Categories
व्यक्तिविशेष

एन. डी. सर: धर्मनिरपेक्षतेची पेरणी

जुलै - २०१८

रयत शिक्षण संस्थेचे पाच प्रशासकीय विभाग आहेत. त्यातील सातारा व सोलापूर जिल्ह्यांचा मिळून मध्य विभाग होतो. या विभागात सुमारे 150 शाखा आहेत. 3500 सेवकवर्ग आहेत. या मध्य विभागाचा विभागीय अधिकारी म्हणून सप्टेंबर 2012 मध्ये संस्थेने माझी निवड केली.

कामावर रुजू होण्यापूर्वी आम्हा पाच विभागीय अधिकार्‍यांचे एन. डी. सरांनी बौद्धिक दीड तास घेतले आणि आम्हाला प्रशासनासंबंधी सूचना केल्या. ते म्हणाले, “आपला भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणजे आपल्या देशाच्या घटनेप्रमाणे आपल्या देशाला धर्म नाही. असे असंख्य देश या पृथ्वीतलावर आहेत की, जे धर्मनिरपेक्ष आहेत. जगात असा एकही समूह नाही की, ज्याला धर्म नाही. हे शक्य आहे की, व्यक्तीला धर्म असू शकत नाही. व्यक्तीला स्वत:च्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेले आहे. व्यक्तींनी स्वत:च्या घरी धर्माचरण अवश्य करावे. आपली संस्था देशाच्या घटनेला अधिक महत्त्व देते. म्हणून आपल्या संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये, कोणत्याही धर्माच्या देवदेवतांचे पूजन करू नये, हे सर्वांच्या लक्षात आणून द्या. धर्मनिरपेक्ष हा संस्कार दृढ होण्यासाठी आपल्या शाखेत ईशस्तवन वगैरे गायले जाऊ नये. याची काळजी घ्या. त्याऐवजी स्वातंत्र्याचा जयजयकार करणारी, भारताचा गौरव करणारी, महाराष्ट्राचा गौरव करणारी, नवी प्रेरणा देणारी, संग्रामाची गाणी, जनजागरण करणारी गाणी, विज्ञानगीते आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची गाणी गायली जावीत. अशा प्रकारची काही गाणी तुम्ही त्यांना सुचवा. त्यातील निवडून कोरसमध्ये शाखेतील सर्व विद्यार्थी गातील, असा प्रयत्न करा. ‘जनगणमन’ आणि ‘वंदेमातरम्’ ही राष्ट्रगीते, आपले सर्व विद्यार्थी शुद्ध उच्चार करून म्हणतील, यासाठी कॅसेट लावून सराव द्या.”

हे सांगून सर पुढे म्हणाले, “आठवड्यातील तीन दिवस आपल्या विभागात फिरती करा. शाखेवर गेल्यावर मुलांशी बोला. दुपारच्या सुट्टीनंतर शिक्षकांशी बोला आणि रात्री ग्रामस्थांशी बोलून त्यांचे प्रबोधन करा. आपले विद्यार्थी दैववादी न बनता प्रयत्नवादी बनले पाहिजेत; याची काळजी घ्या.”

पुढे सर म्हणाले,“आपल्या शाखेमध्ये कर्मवीरअण्णांच्या प्रतिमेची हळद-कुंकू लावून, उदबत्ती पेटवून, नारळ फोडून पूजा केली जाते. ती बंद करा. पुष्पांजली वाहण्यास हरकत नाही. नारळ हे मानवाच्या डोक्याचे प्रतीक आहे. नारळाला दोन डोळे व शेंडी असते. नारळ फोडणे म्हणजे अण्णांच्या प्रतिमेसमोर आपण नरबळी देतो, असा त्याचा अर्थ होतो. ज्या वेळी आपण अण्णांच्या प्रतिमेची पूजा करतो, त्यावेळी आपण त्यांना देव बनविण्याची प्रक्रिया सुरू करतो. एकदा अण्णांना देव केले की, त्यांच्या त्यागाचा आपणाला विसर पडतो. अण्णांनी जे केले, ते आपण सुद्धा करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णा महामानव होते. ते ध्येयाने प्रेरित होऊन शंभर पावले चालले असतील. आपण किमान दहा पावले त्यांच्या दिशेने चालू शकतो, हे ध्यानी घेतले पाहिजे.”

मीटिंग संपली होती. मी त्याच ध्येयाने तीन वर्षे माझ्या विभागात काम करीत राहिलो. संपूर्ण विभागात प्रत्येक शाखेत गेलो. दोन गाणी स्वत: गाऊन विद्यार्थ्यांची बसवून घेतली. त्यातील एक होते पां. न. निपाणीकरांचे – बोला आज मिळून सारे। हा निश्चय करू या रे। ज्या ज्या घातक रुढी, दुष्ट प्रथा अन् चाली, नष्ट करू या रे॥ आणि दुसरे गीत होते कवी वसंत बापट यांचे – ‘आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही॥

काही शाळांमध्ये प्रार्थनेच्या वेळी गायत्रीमंत्र म्हणवून घेतला जायचा. तो बंद केला. गणेशोत्सव बंद केले. देव-देवतांच्या प्रतिमा काढून टाकल्या, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने काही सेवक व्यसनमुक्त केले. आंतरजातीय विवाह करणार्‍यांच्या पाठीशी राहिलो. त्यांना आधार दिला. ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ उपक्रम पूर्ण विभागात राबविला.

माझी जडणघडण दाभोलकरांच्या संगतीत आणि अंनिसच्या चळवळीत झाली. नोकरी रयत शिक्षण संस्थेत एन. डी. सरांच्या मार्गदर्शनात झाली. म्हणून हे सर्व काही शक्य झाले.