Categories
उपक्रम

चळवळीचा विचार नवीन ढंगात !

जानेवारी - २०१७

अनेक चळवळींतील ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले की म्हणतात, आजच्या पिढीला आमची भाषा समजत नाही आणि ते काय बोलतात हे आम्हाला लवकर उमगत नाही! अभिव्यक्ती, कार्यक्रम आणि धोरणात अपरिवर्तनीयता असल्याने हा पेच निर्माण होतो.

आरती, महेंद्र, सचिन, दीक्षा, सतीश हे ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या अंनिसच्या राज्यव्यापी अभियानाचे कार्यकर्ते हे नवीन अभियान घेऊन नवीन माध्यम वापरत, चळवळीची अवघड भाषा सोडून देत, तरुणांशी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन त्यांच्याच भाषेत जेव्हा मांडणी करतात, तेव्हा त्यांची संवादशाळा संपूच नये असं वाटतं. आटोपशीर, मुद्देसूद, विचारप्रवण करणारे मुद्दे मांडत; गाणी, फिल्म्स यांचा मुबलक वापर करत ते आपला विवेकी विचार तरुणांपर्यंत पोचवत आहेत. केवळ ऐकवण्याची भूमिका न घेत, त्याचं देखील ऐकून घेत!

महाराष्ट्रातील 10 वी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा चिंचवड, पुणे येथील प्रतिभा कॉलेज येथे पार पडली. कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, डोंबिवली येथून 60 पेक्षा अधिक तरुण-तरुणी व पालक यामध्ये सहभागी झाले होते. यातील 40 पेक्षा अधिक सहभागी हे पहिल्यांदा अंनिसच्या कार्यशाळेला आलेले होते. हे चित्र आशादायक आहे. कारण विचार पोचवण्याच्या माध्यमात नाविन्य आहे.

ही कार्यशाळा मूलत: चार तासांची आहे. पहिल्या दोन सत्रांमध्ये जोडीदाराची विवेकी निवड का? आणि कशी? या विषयावर चर्चा होते. तिसर्‍या सत्रात गटचर्चा आणि शेवटच्या सत्रात संवादासाठी काही मुद्दे देण्यात येतात. तपशिलात जाणार नाही, स्वतः येऊन अनुभव घेण्याची मजा मी हिरावून घेऊ इच्छित नाही. ही संवादशाळा घेण्याचा विचार सुरू झाला; तेव्हापासून त्याची पत्रिका ही आकर्षक असावी यासाठी खूप प्रयत्न केले. वेगवेगळ्या व्यक्तींकडून चार ते पाच पत्रिका बनवून घेतल्या परंतु पत्रिका ‘क्लिक’ होत नव्हती; मग हक्काचा माणूस गाठला मिलिंद जोशी.

पत्रिकेत काय हवंय, हे आधी अर्धा तास या माणसानं समजून घेतलं आणि मग दोन तास बसून पत्रिका तयार केली. मेहनत, कल्पकता आणि विचार यांचं मिश्रण करून मस्त, रोमँटिक अशी जाहिरात – कम – पत्रिका करून दिली. यामुळे प्रचार-प्रसार होण्यास मोठी मदत झाली. थँक्स मिलिंद सर! हा कार्यक्रम यशस्वी केला तो कांकरिया सर, मिलिंद सर, महाजन मॅडम, नंदिनीताई, डॉ. नितीन अण्णा, दीपक आणि प्रीती देशपांडे यांनी!

संवादशाळेच्या उद्घाटकांना ऐनवेळेवर कळालं की आपल्याला उद्घाटन करारचं आहे. सचिन आणि निशा या दोघांनी वर्षभर या ग्रुपमध्ये राहून सहजीवनास सुरूवात करण्याचा निर्णय घेतला तो संवादाच्या आधारावर! त्यामुळे नात्यात संवादाची छत्री उघडली, तर समस्यांचे रखरख ऊन नातं जाळून टाकू शकत नाही, संवादाच्या सावलीत ते अधिक विस्तारू शकतं, अशी कल्पना मांडणारं हे उद्घाटन एकदम अभिनव आणि त्या जोडप्याला देखील सुखद धक्का देणारं होतं. दरवेळेस नवीन पद्धतीने उदघाटन हे संवादशाळेचे वैशिष्ट्य आहे.

ही संवादशाळा अनेक लोकांनी असं सांगून मिस केली की, ‘आम्ही आमचा जोड़ीदार निवडला आहे’ किंवा ‘अजून आम्ही खूप लहान आहोत’ किंवा ‘आता खूप वर्षे झाली रे लग्नाला कशाला यायचं तिकडे?’ ही संवादशाळा त्यासाठीच आहे! कारण आपण निवडत असलेला, निवडलेला किंवा ज्या जोड़ीदारासोबत आपण राहत आहोत, त्याच्यासोबत आपलं सहजीवन अधिक समृद्ध कसं करता येईल? वाहत्या नदीत पोहताना आपण कधी थकू हे आपल्याला देखील माहीत नसतं, तेव्हा कामी येते नवीन पद्धतीने पोहण्याची ट्रिक!

कुणाल शिरसाठे