Categories
स्पेशल रिपोर्ट

आमी जिआय थाकीबो बिसारू!

आम्हाला मुक्ती हवीय!
वार्षिकांक - २०१५

स्त्रियांना ‘चेटकीण’ ठरवून समाजातून बहिष्कृत करण्याचे, मारहाण करण्याचे; अगदी ठार मारण्याचेही प्रकार देशभरात विविध ठिकाणी घडत असतात. ‘महाराष्ट्र अंनिस’ या प्रथेविरोधात जोरदार संघर्ष करत आहे. पण आसाममध्ये या प्रथेची तीव्रता खूपच आहे. आजही असंख्य स्त्रिया आणि पुरुष या प्रथेला तेथे बळी पडत आहेत. यामुळे आसाममध्ये डायन प्रथेविरुद्ध कायदा अस्तित्वात येत आहे. आसाममधील या अघोरी प्रथेचा ‘आँखो देखा हाल’ ‘अंनिस’च्या वाचकांसाठी प्रत्यक्ष आसामात जाऊन विनायक सावळे व राहुल थोरात यांनी तपशिलाने सादर केला आहे. त्यावरून आसामधील या डायन प्रश्नाची दाहकता वाचकांच्या नक्कीच लक्षात येईल.

ओ मूर आपनार देश,

ओ मूर चिकुनी देश,

एनेखान सुवाला, एनेखान सुफला,

एनेखान मोरोमार देश.

अर्थात, ‘हे माझ्या देशा, हे माझ्या प्राणप्रिय देशा, अतिप्रेमळ आणि अतिसुंदर अशा माझ्या देशा, ज्याने नाव घेताच माझ्या मनात सुरेल तरंग उठतात, अशा माझ्या माय देशा.’ या चार ओळी आहेत, आसामच्या राज्यगीताच्या. आपल्या मायभूमीबद्दल अभिमान या ओळी व्यक्त करतात आणि का करू नये? खरोखरच आसाम अतिसुंदर आणि अतिप्रेमळ म्हणावा असाच आहे.

1950 च्या संविधानानुसार ‘आसाम’ राज्याची निर्मिती झाली. खरे तर रोज सकाळी चहा पितानाच आपणा सर्वांना आसामची आठवण होतेच. पूर्वांचल म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश, देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांच्या अंतराने आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड व त्रिपुरा अशी सात वेगळी राज्ये अस्तित्वात येऊन सप्तभगिनींचा प्रदेश बनला. दक्षिणेकडे बांगला देश आणि उत्तरेकडे नेपाळ व भूतान यांच्यामधील भारतीय भूभागाच्या केवळ 10 ते 20 किलोमीटर रूंद आणि 200 किलोमीटर लांबीच्या चिंचोळ्या भूपट्टीने (चिकन नेक) आसाम भारताच्या मुख्य भूमीला चिकटलेला आहे. निसर्गाने आसामला सौंदर्याची देणगी देण्यात कोणतीही काटकसर केलेली नाही.

‘आसाम’ शब्द ऐकला की माझ्या मनात आधी काय यायचं? डोंगराच्या निमुळत्या जमिनीवरील ते हिरवेगार चहाचे मळे, त्या मळ्यात काम करणार्‍या आसामी आदिवासी महिला, पाठीवर विशिष्ट गोल लांब टोपली बांधलेल्या, चहाची कोवळी पानं तोडून मागच्या मागे टोपलीत टाकणार्‍या, सुप्रसिध्द काझीरंगा अभयारण्य आणि तेथील एकशिंगी गेंडा, दरवर्षी येणारा ब्रम्हपुत्रेचा महापूर आणि त्यामुळं विस्कळित होणारं जनजीवन, चेरापुंजी हे जगातलं सर्वाधिक पर्जन्याचं ठिकाण, कर्णमधुर आवाजाचा बादशाह, प्रसिध्द गायक दिवंगत भूपेन हजारिका, कधीकधी आपल्या स्वतंत्र बोडोलँडच्या मागणीसाठी हिंसक कृती करणारे बोडो आदिवासी…

पण… मी नुकताच वार्तापत्राचा व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांच्यासह आसामचा आठवड्याचा दौरा करून आलो आणि प्रचंड अस्वस्थ होऊन मी तुम्हाला सांगतोय, आता ‘आसाम’ शब्द ऐकला की मला दिसतात त्या डायन ठरवून खून झालेल्या अनेक आसामी महिला, अजूनही डाकिणीचा आरोप होऊन गावाबाहेर राहून आपला जीव मुठीत घेऊन जगणार्‍या असंख्य भगिनी, डाकिणीच्या प्रश्नाच्या विरोधात ठामपणे उभी असलेली आदिवासी स्त्री बिरूबाला, डाकीण ठरविल्यानंतर त्या सर्व छळाचा धैर्याने सामना करीत पुन्हा गावात निर्धाराने राहणारी लखीमती, 51 पुरुषांना डाकीण ठरवून त्यांना शिक्षा करणारं जगातलं सर्वात मोठं ब्रम्हपुत्रेतलं बेट मौजुली आणि असं बरंच काही, अस्वस्थ करणारं, तुमच्या मनातल्या विकसित भारताच्या स्वप्नांना धक्का देणारं, कटू वास्तवाचं भान देणारं, आपल्या महाराष्ट्राच्या संत आणि समाजसुधारकांच्या वारशाचं महत्त्व अधोरेखित करणारं. त्याचा हा तपशिलातला रिपोर्ताज.

दिनांक 14 सप्टेंबर रोजी मी आणि राहुल पुण्याहून मध्यरात्री विमानाने थेट गुवाहाटीसाठी निघालो. उत्सुकता, थोडी भीती, आनंद अशा मिश्र भावनांनी आम्हा दोघांचा पहिलाच विमानप्रवास झाला. विमानात जागा शोधणं, मोबाईलवर फोटो काढणं, चुकत माकत पट्टा बांधणं, या सर्व अस्सल गाववाल्या कृती आम्ही बिनधास्त केल्या, अन्य प्रवाशांच्या नजरांची पर्वा न करता. आधी दिल्लीत पोहोचलो. देशाच्या राजधानीचं आयुष्यातलं पहिलं दर्शन आणि तेही मध्यरात्रीचं हवाई दर्शन झालं. दिल्लीहून दुसर्‍या विमानाने कोलकातामार्गे एकूण सहा तासांचा प्रवास करीत गुवाहाटीला पोहोचलो. सकाळी गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपीनाथ बारडोलाई विमानतळावर आम्ही उतरलो. आसामला जर पाऊस सुरू राहिला तर दौर्‍याची अडचण होणार, अशी भीती होती. पण आम्ही गुवाहाटीत पोहोचलो आणि स्वच्छ, सुंदर, आल्हाददायक वातावरणाने आमचे स्वागत केले वर निळे आकाश पाहून कोणत्याही पावसाची शक्यता दिसत नव्हती, आनंद झाला. राहुलची पूर्वतयारी छान होती. आधीच सर्व संपर्क केलेले. कधी कुठे कोणाला भेटायचे, याबाबत तपशिलात नियोजन केलेले, ‘अंनिस’चे कार्यकर्ते हैदराबादस्थित पोलीस अधिकारी महेश भागवत यांच्या ओळखीने राहुलने आधीच केलेल्या नियोजनाचा फार उपयोग झाला. कधी, कोणाला, कुठे भेटायचे, याबाबतचा त्याचा गृहपाठ अतिशय उत्तम होता.

दिनांक 15 सप्टेंबर, मंगळवारी सकाळीच विमानतळावर उतरल्याबरोबर राहुलने गुवाहाटीत असलेले; पण मुळचे महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर यांना संपर्क केला. त्यांचे वाहन आम्हाला घ्यायला आले, आम्ही गुवाहाटी पोलीस मुख्यालयासमोरील गेस्ट हाऊसमध्ये उतरलो, फ्रेश झालो आणि आमचा प्रत्यक्ष आसाम राज्यातील डाकीण प्रश्नांचा अभ्यास दौरा सुरू झाला.

आसाम भारताच्या ईशान्य कोपर्‍यातले एक राज्य. तेराव्या शतकात ब्रम्हदेशातून येऊन ब्रम्हपुत्रेच्या खोर्‍यात स्थायिक झालेल्या व पुढे राज्य करू लागलेल्या शानवंशियांना ‘आहोम’ हे नाव स्थानिक लोकांनी दिले. ‘आहोम’चे आकाम आणि त्यापासून आसाम असे नाव पडले असावे, असे म्हणतात. ‘असम’ या संस्कृत शब्दाशी आहोम भाषेतील अचाम (अपराजित) किंवा बोडो भाषेतील हा-कोण (उंच-सखल) या शब्दाचाही संबंध याच्या नावाशी जोडला जातो. आसामला ‘असम’ असाही काहीजण उच्चार करतात. आसामला प्राचीन इतिहास आहे. ब्रम्हपुत्रा आणि इतर नद्यांमुळे सुजलाम् सुफलाम् बनलेल्या आणि अफाट सौंदर्याने नटलेल्या आसाममध्ये घनदाट जंगले, खळाळत वाहणार्‍या नद्या आणि वेगवेगळे पशु-पक्षी विपुल आढळतात. आम्ही प्रवास करताना लहान मोठ्या 15-16 हत्तींचा मोठा कळप बघितला, आसामचे क्षेत्रफळ हे 78 हजार 418 चौ.किमी. म्हणजे महाराष्ट्राच्या सुमारे 1/4 आकाराचे आहे. त्यातील गुवाहाटी, बक्सा, उडालगुडी व गोलपारा या चार जिल्ह्यांच्या दौर्‍याचे आमचे नियोजन होते. हा भाग बोडोलँड म्हणून परिचित. विशेषत: आदिवासी भाग असून डाकिणीचा प्रश्न येथेही आदिवासी जमातीतच अधिक आढळतो. आम्ही आमच्या अभ्यास दौर्‍याला सुरुवात केली.

दीपज्योती सैकिया, ब्रदर्स नावाच्या एका अशासकीय संस्थेचे सेक्रेटरी. या संस्थेच्या वतीने गेले काही महिने डाकीण प्रश्नावर ‘सजगता अभियान’ सुरू आहे. या अभियान यात्रेत सहभागी होण्याचे आमचे नियोजन होते. गुवाहाटीहून आम्ही एक इंडिका गाडी भाड्याने ठरवली. ड्रायव्हर नीलमज्योती या तरुणाच्या रूपाने आम्हाला एक चांगला दुभाषी, मार्गदर्शक आणि मित्र मिळाला. ब्रदर्स संस्थेचा कार्यक्रम त्या दिवशी उदालगुडी जिल्ह्यातील दिमाकुशी तालुक्यातील बरांगजुली गावात होता. गुवाहाटीच्या उत्तरेस सुमारे 130 किमी अंतर पार करीत आम्ही उदालगुडी जिल्ह्यातील बरांगजुली गावाला पोहोचलो. एका सभागृहामध्ये कार्यक्रम आधीच सुरू झालेला होता. ठिकाण होतं ‘सत्र’/‘नामघर’ याची माहिती पुढे आपणास वाचायला मिळेलच.

बाहेर विविध शस्त्रांनी सज्ज अशा सैनिक व पोलिसांचा पहारा होता. त्यांचे अधिकारी पहार्‍याची देखरेख करीत होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी एवढे सैन्य पाहून आम्हास आश्चर्य वाटले, मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. आम्ही आल्याचे संयोजकांना कळले. त्यातील स्थानिक संयोजकांनी आम्हाला विचारमंचावर बोलाविले. या सभागृहात साधारणपणे 150 ते 200 श्रोते कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यात आनंदाची बाब म्हणजे महिलांची उपस्थिती ही 80 टक्के होती. हा अनुभव पूर्ण पाचही दिवस आम्हाला आला. ब्रदर्स संस्था आज या ठिकाणी प्रबोधन करणार होती. कार्यक्रमाचे संयोजन ‘आसाम बोडो स्टुडंट युनियन’ या बोडोंच्या हक्कासाठी लढणार्‍या आणि प्रभाव असणार्‍या बिगर राजकीय विद्यार्थी संघटनेने केले होते. तेथेच ब्रदर्स संस्थेचा सर्वेसर्वा जनरल सेक्रेटरी दीपज्योती सैकिया या तरुणाची भेट झाली. देखणा, उंच, शरीरबांध्याने सुभाषबाबू वाटावा असा तरुण डाकीण प्रश्नावर काम करतोय.

सफेद लांब आणि लाल पट्ट्याची नक्षी असलेला गामोशा (रूमाल) देऊन या कार्यक्रमात आमचे स्वागत करण्यात आले. तेथील बोडो मुलींनीच आमचे स्वागत केले, याचा आनंद वाटला. आपल्याकडे मुलींचा स्वागत समारंभातील वापर हा किळसवाणाच असतो. त्यांना नटवून-सजवून केवळ सत्काराचे सामान विचारमंचावर पोहोचविण्यासाठी वापरले जाते, सत्कार करणारे दुसरेच असतात. येथे तसे नव्हते, मुलींनीच सर्व प्रमुख अतिथी, वक्ते यांचे स्वागत केले. तेथे प्रबोधनाचा कार्यक्रम होता. स्वत: दीपज्योती सैकिया, गुवाहाटी मेडिकल कॉलेजचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.दीपेश भागवती, आसाम बोडो स्टुडंट युनियनचे जिल्हा पदाधिकारी, उदालगुडीच्या डेप्युटी कमिशनर श्रीमती साधना होदाई आणि नामघरचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी मनोगत व्यक्त केले. आसामी भाषेतील कार्यक्रम पूर्ण कळत नव्हता; पण त्यांच्या भावना पोहोचत होत्या. अधूनमधून मी शेजारी बसलेल्या नामघर कार्यकर्त्याशी बोलत असे. डाकीण प्रश्नाबाबत आपले मत-भूमिका ते मांडीत होते. मानसोपचार तज्ज्ञाने प्रश्नोत्तरे घेतली. श्रीमती साधना यांनीही भाषण केले. शेवटी दीपज्योतीचे भाषण झाले, डाकीण प्रश्नासोबत धार्मिक सलोखा आणि हिंसेला विरोध अशी मांडणी दीपज्योतीने केली. भाषण सर्व श्रोते; विशेषत: महिला शांतपणे ऐकत होत्या याचे कौतुक वाटले. मला राहुलने चमत्कार सादरीकरण करावे, असे सांगितले. स्थानिक संयोजकांनी त्यास संमती दर्शविली. मग मीही बुवाच्या ड्रेपरीमध्ये काही चमत्कारांचे सादरीकरण केले. रिकाम्या हातातून सोनसाखळी काढणे, तीर्थाच्या कलशात चमत्काराने पाणी आणणे, असे काही चमत्कार करून दाखविले. माझे हिंदीतील सादरीकरण तेथील एक शिक्षक आसामी भाषेत भाषांतरित करीत होते. चमत्कारांना जोरदार प्रतिसाद मिळाला. दीपज्योतीच्या सांगण्यावरून प्रथमच असे चमत्कार आसाममध्ये सादर होत होते. शेवटी बोडो आदिवासींचे बोडोनृत्य सादर करण्यात आले. सौंदर्य, तारुण्य, ठेका, आनंद, ऊर्जा, लय यांचा सुरेख संगम म्हणजे बोडोनृत्य. पुरुषांची भूमिका वाजविण्याची होती. आणि महिला, तरुणींचा नृत्य आणि गायनात सहभाग होता. विशिष्ट आवाजात आरोळी देऊन पुरूष मंडळी नृत्यांगनांना प्रोत्साहन देत होते. नितांत सुंदर नृत्य. शाळेत वर्षानुवर्षे आम्ही प्रतिज्ञा म्हणतो, आधी विद्यार्थी म्हणून, आणि आता एक शिक्षक म्हणून, त्यात एक वाक्य आहे, “माझ्या देशातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.” औपचारिक आणि कर्मकांडी भावनेने म्हटलेल्या या वाक्याचे महत्त्व जेव्हा ही विविधतेने नटलेली बोडो परंपरा आपण प्रत्यक्ष पाहतो तेव्हा कळते, मनात खोलवर रूजते.

चमत्कार सादरीकरण झाल्यावर तेथील नामघर कार्यकर्त्यांनी माझे अभिनंदन केले आणि येथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांपैकी 95 टक्के श्रोते हे अंधश्रद्धा मानीत नाहीत, असे सांगितले. याचे स्वाभाविकपणे मला आनंद, समाधान यासोबत आश्चर्यही वाटले. कार्यक्रमानंतर आम्ही तेथीलच स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला. भात हे जेवणातील प्रमुख अन्न होते. सोबत सैनिकही होते. मी विचार करीत होतो की येथील 95 टक्के श्रोते अंधश्रद्धा मानीत नाहीत, याचे कारण काय असावे? विचारल्यावर समजले, की आम्ही जेथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलो ती जागा म्हणजे ‘नामघर.’ 15 व्या शतकात आसाममध्ये शंकरदेव नावाचे एक मानवकेंद्री धर्माची भूमिका घेणारे संत होऊन गेले. 1449 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी स्थापन केलेल्या धार्मिक स्थळांना ‘सत्र’ या नावाने संबोधले जाते. तेथील मंदिर परिसर ‘नामघर’ नावाने ओळखला जातो. सत्राचा पुजारी तो सत्राधिकारी असतो. आजही आसाममध्ये त्यांचा प्रभाव चांगला दिसून येतो. त्यांनी उभारलेली धार्मिक स्थळे म्हणजे नामघर. देऊळ म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारणपणे आपण बघतो तशी देवळे नाहीत किंवा कोणत्याही देव-देवतांचा फोटो, मूर्ती नसते. ते निराकार ईश्वरास मानतात. तर या ‘सत्रा’मध्ये गावकरी एकत्र जमून गायन व कीर्तन करतातच; तसेच गावाच्या दृष्टीने महत्त्वाच्या चर्चा व निर्णयही इथेच घेतले जातात. आसामी कला, संगीत, बोडोनृत्य, नाटक, हस्तकला, साहित्य व धर्माची ही शिक्षणकेंद्रे आहेत. नामघर परिसरातील देवळात छोटी मूर्तिविरहित देवळे असतात. पुरासारख्या संकटसमयी गावकर्‍यांच्या राहण्याची व जेवणाची सोयही येथे केली जाते. गावातील छोटी मोठी भांडणे पोलीस ठाण्यात न जाता येथे मिटवली जातात, अशी माहिती मिळाली. पुरोगामी भूमिका घेणारी ही नामघरे आसाममध्ये अनेक आहेत. तेथील सत्राधिकारी गुरू हरेकृष्ण महंतो यांचीही आम्ही भेट घेतली. त्यांनी संपूर्ण आसाममध्ये अशी 28 सत्र असल्याचे सांगितले. महंतोंनी आमच्या चमत्कार सादरीकरणाचे कौतुक केले. तसेच ते पुढे म्हणाले “या ‘सत्रा’मध्ये सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. देव केवळ एक ऊर्जा आहे; फक्त नामस्मरण करा, कोणत्याही प्रकारची कर्मकांडे करण्याची गरज नाही, अशी भूमिका शंकरदेव घेत असत.” याचा प्रभाव म्हणून काय, येथील श्रोते अंधश्रद्ध नव्हते. जशी आपल्याकडे संत तुकारामांची पुरोगामी, मानवतावादी ओळख आहे, तशीच शंकरदेवांची आसाममध्ये आहे. माझ्या मनात एक प्रश्न पिंगा घालीत राहिला; मग आसाममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाकिणीचा प्रश्न कसा?

तेथील भोजन संपवून आम्ही पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालो. दीपज्योती या तरुणात ऊर्जा आणि उत्साह दिसतो. त्याची सविस्तर मुलाखत घेण्याचे नियोजन होते; पण पुढील कार्यक्रमासाठी लगेचच निघावे लागले. तेथून आम्ही भेरगाव टी इस्टेट येथे पोहोचलो. चहाच्या मळ्यातील मैदानाच्या एका टोकाला छोटं स्टेज होतं. भेरगाव हे उदालगुडी जिल्ह्यातील एक चहा उत्पादक खेडं. आज सायंकाळचा कार्यक्रम येथे होणार होता. ‘ब्रदर्स’च्या कार्यकर्त्यांनी आधीच येऊन बॅनर्स लावले होते. श्रोते जमा करण्यासाठी त्यांनी एक पथनाट्य तेथे मैदानात सादर केले. ते पथनाट्य स्वाभाविकपणे आसामी भाषेत ‘डाकीण ः प्रश्न आणि अंधश्रध्दा’ याबाबत होते. या पथनाट्याचा आशय हा पुढीलप्रमाणे होता. “गावातील एक बेज (मांत्रिक) व त्याचा मित्र गावातील एका सधन; पण निराधार महिलेला ‘डायन’ समजून तिची संपत्ती हडप करणार असतात. हा त्याचा डाव त्याची आधुनिक विचारांची पत्नी उधळून लावते आणि ‘डायन’ प्रथेवर गावकर्‍यांचे प्रबोधन करते.” नाट्यातील अभिनय छानच होता. दोन महिला आणि तीन पुरुषांचा सहभाग नाटकात होता. अधून- मधून विनोदाची पेरणी नाटकात होती, श्रोते मनमुराद हसत होते. शेवटी अंधश्रद्धा आणि डाकिणीबाबत संदेश दिला जात होता. पथनाट्य संपल्यावर पुन्हा दीपज्योतीने भाषण केले, सजगता अभियानाबाबत माहिती दिली. मी पुन्हा चमत्कार सादरीकरण केले. श्रोत्यांमधून येऊन तेथील एका किशोरवयीन मुलीने जळता कापूर खाऊन दाखविला, डाकीण प्रश्नावर सडेतोड भाषण केलं, श्रोत्यांनी टाळ्या वाजविल्या. कार्यक्रम छान झाला. मला आम्ही नंदुरबार जिल्ह्यात काढलेल्या डाकीण प्रथा विरोधी प्रबोधन यात्रेची आठवण झाली.

कार्यक्रमादरम्यान काही लोकांशी बोलणे होत होते. कार्यक्रम लोकांना आवडत होता; पण डायनी (डाकीण) वरचा त्यांचा विश्वासही कायम होता. डायन असते, ती मंत्राने मारू शकते, आजारी पाडू शकते, रक्त पिते, कोणताही वेश धारण करू शकते, पहिला प्रयोग आपल्या नातेवाईकांवर करते, अशी समजूत तेथील चहाच्या मळ्यात काम करणार्‍या कामगारांची होती. डायनला मारणारे कोणताही अपराध करीत नाहीत, असे अत्यंत शांतपणे आणि ठामपणे सांगणारे मध्यमवयीन माणसंही भेटली. तेव्हा आसाममध्ये डायनचा भ्रम किती खोलवर रूजला आहे, याची जाणीव झाली. या खोल जखमेवरचं आज दिलं जाणारं उत्तर मला अतिशय उथळ वाटू लागलं. पण याने किमान विचारांची प्रक्रिया सुरू होऊ शकली तरी काय हरकत आहे, असे स्वत:लाच बजावत अस्वस्थ मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम संपला. काहीतरी नवीन, मनोरंजनात्मक माहिती मिळाल्याचं समाधान श्रोत्यांच्या चेहर्‍यावर दिसत होतं. चमत्कार सादरीकरण सर्वांनी प्रथमच पाहिल्याने त्याबाबत चर्चा होत होती. दीपज्योती या सर्व यात्रेतील बारीक-सारीक संयोजन बघत होता. रात्र झाली. त्याच्याशी सकाळी तपशिलात बोलावे, असं ठरलं. एका शासकीय विश्रामगृहात आम्ही रात्रीचा मुक्काम केला. दिवसभरचा प्रवास आणि कार्यक्रमांचा थकवा यामुळे लगेचच झोप लागली.

बोडोंच्या देवघरात देव नसतो

आसाममधील बोडो आदिवासी हे ‘बाथो’ या पंथाचे असल्याने त्यांच्या देव्हार्‍यात कोणत्याही देवाची मूर्ती नसते. ते मूळचे निसर्गपूजक आहेत. घराबाहेर असणार्‍या देव्हार्‍यात ते तांदूळ व पाणी याची पूजा करतात. देव्हार्‍याच्या बाहेर निवडुंगाचे झाड लावतात. या झाडाला ते पवित्र मानतात. निवडुंग जसा प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहतो, तसेच हे बोडो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत येथे टिकून आहेत.

सकाळी ठरल्याप्रमाणे दीपज्योती सैकिया यांची मुलाखत घेण्यास मी आणि राहुलने सुरुवात केली. आज आसाममध्ये दीपज्योती सैकिया हे नाव माध्यमांमध्ये सुपरिचित झाले आहे. डाकीण म्हणून काढलेल्या महिलांना न्याय मिळवून देणारा, डाकीण प्रश्नावर कायदा व्हावा म्हणून राजकीय पातळीवर सतत पाठपुरावा करणारा, सतत समाजामध्ये प्रबोधनासाठी लढणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना मान्यता आहे. स्वत: इंटेरिअर डिझाईनर आहेत, त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहेे. शासकीय पातळीवर सातत्याने संपर्क करून त्यांनी संवाद ठेवला आहे. ते आपल्या कामाबाबत बोलत राहिले.

मी आपण सार्वजनिक जीवनात केव्हा आणि कशी सुरुवात केली?

दीपज्योती वडिलांच्या प्रेरणेने मी सार्वजनिक जीवनात आलो. 1999 मध्ये महाविद्यालयीन जीवनापासून माझ्या कामाला सुरुवात केली. प्रथम सांप्रदायिक एकता, राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम सुरू केलं. त्यानंतर ‘आसाम सत्र महासभा’ या 100 वर्षांची परंपरा असलेल्या प्रबोधन चळवळीत सहभागी झालो. त्यानंतर मी सन 2007 मध्ये ‘समनिता युवा तीर्थ’ या नावाचे म्हणजे ‘सबको साथ लेकर चलना’ अशी भूमिका घेऊन युवा संघटन उभे केले. आता काही वर्षांपूर्वीपासून ‘ब्रदर्स’ शी जोडला गेलो. त्यातच आता मी काम करीत आहे.

ब्रदर्स संस्था काय काम करते?

मुख्य काम हे जातीय-धार्मिक सलोख्याचे आहे. जात- धर्मभावनेच्या पलीकडे जाऊन बंधुभाव जोपासण्याचे आवाहन करणे. महापुरातील संकटग्रस्त लोकांना मदत करणे, संकटे जात-धर्म बघून येत नाहीत, म्हणून आपण सर्वांनी जात-धर्माच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज आहे, असे लोकांचे प्रबोधन करतो.

मग तुम्ही डाकीण प्रश्नावर काम कसे सुरू केले?

माझं धार्मिक सलोख्याचं, एकतेचं काम सुरू होतं. त्यासोबत शिक्षण, रोजगार आणि आरोग्याच्या क्षेत्रातही काम सुरू केलं. आरोग्याच्या कामात मात्र आम्हाला यश येईना. जेव्हा त्यामागील कारणांचा शोध घेतला, तेव्हा लक्षात आलं, यामागे मुख्य कारण अंधश्रद्धा हेच आहे. बळी, भूत-प्रेत, डायन, बेझ (म्हणजे नखांमध्ये बघून भविष्य सांगणारा), ओझा (मांत्रिक) यांचा मोठा अडथळा समाजाच्या विकासात आहे, याची जाणीव झाली. त्यामुळे 2009-10 पासून डाकीण निर्मूलनाचे स्वतंत्र काम सुरू केलं.

दीपज्योतीच्या संपूर्ण वागण्यात चांगला आत्मविश्वास जाणवतो. सरकारी यंत्रणेशी त्यांनी चांगले संबंध निर्माण केले आहेत. अनुभवातून त्यांनी आपली कामाची पध्दत ठरवली आहे. जसे तालुक्याच्या कार्यक्रमात जर तालुका पोलीस अधिकारी किंवा तहसीलदार हवा असेल तर त्यांच्याशी न बोलता थेट एस. पी. िंकंवा जिल्हाधिकार्‍यांशी बोलणे, वरिष्ठ प्रमुख यंत्रणांचा वापर करून खालील यंत्रणांचा सहभाग घेणे, याप्रकारे कामात गती आणि प्रभाव आणता येतो, यावर दीपज्योतीचा विश्वास आहे. माध्यमांशी त्यांनी चांगले संबंध ठेवले आहेत. त्यांच्या कामाची नोंद माध्यमांनी वेळोवेळी घेतली आहे. थोडी आक्रमकता त्यांच्या एकूण शैलीत दिसून येते.

मग डायनवरचे काम पुढे कसे नेले?

अंधश्रद्धेविरोधी काम सुरू झाले. 2013-14 पर्यंत काम खूप वाढले. डायनच्या नावाने हत्या, बळी देण्याची प्रथा, स्मशान-कब्रस्थानातील पूजापाठ-मांत्रिकगिरी याबद्दलचे प्रबोधनाचे, संघर्षाचे काम आम्ही करू लागलो. प्रत्यक्ष गावागावात जाऊन डायन प्रश्न समजून घेतला. आदिवासी महिलांचे होणारे हाल, त्यांचे शोषण आणि खून या सर्व गोष्टी स्वत: बघितल्या. या प्रश्नावर ‘आसाम महिला समता परिषद’ काम करीतच होती. परंतु त्यांचे प्रयत्न खूपच कमी पडत होते. म्हणून मग आम्ही डायन प्रश्नाबाबत ब्रदर्स संस्थेच्या वतीने रान उठवायचे ठरवले. माध्यमांचा वापर करून राज्यात याविरोधात एक माहोल उभा केला. ब्रदर्स संस्थेच्या वतीने आम्ही डायन ठरवून मारहाण झालेल्या महिला-पुरुषांना हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करतो त्यांना शासनाच्या आरोग्य विभागाची वैद्यकीय मदत मिळवून देतो. तसेच त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहून त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास कायदेशीर मदत करतो. जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेच्या मदतीने आम्ही पीडित व्यक्तीचे त्यांच्याच गावात पुनर्वसन करतो. शासकीय अधिकारी व पोलिसांना गावामध्ये घेऊन जाऊन गावकर्‍यांचे डायनवर प्रबोधन करतो.

तुम्हाला पोलीस यंत्रणेची काही मदत झाली का?

पूर्वी पोलिसांकडे गेल्यावर आम्हाला प्रतिसाद मिळायचा नाही. पोलीस टाळत असल्याचे लक्षात आले. अनेकदा तेच डायन मानत असल्याचाही अनुभव आला. ते म्हणायचे, “ये आदिवासी कभी सुधरेंगे नहीं, मर मरकेही ये लोग ठीक हो जाएंगे।” काय करणार? हे पोलीसही याच समाजाचा भाग आहेत. परंतु आता माझे नाव सुपरिचित झाल्याने पोलीस अधिकारी सहकार्याची भूमिका घेतात. डायनचा प्रश्न पुढे आल्यावर आम्ही स्वतंत्र कायद्याची मागणी केली. त्यासाठी प्रत्यक्ष डायन म्हणून काढलेल्या महिलांच्या केसेसचा अभ्यास केला. ड्राफ्टिंगसाठी काही बाबी शासनाला सुचवल्या. त्या अनुषंगाने अन्य राज्यांच्या कायद्याचाही अभ्यास केला. तुमच्या महाराष्ट्राच्या जादूटोणाविरोधी कायद्याचाही अभ्यास केला. त्याचा मला खूप उपयोग झाला. महाराष्ट्रात असा कायदा झाल्यामुळे आमच्या कायद्याच्या मागणीला येथे मोठे पाठबळ मिळाले. आम्हाला कायदा कठोर हवा होता. आम्ही कठोरातील कठोर कायदा करण्याचा प्रयत्न केला आहे.

हो, आपले अभिनंदन! आताच काही दिवसांपूर्वी आसाम शासनाने डायन प्रथेविरोधी कायदा पारित केला आहे. आता कायद्याची काय स्थिती आहे?

कायदा मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. आता राज्यपालांच्या सहीसाठी तो त्यांच्या कार्यालयात आहे. त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो मा. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी दिल्लीला जाईल आणि त्या स्वाक्षरीनंतर तो प्रत्यक्ष कायदा अस्तित्वात येईल. पण आमच्या प्रयत्नांना यश आले, याचा आनंद आहे.

या कायद्याबाबत तुम्ही समाधानी आहात काय?

हो! मी समाधानी आहे. पण त्यासाठी अनेक राजकीय अनुभवांचे चढउतार पाहिले. प्रचंड पाठपुरावा त्यासाठी करावा लागला. विधानसभेतील चर्चांना अनेकदा उपस्थित राहायचो. सत्ताधारी आमदारांना, मंत्र्यांना काही बाबी सुचविलेल्या असायच्या. उदाहरणार्थ या कायद्यात बेझ, ओझा (बुवा, मांत्रिक) यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी तरतूद असावी, अशी मी मागणी केली होती. त्यांनी ते मुद्दे विधानसभेत मांडणार, असे मला स्पष्ट आश्वासन दिलेले असायचे. मी प्रेक्षक गॅलरीत बसून माझ्या मुद्द्यांबाबत चर्चेची वाट पाहायचो, पण त्यांची चर्चा व्हायची नाही. दुसरेच काहीतरी चर्चिले जायचे. त्यात समाधानाची एक गोष्ट घडली की हा कायदा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा, ही माझी मागणी मान्य करण्यात आली. तसेच याच्या फिर्यादी आणि साक्षीदार यांना संरक्षण पुरवण्यात यावे, हा मुद्दा देखील शासनाने मान्य केला. डायन ठरविणार्‍या व्यक्तीला सात ते पंधरा वर्षे तुरुंगवास आणि पन्नास हजार ते एक लाख रुपये दंड, अशी जबर तरतूद कायद्यात आहे. दंडाचे हे पैसे पीडिताला मिळणार आहेत. पीडिताचे आरोग्य, पुनर्वसन यासाठीही कायद्यात तरतूद आहे. परंतु डायन प्रश्नावर काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षणाची आम्ही सुचवलेली तरतूद शासनाने या कायद्यात घेतली नाही.

याबाबत आमचा अनुभव फार मोठा आहे. आम्ही अठरा वर्षे संघर्ष केलाय. सनदशीर म्हटले जाणारे सर्वच मार्ग आम्ही कायद्यासाठी अवलंबिले; मात्र कायदा झाला तो आमच्या नेत्याच्या खुनानंतर. फार मोठी किंमत मोजली आम्ही; कधीही भरून न निघणारी.

हो, मी वाचलेय सर्व. डॉ. दाभोलकरसाहेबांचं यातील योगदान ऐतिहासिक आहे. येथेही कायदा सहज झाला नाही. त्यासाठी भरपूर आंदोलने करावी लागली. राज्यभर डायनच्या घटना घडत होत्या. आम्ही त्या जास्तीत जास्त प्रमाणात माध्यमांपर्यंत पोहोचविल्या. शासनावर चांगला दबाव तयार झाला. त्यामुळे 13 सप्टेंबर 2013 रोजी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी, ‘आम्ही याच वर्षी कायदा करू’ असे आश्वासन दिले. त्यानंतरही काहीही कारवाई झाली नाही, आंदोलने, मागण्या सुरूच होत्या. त्याचबरोबर राज्यभर डायनच्या घटनाही घडतच होत्या. 22 ऑक्टोबर 2013 रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर काम करीत असलेल्या सर्व संघटना प्रतिनिधींची बैठक बोलावली. त्यात आमच्या भूमिका जाणून घेतल्या. अशा बैठकांचा सिलसिला सुरूच होता. 4 नोव्हेंबरला पुन्हा दुसरी बैठक झाली. कायद्याच्या विविध तरतुदींबाबत चर्चा झाली. तेव्हा आम्ही दबाव वाढविण्यासाठी मीडियामध्ये पुन्हा कायद्याची मागणी केली. त्यानंतर एका वकिलाने याबाबत गुवाहाटी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यावर नोव्हेंबर 2013 च्या अखेरीस हायकोर्टाने सरकारला खडसावले आणि लवकरात लवकर कायदा करण्याचा आदेश दिला. 27 मे 2015 रोजी मी डायनच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘सजगता अभियान’ सुरू केले. आमचा दबाव आम्ही अधिक वाढवला. 16 जून 2015 ला याबाबत शेवटची एक बैठक सरकारने बोलावली. यात विविध सामाजिक संस्था, संघटना, विविध शासकीय विभागांचे प्रमुख या सर्वांच्या प्रतिनिधींशी कायद्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यात सर्वांच्या सूचनांची नोंद घेण्यात आली. नियमित पाठपुरावा सुरूच होता. माध्यमांनीही आपला दबाव कमी पडू दिला नाही. दिनांक 10 ऑगस्ट 2015 पासून विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पहिल्याच दिवशी या कायद्यावर चर्चा झाली. विरोधी पक्ष बीजेपीने सहकार्याचे आश्वासन दिले. आसाम गण परिषदेशीही आम्ही चर्चा केली होती. शेवटी तो क्षण आला… 13 ऑगस्टला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी विधानसभेत कायदा पारित झाला. राज्यभर आम्ही आनंद व्यक्त केला. राज्याच्या गृह विभागाचा हा कायदा आहे. विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांची स्वाक्षरी झाली. आता तो कायदा राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेला आहे. पुढे मा. राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन कायदा अस्तित्वात येईल.

अभिनंदन दीपज्योती! तुम्ही लढून तुम्हाला हवं ते मिळवलं. मनापासून अभिनंदन! पण कायद्याचा दिल्लीतील पुढील प्रवास वेगाने होईल, याबाबत तुम्ही काय नियोजन केलेय?

याबाबत आमच्या हातात सरकारवर सतत दबाव ठेवणं हेच आहे. ते आम्ही पूर्ण ताकदीने करीत आहोत.

दीपज्योतीने तपशिलात सर्व माहिती सांगितली. त्याच्या धडाडीचे कौतुक वाटले. प्रवासात असताना त्याला डायनबाबतच्या तक्रारींचे फोन येत होते, ‘मी आता कार्यक्रमात व्यस्त आहे, परवा येतो’ वगैरे सांगत तो त्या तक्रारींची नोंद घेत होता. त्याचे नियोजन चांगले होते. पण दीपज्योतीशी बोलताना काही बाबी खटकत राहिल्या – ते डाकीण प्रश्नावर काम करणार्‍या अन्य संस्था, संघटना, व्यक्ती यांच्या योगदानाबाबत काहीही सांगत नाहीत. त्यांच्या स्वत:च्या ब्रदर्स संस्थेच्या कोणत्याही सदस्याबाबत त्यांनी काहीही उल्लेख केले नाहीत, आम्ही दोन दिवस त्यांच्या सजागता अभियानात सहभागी झालो. या दोन दिवसात ब्रदर्स संस्थेच्या एकाही सदस्याने सहभाग दर्शविला नाही, यावरून दीपज्योती यांची ‘एकला चलो रे’ अशी भूमिका आहे काय, अशी शंका येते. अन्य संस्थांबाबतही ते सकारात्मक काही बोलत नाहीत. पण या विषयाला फक्त आसामच नव्हे, तर देश आणि जगाच्या पाठीवर चर्चेला आणण्यासाठी ‘बिरूबाला राभा’ या आदिवासी महिलेचे योगदान आहे, याचा मात्र त्यांनी उल्लेख केला. डायनच्या प्रश्नावर लढणारी बिरूबाला ही पहिली आहे, आणि तिचे कामही खूप आहे, असा उल्लेख दीपज्योतीने केला.

राहुलने केलेल्या नियोजनात आम्ही या शूर बिरूबाला राभांना भेटणार होतो. तत्पूर्वी आम्ही आज दुपारी ब्रदर्स संस्थेच्या अभियानातील एका कार्यक्रमात सहभागी होणार होतो. दीपज्योतीने नाटक सादर करणार्‍या कलाकारांना आणि पूर्वतयारी करणार्‍या कार्यकर्त्यांना आधी पुढे जाऊन तयारी करण्यास सांगितले होते. आमची मुलाखत संपली होती. आता सकाळचे साडेनऊ वाजत आले होते. पुढील कार्यक्रमासाठी आम्ही राऊटा या तालुक्याच्या गावी जाणार होतो. या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे हा कार्यक्रम डायन ठरवून प्रचंड छळ सोसलेल्या आणि निर्धाराने आपल्या गावात परत आलेल्या महिलेने आयोजित केलेला होता. तिच्याबाबत दीपज्योतीने आम्हाला आधीच सांगितले होते. आम्हा दोघांना त्या शूर महिलेला भेटण्याची उत्सुकता लागली होती. आम्ही नाश्ता केला, बटाट्याची भाजी आणि पापडी. येथे बटाटा खूप मोठ्या प्रमाणावर पिकतो, म्हणून प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे हे असतातच, अगदी चिकन आणि मटणमध्येही बटाट्यांचे दर्शन आम्ही घेतले. नाश्ता झाल्यावर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी निघालो. तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी राऊटाला पोहोचलो. पुन्हा तोच आर्मीचा आणि पोलिसांचा फौजफाटा आम्ही बघितला. एकही कार्यक्रम सैनिकांच्या आणि पोलिसांच्या कडक पहार्‍याशिवाय झाला नाही. हा भाग पोलीस आणि आर्मी यांच्या संयुक्त देखरेखीखाली असल्याचे समजले, म्हणून दोन्ही विभागांची सुरक्षा प्रत्येक ठिकाणी होती. बोडोलँडची मागणी घेऊन अनेक वर्षे हिंसात्मक कारवायांचा बळी ठरत राहिलेला हा भाग होता. सध्या शस्त्रसंधी झाल्याने बोडो अतिरेकी आणि सरकार यांच्यात चर्चा सुरू असल्याचे समजले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात येथे बोडोंना स्वायत्तता दिली आहे. येथे बोडोलँड टेरेटरी कौन्सिल (बी.टी.ए.) चा अंमल आहे. पोलीस आणि कलेक्टर सोडून सर्व विभाग बी.टी.ए.च्या प्रभावाखाली आहे. तरीही जागोजागी आर्मीचे जवान तैनात होते. पहारा देणारे जवानही कार्यक्रम बघत असत, आवडल्याचे सांगत. याची नितांत गरज असल्याचेही सांगत. कार्यक्रमासाठी पत्र्याचे एक शेड व त्यात काँक्रीटचं व्यासपीठ बनविलेलं, अशी छानच व्यवस्था होती. आधीच आलेल्या कलाकारांनी बॅनर्स लावणे, पथनाट्य करणे, लोकांना जमविणे अशी कामे केलेलीच होती. साधारणपणे 100 ते 125 श्रोते असावेत; यात पुन्हा महिलांची संख्या लक्षणीय होती. गेल्याबरोबर मला बुवाबाजीचे चमत्कार सादर करण्यास सांगण्यात आले. मग मीही चमत्कार सादरीकरणाला सरुवात केली. मी बाबाच्या ड्रेपरीत सादरीकरण केले, हिंदीतील माझे सादरीकरण ब्रदर्स संस्थेत कार्यरत तरुणी दिबाजानी दास आसामीत भाषांतर करीत होती. तिचं भाषांतरही तिच्यासारखंच सुंदर होतं. महिलांचा उत्साह बघण्यासारखा होता. मलाही सादरीकरणात आनंद वाटत होता. हिंदीही चांगलं श्रोत्यांपर्यंत पोहोचत असल्याचा मला अनुभव आला, “डॉक्टरांच्या खुनानंतरही आम्ही काम थांबू तर दिलं नाही उलट दुप्पट जोमाने आम्ही काम करीत आहोत,” या माझ्या वाक्याला भाषांतराआधीच टाळ्या पडल्या, आनंद वाटला. राहुलने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. भावना जर एकच राहिली तर भाषा ही अडचण नसतेच याचा पुन्हा अनुभव आला. हा अनुभव मी आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरही घेतला आहे. कार्यक्रम छान झाला. या कार्यक्रमादरम्यान एक साधारणपणे पस्तिशीतील, सडपातळ बांध्याची, टिपिकल आसामी लूक असलेली, आपल्या चालण्या बोलण्यात आत्मविश्वास असलेली एक महिला कार्यक्रमाच्या संयोजनाच्या निमित्ताने धावपळ करताना दिसली.

त्या कार्यक्रमासाठी आसाम बोडो स्टुडंट युनियनचे जिल्हा पदाधिकारी सम्रा ब्रम्हा, रणजित नारझेरी, मातीलाल राभा आणि एका सामाजिक संस्थेचे सेक्रेटरी मिहीर रंजन भट्टाचार्य उपस्थित होते. या विभागाचे पोलीस अधिकारीही कार्यक्रम सुरू झाल्यावर उपस्थित झाले. माझ्या शेजारीच ती आयोजक महिला बसली होती; तीच होती ती ‘लखमती दायमेरी.’ डायन ठरवून प्रचंड छळ झालेली आणि आता त्या दुष्ट प्रथेविरुध्द स्वत:च लढणारी. निर्धाराने परत गावात येऊन राहणारी लखमती.

कार्यक्रम छान झाला. नंतर सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. आता आसाम राज्यातील डायन ठरविलेल्या पहिल्या बोडो महिलेला आम्ही भेटलो होतो. त्यांची सविस्तर मुलाखत घेण्याचे ठरले, त्यासाठी तेथून लखमतींच्या गावी जाण्याचे ठरले. आम्ही निघालो. लखमती आमच्याच वाहनात पुढे बसल्या. त्यांच्या गावाला जाण्याआधी राऊटा गावातीलच एका छोट्या हॉटेलात दीपज्योतींनी आम्हाला जेवणासाठी नेले. तेथे बटाटेयुक्त डकच्या मांसाचा आस्वाद आम्ही घेतला. येथून दीपज्योतीच्या अभियानातील आमचा सहभाग संपला होता. त्याच्या पथनाट्यातील युवा, महिला कलाकारांना आम्ही भेटलो. ही त्या सर्वांशी शेवटची भेट होती, एकमेकांना शुभेच्छा देत आम्ही परस्परांचा निरोप घेतला.

लखमतीशी वाहनातच चर्चा सुरू झाली. आमचा ड्रायव्हर नीलमज्योतीही आता कार्यकर्ताच झाला होता. तो आसामीत चांगला संवाद करीत असे. लखमतीशी आम्ही हिंदीत चर्चा करू लागलो. लखमतीला हिंदी थोडीबहुत कळत होती, काही शब्दांची अडचण वाटली तर नीलमज्योती मदत करायचा. आता आम्ही ग्रामीण आसाममध्ये होतो. वृक्षराजींनी सजलेले डोंगरे काय िंकंवा दाट झाडींनी नटलेली वने काय, अथांग वाहणारी ब्रम्हपुत्रा काय किंवा समृध्द बोडो, राभा आदिवासी संस्कृतीची लोकवस्ती काय; सर्वांगाने आसाम नटलेला दिसतो. बाहेर निसर्गाने ओतप्रोत भरलेलं सौंदर्य आणि आत वाहनात लखमतीची वेदना, अशी अवस्था होती. लखमती स्वत: बोडो आदिवासी जमातीची. साधारणपणे अर्धा तासाचा प्रवास करीत आम्ही ‘बलिसिहा जंगल’ या लखमतीच्या गावी पोहोचलो. हे बोडो आदिवासी जमातीचं गाव आहे. साधारणपणे 1000 ते 1200 लोकवस्तीचं. टिपिकल आसामी आदिवासी वस्ती. उतरत्या छपराची घरे. विरळ लोकवस्ती. गावात पोहोचल्यावर कोकणातल्या एखाद्या खेड्यात आहोत, असेच वाटले. तशीच निमुळत्या छपराची घरे, नारळी-सुपारीसारख्या दिसणार्‍या वृक्षांच्या बागा, भरपूर झाडी आणि प्रत्येक घराच्या मागील बाजूस छोटा तलाव; त्यात मच्छीपालन. गावात गाडी शिरली, छोटा आणि कच्चा रस्ता. पुढे बसलेल्या लखमती हाताने इशारे करीत रस्ता दाखवित होत्या, कधी डावे तर कधी उजवे, अशी तीन-चार वळणे घेत आमचे वाहन थांबले. आम्ही लखमतींच्या घरी पोहोचलो. येथील घरांत एक वेगळीच प्रथा तेथे पाहायला मिळाली. साधारणपणे 10 बाय 15 फुटाच्या एकमेकांच्या समोर तीन झोपड्या. एक स्वयंपाकासाठी, एक मुलांसाठी, एक पती-पत्नीसाठी आणि एक अन्य साहित्य किंवा गुरा-ढोरांसाठी. प्रत्येक कुटुंबाची अशीच घरे आम्ही पूर्ण ग्रामीण आसाममध्ये बघितली. आसाममधील मैदानी भागातील खेड्यात लोक कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असलेल्या घरातून राहतात. नागरी वस्तीतही पक्की घरे कमी. गरीब, श्रीमंतीची आपल्याकडे पावलोपावली जाणवणारी दरी येथे दिसत नाही. लोकांचे राहणीमान अत्यंत साधे; गावातील गरिबाचे घर कोणते? आणि श्रीमंताचे कोणते? हे ओळखू येत नाही. लोकांचा पोषाख, सामान्यत: पुरुषांचे धोतर व पांघरण्यासाठी शाल आणि स्त्रिया साडी व शाल वापरतात.

घरी पोहोचल्यावर तेथे आमचं स्वागत एका 16-17 वर्षाच्या तरुणीने केलं. एक मुलगा होता. लखमती काही बोलण्याच्या आधीच मी म्हणालो, “मै अंतर्ज्ञानी सिध्दी प्राप्त व्यक्ती हूँ, आपको बताने की जरूरत नहीं, मै जानता हूँ की ये लडकी कौन है?” सर्व आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. “ये मनोरमा है, आपकी लडकी,” मी लखमतींकडे बघत म्हणालो. मी कसे ओळखले, याबाबत सर्वांनाच नवल वाटले. थोडी उत्सुकता ताणून धरत मीच उत्तर दिले. दुपारच्या कार्यक्रमात तिनेच माझं गामोशा (रुमाल) देऊन स्वागत केलं होतं. सूत्रसंचालकाने केलेला नावाचा उल्लेख माझ्या लक्षात होता आणि ती लखमतींच्या घरी सायंकाळी भेटली, यावरून तिची मुलगी असल्याची हवेत मारलेली आणि बरोबर निशाण्यावर लागलेली ती गोळी होती. थोडा हशा!… वातावरण हलकं झालं होतं. आमच्या पुढील चर्चेसाठी त्याची आवश्यकता होती. लखमतींनी खुलेपणाने आमच्याशी बोलावे, अशी आमची इच्छा होती.

बाहेर छोट्याशा अंगणातच आमच्यासाठी मनोरमाने खुर्च्या टाकल्या. राहुल, मी, आमचा ड्रायव्हर मित्र आणि दुभाषी नीलमज्योतीही बसला. आमच्या समोर डायन प्रश्नाने पीडित असलेली; पण त्या पिडेने खचून न जाता निर्धाराने सामना करणारी एक शूर महिला बसली होती. आम्हाला सर्व तपशिलात माहिती हवी होती.

लखमतीजी, तुमच्यावर डायन ठरवून जे जे काही अन्यायअत्याचार झाले, याबाबत तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा.

लखमती, चाळिशीच्या आसपास वय असलेली एक बोडो आदिवासी महिला. नववीपर्यंत शिक्षण. गावातील शाळेत स्वयंपाक करणारी; त्यासोबत महिला बचत गटांचंही काम करणारी. गावातील महिलांना बँकेत खाते काढून देणे, अन्य स्वरूपाची कार्यालयीन मदत करणे, तालुक्याच्या गावी जाऊन महिला बचत गटाशी संबंधित विविध कामे करणे अशी छोटी-मोठी कामे करणारी स्वावलंबी स्त्री. तीन मुले, एक मुलगी आणि नवरा असं कुटुंब. थोडी सुपारीची शेती, मजुरी आणि स्वत:ची नोकरी यात आनंदानं आपला संसार करणारी लखमती. आपल्यावरील आप-बीती सांगू लागली. बारीक नाजूक आवाज; पण बोलण्यात ठामपणा आणि वेदना होती. त्या घटनेला एक वर्ष झालं होतं. सर्व घटनाक्रम आजही तिला तपशिलासह आठवत होता.

लखमतीची सांगू लागली… “गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावातीलच ओझाने (भगतिणीने) गावकर्‍यांना सायंकाळी मंदिरासमोर येण्याचा आदेश दिला, तिचा आदेश गावासाठी अंतिम असतो. सर्व गाव आपल्या पोराबाळांसह तिथं जमा झालं. गोल रिंगण करून गाव उभं होतं आणि 20 वर्षांची तरुण भगतीण (ओझा) आज गावाबाबत काही विशेष भविष्यवाणी करणार होती. मी तिच्याकडे कधी जात नाही. आजारी पडले की लोक तिच्याकडेच जातात, दोरा-धागा करतात. मी मात्र डॉक्टरांच्या उपचारावरच विश्वास ठेवते, याचा तिला पूर्वीपासूनच राग होता. पण त्या दिवशी मीही गेले. उत्सुकतेपोटी. हातात त्रिशूल असतो तिच्या. तरुण मुलगी; पण वृध्दही तिला नमस्कार करतात, आज काय भविष्यवाणी होते गावाची? देवी काय सांगणार? गावावर काही संकट तर येणार नाही ना? सर्वच गाव एकत्र येण्याचा आदेश का? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात असतील. गाव गोल रिंगण करून शांतपणे उभं, देवी घराजवळील मंदिरातून बाहेर आली. सर्वांनी वाकून नमस्कार केला. मी शांतपणे उभीच होती. देवीचा जयजयकार सुरू झाला. देवीनं सर्वांना शांत केलं आणि बोलू लागली. “आपल्या गावात काही दिवसांपासून विविध आजारांनी कहर केला आहे. गेल्या काही दिवसांत गावात अनेकांचे निधनही झाले आहे. तसेच यावर्षी भयंकर दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, ही सर्व दुष्कर्मे गावातीलच एक महिला करीत आहे. कारण ती डायन आहे.”

सर्व लोक शांतपणे देवीची वाणी ऐकत होती, आता प्रश्न होता की ही डायन कोण? देवी कोणाचं नाव घेणार? भीती, दहशत, उत्सुकता, चिंता अशा सर्वच भावना. तिने आपला हात समोर करीत सांगितले, ‘माझे हे बोट जिथे थांबेल ती डायन आहे.’ देवीचे बोट गोलाकार उभ्या लोकांसमोरून फिरू लागले. पुन्हा तीच दहशत, भीती आणि तिचा गोल फिरणारा हात नेमका माझ्यासमोर थांबला आणि म्हणाली, “हीच लखमती डायन आहे, हीच मंत्राने सर्व गावाचा नाश करायला निघाली. गेल्या काही दिवसांपासून गावात झालेल्या मृत्यूला हीच जबाबदार आहे. गावात पसरलेले आजारपण हिच्यामुळेच आहे, हीच आहे ती डायन.”

सुरुवातीला मला काहीच कळत नव्हते, की हे सर्व काय चाललंय? मला डायन ठरविले जात आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण तिने सांगितलेले गावकर्‍यांनी मान्य केले. त्यामध्ये माझा सख्खा जेठही (नवर्‍याचा सख्खा मोठा भाऊ) सामील झाला होता. लोक माझ्याकडे हिंसक नजरेने बघू लागले. मला भीती वाटू लागली. मी माझ्या मुलांसह, पतीसह पळत घरी आले. तेवढ्यात सर्व हिंसक जमाव गावातील मुखियासह माझ्या घरी आले. सर्व गावकरी मला बेदम मारहाण करू लागले. लाथाबुक्क्यांनी मला गावकरी मारत होते. गावातील नोकरीवाले, सरपंच कोणीही मला मदत केली नाही. मी ओरडत होते, ‘मी डायन नाही हो, मी डायन नाही. मला मारू नका!’ पण गावकर्‍यांवर माझ्या या विनंतीचा काहीही परिणाम झाला नाही. या मारहाणीसोबत अत्यंत गलिच्छ शिवीगाळही सुरू होती. माझ्यावरील ही मारहाण पाहून माझे पती, मुलं गावकर्‍यांना थोपवू लागली; मग त्या लोकांनी त्यांनाही मारहाण केली. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली जात होती आणि कोणीही आमच्या मदतीला येत नव्हते. मुलांना केली जाणारी मारहाण बघून मी अर्धशुध्द अवस्थेतच ओरडले, ‘अरे, माझ्या मुलांना मारू नका,त्यांनी तुमचं काय नुकसान केलंय, मला मारा,’ असे मी म्हणताच गावकर्‍यांनी मुलांना दुसर्‍या खोलीत कोंडून घातले आणि पुन्हा मला लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू झाली, माझ्या डाव्या हाताला जबर मार बसला, मारणार्‍यांची कू्ररता अधिक वाढली. त्यांचे मारहाणीवर समाधान झाले नाही, मला बळजबरीने ‘लघवी’ पाजली, ही सारी क्रूरता मी अनुभवली. हा सर्व प्रकार गावातील मुखिया करीत होता. शेवटी मला धमकी देण्यात आली, ‘जर या गावात दिसली, तर जिवंत राहू देणार नाही, या गावातून आताच्या आता निघ.’ माझा सर्व संसार, भांडी घरातून बाहेर फेकून देण्यात आली, घराला लागून असलेली माझी सुपारीची झाडे कापून टाकली. मला अर्धमेल्या अवस्थेत टाकून गावकरी निघाले. आता येथे थांबणं म्हणजे जीव गमावणंच होतं.

मग माझ्या नवर्‍याने विनवणी करून टाटा मॅजिक गाडी भाड्याने आणली. त्याच रात्री आम्ही सर्व संसार त्या गाडीत भरून माझ्या आईच्या गावी गेलो. येथून 20 किलोमीटर अंतरावर होगराजोली गाव आहे. रात्री उशिरा आईकडे पोहोचलो. जीव वाचला.” मी आणि राहुल सून्नच झालो होतो. कोणीतरी एखाद्या जुन्या चित्रपटातलं कथानक ऐकवतंय; ज्यात ठाकूर असतो, तो आपल्या गुंडांच्या मदतीने असे अन्याय गावकर्‍यांवर करीत असतो, असेच वाटत होते. पण हे सारं वास्तव होतं. पुढे काय विचारावं, हेही कळत नव्हतं. लखीमतीने हे सारं कसं सोसलं असेल? आपल्या आईच्या झालेल्या या क्रूर छळाचा मुलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल? अशा प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो. लखीमतीचा चेहरा शांत वाटत होता. आश्चर्य म्हणजे तिच्या नजरेत आणि बोलण्यात बदल्याची भावना नव्हती; पण न्याय हवा होता. मी म्हणालो, ‘मग पुढे काय झालं?’

लखमती बोलू लागली, ‘काही दिवस मी आजारीच होते. 15, 16 व 17 सप्टेंबर 2014 हे तीन दिवस मी गंभीर होते. अर्धशुध्द अवस्थेत. माझा डावा हात निकामीच झाला की काय, असे वाटायचे. त्याला अधिक मार बसला होता. मी घरीच गोळ्या, औषधे घेत होते. आताही मला डाव्या हाताने आधीसारखी कामं करता येत नाहीत. पण मी स्वस्थ बसणारी नव्हते. मला माझ्यावरील अन्याय मान्य नव्हता. मग मी 18 तारखेला माझ्यावरील अन्यायाविरुध्द दाद मागण्यासाठी ‘आब्सू’कडे (आसाम बोडो स्टुडंट युनियन) गेले.

पण तुम्ही पोलिसांकडे का गेला नाहीत?

नाही. आमच्याकडे आधी ‘आब्सू’कडेच तक्रार करावी लागते. त्यांच्याकडे जाण्याआधी जर तुम्ही पोलिसांकडे गेलात, तर ते तुमच्या कोणत्याही प्रकरणात तुम्हाला मदत करीत नाहीत, म्हणून आधी त्यांच्याकडेच जावे लागते.

प्रोग्रेसिव्ह विचारधारा(?) मानणार्‍या बोडोंच्या संस्थेची ही हुकूमशाहीच होती. आसामची जातपंचायतच म्हणा हवं तर.

मग, त्यांनी काय मदत केली?

कसली मदत? काहीही नाही. मग मी बोडोंच्या म्हणजे ‘आब्सू’च्या डिस्ट्रिक्ट युनियनच्या कार्यालयात गेले. तेथे मला कोणीही भेटले नाही. शेवटी धाडसाने मी स्वत:हून पोलिसांत तक्रार केली. त्याचा परिणाम झाला. 8 ऑक्टोबरला 15/16 पोलीस गावात आले, त्यांनी संबंधितांना या घटनेचा जाब विचारला; पण गावकर्‍यांनी धमकावून त्यांना गावातून हाकलून लावले. यावेळी आमच्या जिल्ह्याचे पोलीसप्रमुख डॉ.धनंजय घनवट साहेबांना माझी आप-बीती समजली. त्यांनी या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दीपज्योती सैकिया यांना याबाबत लक्ष घालण्यास सांगितले. मग दीपज्योतीनेच या प्रकरणात गंभीरतेने लक्ष घातले. त्यामुळे तालुक्याचे सर्व पोलीस अधिकारी, बी.डी.ओ. हे सर्वजण पोलिसांच्या ताफ्यासह गावात आले. गावकर्‍यांना सज्जड दम भरला. त्यांनी गावात बैठक घेतली. दीपज्योतीने सर्वांना दमात घेतले आणि यापुढे लखीमतीला काही त्रास झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. माझी तक्रार पोलिसांत नोंदली गेली. मांत्रिक मुलीसह काही लोकांना अटक झाली. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे. मी या केसमध्ये फार लक्ष देत नाही. कारण जर त्या मांत्रिक मुलीला कठोर शिक्षा झाली, तर गाववाले मला सुखाने जगू देणार नाहीत, कारण तिची अजूनही गावात दहशत आहे.

मी माझ्या कुटुंबासह गावात परत आले. माझ्या शाळेचंही काम सुरू केलं. मला माहीत आहे की, अजूनही लोक मला डायन समजतात. पण माझ्यासमोर कोणी बोलत नाही.

एवढा मोठा प्रकार झाला, यामागील खरे कारण काय होते, ते सांगा ना.

चेहरा थोडा संकोचल्यासारखा झाला; पण लखमती बोलू लागल्या. माझ्या जेठाची माझ्यावर वाईट नजर होती. तो अनेकदा माझ्याकडून शरीरसंबंधांची मागणी करायचा. मी सतत याला नकार दिला. अधूनमधून तो माझ्या बेडवरील उशीखाली चिठ्ठी ठेवायचा. कधीकधी रात्री-अपरात्री माझ्या बिछान्यावरही यायचा. यावरून एके दिवशी खूप वाद झाला. मी त्याला विनवत होते, ‘माझा पती आहे, मला मुलं आहेत, माझा सोन्यासारखा संसार आहे, मी कसं तुझ्याशी संबंध ठेवू?’ पण त्याने सतत मला त्रास देणं सुरूच ठेवलं. मी होकार देत नाही म्हटल्यावर त्याने गावातल्या मांत्रिक मुलीला पैशाचे लालूच दाखवून, बदला घेण्याच्या वाईट हेतूने हा सर्व प्रकार केला.

धीराने. पण शांतपणे लखमतीने शेवटी मुख्य कारण सांगितले. बोडो जमातीत मातृसत्ताक पद्धत आहे. या आदिवासी जमातीत स्त्रीला नागरी समाजाच्या तुलनेने अधिक स्वातंत्र्य असतं, असं म्हटलं जातं. पण कोठेही जा, स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघण्याचा पुरुषी दृष्टिकोन जगाच्या पाठीवर सर्वच ठिकाणी असावा. स्त्रीला एक माणूस म्हणून सन्मानाने बघणारा समाज कधी अस्तित्वात येईल? तिच्या भावभावनांना मान्यता देणारा समाज या पृथ्वीतलावर असेल का? असे अनेक प्रश्नांची मनात वादळे निर्माण झाली. लखमतीनं कसं सहन केलं हे सारं? मी खचली कशी नाही? निर्धाराने उभी राहिले कशी? तीही याच बोडो आदिवासींचीच प्रतिनिधी; मग डायन नसते, आणि मांत्रिक सर्व खोटे असतात, आजारपणात दवाखान्यातच जावं, हे वैज्ञानिक सत्य केवळ नववी पास असलेल्या लखमतीलाच कसं कळलं? या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं माझ्याकडं नव्हती. मी त्या धाडसी स्त्रीला मानाचा मुजरा करतो. तिच्या शौर्याला, कणखर वृत्तीला सलाम करतो, असं काहीसं मनात सुरू होतं….

तिच्या मुलांशी काहीतरी बोलावं म्हणून मनोरमाशी संवाद केला. आपल्या आईचंच सौंदर्य मनोरमाला लाभलेलं. नाजुकशी टिपिकल आसामी लूक असलेली मनोरमा. ‘आईला डायन ठरवल्यावर तुला शाळेत किंवा तुझ्या मैत्रिणींकडून काही त्रास किंवा वेगळी वागणूक मिळाली का?’ मी विचारले.

तेव्हा मनोरमा म्हणाली, “आधी तर मी फार दिवस शाळेतच गेले नाही. भीती वाटायची, मग आम्ही गावात परत आलो. मी तालुक्याच्या गावी अकरावीला आहे. अनेक दिवस मी माझ्या मैत्रिणींना हे कळू दिलं नाही. मला भीती वाटायची. पण हळूहळू त्यांनाही समजलं. आता माझी आई डाकीणविरोधी कार्यक्रमांना जाते, भाषण करते. मला तिचा अभिमान वाटतो. आजही मी माझ्या काही मैत्रिणींना कार्यक्रमाला बोलावलं होतं. त्या आल्या होत्या. पण एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, ‘मी बोडोंशी कधीच लग्न करणार नाही! कारण बोडो महिलांना डायन ठरवतात, त्यांना मारहाण करतात.’

बोडोंच्या नव्या पिढीचा हा बोडोंना इशाराच होता. राहुल गमतीनं म्हणाला, ‘चल आमच्यासोबत, तुला आमच्याकडेच शिकवू आणि एका महाराष्ट्रीयन मुलाशी तुझं लग्न लावू.’ थोडा हशा!

संध्याकाळ झाली होती, अंधार दाटून आला होता. लखमतीने घरीच थांबण्याचा आग्रह केला; पण राहुलच्या नियोजनाप्रमाणे पुढील भेटी होणं आवश्यक होतं. आम्ही सर्व कुटुंबियांचा निरोप घेतला. एकमेकांना आपापले संपर्क नंबर्स दिले आणि तेथून निघालो. सून्न झालो होतो. बाहेर पसरलेला अंधार खोल बोडोंच्या डोक्यात शिरलाय, असे वाटू लागले. बाहेरच्या अंधाराला सकाळी अस्त आहे; पण बोडोंच्या डोक्यातल्या शिरलेल्या काळोखाचा अंत कधी? प्रकाशाचा उदय कधी?

दीपज्योतीच्या कठोर हस्तक्षेपामुळे सध्या लखमतीचा जीव वाचलेला आहे. पण दहशत मात्र तीच आहे. लखमती मनाने खचलेली नाही. आता ती डायन प्रथेविरोधी सजगता अभियानात सहभागी झालीय, कार्यक्रम संयोजित करते, भाषण देते. तिच्यानंतरही गावात एका पुरूषाला डायन काढले; पण लखमतीच्या एवढा त्रास त्याला झाला नाही. कदाचित तो पुरुष असेल म्हणूनही.

अशा कितीतरी लखमती संपूर्ण आसाम राज्यात आहेत. काही दहशतीत जगत आहेत; पण कित्येकांना तर क्रूरपणे ठार करण्यात आलंय. आम्ही जाण्याच्या केवळ दोन महिने आधी येथे घटना घडली. तेथील सुनितपूर जिल्ह्यातील विमाजुली गावात मोनी ओरंग नावाची 63 वर्षीय वृध्द महिला होती. गावातील एका पुजार्‍याने ती डायन असल्याचे गावकर्‍यांना सांगितले. पुजार्‍याने चिथावणी दिल्यानंतर दोनशे जणांच्या जमावाने घरातून ओढून तिला मारहाण केली. बेदम मारहाण केल्यानंतर तिचे कपडे फाडले. त्यानंतर हिंसक जमावाने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला करत तिचे शीर धडावेगळे केले. जमाव एवढा हिंसक झाला होता, की त्यांनी पोलिसांनाही घटनास्थळी येण्यापासून रोखले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त समद हुसैन यांनी एका पथकासह गावात प्रवेश केला आणि जमावाला पांगवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. काही लोकांना अटक करण्यात आली. अशा अनेक घटना पुढे आमची वाट पाहत होत्या…

आता आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो, सायंकाळचे साडेसहा वाजले होते. आता उदालगुडी जिल्ह्यातून आम्ही बक्सा जिल्ह्याकडे रवाना झालो. दक्षिणेकडे भूतानच्या बॉर्डरकडे 120 किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार होतो. हा सर्व प्रदेश बोडोलँड म्हणून ओळखला जातो. येथे प्रवास करताना पावलोपावली मिलिटरी दिसत होती. सशस्त्र सैनिकांच्या गाड्यांची गस्त सरू होती. जणू युद्धभूमी वाटावी, अशी एकूण परिस्थिती. एका धाडसी महाराष्ट्रीयन पोलीस अधीक्षकाला भेटायचे नियोजन होते. तोच अधिकारी, ज्याने स्वत: माहिती घेत, लखमतीच्या केसमध्ये जातीने लक्ष घालत, दीपज्योतीशी संपर्क साधून या प्रकरणात लखमतीला मदत केली होती. आसाम सरकारने एका स्पेशल ऑपरेशनसाठी त्यांची नियुक्ती केली होती. आसाममधील अतिरेकी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांचे नाव डॉ. धनंजय घनवट.

आम्हाला निघायलाच उशीर झालेला, रस्ताही थोडा खराब, ड्रायव्हर नीलमज्योतीचा सर्व प्रदेश ओळखीचा. रस्ते, तेथील लोकजीवन, सामाजिक परिस्थिती, शेती, उद्योगधंदे. तो याची प्रवासात माहिती द्यायचा. चार तासांचा प्रवास करत आम्ही पाठशाला येथे पोहोचलो. तेथे घनवट साहेबांनी आम्हाला पुढील रस्ता दाखविण्यासाठी शस्त्रधारी पोलिसांची एक गाडी पाठविली होती. मानस अरण्याचा हा सर्व परिसर. दिवसाही या अरण्यात अंधार असतो. एवढे घनदाट जंगल. दुर्गम भाग. जवळच दहा किलोमीटरवर भूतानची सीमा. रात्री साडेदहा वाजता आम्ही स्पेशल ऑपरेशनचे पोलीस अधीक्षक डॉ. धनंजय घनवट साहेबांच्या घरी सालबरीला पोहोचलो. एक मोठा अधिकारी; पण साहेब आम्हाला स्वत:च रिसिव्ह करायला बाहेर आले. उमदा तरुण, बारीक; पण पाणीदार डोळे, सावळा रंग, हसरा चेहरा, पॅशन म्हणून नोकरी करणारा, अत्यंत विपरीत परिस्थितीत राहूनही समाधानी आणि आनंदी वृत्तीचा अधिकारी. भूतानच्या सीमेवर युद्धभूमीवरच काम करणारा. त्यांच्याशी फोनसंपर्क राहुलचाच होता. मी प्रथमच त्यांच्याशी बोलत होतो. यापूर्वी एखाद्या जिल्ह्याच्या पोलीसप्रमुखांशी कामाशिवाय अन्य गप्पा मारण्याचा प्रसंग नव्हता. कोणत्या विषयावर कसा संवाद साधावा, अशी थोडी काळजी वाटायची. पण घनवट साहेबांनी कोणत्याही औपचारिकता आमच्याशी बोलताना येऊ दिली नाही. आम्ही फ्रेश झालो, जेवण झाले, आणि झोपण्याचा बेत कुठेच राहिला. आम्ही पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत गप्पा मारीत होतो. डायनपासून तर अंधश्रद्धा निर्मूलन चळचळ, डॉक्टरांचा खून, देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, देशी-विदेशी तत्त्ववेत्ते, त्यांच्या भूमिका, व्यक्तिगत जीवन, विचार व्यवहार संघर्ष, बोडो अतिरेकी, आंतरराष्ट्रीय राजकारण, कुटुंंब अशी बरीच मोठी फिरस्ती आम्ही केली. संघटनेच्या कामाबाबत काही मोलाच्या सूचना त्यांनी केल्या. नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यकर्त्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना याहीबाबतीत त्यांनी काही गोष्टी ‘शेअर’ केल्या. या गप्पांनी आम्हा उभयतांना खूप आनंद आणि समाधान दिले. आमच्या सोबत काही तास बक्साचे डी.वाय.एस.पी. श्रीजीत साहेब होते. उंचपुरा, देखणा, तरुण, भगतसिंगांसारखी मिशी आणि दंडावर टॅटू गोंदलेला; सिंघमच वाटावा असा. आधुनिक विचारांचा. पक्का नास्तिक. पेरियार वाचलेला. तामिळनाडूचा. त्यांनी डायनच्या गुन्ह्यांबाबत त्यांचे अनुभव सांगितले. एका बोडो म्हातार्‍याला गावकर्‍यांनी डायन म्हणून गावातून हाकलून दिले होते. श्रीजीत साहेबांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये महिनाभर आश्रय दिला. वातावरण निवळल्यावर त्या वृद्धाला पोलीस बंदोबस्तात गावात नेऊन सोडले. एका गावातील महिलेला गावकर्‍यांनी डायन ठरवून दगडांनी ठेचून मारल्याची घटनाही त्यांनी सांगितली. डायन हा प्रश्न कसा सर्वच ठिकाणी आहे; याचे प्रत्यंतर येत होते. तसेच श्रीजीत साहेबांनी ‘अंनिस’च्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले. त्यांनाही चळवळीबद्दल खूप आस्था होती. विशेष म्हणजे कामही माहीत होते. डॉक्टरांच्या निधनाचे दु:ख होते. खुनी सापडत नसल्याची वेदना होती. गप्पा संपल्या. चार वाजता घनवटसाहेबांना ऑनलाईन बैठक अ‍ॅटेंड करायची होती, म्हणून गप्पांना विराम दिला आणि ‘गुड नाईट’ म्हणत रूममध्ये बेडवर जाऊन पडलो. अत्यंत साधारण बंगला. कोणत्याही विशेष सुविधा नाहीत. अनेकदा वीज नसते, तेव्हा बाहेरून इंधन मागवून काटकसरीने जनरेटर वापरून वीज वापरावी लागते. एसी वगैरे काही नाही. अशा विपरीत परिस्थितीत एक महाराष्ट्रीयन आयपीएस अधिकारी आपले कर्तव्य बजावीत आहे. ‘सॅल्यूट साहेब तुम्हाला. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो,’ असा मनातल्या मनात संवाद करीत झोपी गेलो.

आज तारीख 17 सप्टेंबर. आसाममधील तिसरा दिवस. गेले दोन दिवस खूपच कार्यमग्न होते. राहुलच्या गृहपाठाचा खूप फायदा झाला. सकाळी राहुलचे पुढील संपर्क संवाद सुरू झाले. आम्ही घनवटसाहेबांसोबत सकाळचा चहा, नाश्ता घेतला. ‘संघटनेसाठी माझी काही मदत लागली तर जरूर सांगा,’ असेही आश्वासन त्यांनी दिले. आम्ही एका कार्यकर्त्याच्या स्पिरीटने काम करणार्‍या अधिकार्‍याचा निरोप घेतला. सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांच्या वाहनाच्या सुरक्षेत आम्ही बक्साच्या बाहेर पडलो. पुढील प्रवास गोलपारा…

आता आम्ही आसाम महिला समता सोसायटीच्या कार्यकर्त्यांना भेटणार होतो. संपूर्ण आसाममध्ये महिलांच्या प्रश्नावर काम करणारी एक स्वायत्त अशासकीय संस्था. सन 1996 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. सध्या गीताराणी भट्टाचार्य या राज्य कार्यक्रम निदेशिका आहेत. डायनच्या प्रश्नावर पूर्ण आसाममध्ये काही ना काही कृती करणारी ही संस्था होती. राहुलने इंटरनेटच्याद्वारे हे संपर्क मिळवले होते. आम्ही या सोसायटीच्या गोलपारा जिल्ह्याच्या प्रमुख कार्यक्रम निदेशिका श्रीमती मामुनी सैकिया यांना भेटणार होतो. त्यांच्याशी आधीच बोलणे झाले होते. साधारणपणे 125 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही गोलपार्‍याला पोहोचलो. गोलपारा हा ‘राभा’ या आदिवासी जमातीचा जिल्हा. गोलपारा जिल्ह्याचं ठिकाण पण अविकसित. आपल्याकडील खान्देश अथवा मराठवाड्यातलं एखाद्या तालुक्याचं ठिकाण असावं तसं. बाहेर आधी जेऊन घेतलं. मग आसाम महिला समता सोसायटीच्या कार्यालयात पोहोचलो. तेथे मामुनी मॅडम आमची वाटच पाहत होत्या. साधारणपणे मध्यमवयीन महिला. हसरा चेहरा, मोकळा आणि विनयशील स्वभाव, सहकार्याची भावना. डायनच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षं त्या गोलपारा, सुनीतपूर, उदालगुडी आणि शेजारच्या मेघालय राज्याच्या सीमावर्ती भागात काम करीत आहेत. त्यांच्या ऑफिसलाच आम्ही बसलो. ओळख, परिचय झाला. मामुनी मॅडमनी आधीच काही फोटो, बातम्या कात्रणे, रिपोर्ट्स काढून ठेवले होते.

मग त्या बोलू लागल्या. 1999 पासून मी या संस्थेच्या कामात आले. माझं गाव नाटलखीपूर, अप्पर आसाममध्ये. येथून 600 किलोमीटर अंतरावर. वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांचा आणि विनोबा भावेंचा संपर्क होता. ते विनोबांसोबत पदयात्रेत होते. वडिलांच्या शिकवणुकीमुळे एवढ्या दूर येऊन काम करण्याची प्रेरणा मिळाली. 1986 चे नवीन शैक्षणिक धोरण आले. यानिमित्ताने आसाम महिला समता सोसायटीचे काम सुरू झाले. ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण आणि सबलीकरण या उद्देशाने कामाला सुरुवात झाली. कामासाठी आम्ही सर्वांत कमी साक्षरता असलेले जिल्हे निवडले. आसाम राज्यातील अशा एकूण 12 जिल्ह्यात आमचे काम चालते. माझ्याकडे गोलपारा जिल्ह्याची जबाबदारी आहे. गावागावात जाऊन महिलांचे प्रश्न समजून घेतो, त्यांचे संघ तयार करतो, त्यांनाच त्या संघाचा नेता निवडण्यास सांगतो. मग आम्ही त्या नेत्यांना प्रशिक्षण देतो. शिक्षण, आरोग्य, बालशिक्षण, कायदा, रोजगार अशा अनेक प्रश्नांवर आम्ही काम करतो. सामाजिक, आर्थिक व कायदेविषयक प्रशिक्षण देणे, महिलांना स्वत:च्या हक्कासाठी जागृत करणे, शोषणाविरुद्ध संघर्ष करणे, हे काम ओघाने आलेच.

डायन प्रश्नावर तुम्ही कधी आणि कशी कामाला सुरुवात केली?

जेव्हा आम्ही गावागावांत जाऊन महिलांचे प्रश्न समजून घेऊ लागलो, तेव्हाच डायनचा प्रश्न समजला. फार मोठा प्रश्न आहे. गावोगावी अनेक असंख्य महिलांना डायन ठरवलं जातंय. खून, मारहाण, जिवे ठार मारण्याची धमकी, गावातून हाकलून लावणे असं सारं काही यात घडतंय. सर्व गाव एका बाजूला आणि डायन काढलेली महिला एका बाजूला, अशी स्थिती असते. महिलेचे नातेवाईकही तिच्या बाजूला नसतात. कधी तेही तिला डायन समजतात किंवा गावाचा दबावच एवढा भयंकर असतो की त्यांना काहीही भूमिका घेता येत नाही.

पहिली केस आम्ही गोलपारा जिल्ह्यातच सोडवली. थापोरपिठा गाव, राभा या आदिवासी जमातीची वस्ती. गावात पिके खराब झाली, एका शिक्षकाची पत्नी आजारी पडली म्हणून गावातीलच जुनाली राभा हिला डायन ठरविले. गावकर्‍यांनी जबर मारहाण केली. गावातून पळवून लावले. हद्दपार केले. जवळच तिचे हेटीगाव हे माहेर होतं. पण डायन आहे म्हणून माहेरच्या लोकांनी घरात घेण्यास नकार दिला. ती रात्रभर नदीवरच झोपली. नंतर तिने आमच्या सोसायटीकडे तक्रार केली. संघाचे सदस्य गावात गेले, लोकांशी बोलले. पण काहीही उपयोग झाला नाही. आम्ही लखीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस गावात गेले. चौकशी केली. कायद्याचा धाक दाखविला. जुनालीला गावात परत बोलविण्यास सांगितले. वरून तीन अटी गावकर्‍यांवर लादल्या. जुनालीच्या सासूला 20 वर्षांपूर्वी डायन ठरवून गावातून हद्दपार केले होते, तिलाही बोलवा. दुसरी गावपंचायतीत जुनालीने भरलेला 3001 रुपये दंड परत मिळावा आणि तिसरी अट परत असा आरोप करू नये. या तीनही अटी आम्ही गावकर्‍यांकडून लेखी स्वरूपात घेतल्या आणि जुनालीला न्याय मिळाला.

दुसरी घटना. सावित्री हाजुराईची. धुपधुरा पंचायतीच्या कार्यक्षेत्रात घडलेली घटना. एके दिवशी सावित्रीच्या शेजारील कुटुंबात तीन मुलं आजारी पडली. शेजारी ओझाकडे गेले. त्याने सावित्री डायन असून तिने मंत्राने मुलांना आजारी पाडले, असे सांगितले. शेजारी धनेश्वर बासुमतीने गावकर्‍यांसह तिला धमकी दिली, ‘तीन दिवसात जर मुलांना बरं केलं नाही, तर तुझ्या पतीसह तुला जिवंत जाळू’ बिचारी सावित्री दुसर्‍याच्या मुलांसाठी स्वत: डॉक्टरांचा शोध घेऊ लागली. सावित्रीचा मुलगा प्रचंड दहशतीखाली होता. तो गावातील कालिकेच्या मंदिरात प्रार्थना करीत होता, ‘माते, माझ्या त्या मुलांना बरं कर, माझ्या आईला वाचव.’ ही प्रार्थना मंदिरात एका महिलेने ऐकली. त्या महिलेने त्या मुलाची चौकशी केली. ती आमच्या एका शिबिरात आली होती. आमच्याकडे सावित्रीची तक्रार आली. आम्ही ही केस थेट डेप्युटी कमिशनर व एस.पी.कडे नेली. पोलीस आणि आर्मीचे सैनिक घेऊन गावात गेलो. गावकर्‍यांशी मी आणि अधिकारी बोललो. गावकर्‍यांना तिची दया आली आणि सावित्रीचा जीव वाचला.

अशा अनेक घटना मामुनी मॅडम सांगत राहिल्या. रश्मी राभा, खेदाई बाला राभा, लनसुन राभा, भुलेश्वरी, अनिता, सिरानी, जोगाई, बीवा, राणीश्वरी… अशा कितीतरी; न संपणारी यादी, न संपणारे दु:ख. काहींमध्ये त्या मदत करू शकल्या होत्या. तर काही केसेसमध्ये महिलांचा डायन ठरवून खून झालेला होता. ऐकत असतांना अंगावर शहारे येत होते. कुणाचा दगडांनी ठेचून खून, तर कुणाला मुलांसमक्ष सुर्‍याने गळा चिरून शीर धडावेगळं केलेलं. आपण 21 व्या शतकात वावरत आहोत, याबाबतच शंका उपस्थित व्हावी, अशी परिस्थिती. आम्ही दोघं अगदी सून्नच व्हायचो.

एका केसमध्ये तर पोलीस कर्मचारीच ओझा होता. हुसेन त्याचे नाव. गेल्या एप्रिल महिन्यातच त्याने गावातील पॅनोक राभा या पुरुषाला डायन ठरविले. गावकर्‍यांनी त्याला गावातील एका घरात डांबले. त्या खोलीत त्याला गोल फिरवून फिरवून मारले, अगदी मरेपर्यंत. त्याचा खून झाला. 22 ऑक्टोबर 2011 ला सोनीतपूर जिल्ह्यात पती ऑडेस आणि पत्नी लाभुण्या दोघांना डायन ठरवून गावकर्‍यांनी ठार केले. आता ऐकणंही मुश्कील झालं होतं.

पोलीस या सर्व प्रकारांकडे बसे बघतात?

फार समाधानकारक स्थिती नाही. पोलीस या घटनांची नोंद डायन म्हणून करीत नाहीत, दुसर्‍या नावाने करण्याचा प्रयत्न करतात.

डायन म्हणून गावाबाहेर काढण्यामागील कोणकोणती कारणे तुम्हाला आढळून आलीत?

मंत्रतंत्राचा आरोप, अंधश्रध्दा हा भाग आहेच; यासोबत जमिनी हडप करण्यासाठी, दुसरी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, शारीरिक संबंधांची मागणी, दुसरे वाद असल्यास त्याचा बदला काढण्यासाठीही असे आरोप केले जातात.

आजपर्यंत तुम्ही डायनच्या किती केसेस हॅण्डल केल्या, मी विचारले.

आम्ही एकूण 86 गुन्ह्यांमध्ये हस्तक्षेप केला आहे. यातील 6 टक्के पुरुष आणि 56 टक्के स्त्रियांना आम्ही न्याय मिळवून दिला आहे. 4 पुरुष व 10 महिलांचा डायन ठरवून खून झाला आहे व एक महिला अजूनही गावाबाहेरच राहते, तिला न्याय मिळवून देण्यासाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. शेजारच्या मेघालयातीलही 12 केसेस आम्ही सोडविल्यात.

या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आणखी अन्य काय उपक्रम तुम्ही राबविता? राहुलने विचारले.

कलाजथ्था, जनजागृती मेळावे, सायकल फेरी, आरोग्याचे पोस्टर्स प्रदर्शन; त्यातून डायन बाबत प्रबोधन, शिबिरे वगैरे सतत काहीतरी सुरू असतं. ‘मलाही डायन म्हणतात. डायनला साथ देते म्हणून.’ मित्र म्हणतात, इकडे-तिकडे एकटी जाऊ नकोस. ते तुला मारून टाकतील. पण मला भीती वाटत नाही. ज्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्यासोबतही मी काम केलं आहे. आमच्या संस्थेने अनेकांचे जीव वाचवले, संसार वाचवले, याचा मला आनंद आणि समाधान आहे.

तुम्ही केलेल्या कामाचं काय फलित आहे, असं तुम्हाला वाटतं?

आता लोक विचार करू लागले. सरकारही जागृत झालंय. कायदा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय, जनजागृती होतेय. अनेक संस्था-संघटना यात आल्यात, फरक पडतोय. पण खूप काम करावे लागेल. ‘अभी तो बहुत कुछ करना बाकी है।’ अनेक प्रश्न एकमेकांत गुंतलेले असतात. सर्वांवरच काम करण्याची गरज आहे. मागच्या 1 सप्टेंबरला मी एका गावात बैठकीसाठी गेले, तर बैठकीला आमची एक प्रमुख कार्यकर्ती आली नाही. मग मीच तिच्या घरी गेले. का आली नाही हे विचारलं, तर एका मांत्रिकाने 19000 रुपयांची तिची फसवणूक केली होती. सामाजिक काम करणार्‍या कार्यकर्त्यांची अशी बिकट अवस्था आहे. अजून खूप काही करायचे आहे.

कायद्याबाबत तुमचे मत काय?

कायदे खूप आहेत. गेल्या 16 जूनला कायद्याबाबत बैठक होती, शासनाला आम्ही सूचित केले की, संपूर्ण प्रतिबंधासाठी काहीतरी करा. रोग होणारच नाही, यासाठी काही उपाययोजनांची गरज आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर काम करण्याची गरज आहे. आसाम कसा पुढे जाणार? पुढची पिढी हे सर्व बघतेय. त्यांच्यावरही तेच संस्कार होत आहेत. देश कसा महासत्ता होणार?

तुम्ही गैरआदिवासी आणि आदिवासींच्या प्रश्नावर लढता, याबाबत आरोप होतात का?

नाही, कधीच नाही. लोकांचं खूप प्रेम मिळतं मला. मी समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकते. माझ्यापरीने जेवढं प्रामाणिकपणे करता येईल, तेवढं मी करीत आहे, करीत राहीन. डायन प्रश्नासाठी आता कोणताही स्वतंत्र फंड आमच्याकडे नाही; पण मी तरीही काम सुरूच ठेवलेय. वर्षानुवर्षे हद्दपार झालेली महिला जेव्हा आपल्या स्वत:च्या गावी, आपल्या घरी येते तेव्हा तिच्या डोळ्याकडे बघूनच सर्व शीण कुठेच निघून जातो. सगळा ताण विरून जातो. जमेल तितके चांगलं करीत राहावं, समाधान वाटतं, आनंद मिळतो. असा आनंद की जो माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असं समाधान जे मला जगण्याची ऊर्मी देतं.

मामुनी मॅडमचं चेहर्‍यावरचं समाधान बघण्यासारखं होतं. डायनच्या विविध घटना ऐकून झालेलं अस्वस्थ मन आता थोडं शांत झालं होतं. आमच्यातही समाधानाची भावना होती. मामुनी मॅडमच्या भेटीचं समाधान. निष्ठेने काम करणार्‍या या महिलेकडून आम्हालाच ऊर्जा मिळत होती. खूप बरं वाटलं.

मॅडम, बिरूबाला राभा या आदिवासी महिलेने डायन प्रश्नावर आसाममध्ये मोठी चळवळ सुरू केली. त्या आपल्या सोसायटीच्याच सदस्य होत्या, त्यांच्याबद्दल काही सांगा.

हो, बिरूबालाने आता डायनी प्रश्नावर स्वतंत्र काम सुरू केलं आहे. 15 सप्टेंबर 2001 मध्ये आम्ही लखीपूरमध्ये डायन प्रश्नावर एक बैठक घेतली. या बैठकीला बिरूबाला प्रथमच हजर होती. तेथे तिने स्वत:चे अनुभव सांगितले. तेव्हापासून ती आमच्या सोसायटीत काम करू लागली. तिचे काम खूप वाढले. सोसायटीने तिला खूप मदत केली. आता ती स्वतंत्र काम करते आहे.

मॅडम, आम्हाला बिरूबाला भेटायचेय, त्यांच्याशी संपर्क कराल का?

मामुनी मॅडमनी लगेच बिरूबालाला फोन संपर्क केला. रेंजची अडचण येत होती, फोन कट होत होता, चार-पाच वेळा प्रयत्न झाला. बिरूबाला कुठेतरी प्रचारासाठी जात असल्याचे समजले. म्हणजे त्यांना त्यांच्या घरी भेटणे शक्य नव्हते. मग त्यांना त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरच भेटायचे ठरले. मामुनी मॅडमनी नियोजन केले. वेळेचं भानच नव्हतं. दुपारपासून सुरू झालेली चर्चा सायंकाळपर्यंत सुरूच होती, आता पुन्हा थोडा प्रवास करायचा होता. मामुनी मॅडम आमच्यासोबत आल्या, बिरूबालांशी आमची भेट होणं महत्त्वाचं होतं, बीबीसी वृत्तवाहिनीने नोंद घेतलेली आदिवासी धाडसी महिला बिरूबाला.

गाडीत मामुनी मॅडम बसल्या. फोन संपर्क सुरूच होता. फोन कधी न लागणं, आवाज नीट ऐकू न येणं, पुन्हा कट होणं, असं सारखं सुरू होतं. पण मामुनी मॅडमनी कुठलाही कंटाळा न करता प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी आसाम व मेघालय सीमेवरील एका खेड्यात बिरूबाला थांबल्या आहेत, असे समजले. आम्ही निघालो, गोलपाराहून दक्षिणेकडे, वळणाचा रस्ता, अंधार झालेला, थोडा घाट, आजूबाजूला दाट जंगल. शेवटी बिरूबालांशी आमची भेट झाली.

बिरूबाला राभा… 62 वर्षीय एक धाडसी आदिवासी महिला.. आसामच्या गोलपारा जिल्ह्यात ठाकूरव्हिला हे त्यांचं गाव. मेघालयच्या बॉर्डरजवळ. शांततेच्या नोबेलसाठी 2005 साली ज्या एक हजार महिलांचं नॉमिनेशन झालं, त्यात बिरूबालाचंही नाव होतं. अंधार होता. रस्त्यालगत एक झोपडीवजा घर होतं. छोटसं दुकानही. तेथेच लाकडाची पाटी बसण्यासाठी… कोणी बाहेरगावाहून पाहुणे आलेत असे समजल्याने बाहेर उभ्या पुरुषांनी इकडून तिकडून 3/4 खुर्च्यांची व्यवस्था केली. आम्ही बसलो. आसामी परंपरेप्रमाणे आम्हास पानसुपारीचे ताट आणून दिले. मोबाईलच्या बॅटरीचा उपयोग करून बिरूबालांशी आम्ही बोलू लागलो. त्यांनाही घाई होती. कुठल्याशा खेड्यात त्यांना बैठकीसाठी जायचे होते.

तुम्ही डायन प्रश्नावर काम कधी आणि का सुरू केलं? अत्यंत कमी वेळ बोलायला मिळणार म्हणून मी थेट प्रश्न केला.

मी 2001 मध्ये आसाम महिला समता सोसायटीच्या बैठकीला गेले होते. तेथे डायनी प्रश्नावर मी बोलले…. बोलले म्हणजे माझी वेदनाच व्यक्त केली. माझा मुलगा धर्मेश्वर मतिमंद आहे. त्याला बरं करण्यासाठी मी फार झटले. माझ्या पतीने त्याला गावातल्या मांत्रिकाकडे नेलं. वर्ष होतं 1991. मांत्रिक म्हणाला, ‘याला डायनीने झपाटलंय. तो केवळ पुढील पाच दिवस जिवंत राहील.’ हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे काही सुचेना… मला धक्काच बसला… पण त्याला पाच दिवस उलटूनही काहीही झाले नाही, मग माझा मांत्रिकांवरचा विश्वास उडाला. नंतर अनेक डायनच्या घटना मी बघितल्या. अनेक केसेसमध्ये डायनी ठरवून कुटुंबेच्या कुटुंबे उध्वस्त झालेली बघितली. पतीपासून पत्नी वर्षानुवर्षे विलग झालेली बघितली. आई आपल्या मुलाबाळांपासून दूर झालेली बघितली. अनेकांचे खून झाले. मी फार अस्वस्थ झाले. आसाम महिला समता सोसायटीच्या मदतीने मला या विषयावर काम करण्याची संधी मिळाली. मग मी या विरोधात जनजागरणाला सुरुवात केली.

सध्या काय काम सुरू आहे?

आम्ही ‘मिशन बिरूबाला’ प्रोजेक्टचं काम करतोय. त्यात खेडोपाडी जाऊन लोकांशी व्यक्तिगत, सामूहिक बैठका घेऊन डायन प्रथेवर प्रबोधन करीत आहोत.

तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय?

सुरुवातीला लोक विरोध करायचे. माझ्या गावातही कोणी माझं ऐकायचं नाही. पण जसं काम वाढत गेलं. तशी अनेकांची मदतही मिळू लागली. आसाम महिला समता सोसायटीमुळे मला खूप संधी मिळाली. ‘नोबेल पारितोषिका’साठी नॉमिनेशन झाल्यानंतर त्याची मला खूप मदत झाली. तेव्हा अनेक डॉक्टर्स, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांची साथ मिळू लागली. आता लोक ऐकायला लागलेत. पण फार लांबचा पल्ला गाठायचाय. खूप काम अजून बाकी आहे.

या कामात काय अडचणी वाटतात?

अडचणी खूप आहेत. काम करायचे म्हणजे फिरायला हवे. मी अत्यंत साधारण कुटुंबातली महिला. फिरण्यासाठी पैसे हवेत. पोलीस, शासन यांनी आपली जबाबदारी नीट पार पाडणे आवश्यक आहे; तसे दिसून येत नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगाराचे प्रश्न आहेत. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत. मी एकूण 35 केसेस सेटल केल्या, त्यात 33 महिला आणि केवळ 2 पुरुष होते. महिलांना डायन ठरविण्याचं प्रमाण मोठं आहे. आताच मी एक केस सेटल केली. अंजली हाजोंग, या तरुण विधवा महिलेला गावकर्‍यांनी डायनी ठरविले. मी त्यामागील कारणांचा शोध घेतला तर समजले की, गावातील काही तरुण तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. ते तिने नाकारले. मग तिला डायनी ठरविले. बघा…लोकांचेच प्रबोधन करण्याची गरज आहे. ही पुरुषी मानसिकता सर्वांत मोठी अडचण वाटते.

सरकारने कायदा केला, त्याचा फायदा होईल, असे वाटते का?

कायदा व्हावा म्हणून मी गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. लोकांचा पाठिंबा मिळवला. शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण सरकारचा व कायद्याचा उपयोग मर्यादितच असतो. जे काही करायचंय ते आपल्यालाच करावे लागेल. आपण करायला हवं. पण कायदा चांगला आहे, कठोर आहे. तो लवकरात लवकर प्रत्यक्ष अस्तित्वात यावा, अशी अपेक्षा आहे.

इयत्ता 5 वी पास बिरूबाला. आज डायनी प्रश्नावर लढणारी आसाममधील सर्वपरिचित कार्यकर्ती आहे. या वयातही बिरूबालांचा उत्साह कमी झालेला नाही. आमची चर्चा अखेरच्या टप्प्यात असताना त्यांना पुढील बैठकीला नेण्यासाठी एक व्यक्ती आली. डॉ. एन्. दास. बिरूबाला मिशनच्या कामात तेही असतात, असे समजले. आमची ओळख झाल्यावर ते म्हणाले, “सर, मुझे पता है, महाराष्ट्र अंधविश्वास उन्मूलन समिती और डॉ. दाभोलकरजी। इनको मैं अच्छी तरह जानता हूँ।” आसाम मेघालयाच्या सीमेवर, दूर घाटातील एका राभा जमातीच्या आदिवासी खेड्यात भेटलेला डॉक्टर ‘महाराष्ट्र अंनिस’बद्दल इतके भरभरून बोलला. ‘महाराष्ट्र अंनिस’ किती दूरपर्यंत पोहोचली, हा अनुभव आला. मी त्याच चळवळीचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान वाटला. मनात दाभोलकरांना म्हटले, ‘डॉक्टर, बघा ना, येथेही आपल्याला चांगलं ओळखतात. तुम्ही म्हणायचे, आपल्याला आपल्या लायकीपेक्षा अधिक प्रसिध्दी मिळते; पण आता तुमच्या जाण्यानंतर ते खरं नाहीये, तुमच्या बलिदानाने ते साफ खोटं ठरवलंय. आपण पोहोचलो, सर्वदूर, जगभर.’

बिरूबाला यांना त्वरित निघायचे होते. त्यांना आम्ही दोघांनी नमस्कार केला. त्यांना शुभेच्छा देत, परतीचा गोलपाराच्या दिशेनं प्रवास सुरू केला. ही भेट मामुनी मॅडमांच्या प्रयत्नामुळेच घडू शकली. त्यांनाही आम्ही धन्यवाद दिले. पुन्हा गोलपार्‍याला पोहोचलो. मामुनी मॅडमचा निरोप घेतला आणि आम्ही पुन्हा निघालो गुवाहाटीला, शेवटची भेट घ्यायला… एका मोठ्या पोलीस अधिकार्‍याची… ज्यांनी डायन प्रश्नाच्या विरोधात एक रचनात्मक काम उभं केलं आहे. सतत दहा वर्ष एक प्रकल्प चालवला. ‘प्रोजेक्ट प्रहरी’ नावाने, देशभर गाजलेला…..संवेदनशील मनाचा आणि तेवढ्याच कडक शिस्तीचा अधिकारी, आसामचे अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कुलधर सैकियासाहेब.

गोलपाराहून निघत आम्हाला रात्र झाली. नियोजना नुसार आता कुलधर सैकिया सरांची मुलाखत हेच काम होते. सर्व काही राहुलच्या गृहपाठानुसार घडत गेले. आम्ही बारपेठा, कामरूप जिल्ह्यातून प्रवास करून रात्री उशिरा गुवाहाटी पोलीस मुख्यालयाच्या विश्रामगृहावर पोहोचलो. राहुलचे फोनसंपर्क सुरू होते. सकाळी नऊ वाजता सैकिया साहेबांची भेट निश्चित झाली. आजही आम्ही खूप थकलो होतो. ठरल्याप्रमाणे भेटी झाल्याचं समाधान मानीत आम्ही झोपलो.

महाराष्ट्र अंनिस’च्या मार्गदर्शनाने आसाममध्ये प्रथमच बुवाबाजीचा भांडाफोड

आसाममध्ये बुवाबाबांचा भांडाफोड कोणीही करीत नाही. तेथील बुवा (ओझा) हे पारंपरिक पद्धतीने लोकांना जडीबुटी देण्याचे काम करतात. आसामची आरोग्य व्यवस्था विस्कळित असल्याने लोक अशा ओझांकडेच वैद्यकीय उपचारासाठी जातात. हेच काही ओझा लोक या आदिवासींना तंत्र-मंत्र धार्मिक उपचार करण्यास सांगतात.

बेज हा पण आसामधील बुवांचा एक प्रकार. हा बेज आयुर्वेदिक उपचार करीत नाहीत तर फक्त तंत्र-मंत्र करणे, भूतबाधा दूर करणे अशी कामे करतो. मात्र डाकीण काढण्याचे काम ओझा आणि बेज हे दोघेही करत असतात. आसामच्या प्रत्येक गावात एक ओझा किंवा बेज असतोच. पण त्याविरुद्ध लोक पोलिसांत तक्रार करत नाही किंवा एखादी सामाजिक पुरोगामी संघटना स्वत:हून भांडाफोड करत नाही, याचे आम्हास आश्चर्य वाटले.

आसाममध्ये अशा बेज आणि ओझाचा सुळसुळाटच झाला आहे. आम्ही ‘अंनिस’च्या वतीने महाराष्ट्रात कसा बुवाबाबांचा भांडाफोड करतो, याचा तपशील दीपज्योती सैकिया यांना सांगितला. त्यांना ते भन्नाट वाटले. त्यांनी आम्हास एका ख्रिश्चन बेजची माहिती दिली. हा बेज मंतरलेले पाणी सर्व रोगांवर आदिवासींना विकत असतो. याचा भांडाफोड करण्याचे प्लॅनिंग आम्ही व दीपज्योतीने केले.

मेरी बासूमेरी ही ख्रिश्चन धर्मीय महिला ‘मै भगवान अंग हूँ’ असे म्हणून लोकांना मंतरलेले पाणी देत असे. एका पाण्याच्या बाटलीसाठी 100 रुपये दक्षिणा उकळत असे. येशूने मला लोकांना रोगमुक्त करण्याचा आदेश दिला आहे. अशी भाकडकथा ती सांगत असते. 200 लोक तिच्या दरबारात काम करण्यासाठी होते. उदालगुडी जिल्ह्यातील हरिसिंगा या गावी तिचा दरबार भरला होता. दीपज्योती सैकीया यांनी या तिच्या बुवाबाजीची माहिती या जिल्ह्याच्या पोलीसप्रमुखांना दिली. त्यांनी प्रथम कारवाई करण्यास नकार दिला. परंतु ती कशी बेकायदेशीर उपचार करत आहे. हे सांगितल्यावर ते कारवाई करण्यास तयार झाले. सकाळी 8 वाजता दीपज्योती सैकिया पोलिसांना घेऊन तिच्या दरबारात दाखल झाले आणि ती करीत असलेले उपचार कसे बेकायदेशीर आहेत हे तिला सांगितले आणि दरबार बंद करण्याची विनंती केली. परंतु मेरी काही ऐकेना तेव्हा पोलिसांनी तिला कायद्याचा धाक दाखवून अटक केली. या भांडाफोडीला तेथील वर्तमानपत्रांनी खूपच प्रसिद्धी दिली.

दीपज्योती सैकियांनी भांडाफोडच्या मार्गदर्शनाबद्दल ‘महाराष्ट्र अंनिस’चे आभार मानले. ‘महाराष्ट्र अंनिस’च्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही मोहीम अधिकाधिक व्यापक व्हावी, अशी आशा करत आम्ही परतलो.

सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही कुलधर सैकिया साहेबांच्या ऑफिसला निघालो. एवढा मोठा अधिकारी, पण अत्यंत साधा. ऑफिसच्या इमारतीत विश्वकर्मा पूजेचा कार्यक्रम सुरू होता. बहुतेक पोलीस कर्मचार्‍यांची कुटुंबे होती, माईकवर मुलं आसामी गाणी गात होती. जेवणावळी सुरू होत्या. जिन्याने चढत आम्ही पहिल्या मजल्यावर पोहोचलो. बाहेरच्या पोलिसाला आम्ही आल्याचे सांगितले. त्याने साहेबांशी फोनवर संपर्क करून लगेचच आत साहेबांच्या केबीनला पाठविले. साहेबांनी आनंदाने आणि उत्साहाने आमचे स्वागत केले. थोड्या गप्पा झाल्या. कुलधर साहेबांनी ‘महाराष्ट्र अंनिस’बद्दलच्या कामाबद्दलची माहिती आमच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर आम्ही मुलाखतीला सुरुवात केली.

राहुल म्हणाला, सर, या डायनच्या प्रश्नाकडे तुमचं कसं लक्ष गेलं?

साहेब सांगू लागले… ‘प्रहरी प्रोजेक्ट’ के पहले की बात है। एप्रिल 2000 मध्ये कोक्राझार जिल्ह्यातील कांचुगाव पोलिस स्टेशनअंतर्गत येणार्‍या थाईगरगुडी या गावात डायन ठरवून 5 लोकांचा खून झाला. त्यात 80 वर्षांची म्हातारी होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी आमचे पोलीस तेथे गेले. पण तो गुन्हा सामूहिक होता. सर्व गावकर्‍यांचा सहभाग. कोण पुरावे देणार?… लोकांनी गावातील पाच लोकांना डायन समजून नदीकडे नेऊन ठार केले होते. या प्रकरणात 25 लोकांना अटक झाली. परंतु ते सर्वजण जामिनावर सुटले. लहान मुलालासुद्धा चेटकीण समजून या लोकांनीच ठार मारले. सबळ पुराव्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे चौकशी केली. काही उपयोग झाला नाही. कोक्राझार हा दुर्गम भाग. डायन काढण्याचं प्रमाण तेथे खूप जास्त. या भागात माझे पोस्टिंग जुलै 2001 मध्ये झाले. जुन्या केसेसच्या तपासादरम्यान मला ही घटना समजली. मी विचार केला, ‘काय करावं?’ ‘फिर मैंने सोचा, ‘पहले 15 दिन तक कुछ नहीं करेंगे। सिर्फ गाववालोंसे बाते करेंगे, उनसे रिश्ता बनाएंगे, विश्वास बनाने की कोशिश करेंगे।’

साहेब शांत आणि हळूवार बोलत होते.

मग मी गावकर्‍यांशी सतत संवाद चालू ठेवला. गावाशी नियमित संवादाची प्रक्रिया मी थांबवली नाही. “अब हमारी चर्चा गावकी तकलिफे, जरूरते इनके बारेंमे होने लगी. लोग मुझसे खुलेपनसे बात करने लगे थे।” मी लोकांना म्हणालो, गावाच्या विकासासाठी काहीतरी करू या. मी तुम्हाला पैसे देणार नाही. जे काही करायचंय, ते तुम्हालाच; आम्ही तुम्हाला सहाय्य करणार. “अब हमारा रिश्ता बन गया था, मेरी बाते सुनी जा रही थी। अब उसपे अंमलभी हो रहा था।” मग आम्ही पुरुष आणि महिलांचे स्वतंंत्र गट सुरू केले. गावामध्ये कम्युनिटी सेंटर्स सुरू केले. त्या सेंटरच्या माध्यमातून माझ्या संपर्काने मेडिकल कॅम्प लावणे, बँकेचे-शेतीचे अधिकारी घेऊन जाणे, विविध योजना गावकर्‍यांपर्यंत पोहोचविणे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहन देणे अशी कामे सुरू केली. कोणाशीही डायनबद्दल बोललो नाही. एकमेकांच्या मदतीने आपण एकमेकांचा विकास करू शकतो, पुढे जाऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास निर्माण केला. याचा फार उपयोग झाला आमच्याशी संवादाला विश्वासाची मजबूत चौकट मिळाली. आमचं नातं तयार झालं. या संवादातून मला कोणाचा डायन प्रथेवर विश्वास नाही, याची माहिती मिळत होती, अशांशी मी अधिक ओळख निर्माण केली.

सर्वच गावकरी अशिक्षित होते. चौथी-पाचवी शिकलेली एक महिला होती, तिला आम्ही सेक्रेटरी केले. विविध प्रकारची कामे होत राहिली, संवाद घडत राहिला. ज्याच्या बापाला गावाने डायन ठरविले आणि दगडांनी मारत मारत त्याचा खून केला, त्या तरुणाशी (जो बापाला दगड मारण्यात सहभागी होता) मी जवळीक साधली.

त्या तरुणाला गावकर्‍यांनी त्याच्या बापाला डायन ठरवून का मारले, असे विचारले असता तो तरुण उत्तरला, ‘वो खराब आदमी था साहब’ त्यानंतर काही वेळातच तो हुंदके देऊ लागला आणि म्हणाला, “मेरे पिताजी अच्छे आदमी थे साहब, गाववाले मेरे पिताजी के खिलाफ जो बोल रहे है, वो सही नहीं है। उन्हे मारकर हमने सही नहीं किया।”

गावकर्‍यांनाही आपली चूक कळली होती. त्यांना होणारा पश्चात्ताप त्यांच्या नजरेतून मी टिपला होता. येथेच माझ्या ‘प्रोजेक्ट प्रहरी’चा जन्म झाला. आता मागचं सारं विसरून गावाच्या विकासासाठी आपण झटायचं असं मी म्हणत, त्यांची गावविकासाप्रती असलेली प्रेरणा जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. बोडो जमातीतील लोक डायन प्रश्नावर त्यांच्याशी थेट बोलले तर ते आपले ऐकत नाहीत. पण त्यांच्या विकासावर बोलले, कृती केली तर ते समोरच्याचे नक्की मनापासून ऐकतात आणि बदलतात सुद्धा. हीच नाळ पकडून मी या प्रोजेक्टवर काम करू लागलो.

गावात विविध उपक्रम सुरू झाले. आसाममधील बोडो जमात वीणकामामध्ये अत्यंत प्रवीण आहेत. याचाच उपयोग करण्याचे मी ठरविले. शासनाच्या विविध योजनांमधून गावात शिलाई मशीन आणले, वीणकामाची यंत्रे आली, वीणकामाच्या डिझाईनच्या प्रशिक्षणासाठी मी खास बडोद्याहून माणूस आणला. त्याने सर्वांना प्रशिक्षित केले. गावाचा कायापालट झाला होता. हे सर्व बघायला मी डी.जी.पी. साहेबांना सोबत नेलं. साहेबांनी हा सर्व बदल पाहिला. गावकरी साहेबांना म्हणाले, ‘सैकिया साहब, हमारे लिए भगवान है।’

कम्युनिटी सेंटर चांगले सुरू झाले. विविध बॅचेस तेथे लोकांनीच तयार केल्या. गैरहजर राहिल्यास सर्वांना चहा पाजावा लागेल अशी शिक्षा त्यांनीच ठरवली. एकंदरीत वातावरणच बदलले. या उपक्रमात नवीन दहा गावे वाढली. आम्ही त्या दहाही गावांत असेच प्रयत्न केले. त्यांतील यश पाहून आमचाही उत्साह वाढला. त्यात नंतर आणखी गावांची भर पडून एकूण 50 गावे झाली. हाच तो गाजलेला ‘प्रोजेक्ट प्रहरी.’

‘प्रोजेक्ट प्रहरी’चा मुख्य हेतू हा लोकऊर्जेला परिवर्तित करून लोकांना काही ठोस समाजोपयोगी उपक्रमांसाठी एकत्र आणायचे, जेणेकरून ते डायनसारख्या समाजविघातक प्रथांपासून आपोआप परावृत्त होतील, असा होता.

सर, आणखी कोणकोणती कामं या ‘प्रोजेक्ट प्रहरी’मार्फत झालीत? राहुलने विचारले.

ज्या गावांमध्ये डाकीण प्रथेचा प्रभाव आहे, अशी गावे आम्ही या प्रोजेक्टसाठी निवडली. या प्रोजेक्ट अंतर्गत अनेक कामे झाली. चार गावांनी मिळून (सरफनगुडी, कोलाबारी, चिलसिलीबारी आणि खरबुजा) 5 किलोमीटरचा वर्षानुवर्षे बंद पडलेला पाण्याचा कालवा श्रमदानाने स्वच्छ केला, खोल केला आणि दुरुस्त केला. शेकडो एकर जमीन आता ओलिताखाली आली. कोणत्याही बाहेरच्या एजन्सीच्या, शासनाच्या मदतीशिवाय गावकर्‍यांनी हे घडवून आणले. अनेक अतिरेकी कारवायांमध्ये व अन्य गुन्ह्यामध्ये सहभागी तरुणांनी स्वत:ला सरेंडर केले. सारपारा गावातील मुले शाळेत जाण्यासाठी शेजारच्या बेटमरी गावाला जायची. रस्त्यात नदी आडवी यायची. पण या नदीवर पूर्वी केवळ बांबू वापरून पूल बनवला होता. अत्यंत धोकादायक. पावसाळ्यात त्यावरून चालणे अशक्यच; मग गावकर्‍यांनीच ठरवले आणि पोलिसांच्या सहकार्याने 200 फूट लांब लाकडी मजबूत पूल आता त्या नदीवर तयार झालाय, पोलीस आणि गावकर्‍यांच्या संयुक्त प्रयत्नाने हे शक्य झाले म्हणून आम्ही त्या पुलाला नाव दिले ‘मैत्रीचा पूल’. या प्रोजेक्टअंतर्गत भरपूर मेडिकल कॅम्प झाले. मेडिकल कॅम्प भरविण्याचा उद्देश हा गावकर्‍यांमध्ये आधुनिक वैद्यक सुविधांबद्दल जागृती निर्माण करून गावातील बाबा, ओझांकडे जाण्यापासून परावृत्त करणे हा होता. गावातल्या तरुण मुलांसाठी फुटबॉलचे कोच आम्ही नेमले. पोलिसांनी गावातील तरुणांच्या फुटबॉल टीम तयार केल्या. त्यांचे सामने भरविले.जेणेकरून तरुणाई आतंकवादी गटांना भुलण्याऐवजी सकारात्मक टीमवर्कमध्ये गुंतून जाईल. “प्रगती के लिए समाज, ऐसी सोच रखी, बदलाव दिखाई दिया।” प्रथम आम्ही सुरुवात केली. हा बदल समाधान देणारा होता.

प्रोजेक्ट प्रहरी’ने तुम्हाला अत्यंत आनंद देणारा एखादा प्रसंग सांगा ना, मी विचारले.

असे दोन प्रसंग मी तुम्हाला सांगतो- एके दिवशी अगदी पहाटे पाच वाजता मला फोन आला. मी रिसिव्हर उचलला. इकडून ‘हॅलो’ म्हणालो, तेवढ्यात तिकडून एका मुलीचा आवाज आला, “अरे साब, तू क्या कर रहा हैं? सेंट्रल का स्कीम हैं, टेक्स्टाईलवालों को दो लाख रुपयेका लोन मिलता हैं, ऐसा सुना हैं, तुम जानते हो क्या इसके बारेमें?” मी लगेच उत्तर दिले की माहिती घेतो आणि तुला सांगतो. ही सकाळ माझ्यासाठी अत्यंत आनंदाची सकाळ होती. तिच्या गावाला फोन नाही. ती पहाटे उठून पाच किलोमीटर पायी हायवेवरील एसटीडी बूथवर आली. कोणतीही भीड न ठेवता माझा बिनधास्त एकेरी उच्चार केला. अधिकारवाणीने मला फोन केला. काम सांगितले. हेच तर महिला सबलीकरण आहे, असे मला वाटते.

अशीच दुसरी घटना. दोन वर्षांपूर्वी ऑफिसला मला फोन आला महिलेचाच. “तू हमको नहीं जानता, मैं जानती हूँ तुझे, हमारे गावमें एक औरत को डायन निकाला हैं। तू कुछ तो कर, नहीं तो 300 औरतें मेरे साथ है। मैं मोर्चा लेकर पुलीस थाने आएगी।” ही निर्भयता या ‘प्रोजेक्ट प्रहरी’ने आदिवासी महिलांच्यात आली. हे महिला सबलीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

साहेबांच्या चेहर्‍यावर आनंद, अभिमान आणि समाधानाची भावना स्पष्ट होती; पण बोलण्यात मीच सर्व केलं असा बडेजावही नव्हता, अत्यंत नम्रता होती. मी फक्त वातावरण तयार केले. सर्व माझ्या गावकर्‍यांनीच केले, पोलिसांनी केले, असेच ते म्हणत राहिले. पोलीसवाले काहीतरी सकारात्मक करू शकतात, असा विश्वास त्यांनी डिपार्टमेंटमध्ये निर्माण केला. त्यांच्या या कामाची दखल त्यांच्या शासनानेही घेतली, मीडियानेदेखील याला चांगली प्रसिध्दी दिली. प्रोजेक्ट प्रहरी, महिलांना निर्भयतेने सन्मानाने जगण्याचा प्रहर धुसर वाटत असला, तरी असे प्रयत्न नक्कीच त्या दिशेने टाकलेली पावले असतात. ही पावले तो प्रवास सुसह्य करतात. आशा जिवंत ठेवतात, बदलाच्या दिशेने चालत राहण्याची ऊर्जा देतात.

मुलाखत संपत आली होती; पण उठावेसे वाटत नव्हते. तेवढ्यात त्यांना एक फोन आला. बैठकीसाठी कुठेतरी जावे लागत होते. आम्ही तिघं गप्पामध्ये गुंग झालो होतो. साहेबांना जावे लागणार, याची जाणीव झाल्याने आम्ही त्यांची परवानगी घेत उठलो. सर म्हणाले, ‘एवढे ठीक आहे ना? आणखी काही माहिती हवी असेल तर मी तुमच्या विश्रामगृहाच्या शेजारीच राहतो, रात्री येऊन जाईन तुमच्याशी बोलायला?’ हे ऐकून आम्ही दोघं तर अवाक्च झालो. राज्याचा दोन नंबर रँक असलेला पोलीस अधिकारी आमच्याशी बोलायला स्वत:च आमच्या रूमवर येणार होता, यापेक्षा मोठं नम्रतेचं दुसरं उदाहरण माझ्या आयुष्यात नाही. साहेबांचा मोठेपणा आत खोलपर्यंत भिनला. खूप आनंद वाटला. आम्ही त्यांचे हातात हात घेत शुभेच्छा देत-घेत रूमच्या बाहेर पडलो. पण त्यांची प्रतिमा आत तशीच बसली, अगदी घट्ट, पक्की, कधीच पुसली न जाणारी.

नियोजित सर्व मुलाखती, भेटी संपल्या. आसामचा डायन प्रश्न किती भयानक आहे, हे समजलं. त्यावर सुरू असलेलं काम प्रत्यक्ष बघता आलं, त्यात सहभागी होता आलं, याच समाधान शब्दातीत आहे. या पाच दिवसांनी आम्हाला कार्यकर्ता म्हणून समृध्द केलं. आपल्या संघटनेबद्दल लोकांमध्ये असलेलं प्रेम, आदर, सन्मान आम्ही प्रत्यक्ष पाहिला. आम्ही दोघं सामान्य कार्यकर्ते होतो, पण आमचा खूप आदर केला गेला, सन्मान केला गेला. याचं सर्व श्रेय चळवळीचंच.

आपल्या महाराष्ट्रात नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा. यात आपण गेली 15 वर्षं येथील डाकिणीच्या प्रश्नावर काम करतोय. मी दोन्ही राज्याच्या प्रश्नाची तुलना करू लागतो, तेव्हा काही गोष्टी जाणतात, त्या तुम्हाला सांगाव्याशा वाटतात.

1. आपल्यापेक्षा आसाममधील डाकिणीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्याला हिंसेची टोकदार किनार आहे. आसाम सरकारने विधानसभा अधिवेशनात लेखी उत्तरात म्हटल्यानुसार जानेवारी 2010 पासून आजपर्यंत म्हणजे या पाच वर्षांत 77 जणांना डायन ठरवून ठार करण्यात आले. त्यात 35 महिलांचा समावेश आहे आणि 60 जणांना गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही पोलिसांच्या डायरीतील आकडेवारी आहे. मामुनी मॅडमच्या मते अनेक गुन्हे डायनशी संबंधित असूनही त्याची तशी नोंद घेतली जात नाही; तसेच अनेक गुन्हे पोलीस ठाण्यापर्यंतही येत नसतील, याचा विचार केल्यास ही आकडेवारी चौपट असू शकते.

2. अत्यंत जमेची बाजू ही, की आसाम सरकारने त्याबाबत अत्यंत कठोर असा कायदा केला आहे. त्यात एखाद्या व्यक्तीस डाकीण म्हणणे, डाकीण ठरवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, अंगावरील वस्त्रे काढणे, शिवीगाळ करणे, छळणे, गावातून हाकलून लावणे, संपत्ती हडप करण्याचा प्रयत्न करणे अशा सर्व बाबी या गुन्हा ठरणार आहेत. त्यासाठी 3 ते 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. शासन आणखी विविध सुविधा डायन प्रथेवर काम करणार्‍या संस्था, संघटनांना अनुदान देत आहे.

3. यावर अनेक संस्था, संघटना काम करीत आहेत. माध्यमांनीही हा प्रश्न उचलला असल्याने बहुतेक घटनांची चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे सकारात्मक जनमानस तयार होण्यास मदत होत आहे.

4. डाकीण ठरविण्यामागील कारणे, त्यामागील राजकारण, पोलिसांची भूमिका हे सर्व महाराष्ट्रात जसं आहे, तसंच आसाममध्येही आहे. येथून तेथून माणूस सारखाच.

5. कुलधर सैकिया,डॉ.धनंजय घनवट, श्रीजीत, वैभव निंबाळकर असे वरिष्ठ पोलिस अधिकारी या विषयांबाबत गंभीर असल्याने पोलीस यंत्रणेत चांगला मेसेज जातो. त्यांची कृतिशीलता या प्रश्नाच्या उत्तराकडे जाणारे दमदार पाऊल ठरते.

चेटकिणीचे बेट

आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीत असणारे जगातील सर्वांत मोठे बेट म्हणजे माजुली. हे बेट पर्यटकांना आकर्षित करते. अत्यंत सुंदर निसर्ग या बेटाला लाभला आहे. चारही बाजूंनी ब्रम्हपुत्रेच्या पाण्याने मौजोलीला वेढा घातला आहे. इकडे जायचे तर फक्त होडीतूनच प्रवास करावा लागतो.

अलिकडे मात्र हे बेट चेटकिणीच्या हत्येमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. गेल्या पाच वर्षांत या बेटावर जवळजवळ शेकडो घटना चेटकिणीच्या घडलेल्या आहेत. मागील वर्षी या बेटावर 55 पुरुषांना चेटकीण ठरवून गाववाल्यांनी बहिष्कृत केले. सामाजिक संघटना व मीडियाने याबाबत आवाज उठविल्यावर पुन्हा त्यांना शुद्ध करून माणसात घेण्यात आले. हा डायन शुद्धिकरणाचा विधी मौजुलीमध्ये प्रसिद्ध आहे.

ब्रम्हपुत्रेला पूर आल्याने आम्हाला या बेटावर जाता आले नाही, याचे वाईट वाटते.

आता काही मर्यादांची चर्चा करू या.

1.डायनच्या प्रश्नाची गंभीरता पाहता आज होत असलेले उपाय कमी वाटतात. त्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची गरज आहे.

2. काम करणार्‍या विविध संस्था, संघटना आणि शासकीय यंत्रणा यांच्यात अजिबात समन्वय नाही; उलट एकमेकांबद्दल संशय आणि अविश्वास आहे. श्रेय घेण्याची सुप्त स्पर्धा आहे का, असाही संशय येतो. म्हणून हे प्रयत्न तुकड्या- तुकड्यांचे होतात. त्यात सलगता नसल्याने त्याची परिणाकारकता कमी होते.

3. प्रबोधनाच्या बाबतीत आपण फार पुढे आहोत. महाराष्ट्राला आपण संत आणि समाजसुधारकांची भूमी म्हणतो. पुरोगामी विचारांचा फार मोठा वारसा आपल्याला मिळाला आहे, तेवढा समृद्ध वारसा आसामला नाही. शंकरदेव आणि माधवदेव यांच्यापलिकडे संतांची प्रभावी नावे मिळत नाहीत. म्हणून डायन प्रथाविरोधी लढाई अजून कठीण होते.

4. वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारी दुसरी कोणतीही संस्था, संघटना तेथे नाही, म्हणून दुसरी बाजू ज्या प्रभावाने मांडली जावी, तशी मांडली जात नाही. म्हणजे डायन नसते पण जे तुम्हाला चमत्कारिक वाटते, त्यामागे कार्यकारणभाव असतो. तो मानवी मनाला समजू शकतो, हे सोप्या आसामी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याची नितांत आवश्यकता आहे. मी सादर केलेले चमत्कार आसामी लोकांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमच पाहिले.

5. कायदा झाला; पण तो अजून केंद्रात जाईल. गृह विभागाच्या अभ्यासानंतर तो राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाईल, या प्रक्रियेला किती काळ लागतो, हे सांगता येत नाही. हा कायदा लालफितीत अडकणार नाही, याची काळजी येथील संस्था, संघटनांना घ्यावी लागेल. त्याबाबत आज कोणाकडे, काहीही नियोजन नाही.

6. प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर अधिक आढळले. संघटित प्रयत्नांची गरज आहे. संघटना चालवणे, कार्यकर्ते तयार करणे, त्यांना त्यांच्या आवडी व क्षमतेप्रमाणे रोल देणे, ही आपल्याकडे विकसित झालेली कार्यसंस्कृती तेथे दिसून आली नाही. म्हणून ही माणसं थांबली की, काम थांबण्याचा धोका आहे. म्हणून संघटित कामाची कार्यसंस्कृती तेथे विकसित होण्याची गरज आहे.

या सर्व बाबींचा विचार करता ती पहाट अधिक दूर असल्याचे जाणवते. आसाम हे भारताच्या पूर्वेकडचे राज्य. तेथे आपल्यापेक्षा सूर्योदय बर्‍यापैकी आधी होतो, अगदी भल्या पहाटेच प्रकाश पसरतो, तसाच तो समाजातील डायनच्या प्रश्नाचा काळोख दूर करण्यासाठी लवकर यावा. लखमतीच्या मुलीने अभिमानाने सांगावे, ‘आता बोडो डायन म्हणून बाहेर काढीत नाहीत, मी बिनधास्तपणे बोडोंशी लग्न करणार.’ लखमतीला सर्व समाज आपलं मानेल, वर्षानुवर्षे गावाबाहेर हद्दपार केलेल्या महिलांना सन्मानपूर्वक आपापल्या कुटुंबात परत बोलावले जाईल. सर्व आसामी माताभगिनी सन्मानाने आपले जीवन जगतील.

आणि मला त्यावेळी ‘महाराष्ट्र अंनिसची’ आठवण आली.’

महाराष्ट्रीयन पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे काझीरंगा परिसराचे डी.वाय.एस.पी. असताना तेथे एक डायनची घटना घडली. गाववाल्यांनी सामूहिकपणे एका दांपत्याला डायन ठरवून त्यांची हत्या केली. याचा तपास निंबाळकर साहेबांकडे होता. या गुन्ह्यात साहेबांनी पंधरा एक लोकांना अटक केली. अटक केलेल्या लोकांच्या मनात आम्ही काही गुन्हा केला नाही अशी, भावना होती; उलट आम्ही गावाला डायनपासून वाचविले असेच ते म्हणत. ‘या गावाचे प्रबोधन करण्यासाठी मला ‘महाराष्ट्र अंनिस’ची व डॉ.नरेंद्र दाभोलकरांची त्यावेळी आठवण झाली,’ असे आसामचे असिस्टंट आय.जी. वैभव निंबाळकर यांनी आम्हास सांगितले. या घटनेच्या वेळेला मी तुम्हाला बोलवणार होतो, असे ते आम्हाला म्हणाले. त्यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या गावात डाकीण प्रश्नाबाबत प्रबोधन शिबिर आयोजित केले आणि गावातील हा अंधविश्वास संपविण्याचा प्रयत्न केला.

‘आमी जिआय थाकोबो बिसारू!’ (We want to live) म्हणजे या डायन प्रथेपासून आम्हाला मुक्ती द्या, आम्हालही जगू द्या! अशी आर्त किंकाळी आसामी महिलांची आहे. सन्मानानं आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे, ही त्यांची आर्त किंकाळी तेथील समाजमनाला कधीतरी कळेल आणि आपण सर्व निर्भय, नीतिमान आणि स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारा समाज निर्माण करू. तो सूर्योदयही लवकर व्हावा, तेव्हा आसामी माणसासह आपणही त्यांच्या राज्यगीताच्या शेवटच्या चार ओळी अभिमानाने गाऊ,

ओ मूर ओपाजा थाई, ओ मोर असामी आई,

चाई लोउन एबर मखोनी तोमार, हेनपाह मूर पोलोवा नाई.

हे माझ्या जन्मभूमी, हे माझ्या असमिया आई, तुला पुन्हा पुन्हा पाहुनही माझे समाधान होत नाही. तुझे मुख पुन:पुन्हा पाहण्यासाठी माझा जीव व्याकूळ होतो. तसाच

आमचाही जीव व्याकूळ होतोय,

डायनमुक्त आसामसाठी…!

लेखक संपर्क :

विनायक – 9403259226, राहुल – 9422411862