Categories
जट निर्मूलन

गीताताई झाल्या जटामुक्त!

एप्रिल - २०१८

उत्साळी (ता. चंदगड, जि.कोल्हापूर) येथील सौ. गीता रुपेश सुतार या सुशिक्षित महिलेच्या केसामध्ये जटा तयार होऊन मोठा गुंता तयार झाला होता. अंनिसचे कार्यकर्तेसूर्यकांत देसाई व भूषण सुरंगे यांनी गीता सुतार व तिचे पती रुपेश यांची भेट घेऊन जटा निर्मूलनाबाबत त्यांची मानसिक तयार करून घेतली.

प्रकाश भोईटे (जिल्हा अध्यक्ष, अंनिस), पांडुरंग करंबळकर गुरुजी (तालुका उपाध्यक्ष, अंनिस), सुरेश मटकर सर (अध्यक्ष, अंनिस शाखा नेसरी), रवींद्र हिडदुग्गी सर (कार्याध्यक्ष, अंनिस शाखा नेसरी) या सर्वांनी नेसरी वाचन मंदिराचे अध्यक्ष वसंत पाटील यांची भेट घेतली व सदर जटानिर्मूलन कार्यक्रम वाचन मंदिर येथे घेण्याची विनंती केली. वसंत पाटील सर यांनी मोठ्या आनंदाने अंनिस कार्यकर्त्यांची विनंती मान्य केली.

जटानिर्मूलनासाठी लागणार्‍या धारदार कात्र्या, कंगवा, अंघोळीचे गरम पाणी, शाम्पू, साबण इत्यादी साहित्य सुरेश मटकर सरांनी दिले. जटानिर्मूलन वाचनालयातील एका खोलीत प्रकाश भोईटे सर, बाबूराव शेवाळे, करंबळकर गुरुजी, शशिकला पाटील, गीताताई यांनी तिच्या जटा सोडविल्या. त्यानंतर जयश्री हुक्केरी व शशिकला पाटील यांनी तिचा साडी-चोळी देऊन सत्कार केला. शिवलिला हिडदुग्गी यांनी सुषमा देसाई यांचा सत्कार केला. सदर कार्यक्रमात जटा कशा तयार होतात व त्यातून बाहेर पडल्याने आरोग्य कसे लाभते हे भोईटे सरांनी मनोगतात सांगितले. करंबळकर गुरुजींनी अनेक कर्मकांडे कशी चुकीची आहेत, हे उदाहरण देऊन पटवून सांगितले. टी. बी. कांबळे व वैशाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सौ. गीता सुतार आपल्या मनोगतात म्हणाल्या, ‘मी आज जटेच्या त्रासातून मुक्त झाले. मला वेदना होत होत्या. कोणत्याही कुशीवर झोपताना मोठ्या जटेमुळे केसांना ताण येत होता. त्यामुळे झोप लागत नव्हती. समाजात वावरताना संकोच वाटत असे. माझी श्रद्धा ही आंधळी श्रद्धा होती. जटा निर्मूलनामुळे माझ्या मनावरील व डोक्यावरील ओझे कमी झाले. येथून पुढे मी अशा कर्मकांडात अडकलेल्या व्यक्तींना जटामुक्तीचा सल्ला देईन. मी व माझे पती यापुढे अंनिसचे कार्य करू. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानते.

सदर कार्यक्रमात सुरेश मटकर, रवींद्र हिडदुग्गी, प्रल्हाद माने, भूषण सुरंगे, आप्पासो कुंभार, सयाजी पाटील, अशोक मोहिते, एस. एन. देसाई, सदानंद शिंदे, अमजद जमादार, माधुरी कुंभार, एकनाथ पाटील, गणपत पाथरवट इत्यादी कार्यकर्ते हजर होते. आभार विनायक कोळी यांनी मानले.

पांडुरंग करंबळकर गुरुजी,

हेब्बाळ-जलद्याळ, ता. गडहिंग्लज, जि.कोल्हापूर