कलबुर्गींच्या खुनाच्या दुसर्याच दिवशी एक ई-मेल आला, तो भिकचंद लांडे या विद्यापीठीय युवकाचा होता. त्याला माझ्याकडून राष्ट्रपतींचा आणि मुख्यमंत्र्यांचा ई-मेल हवा होता. पंतप्रधानांचाही ई-मेल हवा होता. तो आणि त्याचे काही मित्र मिळून या सर्वांना एकसारखा ई-मेल पाठवणार होते. पुरोगामी विचारांची अजून किती माणसं आपण गमावणार आहोत,’ असा प्रश्न या सगळ्यांना त्यांना विचारायचा होता. शिवाय नुसतंच हळहळू नये, तर आता तरुणांनी पुढाकार घेऊन चळवळ उभारायला हवी,’ असंही भिकचंदनं ई-मेलमध्ये म्हटलं होतं. त्याच्या भावनांचं मला कौतुक वाटलं; पण नेमकं काय करायचं, चळवळ म्हणजे नेमकं काय वगैरे प्रश्न होतेच. दाभोलकरांचे कुटुंबीय पंतप्रधानांची भेट व्हावी यासाठी पाच-सहा महिने प्रयत्न करतायत. मुख्यमंत्र्यांनीही भेट घडवून आणण्याचं आश्वासन दिलं होतं; पण अद्याप भेट काही झालेली नाही, हेही वास्तव आहे.
कर्नाटकात अलीकडच्या काळात यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड आणि काही प्रमाणात शिवराम कारंथ यांच्या पुरोगामी विचारांची परंपरा आहे. धर्मसुधारणा, धर्मचिकित्सा आणि आंदोलनाचं काम त्यांनी आयुष्यभर केलं. त्यासाठीची किंमतही मोजली. कलबुर्गी यांच्या वाट्याला तर 40 वर्षांपासून ही गोष्ट आली होती. त्यांच्या दारात त्यांचीच प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली गेली होती. बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं होतं. एक-दोन नव्हे तर सोळा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध खटले चालवले जात आहेत. बहिष्काराचं अस्त्रही उगारलं गेलं. धमक्यांची तर गणतीच नाही. माझ्या मते समाज एक चूक करत होता आणि ती म्हणजे धर्मसुधारणा आणि धर्मचिकित्सेला तो धर्मद्रोह आणि राजद्रोह समजत होता. काहीजण त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करत होते. श्रद्धा-अंधश्रद्धा, विवेक आणि धर्मांधपणा, धर्म आणि कर्मकांड, धर्म आणि मूलतत्त्ववाद यांच्यातलं अंतर पुसट केलं जात होतं आणि आजही ती प्रक्रिया थांबलेली नाही; किंबहुना वाढतं आहे. माझा धर्म अधिक सुंदर, अधिक विवेकवादी, अधिक समाजाभिमुख, अधिक निखळ, श्रद्धाशील करण्याचा मला अधिकार आहे की नाही, हा एक प्रश्न त्यातून निर्माण होत असावा आणि या प्रश्नाला उत्तर देण्याइतपत सक्षम समाजमन आपल्याकडं तयार झालेलं नाही किंवा ते होऊ देण्याचा प्रयत्न कुणी करत नाही. माणूस नुसताच स्वतः विकास पावत नाही, तर आपण जन्माला घातलेल्या धर्म आणि संस्कृती यांचाही तो विकास करत असतो; अन्यथा या दोन्ही घटकांमध्ये अंतर पडत जातं,’ अशीच भूमिका कलबुर्गी मांडत होते. खरंच ती चुकीची होती काय? कार्यक्रम संपवून कलबुर्गी परतले. अनुवादासंबंधी त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली; पण माझ्या पुस्तकांच्या अनुवादाचं काम माझ्या मित्रमंडळींनी सुरू केलं होतं. या विषयावर कलबुर्गी यांच्याशी नंतर बोलण्याची आवश्यकता भासली नाही. आपल्यावर हल्ला होईल, हे कलबुर्गी यांना माहीत नसावं, असं नाही. कारण, त्यांना एकाच वेळी आत आणि बाहेर अनेक शत्रू तयार झाले होते. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी पहिली घोषणा केली होती ती राज्यभरातल्या सर्व धर्मस्थळांचा जीर्णोद्धार करून कोट्यवधी रुपये खर्च करण्याची. या योजनेचा एक भाग म्हणून कोट्यवधी बाटल्या भरून काशीतून गंगेचं तीर्थ आणण्यात आलं होतं. एका वजनदार अधिकार्यानं देऊ केलेलं तीर्थ कलबुर्गी यांनी नाकारलं होतं आणि राजसत्तेनं धर्मसत्तेत येऊ नये,’ असं सांगितलं होतं. काय काय घडत गेलं आणि शत्रूंची संख्या वाढत गेली. मित्रही होतेच; पण ते जणू काही अल्पमतात गेल्यासारखे होते. आता प्रश्न पडतो तो हा, की या घटनांनंतर आंदोलन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ? खुन्यांना पकडा’ हे तर रोज रोज ठासून सांगावंच लागेल; पण यालाच फक्त आंदोलन म्हणता येणार नाही. एक व्यापक समाजप्रबोधन हेच उत्तर ठरू शकतं आणि त्यासाठीची साधनसामग्री जुळवायला हवी. भिकचंद जे व्यक्त करणार आहे, त्या भावना असतील; पण दुसरं पाऊल आंदोलनाकडंच असायला हवं…
विवेकवादावरचा हा काही तसा पहिलाच हल्ला नव्हे. अशा हल्ल्यांची अनेक ठिकाणं मानवानं तयार केलेल्या नकाशात आढळून येतात. मात्र, विवेकवाद असा जखमी होत राहिला तरी, त्याचं रक्त भळभळत राहिलं तरी अंतिम विजय हा मानवतावादाचाच होत असतो, हेही आपल्याला याच नकाशात पाहायला मिळतं.