अंधविश्वास आणि छद्मविज्ञान विज्ञानाच्या वाटेवरचे आपलं लक्ष विचलित करतात. वास्तव प्रश्नांना सोपी उत्तरे देतात. चिकित्सेला हुलकावणी देतात. श्रद्धेची भीती घालीत, आपल्या अनुभवाचे सोपे आणि फसवे समर्थन करीत मळलेल्या वाटेवरचे भोळसट प्रवासी बनवतात. उडत्या तबकड्या, बर्म्युडा त्रिकोणात नष्ट होणारी विमाने आणि जहाजे, प्लँचेट वरून आपणाशी बोलणारे मृतात्मे, हे सर्व जर खरं ठरलं असतं, तर असं जग खूप गमतीशीर वाटतं असतं. या गमतीत जगाची भविष्यवाणी खरी ठरली असती तर आणखी मजा आली असती.
वरील उदाहरणातील भ्रामक विज्ञान हे विज्ञानाचे आणि त्याच्या पद्धतीचे विकृतीकरण आहे. भ्रामक विज्ञानातील अनुमानांना सबळ पुरावा नसतो किंवा पुरावा विरोधात केला तर त्याच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जाते. त्यातून भोळसटपणा दिसून येतो; पण केवळ भोळसटपणा एवढेच कारण पुरेसे वाटत नाही. तंबाखू सेवनाने तोंडाचा कॅन्सर होतो, हे माहीत असूनही लोक तंबाखू सोडत नाहीत. डॉक्टरनी दारूचे दुष्परिणाम सांगितले तरी काहींची दारू सुटत नाही. व्यसन ही एक प्रकारची झिंग किंवा भ्रष्टबुद्धी आहे. असाच काहीसा प्रकार छद्मविज्ञानाबाबतही घडतो. छद्मविज्ञान ही एक प्रकारची झिंग आहे. खोटे समाधान देणारी आणि हवीहवीशी वाटणारी ही झिंग कशामुळे येते? छद्मविज्ञानाचे एवढे आकर्षण आणि लोकप्रियता याचं काय कारण आहे?
प्रसारमाध्यमे विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील फरक समजून घेण्याची तसदी घेत नाहीत. छद्मविज्ञानाचे दावे त्यांनाही आकर्षित करतात. लोकांना चमत्कारिक गोष्टींचे अप्रुप वाटते. तशा घटना किंवा दावे छापण्यात प्रसारमाध्यमांचा हितसंबंध साधला जातो. त्यांचा खप वाढतो. तपासून घेतलेल्या प्रयोगसिद्ध गोष्टींकडे प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करून राहतात. छद्मविज्ञान लोकप्रिय होण्यास प्रसारमाध्यमे अप्रत्यक्षपणे हातभार लावतात. फसवा युक्तिवाद करण्यात छद्मविज्ञान खर्या विज्ञानावर बाजी मारते. याचं कारण वास्तवाबद्दलच्या मतभेदांना त्यात शिताफीने फाटा दिलेला असतो. ज्या युक्तिवादातून पुराव्याकडे जाणे अटळ असते, असे युक्तिवाद छद्मविज्ञानात केले जात नाहीत. सामान्य लोकांना छद्मविज्ञानाचे आकर्षण वाटते, त्यामागे हेही महत्त्वाचे कारण आहे. पण आणखी विविध कारणांमुळे छद्मविज्ञानाची लोकप्रियता वाढलेली असते.
छद्मविज्ञान हे लोकांच्या भावनेला हात घालते. विज्ञानात मात्र अशा भावनांना आवाहन केले जात नाही. विविध विश्वासप्रणालीपैकी कोणती आपल्याला मदत करू शकेल, याचा अनुभव घेताना तर्कबुद्धीतून आलेलं संशयाचं ओझं टाकून आपल्या निराशेला दूर करणारी अंतर्मनातील सुप्त इच्छा आपल्याला प्रभावित करते. यालाच इच्छा प्रभाव किंवा Wishful Thinking असं म्हणतात. आपल्या इच्छेला अनुसरून भावनेला आवाहन करण्याची छद्मविज्ञानाची चलाखी अधिक प्रभावी ठरते. आपल्यामध्ये ज्या शक्तीचा अभाव असतो आणि ज्या आपल्या बाबतीत घडाव्यात, असं प्रकर्षाने वाटत असतं त्या गोष्टी कुणाकडून तरी घडून येतील, असे त्याला वाटावे, अशा प्रकारचे अतिरंजित दावे छद्मविज्ञान लोकांपर्यंत पोचविते. कॉमिक पुस्तकातील हिरो किंवा पुराव्यातील विविध देवदेवता जसं हवं ते आपणास देतात, तसंच हे घडतं.
छद्मविज्ञान माणसाची अध्यात्मिक भूक भागविण्यासाठी देखावा करते, असाध्य आजार बरा करण्याची हमी देते आणि मृत्यू हा आपला शेवट नाही, असा आत्मविश्वास देते. छद्मविज्ञान आपले विश्वातील स्थान आणि महत्त्व यांना आश्वासक दिलासा देते. विश्वाशी आपली नाळ जोडली आहे, असे दयाळू आश्वासन आपणाला दिले जाते. काही वेळा ते जुना धर्म आणि नवविज्ञान दोघांकडूनही उसन्या कल्पनांचा आधार घेते; पण या कल्पना पूर्ण धार्मिक किंवा पूर्ण वैज्ञानिक नसतात. घोडा पण नाही, गाढव पण नाही, अशी त्यांची स्थिती असते.
धर्म आणि छद्मविज्ञान दोहोच्याही मूळ विचारात एकच मध्यवर्ती कल्पना आहे, ती म्हणजे इच्छाशक्ती असेल तर इप्सित साध्य होते. लोककथा, पुराणकथा आणि परिकथांत वर्णन केल्याप्रमाणे जर खरोखरच घडत असेल तर ते किती समाधान देणारं होईल? इच्छित साध्य होण्यासाठी ज्या चिकाटीची गरज असते, त्याच्याशी तुलना करता अशा भुरळ पाडणार्या कल्पनांची तुलनाच करता येणार नाही. जादूच्या कथेतील मंतरलेली अंगठी किंवा अल्लाउद्दिनचा दिवा आपल्याला हव्या त्या तीन गोष्टी मिळवून देतो. मात्र जास्त मागितल्या तर सगळ्या वस्तू गायब. छद्मविज्ञान हे अशा जादूच्या अंगठीप्रमाणे आहे. त्याची भुरळ पडणं म्हणजे सुप्त स्वप्नांची पूर्ती करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठरतो; पण अशी अंत:प्रेरणेतून आलेली भुरळ मनुष्यप्राण्यावर प्रभाव गाजविते, हे विदारक वास्तव आहे.
धर्मकल्पनांवरील विश्वासातून निर्माण झालेल्या छद्मविज्ञानाचे उत्तम उदाहरण म्हणजे बायबलप्रणित विश्वनिर्मितीची कल्पना. विश्वाची आणि जीवसृष्टीची उत्पत्ती आणि विकास कसा झाला, याबाबत सत्य विज्ञान पुराव्यासहित विश्वाची उत्क्रांती आणि प्राण्यांची उत्क्रांती याची माहिती आपणास देतं; पण हे पुरावे दुर्लक्षित करून बायबलप्रणीत विश्वनिर्मिती आणि जीवननिर्मिती हीच खरी. असं छद्मविज्ञान हे प्रगाढ विश्वासामुळे आलेल्या हटवादाचं उदाहरण आहे. खरं विज्ञान हे समजायला कठीण असू शकतं. तुम्हाला एखादे विज्ञानक्षेत्र पुरेसं परिचित नसेल, तर त्यातील काही संकल्पना व सिद्धांत तुम्हास आकलन होणं कठीण जातं. एखादा विशेषज्ञ तुम्हाला अशा विज्ञानावर आधारित काही स्पष्टीकरण देत असेल तर ते तुम्हाला समजत नाही.
मात्र छद्मविज्ञान संबंधित खर्या विज्ञानापेक्षा समजायला सोपं जातं. परिणामी डोकेफोड करीत बसण्यापेक्षा जे सहज समजतंय, त्या छद्मविज्ञानावर लोक विश्वास ठेवतात.
खरं विज्ञान हे काही लोकांना रूक्ष आणि कंटाळवाणं वाटतं. त्याऐवजी हवहवसं वाटणारं आणि भावना उत्तेजित करणारं छद्मविज्ञान अधिक प्रभाव टाकून जातं.
इजिप्तमधील पिरॅमिड बांंधण्यासाठी हजारो माणसं 20 वर्षे झटत होती, हे स्पष्टीकरण स्वीकारण्याऐवजी अवकाशातून आलेल्या परग्रहावरील अंतराळवीरांनी हे पिरॅमिड झटपट बांधले, हे ऐकायला मजा वाटते.
इंग्लंडमध्ये गव्हाच्या शेतात वर्तुळाकार पॅटर्नस् (क्रॉप सर्कल्स) दिसू लागले. ही वर्तुळे म्हणजे परग्रहवासियांनी पृथ्वीवासियांना निरोप पोचविण्यासाठीच्या खुणा होत, असं अनेक लोकांना वाटलं. गूढ घटनावादी यांनी त्याला दुजोराही दिला; पण असे पॅटर्न दोरी आणि इतर साधनांच्या मदतीने काही खोडकर मंडळी तयार करू शकतात. दोन्ही स्पष्टीकरणे तर्कदृष्ट्या तितकीच बरोबर वाटतात; पण पहिले स्पष्टीकरण अधिक लोकांना स्वीकारार्ह वाटतं.
खरं विज्ञान कळायला कठीण असतं. प्रयत्न करूनही ते कळत नसेल, तर लोकांना आपण मंदबुद्धीचे आहोत, असं वाटतं. पण छद्मविज्ञान कळायला सोपं असेल आणि ते विज्ञानच आहे, अशी समजूत असेल तर लोक असं छद्मविज्ञान लगेच स्वीकारतात आणि आपण किती हुशार आहोत, असा आव आणतात. हुशारी सिद्ध करण्याचा तो केविलवाणा प्रयत्न असतो.
छद्मवैज्ञानिक स्पष्टीकरण स्वीकारलेली मंडळी त्याविरोधी पुरावा मिळाला नाही, तर त्याला चिकटून राहतात. बर्याच वेळा विरोधी पुरावा लवकर मिळत नाही. परिणामी त्यांचा छद्मवैज्ञानिक विश्वास चालूच राहतो. सत्य शोधण्याची गरज त्याला वाटत नाही. अज्ञान जोपर्यंत उघड होत नाही, तोपर्यंत ते सत्यच असं मानणं, ही सहज प्रवृत्ती छद्मविज्ञानावरचा विश्वास अबाधित ठेवते.
राजकीय, कला आणि चित्रपट क्षेत्रातील काही बुजुर्ग मंडळी (सेलिब्रेटी) छद्मविज्ञानावर विश्वास ठेवतात. ही बडी मंडळी (अशा गोष्टीवर विश्वास ठेवणारी) त्यांच्या क्षेत्रात जाणकार असतीलही, पण इतर सर्व क्षेत्रातही ती जाणकार असतात, हे खरं नाही. मग ते ज्यावर विश्वास ठेवतात, त्यावर आपणही विश्वास ठेवणे बर्याच वेळा ते धोकादायकही ठरते. सेलिब्रेटीप्रमाणेच काही वैज्ञानिकसुद्धा छद्मविज्ञानाचे समर्थन करतात. ते करतात म्हणून आपणही ते करण्यात चूक नाही, असं मानणं चूक आहे. वैज्ञानिकही माणसंच आहेत आणि ती काही क्षेत्रात अज्ञानी असू शकतात.
एके काळी खरं समजलं जाणारं विज्ञान कालांतरानं असत्य ठरतं. तरीसुद्धा एके काळी ते खरं होतं म्हणून आताही खरं, असं काही मंडळी समजतात. पृथ्वी सपाट आहे, हे एके काळी खरं मानलं जात होतं. आता ती गोल असल्याचे पुरावे मिळालेत. तरीपण काही लोक पृथ्वी सपाट असल्याच्या सिद्धांताचा आग्रह धरतात आणि त्या सिद्धांताला उचलून धरणारे छद्मवैज्ञानिक पुरावे पुढं करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
आता एखादं विज्ञान खरं ठरत नसेल, तर भविष्यकाळात ते खरं ठरणारे पुरावे मिळू शकतात. तार्किकदृष्ट्या हे पटणारं वाटतं. म्हणून आपल्या प्रिय छद्मविज्ञानाचं समर्थन होत राहतं.
मार्केटिंगची भुरळ
तर्कदृष्ट्या विचार करण्यापेक्षा एखादी छद्मवैज्ञानिक वस्तू मार्केटमध्ये नफा मिळवून देते, याचं आकर्षण, तसंच पर्यायी उपचाराचं छद्मविज्ञान गिर्हाईक वाढविण्यास मदत करतं म्हणून त्यावरचा विश्वास वाढविण्याचा प्रयत्न यातून आपली भलावण होते.
लिंडमन–अर्निओचा सिद्धांत
पुरावे विरोधी जाऊनही लोक छद्मविज्ञानाला घट्ट चिकटून का बसतात, याचं मानसशास्त्रीय संशोधन एम. लिंडमन आणि के. अर्निओ यांनी केलं आहे.
लिंडमन आणि अर्निओ असा सिद्धांत मांडतात की, लहान मुलं विविध घटनांबद्दलच्या कार्यकारणभावाचा अपरिपक्व पद्धतीने विचार करतात. ते सावलीला राक्षस समजतात. त्यांचा अज्ञानमूलक कार्यकारणभाव आपण मोठेपणी तसाच ठेवला, तर त्यातून अंधविश्वास, अतिनैसर्गिक घटना आणि छद्मविज्ञान आपणाला खरं वाटू लागतं. त्या चुकांना किंवा गैरसमजुतींना लिंडमन-आर्निओ ‘वैचारिक गोंधळ’ मानतात.
मानसशास्त्रीय संशोधनानुसार लहान मुलांचे जगाच्या समजुतीबाबतचे तीन प्रमुख गट मानता येतील. या तीनही गटातील समजुतीमागे वैज्ञानिक दृष्टिकोनातून येणारा कार्यकारणभावाचा अभाव आणि अंत:प्रेरणांचा (खर्पीींळींळेप) प्रभाव असतो. हे तीन गट असे (1) अंत:प्रेरणेतून प्राप्त झालेलं भौतिक विज्ञान, (2) अंत:प्रेरणेतून स्वीकारलेले मानसविज्ञान आणि काही अपवाद वगळता याच प्रेरणेतून मिळालेलं जैवविज्ञान.
अल्लाउद्दिनचा दिवा मागेल ती वस्तू देतो, असं मुलांना वाटतं. याचा अर्थ असा की, दिव्याला मन आहे आणि त्याला मुलांनी मागितलेली गोष्ट मिळवून देण्याचा हेतू साध्य करण्याचं सामर्थ्य आहे. या उदाहरणात मन आणि भौतिक गोष्ट यांच्यात गोंधळ किंवा सरमिसळ झालेली दिसते. अंत:प्रेरणेतून येणारे मानसविज्ञान, भौतिकविज्ञान आणि जैवविज्ञान यांच्यात सरमिसळ करून मोठी माणसं गैरसमजुती, अतिनैसर्गिक घटना आणि छद्मविज्ञानाचा स्वीकार करतात. याची काही उदाहरणे पाहूया.
टेलिपथीमध्ये एका व्यक्तीचे मन दूर अंतरावरील दुसर्या व्यक्तीच्या शरीरावर आपटून काही क्रिया घडवते, अशी समजूत आहे. येथे मानसशास्त्र आणि जैवविज्ञान यांचा गोंधळ झालेला आहे. मनोगतिकीमध्ये (सायकोकायनेसिस) दूर अंतरावरची वस्तू मन:शक्तीने उचलली जाते, असा समज आहे. येथे मन आणि भौतिक वस्तू यांचा संबंध जोडणारा गोंधळ निर्माण होतो.
फेंगशुईमध्ये घरात विशिष्ट ठिकाणी ठेवलेली विशिष्ट वस्तू घरातील व्यक्तीमधील संबंधात बदल घडवून आणते, अशी छद्मवैज्ञानिक समजूत आहे. भौतिक वस्तू मानसिक परिणाम घडवते, अशी ही समजूत आहे. हिटलर वापरत असलेल्या स्वेटरचा परिणाम त्याला दुष्ट बनवित होता, असं त्याच्या क्रौर्याचं एक कारण सांगितलं जातं. स्वेटरमुळं मानसिक बदल म्हणजे भौतिक गोष्टीचा मानसिक परिणाम होय. तिखट मिरची माणसाला रागीट बनविते, ही गैरसमजूत अशाच सहज प्रेरणेतून येते. देवीचा आजार देवी कोपल्यामुळे होतो, ही गैरसमजूत मानसिक प्रक्रिया शरीरविज्ञानाशी जोडल्यामुळे निर्माण होते. छद्मविज्ञानात बल या कल्पनेबाबतही गोंधळ आढळतो. भौतिक वस्तूबाबत आपण ज्या बलाची कल्पना करतोे, तसलेच बल मानसिक आणि जैविक विज्ञानात गृहीत धरले जाते. लिंडमन यांच्या संशोधनाचा असा निष्कर्ष आहे की, या वैचारिक गोंधळामुळे (Ontological Confusions) गैरसमजुती, अतिनैसर्गिक घटना आणि छद्मविज्ञान निर्माण होते. मोठेपणी जपलेलं हे चुकीचं शैशव आहे.
आधुनिक विज्ञानाचा निष्कर्ष असा आहे की, विश्वातील किंवा निसर्गातील घटना या न-नैतिक स्वरुपाच्या असतात. त्यात भावनांना किंवा हेतूला स्थान नसते. सूर्य हा मानवासाठी अस्तित्वात नाही. चंद्र आपल्यासाठी चांदणं देत नाही. चांदणं पडतं. आपण त्याचा अनुभव घेतो. कॉलरा जंतूमुळं होता; कुणाच्या कोपामुळं नव्हे. तटस्थ निसर्ग, स्वयंचलित शरीरक्रिया यांचे नियम हेतूरहीत असतात; पण मानसिक घडामोडी, भौतिक घडामोडी आणि शारीरिक घडामोडी (आजार, दूषितीकरण) या परस्परावर-हेतुपूर्वक क्रिया-प्रतिक्रिया करतात, हा वैचारिक असमंजसपणा आहे. भौतिक ऊर्जा आणि भौतिक बल यांच्यासारखीच ऊर्जा आणि बल मानसक्षेत्रात कार्यरत असते. त्याला पुरावा नाही. फेंगशुई वस्तू विशिष्ट जैविक बल ओढून घेते आणि नंतर बाहेर पडून कुटुंबातील व्यक्तीच्या मनावर आणि शरीरावर धडका घेते, याला पुरावा नाही. म्हणून ते कल्पनारंजित आहे. ज्योतिषी असं मानतात की, ग्रहांना जैविक ऊर्जा असते, जी माणसांना कवेत घेते किंवा ढकलून लावते (pulles or pushes). सारांश, छद्मविज्ञानात जैविक आणि भौतिक क्रिया या हेतुविरहित राहत नाहीत. त्या विशिष्ट हेतू बाळगून कार्यरत राहतात. थोडक्यात, भौतिक आणि जैविक घटना भावविरहित आणि निर्हेतुक असतात. या आधुनिक विज्ञानाच्या निष्कर्षाशी छद्मवैज्ञानिक निष्कर्ष विरोधी जातात.
हा वैचारिक घोळ पर्यायी उपचारपद्धतीत आढळतो. केवळ स्पर्शातून हीलिंग पॉवर दिली जाते; म्हणजे स्पर्शाद्वारे बरी करणारी उपचारकामधील ऊर्जा किंवा विचार रोग्यात संक्रमित होतो, असा समज या उपचारपद्धतीत केला जातो. अशाच चुका होमिओपॅथी, रेकी, अॅक्युपंक्चर इत्यादीबाबत केल्या जातात.
अंत:प्रेरणावर चिकित्सक बुद्धीने मात करता येते. हीलिंग उर्जेबाबत किंवा हीलिंग विचार सामर्थ्याबाबत अंत:प्रेरणेला चुचकारले जाते; पण यातून निघणारे निष्कर्ष भौतिक आणि जैविक पद्धतीद्वारे मिळणार्या निष्कर्षाशी विसंगत असतात; पण जी मंडळी अंत:प्रेरणेच्या प्रभावाखाली असतात आणि ज्यांना भौतिक विज्ञान आणि जीवविज्ञानाचे आकलन नसते, ती मंडळी अंध:विश्वास, अतिनैसर्गिक घटना आणि छद्मविज्ञानाचे बळी ठरतात.
लिंडमन-अर्निओनी यासंदर्भात 250 लोकांच्या समजुती आणि विचारसरणी यावर संशोधन केले. त्यांनी या लोकांचे दोन गट केले. एक गट अंधविश्वासू; तर दुसरा चिकित्सक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा होता.
चिकित्सक गटातील लोकांपेक्षा अंधविश्वासू गटातील लोक मानसिक घटनांमुळे भौतिक व जैविक घटना मोठ्या प्रमाणावर घडतात, असं मानणारे निघाले. मन वस्तूंना स्पर्श करू शकते आणि दुष्ट विचाराचे प्रक्षेपण दुसर्या व्यक्तीच्या शरीरात बिघाड करू शकते. वाईट नजर मुलांना आजारी पाडते इत्यादी गैरसमजुती अंधश्रद्धाळू गट मानत होता.
अंधविश्वासू व्यक्ती मन:शक्तीचा परिणाम पाणी, फर्निचर, खडक आणि इतर भौतिक वस्तूंवर घडतो, असं चिकित्सक व्यक्तीपेक्षा मोठ्या प्रमाणात मानत होती. शिवाय अशा वस्तूंना इच्छा, ज्ञान किंवा आत्मा असतो, असं प्रत्यक्षपणे मानत होते.
वरील संशोधनातून विविध प्रकारचे अंध:विश्वास आणि छद्मविज्ञाने यांचा संबंध वैचारिक गोंधळ किंवा सरमिसळ आणि अंत:प्रेरणांना दिलेलं महत्त्व यांच्याशी असतो, हा निष्कर्ष निघतो. तिन्ही विचारसरणीची सरमिसळ आणि अंत:प्रवृत्तीला दिले जाणारे प्राधान्य हाच भेद दोन गटात आढळतो, असा निष्कर्ष निघाला.
छद्मविज्ञानावर विश्वास ठेवणार्या व्यक्ती त्याचं अंत:प्रेरणावरील अवलंबित्व लपवत नाहीत. उलट चिकित्सक विचारसरणीपेक्षा अंत:प्रवृत्तीला प्राधान्य देण्याबाबत ते अगदी स्पष्ट असतात. त्यांना अंत:प्रेरणा, जग समजून घेण्यासाठी इतर प्रेरणा इतक्याच महत्त्वाच्या वाटतात.
अंत:प्रेरणांच्या प्रभावाची काही उदाहरणे समजून घेता येतील.
(1) लोकांना आर्थिक स्थैर्य दिले तर त्यांची कार्यक्षमता वाढते. आपल्याला हे खरं वाटतं. ही अंत:प्रेरणा फसवी आहे. चिकित्सेतून सत्य उलट आहे हे कळते.
(2) नैसर्गिक पद्धतीने बाळ जन्माला येणे चांगले ही अंत:प्रेरणा धोकेदायक आहे. अनुभव आणि चिकित्सा वेगळेच निष्कर्ष काढतात.
तरीसुद्धा फायदा होणं दूरच; पण असा अंत:प्रेरणांचा उपयोग अनेकांना अनेकविध चुकीच्या समजुतीच्या विचारधारेकडे घेऊन जातो.
अंध:विश्वासू व्यक्तीचे जगाबद्दलचे ज्ञान चुकीचे असते, याचं कारण त्याच्या सुरुवातीच्या मानसिक, जैविक आणि भौतिक घटना याबाबतच्या अंत:प्रेरणा या मोठेपणीही अबाधित राहतात आणि त्या प्रेरणा, अनुभवजन्य विवेकी ज्ञानाबरोबर अस्तित्वात राहतात.
छद्मविज्ञानावरील विश्वास हा प्रतिकूल पुरावा मिळूनही अबाधित का राहतो, याचं हे सविस्तर स्पष्टीकरण आहे.