‘अंनिस’च्या कोल्हापूर शाखेने जिल्ह्याचा परिसर नजरेसमोर ठेवून 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2017 या कालावधीत संविधान जागर यात्रेचे नियोजन केले. दि. 6 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता संविधान जागर यात्रा कुरुंदवाडच्या सहकारभूषण एस.के. पाटील महाविद्यालय परिसरात दाखल झाली.
हा कार्यक्रम सुरू असताना संयोजकांच्यामध्ये एका वेगळ्या विचाराने घर केले होते. आपण संविधानावर विद्यार्थ्यांची एखादी परीक्षाच का घेऊ नये? असा विचार बोलून दाखवल्यानंतर लगेच त्याची कार्यवाही कशी करायची ते पक्के झाले. या परीक्षेत प्रथम येणार्या विद्यार्थ्यास मी रुपये 1000 देईन, असे मा. प्राचार्यांनी जाहीर केले. या संविधान जागर यात्रेच्या आभार प्रदर्शनावेळी सर्व विद्यार्थ्यांना हा निर्णय जाहीरपणे सांगितला आणि तारीख ठरली 30 डिसेंबर 2017. दुसर्या दिवशी जाणकार प्राध्यापकांच्या बैठकीत प्रश्नांचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, एकूण गुण, संदर्भ ग्रंथ, ग्रंथांची उपलब्धता, विद्यार्थ्यांना द्यावयाच्या सूचना इत्यादी गोष्टींचे पक्के नियोजन केले आणि संपूर्ण कार्यक्रमांची रूपरेखा महाविद्यालयाच्या सूचना फलकावर दि. 8 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना सदर परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळून पुढील तीन दिवसांमध्ये 114 विद्यार्थ्यांनी नावे नोंद केली. ही सर्व प्रक्रिया राबविण्यासाठी प्रा. वाय. एम. चव्हाण, प्रा. पी. के. मेटकर व प्रा. आर. एस. कदम यांची समिती अधिकृतपणे कार्यरत झाली.
सदर परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके कोणती वापरू? अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत राहिली आणि विशेष म्हणजे संविधानासंबंधी असणारी ग्रंथालयातील पुस्तके वाचावयास न्यायला सुरुवात झाली. एकदाही न वाचलेली ग्रंथालयातील पुस्तके या परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच विद्यार्थी वाचनासाठी घरी घेऊन गेले, ही मनाला सुखावणारी गोष्ट या परीक्षेने केली.
या परीक्षेला काय बरे नाव द्यावे? यावर विचार सुरू झाला. कोणी म्हणाले, ही प्रेरणा आहे म्हणून प्रेरणा परीक्षा असे म्हणा; मग एकाने सुचविले की, ही विद्यार्थ्यांची स्वत:ची प्रेरणा आहे म्हणून तिला स्वयंप्रेरणा म्हणा आणि मग या संविधान जागर परीक्षेचे नाव तयार झाले ‘स्वयंप्रेरणा परीक्षा 2017 विषय भारताचे संविधान.’ या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. बाळासाहेब भोसले यांनी मोलाचे योगदान दिले.
परीक्षेला नाव नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचा समितीतील प्राध्यापकांशी सतत संपर्क येत होता. परीक्षा कशी असणार सांगा? अभ्यास कोणता करायचा? याबद्दल सतत विचारणा होऊ लागली म्हणून सुनील स्वामी यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा रविवार, दि. 17 डिसेंबर 2017 रोजी घेतली. या कार्यशाळेत 98 विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. कार्यशाळेत सुनील स्वामी यांनी संविधानाबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांचे शंकासमाधान केले. या सर्व कार्यवाहीनंतर परीक्षेला आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण करून दि. 30 डिसेंबर 2017 रोजी नियोजित वेळी परीक्षा झाली. एकूण 77 मुले परीक्षेला हजर होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका इस्लामपूरच्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्राचे प्राध्यापक सचिन पाटील यांच्याकडून तपासून घेतल्या आणि परीक्षेचा निकाल तयार झाला. आता काम उरले होते, ते फक्त प्रथम येणार्या विद्यार्थ्यास त्याचे पारितोषिक प्रदान करणे; पण याचवेळी समितीला एक अफलातून कल्पना सुचली ती म्हणजे आपण परीक्षेला बसणार्या प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाची प्रत भेट म्हणून का बरे देऊ नये? एका क्षणात कार्यवाही करण्याचे ठरले आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी संविधानाच्या 100 प्रती सवलतीच्या दरात देण्याचे मान्य केले. या प्रती मिळवून देण्यासाठी प्रा. डी. व्ही. सूर्यवंशी यांनी मोलाचे सहकार्य केले. संविधानाच्या प्रती आम्हास मिळाल्यानंतर दि. 6 जानेवारी 2018 रोजी प्रथम पारितोषिक आणि संविधान प्रत प्रदान करण्याचा कार्यक्रम घेतला. कु. पूजा राजाराम मडीवाल, बी. ए. भाग 3 या विद्यार्थिनीस या स्वयंप्रेरणा परीक्षेत सर्वप्रथम आल्याबद्दल रु. 1000 चे रोख बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुनील स्वामी, मा. रमेश माणगावे, कु. सुनंदा मेटकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना एक कृती कार्यक्रम दिला तो म्हणजे जात, धर्म, लिंगनिरपेक्ष मतदानाचा हक्क बजावणे, कोणत्याही परिस्थितीत मतदान करणे, राष्ट्रीय सण साजरे करणे आणि या बरोबरच संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्याबद्दल कटिबद्ध राहणे. या कार्यक्रमाला प्रा. वाय. एम. चव्हाण, प्रा. पी. के. मेटकर, प्रा. आर. एस. कदम, प्रा. डी. व्ही. सूर्यवंशी; तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
– प्रा. पी. के. मेटकर
– प्रा. डॉ. वाय. एम. चव्हाण
संपर्क : 9850849308