आयुर्वेद आणि अध्यात्म यांच्यात काय कनेक्शन आहे, याचा बाबूरावांना नेहमीच संभ्रम पडत असे. अध्यात्म हे अनेकांच्या मते औषध असू शकतं हे एकवेळ मान्य करता येईल; परंतु औषध हे अध्यात्म कसं काय बुवा असू शकेल, असा प्रश्न त्यांना पडला की ते भिरभिरत असतं. गीतेचं तत्त्वज्ञान सांगणारी जाड जाड पुस्तके रेल्वे स्थानकावर विकणारी, शुभ्र सुती लुंगी गुंडाळलेली आणि भाळी टिळा लावलेली माणसे सोबत उदबत्त्याही विकतात, ते ठीकच आहे. अध्यात्म, भक्ती आणि उदबत्त्या एकत्र जाऊ शकतात परंतु अचानक कधीतरी या लोकांजवळ आयुर्वेदिक औषधेही दिसू लागतात, त्याचं कारण काही बाबूरावांना कळत नव्हतं.
बाबूरावांना तशी इतरही अनेक कोडी पडतात. या देशात अक्षरशः प्रत्येक राज्यात शंभरेक तरी बापू, महाराज वगैरे असतील. प्रत्येक बापूंच्या भक्तांची संख्याही मोठी म्हणजे प्रचंडच आहे. लाखोंचे मंडप भरभरून भक्तीच्या नद्या वाहत असतात. हे सगळे बापू आपल्या भक्तांना उपदेश करत असतात, त्यांचे श्रीमंत भक्त सतत मोठमोठी समाजकार्ये करत असतात, या बापूंच्या कृपाप्रसादाने अनेकजण रोगमुक्त, समस्यामुक्त झाल्याचे दाखलेही दिले जातात. याच न्यायाने आणि याच वेगाने गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर या देशातले सर्व प्रश्न संपून, देश रोगराईमुक्त होऊन आणि मनःशांतीचा पूर येऊन आपण आतापर्यंत पाश्चात्यांना अध्यात्म निर्यात करायला सुरुवात करायला हवी होती. पण देशांत बघावं तर जिकडे तिकडे आपणच अद्याप समस्यांचं डबोलं घेऊन फिरतो आहोत.
आंतरराष्ट्रीय योगवर्गांचे चालक-मालक रामदेव बाबा हे तर बाबूरावांना जामच गोंधळात टाकतात. यांच्या नावात बाबा आहे, यांची जी ठिकठिकाणी कार्यालये आहेत त्यांना ‘आश्रम’ म्हणतात. या अर्थाने त्यांनी आपल्या दुकांनाच्या मालिकेतून अध्यात्माचीच विक्री केली पाहिजे. परंतु हे बाबा कार्यशाळा करतात. त्या योगांच्या आणि दुकाने चालवितात त्यात तर औषधे, ज्यूस, बिस्किटे, कपडे धुण्याची पावडर काय वाट्टेल ते असते. आता फक्त बाबांच्याच मळ्यात पिकविलेल्या भाज्या आणि बाबांच्या कंपनीचे मीठ यायचे राहिले. साबण,कपडे धुण्याची पावडर यांची निर्मिती करताना बायप्रॉडक्ट म्हणून मीठ तयार होते, असे म्हणतात. तसे असेल तर लवकरच आयुर्वेदिक मीठसुध्दा विक्रीला येईल. बरं, योगाने जर सर्व आजार बरे होत असतील तर मग बाबा मधुमेहावरची आणि ब्लडप्रेशरवरची औषधं कशाला विकतात? ज्यांचे कुणाचे आजार बाबांच्या कार्यशाळांना जाऊन बरे झाले, त्यांचे आजार योगाने बरे झाले नसून ते योगायोगाने बरे झाले असावेत, अशी शंका बाबूरावांना त्यामुळेच येते.
एकच आदरार्थी उपाधी आपल्या नावामागे लागोपाठ दोनदा लावणार्या महाराजांनी जगाला जगण्याची कला शिकवली, त्याचं तर बाबूरांवांना राहून राहून परत परत आश्चर्य वाटतं. ती कला शिकून घ्यायला बघावं तिकडे प्रचंड गर्दी. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जगण्याची कला देशभर शिकून घेत असूनही लोकांना पुन्हा सोशल मीडियावरच्या ‘अच्छे दिन’च्या भूलथापांनी आकर्षित का करावं? ‘अच्छे दिन’चं सोशल मीडियातून उभं राहिलेलं चित्र किती फसवं होतं, हे आता वर्षभरानं लक्षात आल्यावर लोक महागाईच्या नावान कडाकडा बोटे मोडत आहेत. मग हजारो लोक जगण्याची कला शिकले, ती कला गेली कुठं? दरम्यान, महाराजांची जुनी एसी गाडी जाऊन नवी गाडी मात्र आली असेल. पैसे कमावण्याचे शंभर मार्ग या शीर्षकाचं पुस्तक विकणार्या एका विक्रेत्याला एकानं विचारलं, तुला शंभऱ मार्ग माहिती आहेत, तर हे पुस्तक कशाला विकतोस? विक्रेता म्हणाला, त्या शंभऱ पैकीच हा एक मार्ग आहे. तसंच बहुधा जगण्याच्या कलेचही असावं, असं बाबूरावांना आता वाटू लागलं आहे.
अध्यात्म आणि व्यापार या आयुष्याच्या दोन बाजू आहेत की एकच बाजू आहे, हा प्रश्न तर बाबूरावांचा पिच्छा स्वप्नातही सोडत नाही. तसं पाहिलं तर अध्यात्म माणसाला निर्मोही बनवते असं म्हणतात. ‘इदं न मम’ म्हणजे माझं काहीच नाही, आहे ते सर्व भगवंताचं, असंही अध्यात्म सांगते. मग गायीच्या दुधाच्या चिकापासून तयार झालेल्या आरोग्यगुटिका, गायीच्या तुपावर खास प्रक्रिया करून सिध्द केलेलं, बाजारातील तूपाच्या तूलनेत पाचपट महागडं तूप अशा अनेक वस्तूंची विक्री नेहमी अध्यात्माच्याच सावलीत का बरे होताना दिसते? गंमत म्हणजे अॅलोपथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळावी म्हणून आंदोलने करणारे आयुर्वेदिक डॉक्टर लोक अध्यात्माच्या वेष्टनातून केल्या जाणार्या या बाजाराबाबत कधीच बोलताना दिसत नाहीत.
पण मग बाबूरावांनी यावर खूप विचार केला. आपल्याच विचारांत काही खोटं तर नाही ना याचाही तपास केला. तेव्हा त्यांना उत्तर मिळालं किंवा असंही म्हणता येईल की, लोक जे उत्तर मनातल्या मनात देत असावेत, त्या उत्तरापर्यंत बाबूराव पोचले. बाबूरावांनी स्वतःलाच प्रश्न केला की लोक या बापूंना, महाराजांना, स्वामींना प्रश्न का करत नाहीत? त्यांची कृपा होऊन एखाद्याही व्यक्तीचं दुःख, दैन्य दूर झालेलं नसतानाही त्याचा जाब का विचारत नाहीत?
त्याचं उत्तर एकाच शब्दात होतं- श्रध्दा !
या देशातले लोक आयुर्वेदिक औषधांकडे त्याच्या शास्त्रीय योग्यायोग्यतेऐवजी, त्याच्या अस्सलपणाऐवजी श्रध्देची कसोटी लावून बघतात. श्रध्दा असेल तर गुण येईल असं म्हणतात, तेव्हा औषधाचं अध्यात्म तयार होतं.
–तंबी दुराई