आपल्या लहानपणी घरातील, आजूबाजूचे वातावरण कसे होते?
सर्वसामान्य कुटुंबात असते तसेच वातावरण माझ्या घरात होते. मी माझ्या आईच्या वडिलांकडे आणि आजोबा-आजींकडे वाढलो, तर माझ्याकडे देवभोळे वातावरणच होते. माझे आजोबा पहाटे उठून भजन गात, मी त्यांच्या मांडीवर बसलेला असे. माझी आजी रोज देवळात जाई, आजही जाते. विठ्ठलाचे मंदिर, रामाचे मंदिर असे करत करत घरी यायची. मीही तसाच होतो. मीही आजीबरोबर जायचो पहाटेची शुद्ध हवा मिळायची, पायपीटही व्हायची आणि मला मजा देखील वाटायची. भजन कीर्तन, प्रवचनांना मी जाऊन बसायचो, त्याची मला आवड होती आणि आजही आहे. खरं तर आता मोठं झाल्यावर कळतं, टाळ वाजवायला मिळायचे, प्रसाद मिळायचा आणि त्या देवळातले सकाळचे वातावरण आवडायचे म्हणून मी जायचो आणि त्यानंतर काही दिवसांनी माझे आजोबा आजाराने अंथरुणाला खिळले आणि त्यावेळेस त्यांच्यावर करणीच केली म्हणून अनेक उपाय आणि उपास-तापास असं सगळं केलं गेलं. पण ते सगळं करून माझे आजोबा नीट कधीच झाले नाहीत, त्यांच्या आजाराचे निदानही झाले नाही. मला वाटतं की, ते आचारी असल्याने दिवस-रात्र भट्टीसमोर काम करायचे. एका रात्री ते आले आणि त्यांच्या नाकातून खूप रक्त गेले आणि त्यानंतर मग ते आजारी पडले. फार पूर्वी त्यांना टी. बी. झाला होता, असं माझी आजी म्हणते आणि तसेच ते विड्याही ओढत असत. या सर्वांचा तो परिपाक असावा असं आज विवेकबुद्धीने विचार करताना मला दिसतं. करणी वगैरेवर उपचार करून तर आजोबा काही बरे झालेच नाहीत. अशा अनेक घटना आहेत घरातल्या. मला आठवतंय की, आजोबा गेल्यानंतर घरात पैसेही नव्हते तरी ते श्राद्ध साजरं करायचं. म्हणजे आपण म्हणतो की ते क्रियाकर्म आहे; पण वाढदिवसही आपण साजरा करतो आणि श्राद्ध ही साजरेच करतो. मरणही आपण साजरे करतो. त्यावेळी मी घरातला लहान मुलगा होतो पण तरी मला त्याचा त्रास होत होता की, आपल्याला जर घरात खायला पैसे नाहीत, तर मग श्राद्धात एवढा मोठा खर्च कशासाठी करायचा? आणि त्यामुळे आत्मा तृप्त होतो म्हणजे काय? तर मला वाटतं की, मेलेल्या माणसाला बरे वाटावे म्हणून काही करण्यापेक्षा जी माणसं जिवंत आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं. आता माझे आजोबा वारले, मी माझ्या नाटकाच्या कंपनीला त्यांचं नाव दिलं, मला निश्चित बर वाटलं पण त्यांना बरं वाटलं की नाही, ते मला नाही, सांगता येत. पण माझ्या आजीला बरं वाटलं की माझ्या नवर्याचं नाव कंपनीला दिलं, यातच मला सुख वाटतं.
लहानपणी, मला काही प्रॉब्लेम्स आहेत आणि पत्रिकेत काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नारायण नागबळी करायचा! आता नारायण नागबळीचा खर्च इतका होता की, तो तेव्हा परवडत नव्हता आणि मोठा झाल्यावरही मला नारायण नागबळी करायला लागला. कारण मी तापट डोक्याचा आहे वगैरे. पण मला माझ्या स्वभावात काही बदल आढळला नाही. तो स्वभावातला जो फरक आहे, तो आता मला जी मुलगी झालेली आहे, त्यामुळे मला जी जबाबदारीची जाणीव झालेली आहे, त्याने माझ्यात बदल झाला. माझ्यातला बदल कोणत्याही नारायण नागबळीमुळे झालेला नाही. नारायण नागबळीच्या प्रसंगामध्ये जी ठिणगी पडली, ती अशी की त्या नाशिकमध्ये जी नदी वाहते, त्यामध्ये इतका कचरा करून ठेवलाय की, त्यात ते नदीमध्ये निर्माल्य वाहायचं आणि साफसूफ करणारं कोणी नाही आणि ती नदी घाण करत राहायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायण नागबळीची जी पिंडं तयार केली जातात, ते जे अन्न वाया घालवलं जातं त्यापेक्षा ते कुठल्यातरी गरिबाच्या पोटात गेलेलं बरं नाही का? म्हणून मी माझ्यापुरता निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मी कर्मकांडांना कात्री लावून टाकली. (म्हणजे कोणत्या कर्मकांडांना माझा विरोध आहे- ते सांगतो.) उदाहरणार्थ – माझी आई देवाची पूजा करते, देवापुढे फुले ठेवली की बरं वाटतं, माझी त्याला ना नाही. देवापुढे नतमस्तक होऊन, श्रद्धा बाळगून जर माझ्या आईला बरं वाटतं तर माझी त्याला ना नाही. त्याने तिचं मानसिक स्वास्थ्य नीट राहत असेल तर तिने ते करावं. पण जेव्हा माझी आई, आज चतुर्थी आहे म्हणून मग दुसर्या दिवशी गुरुवार आहे म्हणून आणि सलग तिसर्या दिवशी शुक्रवार देवीचा वार आहे म्हणून सलग तीन दिवस उपवास करते आणि त्याने उपाशी राहते तेव्हा मला फार वाईट वाटतं. कारण आपल्या देहामध्ये देव आहे, असं अनेक संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय, नाही का? की पंढरी, काशी आपल्या देहातच आहे. मला ती चिमणी, गुरं-ढोरं कधी उपवास करताना दिसली नाहीत. आपली वेळ झाली की, आपण आपल्याला हवं तेवढं खाणे आणि आपल्याकडे जर असेल तर आपल्यातले थोडेसे उपाशी माणसांना किंवा प्राण्यांना देणे. मला वाटतं, यापेक्षा कुठला सोपा मार्ग आहे देवाकडे जाण्याचा? मी पण होमहवन केलेले आहे, मला प्रश्न पडतो की आपण होमहवन करतो, त्यावेळी आपण आपल्याविषयी आणि सृष्टीविषयी बोलतो. तेव्हा सृष्टीविषयी बोलत असताना झाडाची लाकडं तोडून, त्या होमात टाकणं आणि त्याच्यातून धूर निर्माण करणे म्हणजे प्रदूषण आणि परत आपण झाडाविषयी आणि निसर्गाविषयीच मागणार. म्हणजे काय उपयोग? त्यासाठी मी माझ्यापुरता मार्ग निवडला की देव हा झाडांमध्येच असेल तर मी झाडे लावीन. माझ्यासाठी देव हा निसर्गामध्ये असेल तर मी निसर्गाची काळजी घेईन.
शालेय जीवन आणि महाविद्यालयीन जीवन कसे गेले?
शालेय जीवनामध्ये मी एक खोडकर विद्यार्थी होतो. खरं तर मी हुशार विद्यार्थी होतो; पण मला गणित जड जात असे. मग मी देवाला जाऊन नवस बोलणे हे करायचो की मला गणितात पास कर. ते मूर्खपणाचंच होत, मूर्ख समजतो. कुणी करत असतील, नसतील. पण एवढं करूनही मी नापास झालो. पण मी हिंदी भाषेसाठी कधीच नाही केले; पण मी त्यामध्ये ऐंशीच्या पुढंच मार्क मिळवायचो. कारण मला ते येत होतं. म्हणजे आपल्याला जे येत नाही त्यासाठी कुठंतरी नवस बोलून कसं काय होईल? त्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. मी जेव्हा मेहनत करू लागलो त्यानंतर मला कळले की, हे असं असं आहे. तर शक्ती म्हणजे काय? तर मीच आहे. ‘अणुरेणूहून थोकडा, तुका आकाशा एवढा’ म्हणजे काय? तर ही सर्व तत्त्वे माझ्यात आहेत. मला वाटतं प्रार्थनाही महत्त्वाची आहे. उदा. मी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जात आहे, मी देवाला अभिषेक वाहतोय पाचशे रुपयाचा आणि तेथून परत येताना मला जर रस्त्यामध्ये असा एक विद्यार्थी दिसला की, ज्याला शिक्षणासाठी पैसे नाहीत तर ते पाचशे रुपये दानपेटीत टाकण्यापेक्षा मी त्या विद्यार्थ्यासाठी खर्च नाही का करणार? कारण दानपेटीत टाकलेले पैसे कुठे जातील? त्याचा विनियोग कसा होईल? मंदिराचा विकास, विस्तार, जीर्णोद्धार होईल. त्यापेक्षा त्या पाचशे रुपयात एखाद्याच्या घरामध्ये चूल पेटणार असेल तर त्याच्याने त्याचं पोट भरणार आहे. मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं, तर शालेय जीवनामध्ये ज्ञानेश्वर आणि तुकोबा पाच मार्कांसाठी शिकवले गेले, त्यावेळेस या विषयांमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता; परंतु मी जेव्हा सजगपणे त्यांच्याकडे पाहायला लागलो, तेव्हा मला वेगळं समजायला लागलं. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली ही जी दंतकथा आहे, त्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं वाटतं की, जी भगवद्गीता आहे ती ज्यांना संस्कृत कळत नाही, त्यांना त्यांच्या भाषेत खुली करून देणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जो संग्राम केला तो मोठा आहेच; पण मला वाटतं की त्या काळामध्ये कोकणासारख्या ठिकाणी हरिजनांसाठी एक वेगळं देऊळ बांधणे आणि हरिजन जोडप्याला घेऊन त्यांची हाताने देवाची प्राणप्रतिष्ठा करणे ही किती मोठी गोष्ट आहे! मला त्या कृतीमध्ये देव दिसतो. मला देव दगडात दिसत नाही; मला कृतीत देव दिसतो. कुठून तरी कुठल्यातरी देवाला मी 24 तास चालत जातो. त्यापेक्षा मला वाटतं की, मी रोज अर्धा तास चाललो तर माझं शरीर चांगलं राहील.
कोणाच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे आपल्यात बदल झाला?
मध्यंतरी मला एक अपघात झाला. 2004 मध्ये. मद्य पिऊन गाडी चालवत होतो. बाईक आणि माझा जबरदस्त अपघात झाला. त्यानंतर मी कोमात गेलो. ज्यावेळी मी शुद्धीत आलो, त्यावेळेस माझ्या लक्षात आले की, सगळ्यांना कळलेले आहे माझ्याविषयी की मी व्यसन करून गाडी चालवत होतो. ही अत्यंत चुकीची गोष्ट होती. माझ्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येऊ लागले आणि मी भयंकर न्यूनगंडाने पछाडला गेलो. रोज रात्री मला सोबत म्हणून कोणी न कोणी झोपायला येत होतं. एकदा मध्यरात्री त्या मुलाच्या छातीवर गाडगेबाबांचे पुस्तक होते. ते वाचता-वाचता त्याला झोप लागली होती. मी गाडगेबाबा वाचायला सुरुवात केली आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, ही तर फारच मोठी व्यक्ती होऊन गेली महाराष्ट्रामध्ये. देव हा देवळात नसून तो माणसात आहे, स्वच्छतेत आहे, हे लहानपणापासून खूप ऐकलेलं असते बरं का! कुठल्याही संताची कितीही मोठी शिकवण जरी असली तरी ती जोपर्यंत आपल्याला आतमध्ये भिडत नाही, आपल्या हृदयाशी लागत नाही तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. तर त्या स्थितीत गाडगेबाबांची शिकवण मला भिडली.
म्हणजे भुकेल्या माणसाला अन्न द्या, हे मला लहानपणापासून घरामध्ये शिकवले होते. परंतु मी जेव्हा मुंबईत गेलो आणि भुकेला होतो, तीन दिवस काही खायला मिळालं नाही; त्यावेळेस मला ज्या माणसाने विचारलं की, तू काही खाल्लंस का? मला तेव्हा कळतं हे काय असतं विचारणं. सुदैवाने आमच्या येथून जेव्हा पालखी जाई, तेव्हा आम्ही कधी पैसे वाटले नाहीत. माझी आजी, आमच्याकडे फारच बिकट परिस्थिती असायची , तशातही रोज एक रुपया साठवायचा. एक महिना आधी, दोन महिने आधी रोज एक रुपया बाजूला टाकायचा आणि वारकरी आपल्या इथून जाणार असतील तेव्हा त्या पैशाची गुडदाणी आणि केळी सार्या वारकर्यांना वाटायची. ती एक हिंट मला बालपणी घरी मिळाली. मला असे वाटते की, जे कोणी असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, अण्णा भाऊ साठे असतील, डॉ. दाभोलकर असतील, मला वाटतं समाजाविषयी विवेकानं काम करणारी माणसं जी आहेत, बेसिकली जी माणसं विवेकानं काही बोलताहेत, बुद्धिनिष्ठ राहून बोलताहेत, समाजाविषयी कळकळीने बोलताहेत, एखाद्या समूह व जातीविषयी न बोलता माणसाविषयी बोलताहेत त्या प्रत्येकाचा माझ्यावर प्रभाव पडला. मी कबीर वाचला-; बडा भाया तो क्या भाया जैसा पेड खजूर। पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर।’ म्हणजे मला वाटतं जर मला उद्या संधी मिळाली आणि मला माझे आजोबा जे वारलेत, त्यांच्या नावाने जर मला काही वास्तू बांधायची झाली तर मी शौचालय बांधेन. मला वाटतं आपल्याकडे जागोजागी वाईन शॉप्स आहेत, मेडिकल शॉप्स आहेत, देवळे आहेत, मशिदी आहेत सगळं आहे; पण स्त्रियांसाठी शौचालये हा केवढा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे.
माझा एक मामेभाऊ होता. त्याला काहीतरी ऐकू यायचं, काही तरी व्हायचं. घरातले म्हणत करणी वगैरे. नगरला कोणी बाबा आहे, त्याच्याकडे घेऊन गेले. त्याला काहीतरी विचारलं जाऊ लागलं. मी निरीक्षण करायला गेलो होतो. म्हटलं बघूया काय ते. इतकं जबरदस्त विचारत होते की… हं सांग ..सांग. तर भाऊ बोलला असं असं दिसतं. असं असं आहे. मी भावाला विचारलं की खरंच तुला असं काही दिसतं काय? तो म्हणाला, ‘ते एवढ्या जोराने बोलायला लागले. मी घाबरून गेलो. म्हटलं बोलून जावं एकदाचं आणि नंतर काय झालं ट्रिटमेंट दिली डॉक्टरांची. अन् तो झाला नीट अशा अनेक गोष्टी आहेत.
एकदा मी कोकणातल्या एका देवळात जात होतो आणि तिथे मला आतमध्ये जायचं होतं आणि त्यांनी मला विचारलं की, ‘आतमध्ये गाभार्यात चालला आहेस. तू पण तुझं नाव काय?’ मला त्यांच्या बोलाण्यातंन कळलं नाही. म्हटलं ‘का हो?’ तर म्हणाले, ‘तुमची जात काय?’ तर मी नाही सांगितलं त्यांना मी ब्राह्मण आहे. मी त्यांना म्हटलं मी दलित आहे. तेव्हा ते मला म्हणाले, “तुम्ही नाही जाऊ शकत आत गाभार्यामध्ये.” नंतर त्यांची मुलगी आली आणि तिने सांगितलं की, ‘अहो हे जितेंद्र जोशी आहेत.’ तर ते म्हणाले ‘जा न आत जा.’ हक्काने जायचं. मी म्हणालो, ‘मी नाही आता आत जायचो. ज्या देवळामध्ये मला माझे नाव विचारून प्रवेश दिला जातो, मला त्या देवळात तेथे जाऊन काय मजा येणार आहे?’ मला जिथे शांत वाटते ना, म्हणजे सांगू का आत्ताच मी महाबळेश्वरला गेलो होतो. वर्कशॉपच्या निमित्ताने गेलो होतो. तिथे जाऊन मी डोंगरावर उभा राहिलो आणि मला ती फुलं दिसली. तिथे छोटासा साप होता, तिथेच मस्त खारुताई होती. मला वाटलं काय मस्त आहे ही जागा, मस्त ऊन लागतंय आणि गार वार्याची झुळूकही येतेय, तिथेच मला वाटलं देवाचा वास आहे आणि तेच मला वाटतं गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता वाचल्यानंतर.. मला वाटतं इथे असेल का देवाचा वास त्यांच्या कवितेमध्ये? माझी मुलगी झाल्यानंतर तिच्या डोळ्यात पहिल्यांदा पहिले ना मला तिथे वाटतं की देव आहे. दि. बा. मोकाशींच्या ‘आमोद सुनांसी आले’ या कथेमध्ये आहे की, एखादा जीव जन्माला येतो किंवा जातो ते कुठेतरी देव सापडेल. तुम्ही बघाल तर हिंदी चित्रपटातील दहा सर्वोत्कृष्ट भजनं आहेत एकत्र शकील बदायुनी किंवा साहीर लुधियानवीने, त्याला चाल दिली आहे नौशादने आणि गाणारा आहे महमंद रफी. त्यामुळे मला वाटतं की देव नावाची जी गोष्ट आहे, श्रद्धा नावाची जी गोष्ट आहे तिच्यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही. ते कुणालाही ज्याला आतून वाटतं त्याचं आहे. तिथे जात, धर्म काही आडवं येत नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव असतातच. पूर्वीही ताणतणाव येत होते आजही येतात. पूर्वी ताणतणावांना काढलेली उत्तरे आणि आता हा विवेकवादी विचारांच्या वाटेवरचा प्रवास झाल्यानंतर स्वतः शोधलेली उत्तरे यांत फरक जाणवतो का?
ताणतणाव ही जी गोष्ट आहे, ती इतकी गमतीशीर आहे! म्हणजे कसंय सांगू का?आता मला मातीतून चालत जायचंय, छान मस्त रस्ता आहे. अचानक पाऊस पडला. आता मी पावसातून चाललोय, चिखल झालाय, तर माझ्याकडे दोन मार्ग आहेत, एक तर मी झाडाखाली जाऊन उभा राहीन, पाऊस निघून जाऊन रस्ता सुका होईपर्यंत किंवा माझी जर निकड आहे, मला चालत जायचंच आहे तिकडं तर चिखलात माझे माझे पाय रुततील, मला नीट चालता येणार नाही, तरी मला चालायचं आहे. आता मी रडतरडत चालू का चिखलात? माझे पाय आत गेले तरी त्याचा एक वेगळा स्पर्श आहे त्याची मजा घेत चालू? हाच फरक आहे आधीचा आणि आताचा. म्हणजे उदाहरणार्थ मला आधी असं वाटायचं की, काय राव मला हेच नाही, मला तेच नाही, माझ्याकडे पैसेच नाहीत. मी एवढी मेहनत करतो राव तरी माझं काही होईना. हे बी केलं, ते बी केलं. नंतर माझ्या लक्षात आले की माझ्यापेक्षा बरेच बाप लोक होऊन गेले. माझ्यापुढं माझे काही ब्रिलीयंट अभिनेते मित्र होते, त्यांचं काही झालं नाही. ते या क्षेत्रात वेगळंच काही तरी करताहेत. माझं एवढं तरी झालं. माझ्यावर लोक प्रेम करतात. यापेक्षा मला आणखी काय पाहिजे?
आता माझं इतरांबरोबर पटत नसेल तर याला मी कशाला वेगळं नाव देऊ? माणसांचा स्वभाव आहे, दोन माणसे वेगवेगळ्या प्रकारची आहेत. नाही पटणार. कोणाचं तरी सुंदर वाक्य आहे, मला असं वाटतं की बॉब मार्लेचं वाक्य आहे की या जगात तुम्हाला प्रत्येक माणूस त्रास देणारच आहे. तुम्ही ठरवा की, कुठल्या माणसाने तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला त्याच्याबरोबर राहायला आवडेल.
मला फार आवड होती, की माझ्या घरात गणपती हा बसवला पाहिजे. श्रद्धा होती माझी, म्हणजे आज माझी श्रद्धा नाही असे नाही. परंतु ज्या दिवशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठल्या तरी एका गणपतीला जावं; मी पायी जातो, मी नवस बोलतो आणि एकवीस बुधवारी मी.. एक साधा किस्सा सांगतो. एक दिवस मी शूटिंग संपवून पहिली लोकल पकडून मी गोरेगावला आलो. स्टेशनवर एक लहान मुलगा बसला होता. मुलाचे वय असेल साधारणपणे आठ वर्षे. आठ वर्षांचा मुलगा म्हटल्यावर मी म्हटलं की, ‘अरे, एवढ्या पहाटे पहाटे कुठे चाललास?’ तर म्हणाला, ‘मी सिद्धीविनायकाला गेलो होतो.’ ‘अरे, म्हटलं एकटाच?’ ‘हो म्हटला. एकटाच गेलो होतो.’ कसा गेला होता? तर चालत. ‘गोरेगाववरून तू आठ वर्षांचा मुलगा एकता सिद्धिविनायकाला?’ मी म्हटलं, ‘का रे’ तर म्हणाला, माझे बाबा दारू पितात ना आणि आईला मारतात, तर मला कोणीतरी सांगितलं की एक केल्याने दारू सुटेल. अकरा बुधवार केले, सुटेल दारू. म्हटलं, ‘किती झाले बुधवार? तो म्हणाला की, ‘दोनदा अकरा केले.’ मी म्हणालो, ‘मग सुटली का दारू बापाची?’ म्हणाला नाही ‘सुटली’. माझ्या अंगावर असा काटा आला की मी म्हणालो की, देव इतका बिझी आहे का या लहान मुलाचं ऐकत नाही. तर नाही. मला असं लक्षात आलं की अरे, हा जो मुलगा आहे आता ज्याची भावना आहे कि त्याच्या बापाची दारू सुटावी म्हणून काहीतरी करतो; आता तो मोठा झाला, त्याला विवेकाची साथ मिळाली, थोडी समज आली की त्याला कळेल की मी तेथे जाऊन काही होणार नाही, बापाला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे? नाही का? तर मला वाटतं कि तो फरक आहे छोटासा. तुम्हाला काय दिसतं.
मी चालत किंवा कुठल्याही तर्हेने एखाद्या देवस्थानाला जाण्यापेक्षा पायी जाणारी जी माणसे आहेत, त्यांना मी जर पाण्याचा एक ग्लास देऊ शकलो तर देअर इज द एंड.

संत तुकाराम यांच्या तुम्ही केलेल्या भूमिकेविषयी सांगा.
संत तुकारामांच्या मी केलेल्या भूमिकेविषयी बोलायचे झाले, तर मी लहानपणापासून जो तुकाराम पाहिला होता, त्याच्या बाबतीत नेहमी चमत्कार सांगितले जायचे. उदा. विठ्ठलाने येऊन तुकारामाची गाथा काढून दिली, आवडीला साडी दिली किंवा पुष्पक विमानासंदार्भातील बाबी इ. तुकारामाच्या बाबतीतला यापेक्षा मला भावलेला वेगळा चमत्कार म्हणजे, दुष्काळामध्ये सर्व गाव बुडालेला असताना, सावकाराचा मुलगा असलेला, धनाढ्य असलेला हा माणूस एका जाणिवेने पछाडून जातो, ती म्हणजे, भाकरी मिळत नाही, पाणी मिळत नाही तर या सोन्या-नाण्याचे मी काय करू? म्हणजे जी संपत्ती आपत्तीत कामाला येत नाही, ती कोणती संपत्ती? तेव्हा त्या संपत्तीचाच तो त्याग करतो आणि ज्यांना कर्जे दिली होती, त्या कर्जाची कागदपत्रेच ‘इंद्रायणी’त बुडवून टाकतो. यापेक्षा मोठा चमत्कार तो कुठला?ती संपत्ती माझी नाहीच असे म्हणून, तिचा त्याग करून निवृत्त होणे हाच मला चमत्कार वाटतो. तो तुकारामाच्या माणूसपणातून घडतो; तर तुकारामांनी गाथा बुडवल्यानंतर ती गाथा ‘इंद्रयणी’तून परत वर येताना नाही दाखवली या चित्रपटामध्ये; तर आपल्याकडे असलेल्या मौखिक परंपरेमुळे तुकारामांची गाथा त्यावेळी लोकांना मुखोद्गत होती आणि अशा प्रकारे गाथा जरी बुडवली गेली तरी तिच्यातील अभंग, शिकवण, सार बुडवता आलं नाही, हे त्या चित्रपटात जे मर्म सांगितलं गेलं. ते मला वाटतं की, फार महत्त्वाचं आहे आणि तुकाराम किंवा कोणत्याही संताचा एक ‘टर्निंग पॉईंट’ असतो. काही घटनांमुळे ते अंतर्बाह्य बदलून जातात. तुकारामात बदल जो घडला तो दुष्काळामुळे घडला आणि त्यांच्या सोबतीला त्यांची कविता होती, त्यांची जाणीव होती, असे मला वाटते. तुकोबारायांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले, उदाहरणार्थ, देवाला नवस करून जर पोरे होणार असतील, तर मग तुम्हाला नवरे कशाला हवेत? हे तुकोबारायांनी त्या वेळेला सांगितलं. समाजासाठी काही अनिष्ट रूढी होत्या, आजही आहेत. त्यावर बोट ठेवण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. पारंपरिक पद्धतीचा विचार करून तुकोबा न दाखवता त्याचं माणूसपण, जाणीव, आसपास काय होतं व त्यातून तुकाराम कसा घडला, हे महत्त्वाचे आहे.

आपल्याला विवेकी विचार कसा पुढे नेता येईल, असं तुम्हाला वाटतं?
सामान्य माणसापर्यंत कसा नेता येईल? मग मला असं वाटतं की, आईबाप जसं वागतात, मुलं त्याचं अनुकरण करतात बहुतांश वेळा. मी समाज वगैरे बदलायला.. मला माहीत नाही.. मी कामाच्या माध्यमातून करू शकेन आणि मी माझ्या मुलीला मात्र नक्की सांगेन. मला वाटतं की महात्मा गांधींपासून ते येशू ख्रिस्त सुळावर चढला; पण डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. मला वाटतं की ही माणसे येऊन सुद्धा समाज असा एक दिवसात एकत्र नाही येऊ शकणार आणि विवेक सोडून जर कोणी काही करत नसेल तर मला वाटतं की त्याने ते करावं. अविवेकी विचार हा कुठलाही असो, कोणाचाही असो; काहीही असो मला असं वाटतं की ते चुकीचंच आहे. म्हणजे कुठल्याही जातिधर्माचा असो. म्हणजे काय आहे की ते खूप पर्सनल आहे. मला एका घावात ते मोडता येणार नाही आणि ते कसं पुढे घेऊन जाता येईल की मला वाटतं लोकांना त्या पद्धतीने साक्षर करूनच ते पुढे नेता येईल. माझ्यासारखा शिकला सावरलेला माणूस जर इतके दिवस याच्यात अडकून पडला होता, ओझं होतं ते. इतकं ओझं होतं! आता ते ओझं काढून टाकल्याने जरा बरं वाटतं मला. मला माझ्या नाटकाची प्रॅक्टिस केल्यानंतर कळतं की मी किती कमी आणि जास्त आहे. जे कोणी शनी वगैरे आहेत.. माझं चांगलं आणि माझं वाईट करण्यास माझा एकटा मीच समर्थ किंवा असमर्थ आहे. कुठलाही शनी, कुणीही माझं काही करू शकणार नाही. चांगलं किंवा वाईट कोणीच करू शकणार नाही. मीच आहे स्वतःचं उत्थान करू शकणारा किंवा स्वतःला बरबाद करू शकणारा. मीच आणि प्रत्येकाच्या बाबतीत मला तेच वाटतं. पुन्हा एकदा ते प्रार्थनेत खूप बळ आहे, असं मला वाटतं. प्रार्थना नक्कीच केली पाहिजे. फक्त ती समजून, उमजून केली पाहिजे. बाकी ज्याच्या त्याच्या ते हातात आहे हो. ते बदलत जाणार, माणसे येत जातील, करत राहतील किंवा त्यांनी त्यांचा पार्ट करावा. आपण आपला करावा. अनेक विषय आहेत. त्याचा त्रास होतो.. आदिवासींची जमीन, शेतकर्यांच्या आत्महत्या… बर्याच बर्याच गोष्टी आहेत. पण मी लहान मनुष्य आहे, मी स्वार्थीसुद्धा आहे खूप. म्हणून मी स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करतोय.

मुलाखतकार : देविदास इंगळे व मिलिंद देशमुख