20 ऑगस्ट 2013 या दिवशी समाजासाठी करुणेनं ओतप्रोत भरलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर या विचारवंताची निर्घृण हत्या झाली. येत्या 20 ऑगस्टला या हत्येला चार वर्षे पूर्ण होतील. या हत्येच्या पाठोपाठ कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या विचारवंतांची त्याच पद्धतीने हत्या झाली. एकापाठोपाठ एक तीन विचारवंतांची हत्या होणे ही मानवी इतिहासातील निर्घृणतेची एकमात्र मालिका असावी. कशासाठी झाल्या असतील या हत्या?
इतिहास कालापासून मानवतेच्या कार्यासाठी अनेक थोर पुरुष प्रयत्न करीत आले आहेत. आपणास ज्ञात असलेल्या इतिहासानुसार विचाराच्या हक्कासाठी लढणारा पहिला महापुरुष म्हणजे सॉक्रेटिस. ‘तू माफी माग म्हणजे तुला मुक्त करतो,’ असे सॉक्रेटिसला सुचविले गेले होते. ‘पण माफी मागणे म्हणजे आपला विचार सोडून देणे होय. मी विचार मरू देणार नाही.’ यासाठी सॉक्रेटिसने विषाचा प्याला आनंदाने स्वीकारला. विचारासाठी प्राणार्पण करणार्या सॉक्रेटिसप्रमाणेच मार्टिन ल्युथर किंग, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, संत तुकाराम आदी महापुरुषांनी विचाराच्या स्वातंत्र्यासाठी मरण पत्करले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांनीसुद्धा विचारस्वातंत्र्यासाठी मरण पत्करले. पण त्यांचे मरण वाया जाऊ द्यायचे नसेल, तर विचारवंतांची हत्या करणार्या सनातनी धर्मांधांना शिक्षा व्हायलाच हवी. व्यथित यासाठी व्हावेसे वाटते की, मारेकर्यांना शोधून त्यांना शिक्षा व्हावी, यासाठी सत्ताधारी राज्यकर्ते सजग आणि प्रयत्नशील दिसत नाहीत. म्हणून महाराष्ट्र अंनिसला ‘जवाब दो’ आंदोलन छेडावे लागत आहे.
भारत देशाने लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे. लोकशाहीत वैचारिक स्वातंत्र्याला मोठं मूल्य आहे. विरोधी विचार मांडून लोकहितार्थ त्यासंदर्भात पुरेशी चिकित्सा व्हावी आणि चुकीच्या रुढींचे, प्रथांचे समर्थन करणार्यांचे बिंग बाहेर पडावे, यासाठी लोकशाहीत विचारस्वातंत्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका काळात योग्य असलेले रीतिरिवाज हे पुढील काळात टाकाऊ ठरतात. एकेकाळच्या श्रद्धा पुढे अंधश्रद्धा ठरतात. सतीची चाल ही एकेकाळी धर्मश्रद्धा होती; पण आज ती अंधश्रद्धा ठरते. याबाबतचा चिकित्सक विचार हा समाजाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आवश्यक ठरतो. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी धर्माच्या नावाखाली चालत असलेल्या चुकीच्या समजुती, कर्मकांडे आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात विचार मांडत होते. धर्म हा समाजाला नीतीकडे घेऊन जाणारा असावा, असा त्यांचा आग्रह होता. या अर्थाने ते खरे धार्मिक होत; पण धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण करणार्या सनातन्यांना हे कसे रुचेल? म्हणून त्यांनी योजनाबद्धपणे या तिघांचा बळी घेतला. या तिघांच्या मारेकर्यांना व त्या पाठीमागे असणार्या धर्मांध शक्तीला लगाम घालणे, हे सत्ताधार्यांचे प्रथम कर्तव्य आहे; पण चार वर्षांचा काळ लोटला, तरी या तिघा विचारवंतांच्या मारेकर्यांना पकडण्यात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला यश आलेले नाही. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने शोधाचे कौशल्य वाढलेले असताना मारेकरी सापडू नयेत, याचा अर्थ काय? मारेकरी व त्यामागचा ब्रेन यांना अप्रत्यक्षरित्या अभय मिळते आहे की काय? सरकारला हिंसा करणार्यांचे संरक्षण अभिप्रेत आहे की काय? जातीच्या, धर्माच्या नावाखाली शोषण करणार्या प्रवृत्तीला अभय देऊन सुधारकांना तुम्ही गप्प बसा! असा इशारा सरकारला द्यावयाचा आहे काय? आम्ही सत्ताधार्यांना असा इशारा देतो की, तुम्हाला तसे वाटत असेल, तर आम्ही प्राणपणाने या प्रवृत्तीविरोधात संघर्ष तीव्र करू. लोकमानस जागे करून लोकशाहीच्या मार्गाने दाभोलकरांच्या मारेकर्यांना व त्यामागील शक्तींना शासन होण्यासाठी तुम्हाला भाग पाडू, याचसाठी सुरू होत आहे ‘जवाब दो!’ आंदोलन.