Categories
संपादकीय

गौरव महाराष्ट्र फौंडेशनचा!

जानेवारी - २०१६

महाराष्ट्र फौंडेशन ही अमेरिका निवासी, सामाजिक जाणिव जागृत असलेल्या मूळ महाराष्ट्रीय असलेल्या नागरिकांची संघटना. ही संघटना प्रतीवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या कर्तृत्ववानांचा गौरव करते. यावर्षी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे साधना ट्रस्टच्या सहकार्याने प्रख्यात साहित्यिक उत्तम कांबळे, पत्रकार सुरेश द्वादशीवार, समाजकार्यकर्त्या व लेखिका विद्या बाळ, विचारवंत शरद बेडेकर इत्यादी मान्यवरांचा महाराष्ट्र फौंडेशनने गौरव केला. विशेष कौतुकाची बाब म्हणजे महाराष्ट्र अंनिसचे नाशिक निवासी कार्यकर्ते कृष्णा चांदुगडे यांचाही यावेळी गौरव झाला. या अगोदरही महाराष्ट्र फौंडेशनने 1996 साली महाराष्ट्र अंनिसला विशेष पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अमेरिकेत निमंत्रित करून 2001 ते 2010 या दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता म्हणून विशेष गौरविण्यात आले होते.

महाराष्ट्र फौंडेशनची धुरा सांभाळणारे सुनील देशमुख हे मुळचे सांगलीचे. व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेल्या देशमुख यांनी आपल्या अमेरिकास्थित सहकार्‍याबरोबर ट्रस्ट स्थापन करून महाराष्ट्रात विवेकवादाची परंपरा तेवत ठेवणार्‍या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे कार्य मोठ्या नेटाने चालविले आहे. विवेकवादावर महाराष्ट्रात आणि भारतात सर्व बाजूंनी आक्रमण सुरू आहे. या आक्रमणाचे डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी हे बळी ठरले. इतरही काही जणांची हत्या झाली. अशा वातावरणातही निर्भयपणे विवेकाची ज्योत तेवत ठेवणारी मंडळी महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यांना बळ देणारी महाराष्ट्र फौंडेशन म्हणजे अविवेकाच्या वाळवंटातील हिरवळच ठरेल.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी यु टूब द्वारा प्राप्त झालेले सुनील देशमुख यांचे भाषण श्रोत्यांना ऐकविण्यात आले. प्रत्येकवर्षी गौरव समारंभाला स्वतः सुनील देशमुख हजर असतात. यावेळी शस्त्रक्रिया झाल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत; पण तंत्रज्ञानाचे आधारे त्यांनी पडद्यावर प्रत्यक्षपणे श्रोत्यांबरोबर संवाद साधला. भारतात धर्मनिरपेक्षता आणि विवेकवाद याचे रक्षण करण्याची किती गरज आहे हे सुनीलजी कळकळीने सांगत होते.

गेली 22 वर्षे महाराष्ट्र फौंडेशन प्रतिवर्षी सातत्याने परिवर्तनवादी कार्यकर्ते आणि विचारवंत यांना भरघोस रकमेचा पुरस्कार देऊन कौतुक करत आहेत. पुरोगामी कार्यकर्ते आणि विचारवंत हे पुरस्कारासाठी कार्य करत नसतात; हे जरी खरे असले तरी ‘पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा’ या शाबासकीने त्यांना निश्चितच बळ मिळते. त्यांची उमेद वाढते आणि कार्याचा प्रभावही वाढतो. महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात पुरोगामी कार्यकर्त्यांनी केलेल्या अभिमानास्पद कार्याचा सुनीलजी यांनी सातत्याने गौरव केला आहे. या कार्यामुळे महाराष्ट्रात विवेकवादाची परंपरा समर्थपणे वाटचाल करील याबद्दल आम्हाला शंका नाही. ‘सकाळी फिरायला जाच’ अशी धमकी देणार्‍या धर्मांधांचा पराभव होईल हे निश्चित.

सुनील देशमुख यांचा महाराष्ट्र अंनिसच्या कार्याशी चांगला परिचय आहे. आपले वार्तापत्र महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात पोहचावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील साडेबारा हजार माध्यमिक शाळांची तीन वर्षांची वर्गणी भरून हे मासिक संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्यात मोठे आर्थिक सहकार्य केले होते. मा. सुनील देशमुख यांचे अंनिसचे हे नाते लक्षात घेऊन येत्या मे महिन्यात आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलना’चे उद्घाटक म्हणून त्यांना खास निमंत्रित करीत आहोत. पुन्हा एकदा सुनीलजी आणि त्यांचे सहकारी यांना मनःपूर्वक धन्यवाद!