Categories
कव्हर स्टोरी

आमच्या सामाजिक-राजकीय चळवळीत बाबासाहेबांची प्रेरणा

एप्रिल – २०१६

मला प्रभावित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे हिंदू कोड बिलाच्या वेळेस बाबासाहेबांनी सनातन्यांच्या आणि सत्ताधार्‍यांच्या विरोधात जो लढा दिला तो दुर्मिळ आहे, या लढ्यात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पोटगीसाठी लढणारी वयोवृद्ध मुस्लिम स्त्री, शाहबानो हिच्या प्रकरणात तत्कालीन भारत सरकारने मुस्लिम स्त्रीचा पोटगीचा अधिकार हिरावून घेतला. त्या पार्श्वभूमीवर तर बाबासाहेबांच्या या लढ्याची आम्हा मुस्लिम कार्यकर्त्यांना तीव्र जाणीव झाली.

समता, सामाजिक न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी लढणार्‍या प्रत्येकासाठी भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक भारतीय नागरिक म्हणून मी त्यांना अभिवादन करते. ‘एक स्त्री म्हणूनही मी त्यांना अभिवादन करते. कारण त्यांनी घटनेच्या गाभ्यात स्त्री-पुरुष समतेलाही स्थान दिले. इतकेच नाही, तर ते त्यासाठी झगडले देखील. हिंदू कोड बिल हे त्याचे उदाहरण आहे.

जेव्हा काही निराश करणारी स्थिती येते, तेव्हा आपला वैचारिक वारसा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतो. आजही प्रतिकूल परिस्थितीशी लढताना किंवा पुढची दिशा शोधताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्यांनी दिलेला लढा मला प्रेरणादायी वाटतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय शाळेत असताना फारच थोडा झाला. खरं म्हणजे शालेय वयात परिचित होणार्‍या विचारांचा दूरगामी परिणाम होत असतो. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव मला सामाजिक चळवळीत आल्यावर जास्त जाणवायला लागला. 1982 साली जेव्हा मुस्लिम पंचकमिटीने मुस्लिम स्त्रियांवर आततायी सिनेमा बंदी लादली आणि शिक्षेच्या नावाने छळ सुरू केला, तेव्हा सिनेमा बंदी विरोधात सत्याग्रहात्मक आंदोलन करताना आम्हाला सर्वात मोठा आधार होता, भारताच्या घटनेने दिलेल्या नागरिकांच्या स्वातंत्र्य आणि अधिकारांचा तेव्हापासून ते लढ्याच्या प्रत्येक टप्प्यावर भारताचं संविधान हा एक भक्कम आधार वाटत आलेला आहे. तसेच घटनेतील मूल्यविचार खूप महत्त्वाचे वाटत आलेले आहेत.

सामाजिक चळवळीत आल्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि त्यांच्यावर लिहिलं गेलेल्या साहित्याचं मिळेल तसं वाचन करत गेले आणि अजूनही ते सुरूच आहे. या वाचनातून पदोपदी, बाबासाहेबांचा लढा आणि त्यांच्या विचारांचा परीघ किती मोठा, विशाल आहे, हे जाणवत गेलं.

या वाचनातून संघर्षासोबत अभ्यासूपणा असलेल्या आणि दलित, शोषित समाजाबद्दल मनात प्रेम असलेल्या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा सतत माझ्या कामात मला मिळाली. बाबासाहेबांनी दलित, शोषित समाजाला दिलेल्या एका संदेशाचा नेहमी उल्लेख केला जातो. तो संदेश म्हणजे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ पण कसे शिक्षण? जे समाजापासून तोडते, आत्मकेंद्री बनवते आणि संघर्ष मारते असे शिक्षण का! महावीर, गौतम बुद्धांनी विद्या कशी असावी, याबाबत जे सांगितले आहे, त्याचा उल्लेख केला आहे, महावीर गौतम बुद्ध म्हणतात, ‘प्रज्ञा म्हणजे शहाणपण, शील म्हणजे सदाचरणाने संपन्न असे आयुष्य, करुणा म्हणजे सर्व मानवजातीबद्दल प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी आत्मियता या चार असल्या तरच विद्येचा काही उपयोग आहे.’ नुसत्या पदव्या मिळवल्याने काही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधनसामुग्री होय. विजेचा गोळा कळ दाबताच जसा निमिषार्धात अंधार नष्ट करून स्वत:चे प्रकाशमान साम्राज्य निर्माण करतो, त्या प्रमाणे शिक्षण घेतलेल्या प्रत्येक माणसाने समाजातील अज्ञान दूर केले पाहिजे. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीला या कसोट्यांवर घासून घेतलं, तरच बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या संदेशाला भरीव अर्थ प्राप्त होऊ शकेल, असे शिक्षणाच्या प्रश्नावर काम करताना मला स्पष्ट झाले. बाबासाहेबांनी त्यांच्या तीन उपाख्य दैवतांची जी चर्चा केली, त्यात पहिलं म्हणजे विद्या होय. विद्येशिवाय मानवाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. शांतता आणि माणुसकीचं शिक्षण देणारी विद्या सर्वांना अवगत झाली पाहिजे.

बाबासाहेबांनी सांगितलेले दुसरे दैवत हे विनय आणि कोणाची याचना न करणे हे आहे. ते म्हणतात, ‘माझे ध्येय असे होते की, माझे पोट भरले पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. त्यांनी सांगितलेले तिसरे दैवत म्हणजे शील होय. याबाबत त्यांनी असे म्हटले आहे की, “माझ्या आयुष्यात दगाबाजी, फसवणूक वा आत्मसिद्धीकरिता पाप केले, असे मला आठवत नाही. या बद्दल मला मोठा अभिमान वाटतो. मी अनेक वेळेला विलायतेला गेलो; पण अजून दारू प्यायलो नाही, विडी प्यायलो नाही, मला कसलेही व्यसन नाही. कोणाला या गोष्टी साध्या वाटू शकतील; पण सामाजिक जीवनात या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.”

शिक्षणाच्या संदेशासोबतच त्यांच्या ज्या मुद्द्याने माझ्या कामाला प्रभावित केले, तो इथल्या जातिव्यवस्थेच्या संदर्भात आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘हिंदू समाज नावाची वस्तूच कोठे अस्तित्वात नाही. तो केवळ जातींचा संग्रह आहे. प्रत्येक जातीला आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव आहे. तिचे जीवन किंवा विनाश तिच्यापुरताच मर्यादित आहे. हिंदूंच्या नीतिमत्तेवर जातीचा झालेला परिणाम अत्यंत शोकजनक आहे. सार्वजनिक हिताची वृत्ती जातीने ठार मारली आहे. सार्वजनिक दयाबुद्धी जातीने नष्ट करून टाकली आहे. सार्वजनिक लोकमत जातीने अशक्य करुन सोडले आहे.’ समाजातील जातिव्यवस्थेच्या उतरंडीमुळे माणसाला माणूस म्हणून जगणे कठीण होते. इतकेच नाही, तर ती उतरंड तशीच टिकून राहावी, असा प्रयत्न उच्च जाती शोषक म्हणून नेहमीच करत असतात आणि आज तर त्याला राजकीय एकक असल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी घटना समिती समोरील भाषणात ‘आपण आपली राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाही बनवली पाहिजे’, असे आवाहन केले. ‘सामाजिक लोकशाहीचा राजकीय लोकशाहीला पाया नसेल तर ती टिकूच शकत नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे तरी काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता या जीवनमूल्यांना मान्यता देऊन ती जीवनमूल्ये मानणारी लोकशाही म्हणजे सामाजिक लोकशाही होय.’

बाबासाहेबांनी केलेले सत्याग्रह, त्यांनी दलित, शोषित समाजासाठी घेतलेल्या सभा, परिषदा याही खूप प्रेरणादायी आहेत. 1920 च्या सुमारास त्यांची पहिली सभा कामाठीपुरा येथे झाली. त्यात दोन-चार कार्यकर्त्यांशिवाय कोणी नव्हते. पण पुढे मात्र त्याला महासागराचे स्वरूप प्राप्त झाले. विशेष महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला दिसतो. काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, महाडच्या तळ्याचा सत्याग्रह. या सत्याग्रहांमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या, त्या रस्त्यावर उतरल्या त्यांनी लाठ्या, तुरुंगवास भोगला. अस्पृश्य म्हणून खालच्या, पायरीवर ठेवल्या गेलेल्या, माणुसकीचा हक्क नाकारला गेलेल्या समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाया बाबासाहेबांनी घातला. इतकंच नाही, तर देवदासी, मुरळ्या, जोगतिणी यांच्याबाबत असलेल्या प्रथा उखडून टाकण्याच्या चळवळीची सुरुवातही बाबासाहेबांनी केली. समाजात महिलांमध्ये सामाजिक, राजकीय जागृतीही आणली.

यासोबतच मला प्रभावित करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे हिंदू कोड बिलाच्या वेळेस बाबासाहेबांनी सनातन्यांच्या आणि सत्ताधार्‍यांच्या विरोधात जो लढा दिला तो दुर्मिळ आहे, या लढ्यात त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर मंत्रिपदाचा त्यागही त्यांनी केला. पोटगीसाठी लढणार्‍या वयोवृद्ध मुस्लिम स्त्री, शाहबानो हिच्या प्रकरणात तत्कालीन भारत सरकारने मुस्लिम स्त्रीचा पोटगीचा अधिकार हिरावून घेतला. त्या पार्श्वभूमीवर तर बाबासाहेबांच्या या लढ्याची आम्हा मुस्लिम कार्यकर्त्यांना फार जाणीव झाली.

एखाद्या दलित, शोषित समाजाचं नेतृत्व कसं असावं या बाबतीत मुस्लीम समाजात काम करताना आम्हा मुस्लिम कार्यकर्त्यांना बाबासाहेबांचं नेतृत्व आदर्श आणि मार्गदर्शक वाटतं.

-रझिया पटेल