जयसिंगपूर येथे पार पडला शानदार सोहळा
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचा खून धार्मिक उन्मादात राहून काम करणार्या लोकांनी केला. विवेकाचा आवाज बुलंद करून जाती-धर्म आणि शोषणमुक्त, कल्याणकारी, समतेचे राज्य उभे राहावे, हे दाभोलकर व कॉ. पानसरे यांनी पाहिलेले स्वप्न साकार करावयाचे असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी जयसिंगपूर येथे व्यक्त केले.
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कारा’ने ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला गौरविण्यात आले. अविनाश पाटील, डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर यांच्यासह ’अंनिस’च्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तिसरा ‘कॉ. गोविंदराव पानसरे प्रबोधन पुरस्कार’ कॉ. उमाताई पानसरे यांच्या हस्ते स्वीकारला. 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांची उपस्थिती होती. अविनाश पाटील म्हणाले, दाभोलकर आणि पानसरे यांचे नेहमीच सुसंवादी, सहयोगी नाते राहिले. त्यांच्याकडून ‘अंनिस’ला ऊर्जा, दिशा मिळाली. दाभोलकरांमुळेच जादूटोणाविरोधी कायदा संमत करावा लागला. भारतीय समाजव्यवस्थेला छेदक असणार्या जात यंत्रणेच्या विरोधातल्या जातपंचायतीला मूठमाती मिळाली. पुरस्कार समितीचे सदस्य ख्यातनाम साहित्यिक उत्तम कांबळे यांनी महाराष्ट्र अंनिस व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली. या समारंभात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी श्रोत्यांना ऊर्जा देणारे स्फूर्तिदायक विचार मांडले. खरे बोलणार्यांपेक्षा बरं बोलणार्यांचे दिवस आलेत, हे वाईट आहे. दाभोलकर व पानसरे खरे बोलत होते. त्यांचा विचार पुढे नेण्याचे धैर्य आपण दाखवायला हवे, असे सांगून दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या विवेकनिष्ठ लढाऊ वृत्तीच्या आठवणी त्यांनी जाग्या करून श्रोत्यांना अस्वस्थ केले.
कॉ. उमाताई पानसरे म्हणाल्या, या पुरस्कारामुळे पानसरेंचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आली आहे. ती पेलण्यासाठी बळ एकवटले पाहिजे. पानसरेंच्या विचारांवर सुरू असलेली वाटचाल सोपी नसली, तरी अशक्य नाही. त्यांनी केलेल्या पायवाटेचा राजरस्ता करून इतरांना आपल्याबरोबर सामील करून घेऊया. स्वागत प्रा. डॉ. नितीश सावंत, तर समन्वयक प्रा. डॉ. मिलिंद कसबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बाळगोंड पाटील यांनी प्रतिज्ञावाचन, सुनील इनामदार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नीलिमा माणगावे, डॉ. जयश्री आवळेकर, डॉ. चिदानंद आवळेकर, प्रा. कुंभोजकर, रघुनाथ देशिंगे, प्रा. राठोर, कृष्णा चांदगुडे, तुषार घाडगे, सदा पाटील, प्रा. प्रकाश मेटकर, प्रा. कांबळे, प्रा. प. रा. आर्डे आदी उपस्थित होते. डॉ. महावीर अक्कोळे यांनी आभार मानले.
–रमेश माणगावे, जयसिंगपूर