Categories
अभिवादन

कॉम्रेडच्या खुनाला एक वर्ष उलटतं तेव्हा

फेब्रुवारी – २०१६

16 फेब्रुवारी, 2015.कॉ. गोविंद पानसरे या एका ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यावर खुनी हल्ला झाला. या हल्ल्याला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची पार्श्वभूमी होती.

20 फेब्रुवारी, 2015. आयुष्यातील अखेरच्या काळात क्षण अन् क्षण समाजपरिवर्तनाचा अव्याहत विचार आणि त्यानुसार कृती करणारा एक जिवंत स्रोत एके दिवशी अचानक हरपला.समाजात घडणार्‍या घटनांचा सातत्यानं वेध घेत त्यांचं राजकीय विश्लेषण करत समाजातील अभावग्रस्त, विषमताग्रस्त, अवमानित, शोषित घटकांना सामाजिक न्याय नि समतेसाठी चालू असलेल्या चळवळीच्या प्रवाहात ओढून नेणारा एक चैतन्याचा झरा निमाला.संघर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या एका भीष्माचा पुढच्या दोन पिढ्यांतील कार्यकर्त्यांना जाणवणारा आश्वासक आधार नाहीसा झाला. या घटनेला एक वर्ष उलटलं.

2016 साल चालू झालं. या वर्षाच्या कालावधीत आपल्या आजूबाजूला काय काय घडलं? एक वर्षापूर्वी महाराष्ट्रात, देशात, एकूणच आपल्या विश्वात जी सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती होती, ती साधारणत: तशीच आहे. किंबहुना तिची भीषणता अधिक तीव्र बनली आहे.ती अधिक टोकदार झाली आहे. समाजात प्रतिगामी व पुरोगामी असे ध्रुवीकरण होताना दिसते आहे.

30 ऑगस्ट, 2015 रोजी विवेकवादी विचारवंत, संशोधक,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. एम्.एम्.कलबुर्गी यांचा राहत्या घरात गोळ्या झाडून खून झाला. हा एक नवाच धक्का होता. खरं सांगायचं तर कोल्हापूरपासून केवळ दोनशे कि.मी.अंतरावर राहाणार्‍या प्रा.कलबुर्गी यांची ओळख आपल्यापैकी बहुतेकांना नव्हती.त्यांचे कन्नड भाषेतील लेखनही वाचण्याचा प्रसंग आला नव्हता. त्यांचा खून झाल्याचं समजताच त्यांची माहिती घेतली आणि त्यांच्या खुनामागचं कारण स्पष्ट झालं. आम्ही भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या नजरेत प्रचंड दु:ख आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष अनुभवलेल्या हिंसेचा थरार होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील दबाव आणि दहशत अजूनही सर्वत्र तशीच जाणवते आहे. म्हैसूरमधील के.एस.भगवान यांना धमक्या आल्या. कोल्हापुरात पोलिस संरक्षणात त्यांनी भाषण केलं, मुलाखत दिली. धारवाड येथील लेखक चेन्नवीरा कनवी आणि जी.गोविंदराज यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यांनी प्रा. कलबुर्गी यांच्या खुनानंतर निघालेल्या निषेध फेरीत सहभाग घेतला होता आणि खुन्यांचा तपास वेगाने व्हावा यासाठी लेखकांनी एकत्र येऊन केलेल्या याचिकेवर सह्या केल्या होत्या. बेंगलोरमधील साहित्यिका व चित्रपट निर्माती चेतना तीर्थहळ्ळी यांनी फेसबुकवर हिंदू धर्म आणि बीफ बंदी यावर टीकात्मक मत व्यक्त केल्यानंतर त्यांना बलात्कार आणि अ‍ॅसिड हल्ल्याच्या धमक्या आल्या. 21 वर्षांचा दलित लेखक एच्. प्रसाद यानं जातिव्यवस्थेवर टीका करणारं पुस्तक लिहिलं. त्यानं जर हिंदुत्वविरोधी लेखन थांबवलं नाही तर त्याची बोटं छाटली जातील, अशी धमकी मिळाली. मांसाहाराची परंपरा असणार्‍या भारतीय समाजात गोमांस बंदी घालण्यात आली. दादरी येथे घरी गोमांस असल्याची अफवा पसरवून अखलाक यास ठार मारण्याची भयंकर घटना घडली. पाकिस्तानचे माजी मंत्री खुर्शीद मसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनास विरोध म्हणून कार्यक्रमाचे आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहर्‍याला काळं फासण्यात आलं.

लोकप्रिय गजल गायक गुलाम अली यांच्या भारतातील कार्यक्रमास विरोध करत निदर्शने झाली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (FTII) या संस्थेच्या समितीच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान या सुमार दर्जाच्या व्यक्तीच्या नियुक्तीविरुद्ध विद्यार्थ्यानी आंदोलन छेडल्यावर शासनानं त्यांच्याशी चर्चाही करण्यास नकार दिला. प्रचंड दडपशाही केली. शाहरूख खानदेशात असहिष्णुता असल्याचं मत व्यक्त करताच त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं. रामनाथ गोएन्का वृत्तपत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात एका मुलाखतीत आमीर खाननं पत्नीला देशात सुरक्षित वाटत नसल्याचं मत व्यक्त केल्यावर स्वत:ला धक्का बसल्याचं सांगितलं. तिच्या मनात दुसर्‍या देशात जाऊन राहावं का, असा विचार आल्याचं त्यानं उघड करताच या दोघांनाही देशद्रोही ठरवण्यात आलं. त्यांचे चित्रपट पाहू नयेत, असं आवाहन सोशल मीडियातून प्रसृत करण्यात आले. जेम्स बाँड मालिकेतील नवा चित्रपट ‘स्पेक्टर’ मधील अनेक दृश्यांना सेन्सॉरकडून कात्री लावून संस्कारी बनवण्यात आलं. ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ चित्रपटातील ‘काली’ आणि ‘लक्ष्मी’ देवींची दृश्ये अस्पष्ट करण्यात आली. ही केवळ प्रसारमाध्यमांनी दखल घेतलेल्या घटनांची यादी आहे. अनुपम खेर सारख्या काही जणांना ‘असहिष्णुता’ या शब्दाबद्दलच असहिष्णूता होती. परिणामी अनेक संवेदनशील बुद्धिजीवी, वैज्ञानिक, साहित्यिकांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल शासनाने दिलेले पुरस्कार परत दिले.याला ‘पुरस्कार वापसी’ असं नाव देऊन उपहास करण्याचा प्रयत्न झाला. अनेक प्रसारमाध्यमांतून ‘यांनी पूर्वी का नाही पुरस्कार परत दिले’, असं म्हणून त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न झाला. ही यादी बरीच मोठी आहे. आता ‘आयसीस’ या मुस्लिम अतिरेकी संघटनेनं देशातील मुस्लिम तरुणांना जाळ्यात ओढलंय, असं चित्र आहे.

दैनंदिन जीवनाशी संबंधित हरेक क्षेत्रातील बाबी अन्न, पेहराव, मैत्री, प्रेम, विवाह, मनोरंजन आणि त्याचबरोबर जाती धर्माच्या रूढ परंपरेबाहेरचे मुक्त विचार आणि लेखन असं सर्वच दहशतीच्या छायेत आलं. डॉ.कलबुर्गी यांच्या खुनानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री श्री. सिद्धरामय्या यांना भेटण्यास गेलो असताना तिथल्या अनेक लेखक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अलिकडच्या काळात राज्यात ‘moral policing’ प्रचंड वाढलं असल्याचं सांगितलं होतं. असं स्पष्ट झालं की केवळ धार्मिक बाबींवर टीका करण्याला नव्हे, तर एकूणच विवेकबुद्धीनं विचार करणं नि त्यानुसार जगणं याला रूढीवाद्यांचा विरोध आहे. सनातनी प्रवृत्ती प्रचंड आक्रमक बनली आहे. स्त्रिया, दलित व अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि हिंदू बहुसंख्याकांच्या वर्चस्वाची आक्रमक मांडणी, देशप्रेम व देशद्रोहाच्या नव्या संकल्पना यातून देशभरात सर्वच संवेदनशील लोकांच्यात एक आंतरिक अस्वस्थता आहे.

काहीच दिवसांपूर्वी कोल्हापुरात आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याची मुलीच्या सख्ख्या भावांनी निर्घृण हत्या केली. या घटनेनं जातीधर्माची बंधनं तोडून प्रेमविवाह करू इच्छिणार्‍या अनेक तरुणतरुणींचा अक्षरश: थरकाप उडाला. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातील शब्दांनी असंख्य संवेदनशील लोकांच्या हृदयात खोल वेदना उमटली. तार्‍यांकडे प्रवासास निघालेला रोहित लिहितो, माझा आत्मा आणि शरीर यातलं वाढतं अंतर मला जाणवतं. या अवस्थेत खोल आतलं कोमल माणूसपण संपतं.

या संपण्याची कारणमीमांसा आपल्याला अर्थव्यवस्थेच्या रचनेपाशी घेऊन जाते. भांडवली विकासाच्या भूलभुलैयात अडकून, बाजारवाद आणि चंगळवादाच्या मूल्यातून जगण्यात भणंगपणा आला आहे.विकत घ्या, उपभोगा नि फेकून द्या, या संस्कृतीनं माणसाला स्वार्थी बनवलं आहे. मानवी कल्याण, गरीब वंचितांबद्दल करुणा, परस्परस्नेह आणि आदर या गोष्टी कुठेतरी सुटून गेल्या आहेत; तर दुसर्‍या बाजूला सवंग उत्सव, बाबा-बुवा-महाराजांचा सत्संग यात हरवलेली मन:शांती शोधण्याचे व्यर्थ प्रयत्न, त्यातून जाणवणारी आंतरिक पोकळी यातून फोफावलेला आध्यात्मिक उन्माद, धार्मिक कट्टरतेनं माणसाला हिंस्त्र पशुवत् बनवलं आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादानं एक हिंसक, भयावह स्वरूप धारण केलं आहे. इतिहास विकृत करून मांडला जातोय, तर शिक्षण आत्माच हरवून बसलं आहे. जोतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी शिक्षण ही एक क्रयवस्तू असून त्याचं मार्केटिंग करायची गरज आहे, असं धक्कादायक विधान अलिकडेच केलं होतं.

पितृसत्ताक मूल्ये,धर्मांधता व भांडवली व्यवस्था यांची परस्पर हातमिळवणी जगण्याची गुंतागुंत वाढवते आहे. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती आणि जुनी, रूढीवादी, सनातनी मानसिकता दोन्ही एकाच वेळी हातात हात घालून चालण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्रियांनी पारंपरिक पोशाख घालावेत, कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे, जास्त मुलांना जन्म द्यावा, अशी वक्तव्यं सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, मंत्री करताहेत. धर्म कन्यादानासारख्या प्रथेतून स्त्रीचं वस्तूपण टिकवतो, तर भांडवली व्यवस्था सौंदर्यप्रसाधनांसारख्या उद्योगातून ते साध्य करते. ज्याला सामाजिक सुधारकांची एक दीर्घ परंपरा आहे, त्या महाराष्ट्रात प्रसारमाध्यमांतून जनमानसांत अंधश्रद्धा, जुने रीतिरिवाज, धार्मिक कर्मकांडं पुनर्प्रस्थापित करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होत आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दलित व स्त्रियांवरील हिंसा वाढते आहे.

हे सारं मूकपणे पाहत राहणं ज्यांना शक्य नाही, त्यांचं काय होईल?

जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे
मारे जाएंगे
कठघरे में खडे कर दिए जाएंगे
जो विरोध में बोलेंगे
जो सच सच बोलेंगे मारे जाएंगे
सबसे बडा अपराध है इस समय में
निहत्थे और निरपराध होना
जो अपराधी नहीं होंगे, मारे जाएंगे

-कवी मेहबूब शेख

ज्यांनी विवेकाची कास धरून अमानुष प्रतिगामी विचार्रव्यवहाराला कडवा विरोध केला, प्रागतिक, समतावादी परिवर्तनाचा विचार प्रमाण मानून जीवन व्यतीत केलं त्या दाभोलकर, पानसरे व कलबुर्गींसारख्या माणसांच्या हत्या झाल्या. निर्भयी विचारवंत गमावल्यानं वैचारिक चिंतन, चळवळीचं आणि कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान झालं. त्यांनी दिलेलं विचारधन आणि व्यवहारसूत्रं यांची शिदोरी चळवळीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं ही महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. जगातील साम्राज्यवादी, युद्धखोर हिंसक शक्ती आणि द्वेषाचं थैमान माजवणार्‍या धर्मांध विकृती यांचा मुकाबला निधड्या छातीनं करण्याचं बळ कार्यकर्त्यांत निर्माण व्हावं, वाढावं, यासाठी तीच शिदोरी मदत करेल.

आपल्या देशाचं संपूर्ण भवितव्य अशा बुद्धिजीवी वर्गावर अवलंबून आहे, जो प्रामाणिक, स्वतंत्र आणि नि:स्वार्थी आहे, असं मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं. ते अगदी खरं आहे. अनेक स्तरांवर असे लोक एका आर या पार लढ्यासाठी तयार होताहेत.अनेक समविचारी लोक कोल्हापुरात येऊन भेटतात. आपली आंतरिक अस्वस्थता व्यक्त करतात. अनेक तरुण कॉम्रेड पानसरेंच्या स्मृती जागवत घरी येतात. त्यांनी कधी कुठेतरी त्यांचं भाषण ऐकलेलं असतं, पुस्तक वाचलेलं असतं, त्यांच्या कार्याबद्दल ऐकलेलं असतं. संविधान आणि त्यातील समता, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर ठाम विश्वास हा एक परस्परांतील बंध असतो. गुजरातमधील लेखकांनी अलिकडेच दक्षिणायन ही प्रवास व परस्परसंवादाची मोहीम केली. पुणे, कोल्हापूर, धारवाड या शहरांना भेटी देऊन समाजवास्तव व लोकभावना समजून घेण्याचा संवेदनशील प्रयत्न केला. असे प्रवास अधिकाधिक व्हावेत, यासाठी प्रयास व्हायला हवेत.

मी स्वत: या वर्षभरात देशातील अनेक गावांत प्रवास केला, अनेक समविचारी लोकांना भेटले, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांचे विचार व भावना समजून घेतल्या. या खुनाच्या सत्राबद्दल दु:ख, वेदना, संताप; तसेच तपास व न्यायालयीन प्रक्रियेबद्दल जाणवणारी हताशा, त्यातून लोकशाही व्यवस्थेबद्दल निर्माण होणारी साशंकता अशा अनेक संमिश्र भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. परंतु विवेक व अहिंसा याच मार्गाने लोकशाही मूल्यांचा आधार घेत पुढे जायचे आहे, हे तत्त्व धरून मार्गक्रमण करायचे आहे, हे स्पष्ट होत गेले.

डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतीनं अंनिसची चळवळ चालू ठेवली. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच जात पंचायतीविरोधात लढा पुकारला. यातून डॉक्टर दाभोलकरांचा कृतिशील विचार पुढे गेला.

कॉ. पानसरेंच्या मृत्यूनंतरही एका आक्रोशातून सर्व समविचारी संघटनांनी एकीचं बीज पेरलं. पण त्याचं रोप अजून फुलायचं आहे. ते फुलेल तेव्हाच पुरोगामी विचार सशक्त बनेल. त्याची एक ताकद बनेल. ती ताकद बनवण्याचं स्वप्न साकार करूया.

-मेघा पानसरे