवित्र, अढळ आणि शुद्धीकरण करणारी शक्ती आहे. हा वर्णव्यवस्थेचा अप्रत्यक्ष पुरस्कार झाला. धर्मसत्ता म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार ब्राह्मण्याचा अग्रमान. त्याने सूत्रसंचालन करावे आणि ही ब्राह्मणांचीच जबाबदारी. फुले-शाहू-आंबेडकर-आगरकर-लोकहितवादी आदींचा गौरव एका भोंदू महाराजाच्या शेजारी उभे राहून करायचा, ही खास हिंदुत्ववादी लबाडी. समजा ती धार्मिक – आध्यात्मिक व्यक्ती भोंदू नसून विद्वान व चारित्र्यवान आहे; तरीही धर्मसत्तेला राज्यसत्तेवर अंकुश ठेवायचा अधिकार नाही. कारण धर्म ही एक सामाजिक वा वैयक्तिक गरज असली तरी समाजाची सारी सूत्रे हाती घेण्याएवढी ती परिपूर्ण आणि लवचिक नाही. धर्माला कालबद्ध आवरण असते. ते कधी गळून पडत नाही आणि त्या जागी नव्या काळाचे आवरणही चढवता येत नाही. कारण तसे ‘कोणाला’ करता येणार नाही, अशी चिरेेबंद व्यवस्था त्यात असते. म्हणून धर्माशी चार हात करीत करीतच आजवरचे जग या टप्प्यापर्यंत आले आहे. दुसरी गोष्ट, फडणवीस राज्यसत्ता भ्रष्ट होऊ शकते, परंतु धर्मसत्ता होऊ शकत नाही, असाही एक गैरसमज पसरवतात. धर्म वरकरणी शुद्ध, पवित्र, निरागस, नि:स्वार्थी वाटतो. जवळ गेल्यास वा पोखरत गेल्यास त्याचे घाणेरडे, खोटारडे, अन्यायी रूप दिसून येतेच. अस्पृश्यता, लैंगिक अत्याचार, स्त्रीदास्य, बहिष्कार, विषमता असे अनेक अपराध आणि त्या चांगल्या गोष्टी एकत्र कशा काय राहू शकता, याचे आश्चर्य वाटते. दहशतवाद आज एकाच धर्माशी जोडला जातो. पण तसे नाही. ईश्वर आणि त्याचे पृथ्वीवरचे प्रतिनिधी दहशत उत्पन्न करण्यासाठीच सार्या धर्मांनी वापरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निःसंशय एक राष्ट्रवादी संघटना असूनही तिचा राष्ट्रवाद धर्माधिष्ठित आहे. त्यामुळे तिचा सत्तावर्चस्वाचा मार्ग धर्मच असणार. फडणवीसांच्या तोंडून मोहन भागवत, गोळवलकर, देवरस असे सारे सरसंघचालकच बोलले!
भारतात धर्म आणि राज्यसत्ता यांचे नाते आजवर कसे राहिले आहे?
हा फार मोठा विस्तृत इतिहास आहे. त्यासाठी तरुणांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची हिंदूधर्मसमीक्षा, वैदिक धर्माचा इतिहास; इतिहासाचार्य राजवाडे यांचे राधामाधवविलासचंपू, भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास; कॉम्रेड शरद पाटील यांची दासशूद्रांची गुलामगिरी व जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती; आंबेडकरांची शूद्र कोण होते, जातीचे निराकरण; साने गुरुजींची भारतीय संंस्कृती, इस्लामी संस्कृती, मानवेंद्रनाथ रॉय यांची जडवाद, बुद्धी, प्रेरणा व क्रांती, फुले यांचे समग्र वाङ्मय; बर्ट्रांड रसेल यांचे धर्म आणि विज्ञान, कार्ल मार्क्स यांचे ‘ऑन रिलीजन’ अशी पुस्तके वाचली पाहिजेत. आणखीही चिकार आहेत. इस्लामवर असगर अली इंजिनिअर, फक्रुद्दिनअली बेन्नूर, वसंत पळशीकर, मानवेंद्रनाथ रॉय आदींची पुस्तके वाचावीत. इंग्रजीत तर गेल्या पाच-सात वर्षांत इतकी आली की बस्स! थोडक्यात बोलायचे झाल्यास धर्म व राज्य यांचा परस्परपूरक व विरुद्ध असा दुहेरी संबंध भारताने पाहिला. राजेशाही, धर्मशाही येथे सुखात नांदली. राज्यघटना निधर्मी व प्रजासत्ताक असली, तरी लोकशाहीला धर्माचे वावडे नसल्याने कठोर, टोकदार भूमिका घेऊन धर्म व राज्य यांचे स्वतंत्र अस्तित्व आपण कधी पाहिले नाही. जातीच्या रूपाने धर्म आपल्या देशात जिवंत असतोच. जातींना निधर्मी व प्रजासत्ताक राज्यशासन करायला भाग पडत असल्याने जरा मोकळे वातावरण आपण भोगतो एवढंच. गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी आपल्या राजकीय – सामाजिक जीवनातून धर्म वगळून टाकला. व्यक्तीला धर्म असेल; मात्र सरकार, ध्येयधोरणे व अंमलबजावणी यांना नसेल, अशी विभागणी आपण अनुभवतो. तरीही संघपरिवार ही व्यवस्था उलटवून टाकायच्या तयारीत आहे म्हणून कार्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे.
पुरोगामी चळवळींना सामान्य माणूस आणि धर्म यांच्यातले गुंतागुंतीचे नाते पुरेसे कळालेले नाही. त्यामुळे सर्वधर्मीय सनातन्यांना विद्वेष पेरायला एक मोठाच अवकाश मिळाला, असा एक आक्षेप नेहमी घेतला जातो. याबाबत आपले काय मत आहे?
सारे सनातनी खूप वाचन केलेले, धर्मग्रंथ मुखोद्गत असलेले, धर्मानुसार आचरण करणारे आणि वृत्तीने धार्मिक नसतात, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. वेद, पुराणे, मनुस्मृती अथवा कुराण, बायबल, गुरुग्रंथसाहेब इत्यादी यांचे दाखले देऊन वाद घालणारे बव्हतांश लोक आधुनिक, वैज्ञानिक, इहवादी दुनियेचा तेवढाच उपभोग घेणारे असतात. ते त्यांनाही कळत असते. गांधी, नेहरु, आंबेडकर अखेरपर्यंत धर्मविरोधी वा धर्मउच्छेदक नव्हते. धर्माची निकड प्रत्येक जाणत होता. पण ते समुहांचे नेते होते म्हणून त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाहीत. त्यांच्याइतक्या बुद्धिमानांना धर्म, ईश्वर, रीतिरिवाज यातली व्यर्थता माहीत होतीच. फक्त ‘सामान्य माणसां’ ना अशी बुद्धी पेलणार नाही म्हणून त्यांनी कधीही धर्मद्वेष ना केला, ना करू दिला. सत्तास्थानी धर्म कधीही येऊ द्यायचा नाही, हे मात्र त्यांनी निश्चित केले. त्या अर्थाने चळवळी धर्मवादी नव्हत्या व नसतील. सामान्य माणसाला धर्म व ईश्वर कधीही नीट कळत नसतो. जसे त्याला रोग व आजार, शिक्षण, बांधकाम व्यापार, अर्थकारण, शेती, खेळ, गायन इत्यादींमधील काही कळत नसते, तसेच हे. म्हणून तो त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा मान राखतो व त्यांचे ऐकतो. धर्माच्या बाबतीत तो भट, पुरोहित, मुल्ला, बिशप, भिक्खू यांचे ऐकतो. डॉक्टर, वास्तुरचनाकार, शिक्षक, शेअरब्रोकर, हवामानतज्ज्ञ, सुतार वा इलेक्ट्रिशियन, प्लंबर, गवंडी यांचे शब्दप्रामाण्य बिनतोड असून ते पाळले नाही, तर मोठे नुकसान अटळ असते हे सामान्य माणूस जाणतो. ‘सेकंड ओेपिनियन’ची सोय या तज्ज्ञांंच्या बाबतीत शक्य असूनही कोणी धोका पत्करत नाही. विशेषज्ञांच्या शब्दप्रामाण्याला (ज्ञानाला) प्रतिवाद, संशय अथवा अव्हेर यांचे पर्याय असतात. कारण सारा व्यवहार मानवी असून त्यात तर्क, अनुभव आणि स्वार्थ यांचा समावेश आहे. जिथे मानवच मौजुद नाही, तिथे संशय कसा घेणार? इथे धर्मवादी म्हणवणारे सनातन फायदा घेतात. ‘त्यांना फायदा झालाय,’ ‘अमुकांनी उपवास केले म्हणून धनलाभ झाला,’ ‘तीर्थयात्रा करा म्हणजे नशीब फळफळेल’ ‘महाराजांना शरण जा, सारे मनासारखे होईल’ अशा केवळ वैयक्तिक गोष्टी जे करून जातात, त्यांना नुकसान झाले वा काहीच फळफळले नाही तरी कबुली करवत नाही. कारण जाब विचारायचा कोणाकडे? स्वतःची फजिती कोणाला इतरांना सांगाविशी वाटेल? आपण दुकान बंद झालेल्या बाबा, महाराज, संत, महात्मे, साधू, गुरू यांचा कधी आकडा शोधत नसतो. त्यांचीही संख्या खूप आहे. कारण फसगत जरी झाली तरी एखादी अदृश्य शक्ती आपल्याला छळेल, अशा अंधविश्वासाने कोणी त्याची वाच्यता करीत नाही. सामान्य माणूस कायम हतबल, हताश, असहाय, दुःखी वा पीडित आहे असे नाही. हावरटपणा आणि इतरांबद्दल दुःस्वास यातूनही तो धार्मिक वा धर्मानुयायी झालेला असू शकतो. महाराजांचे भक्त असेही असतात हे सगळ्यांनाच माहीत असते. म्हणून शोषण आणि शोषित हे दोघेही अदृश्य, निराकार शक्तीचा आधार घेऊन स्वार्थसाधना करीत असतात. यांत काही प्रामाणिक लोक असतात. त्यांची श्रद्धा खरी असते. मात्र अशा खर्या सश्रद्धांमुळेच बनावट, बनेल लोकांचे फावते. हे बदमाषच पुरोगाम्यांच्या विरोधात काहूर माजवतात. श्रद्धा लवचिक असेपर्यंत अहंकारी नसते. ती ताठर अन् स्वार्थसाधक बनली की उद्धट होते. श्रद्धा देखील साशंक, संशयी, जिज्ञासू असावी लागते. मानवाचा तोच एक गुणविशेष आहे की त्याला श्रद्धा बदलता येतात. वेगवेगळे उपाय किंवा साधने म्हणजेच श्रद्धेचे शंकित आणि अस्थिर रूप असते हे धार्मिकांना कळते; पण वळत नाही.
शनी शिंगणापूर, हाजी अली या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी महिलांचा एक गट आंदोलन करीत आहे. त्यात बरेच यशही मिळालेले आहे. रा. स्व. संघाशी संबधित राष्ट्र सेविका समिती ‘पुरोहित सविता’ उपक्रमाद्वारे महिलांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देते. एक मतप्रवाह म्हणतो की स्त्रियांना दास्य– दुय्यमत्व देणारा धर्म त्यांनी पूर्णतः नाकारला पाहिजे. मात्र काहींच्या मते स्त्रीने अलिप्तता बाळगली तर तिच्या तिथल्या सकारात्मक हस्तक्षेपाचा मार्ग पूर्णतः बंद होईल. याबाबत तुम्हाला काय वाटते?
दारूचे दुष्परिणाम जाणवून घ्यायला दारू प्यायलीच पाहिजे, असे म्हटल्यासारखे हे झाले. दारूड्यांनी निर्व्यसनी लोकांविरुद्ध मोर्चा काढल्यासारखेच हे. पुरुषांना स्त्रीवादी कसे होता येईल बरे, असे विचारल्यासारखे झाले हे. तर्क, कल्पना आणि विचार यांना धर्म कसा गुंगारा देतो, याचा हा नमुना. लोकशाही व प्रजासत्ताक यांच्या अमलात येणार्या प्रत्येक संस्थेत लोकांना हस्तक्षेप करता येतोच. हे धार्मिक क्षेत्र असून ते अनुल्लंघनीय आहे, असे म्हणताच येत नाही. धर्माची सत्ता आणि प्रजासत्ता या दोन भिन्न गोष्टी आहेत, असे मानणार्यांचा हा एक डाव असतो. मुसलमान अनेक गोष्टींना विरोध करतात ते या भावनेतूनच. ते हट्टीपणा करीत राहतात म्हणून हिंदूही करतात असेही नाही. सारे धर्म स्वार्थी हट्टाग्रही असतात. ते मोकळे, उदार व्हायचेच नाकारतात. विश्वास नाही तर का देवळात येऊ पाहता, हा प्रश्नही असाच. गळा सूराचा नाही म्हणून गायचेच नाही? लोकशाहीत, प्रजासत्ताकात हक्कांचा आणि अधिकारांचा वावर असतो. त्यामुळे खरोखर गरज आहे का, योग्यता आहे का, भावना आहे का, या प्रश्नाचे काही कामच नाही. हक्क व अधिकार वापरायचे की नाहीत हा व्यक्तिगत मामला. त्यांचा वापर अटी अथवा निकष लावून ठरवता येत नाही. म्हणून साने गुरुजींनी मंदिर सत्याग्रह केला. आता मुद्दा बायकांचा. धर्माने त्यांना दास्य दिले, वामांगीच ठरवले तरी त्यांना धर्म-ईश्वर यांच्याजवळ जावेसे वाटले तर तसे होणे योग्य की अयोग्य? कोणी स्त्री निधर्मी, निरिश्वरवादी होत असेल तर ते हवेच आहे. परंतु जिला होता येणार नाही तिने कर्मकांडे, प्रथापरंपरा, रीतिरिवाज यातला जेवढा अपमानास्पद हिस्सा आहे, तेवढा काढून टाकावा, असा आग्रह धरला पाहिजे. शुद्धतेची म्हणजे मासिक पाळीची अट, पुरुषाच्या डाव्या बाजूला उभे राहण्याची रीत, विधवा आहे म्हणून मनाई, सौभाग्य म्हणून नवर्याला स्वीकारायची परंपरा, गाभार्यात अथवा मशिदीत जाण्यास केलेला प्रतिबंध, डोक्यावर पदर घेण्याची सक्ती, नवस वा उपवास तिथेच करण्याबाबतचा आग्रह, पशुबळी अशा प्रकारांना तिने प्रतिकार करायला पाहिजे. खेरीज देवळात जाऊनच ईश्वरोपासना करता येते, हा समजही बाद करायला हवा. गांधीजी जशी केवळ प्रार्थना करायचे, तशी भजने म्हणूनही ईश्वरभक्ती करता येते. खरे तर तशीच हवी. कशाला लागतात पुरोहित, मुल्ला आणि बिशप-पाद्री? धर्माच्या संस्था उत्पन्न झाल्या की पुरुषांच्या ताब्यात जातात. कारण का, तर संरक्षणासाठी म्हणे. म्हणजे जे धर्म आणि ईश्वर असुरक्षित राहतात, त्यांची भक्ती करून काय उपयोग? ज्यांच्यापासून बळ मिळावे म्हणून भाकणूक करायची, तेच सुरक्षित, कडेकोट बंदोबस्तात? संघाला ईश्वरी सत्ता अपेक्षित असून पौरोहित्यावाचून ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही, अशा भटशाहीची प्रस्थापना करण्याचा त्यांचा डाव आहे. तो उधळून लावला पाहिजे. ज्योतिरावांनी जसा निर्मिक योजला तसा आणि तेवढाच पुरेसा आहे.
धर्मचिकित्सा व धर्मसुधारणा करण्याचे पुरोगामी चळवळींचे आज घडीचे मार्ग किती कालसुसंगत आहेत? त्यात काही औचित्यपूर्ण बदल, सुधारणा हव्यात का? किंवा अजून कोणते प्रभावी, कालसंगत मार्ग अवलंबता येतील?
आपण करतोच ते बरोबर आहे काय, असे आत्मपरीक्षण चळवळींनी केले पाहिजे, त्या करीतही असतात. सुधारक वृत्तीची माणसे संख्येने कमीच असतात. त्यामुळे लोकभावना, लोकमत अथवा लोकरूची जशी असते, तशी सुधारकांनी स्वीकारली पाहिजे, असे नाही. मग संघ आणि सुधारक यांच्यात फरक काय? संघापाशी लाखो स्वयंसेवक असूनही हुंडा, जातिप्रथा, विषमता आदी धार्मिक अन्याय चालूच आहेत. याचा अर्थ त्या सार्यांना ते अन्याय चालू राहावेत, असे वाटते का? संघात सुधारकी विचार पटूनही बहुसंख्येच्या दबावाखाली झुकणारे लोक आहेत. ते पुढे येत नाहीत. धर्म असाच वागतो. तो धैर्य, धाडस मारून टाकतो. पुढचे पुढे बघू, आता हे पाळा, असे तो बजावत राहतो. त्यामुळे पुरोगामी चळवळी व कार्यकर्ते जे करीत असतात, त्याचा फायदा सनातनीही घेत राहतात. त्यांच्या मुलींची लग्ने हुंड्यावाचून, बिनखर्चात झालेली त्यांना आवडणार नाही, असे थोडेच आहे? धार्मिक प्रथा व रीतिभाती यांचा जाच कमी करण्यात पुरोगाम्यांचाच वाटा आहे. त्यामुळे त्यांना वाव आहे, तशी त्यांची गरजही आहे. फक्त सनातनी व धर्मश्रद्ध माणसे आपला पराभव झाकण्यासाठी हे नास्तिक आहेत, हे धर्मबुडवे आहेत, असे बोलून लबाडी करतात. पुरोगाम्यांवर होणारे आरोप अशा चिथावणीखोरांचे तरी असतात किंवा परंपरांमध्ये ज्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केलेली असते, त्यांच्याकडून होत असतात. पैशापुढे सारे तर्क खोटे ठरवायचा मोठा डाव प्रतिगाम्यांपाशी असतोच. त्यांची सत्ता हादरू लागल्याचे ते चिन्ह होय. म्हणून मला वाटते की पुरोगाम्यांनी बदल करणे, सौम्य होणे वा सामीलकी दाखवून आतून स्फोट घडवणे असे धोकेबाज आणि बनावट पवित्रे घेऊ नयेत. संघ नाही का खूपदा आंबेडकरांचा जयजयकार करतो अन् मोक्याच्या क्षणी आरक्षणाला विरोध करतो. राज्यघटनेत बदल करू मागतो. तसे दुतोंडी आपण वागू नये. दुतोंडी वागणे गावकुसाबाहेरच्या, प्रथापरंपराबाह्य आणि उपेक्षित घटकांना जमणेही शक्य नसते. त्यांचा जुनी समाजव्यवस्था टिकवण्यात कोणता रस असतो? म्हणून पुरोगाम्यांनी तडजोडवादी भूमिका घेऊ नये आणि व्यवहारी विचार करीत बसू नये. भट, भिक्षुक, भिक्खू, मुल्ला-मौलवी, ग्रंथी, बिशप अल्पसंख्यच असतात. सुधारकही अल्पसंख्याक असतात. तेव्हा हा संघर्ष उर्वरित समाज कोणत्या विचारामागे उभा करायचा यांमधला असतो. लोकशाही प्रजासत्ताकात या संघर्षाचे मोल अपार आहे. म्हणून तर्क, युक्तिवाद, संवाद यांचेही महत्त्व खूप आहे. तिथे पुरोगाम्यांनी सरस राहिलेच पाहिजे. धर्मराज्य आणि कायद्याचे राज्य यांच्यातला लढा आता संघपरिवार सत्तेत आल्यापासून सुरू झाला आहे. लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य. कायदा तयार करायला इतिहास, अनुभव, विचार, संदर्भ, तर्क, युक्तिवाद, तळमळ, सहानुभूती, करूणा अशा गोष्टी लागतात. पुरोगाम्यांनी चळवळी करून दबाव आणले म्हणून कित्येक कायदे झाले. कामगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, मुले, स्त्रिया अशा असंख्य क्षेत्रातल्या सुधारणा केवळ डाव्या विचारांच्या चळवळींमुळे झाल्या आहेत. संघाचा त्यात काहीही वाटा नाही. डाव्यांच्या, पुरोगाम्यांच्या चळवळीचा लाभ अप्रत्यक्षपणे असा सारा समाज उपभोगतो आहे. पण आज या चळवळीचा जोर ओसरलेला आहे. कदाचित कार्यभाग साधला म्हणूनही चळवळींची गरज संपली असावी. याचा अर्थ प्रश्न संपले आणि ते नव्याने निर्माणच होणार नाहीत, असे नाही. संख्येकडे म्हणून लक्ष देऊ नये. मोजक्या मावळ्यांवरच शिवाजी महाराजांनी आपले राज्य चालवले आणि देशासाठी कित्येक नव्या व्यवस्था निर्माण केल्या. चर्चा, वादविवाद याबरोबर लोकजागृती आवश्यक आहे. लोकशाही प्रजासत्ताकाचे निधर्मी व विज्ञानाभिमुख आणि सामाजिक न्यायाचे व समानतेचे राज्य टिकवायचे आहे. नव्या वाटा अन् नवे कार्यक्रम आपोआप सापडत जातील.
शब्दांकन : शर्मिष्ठा भोसले, औरंगाबाद