Categories
परिषद

जातपंचायत कायदा मागणी परिषद पुणे येथे संपन्न

मे - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जातपंचायत मूठमाती अभियानांतर्गत पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रस्तरीय जातपंचायतविरोधी कायदा मागणी परिषद, श्रमिक भवन पुणे येथे दि. 20 मार्च 2016 रोजी संपन्न झाली.

परिषदेमध्ये सुरुवातीला रामनाथ चव्हाण यांच्या कथेवर आधरित तोलन नावाचा लघुपट दाखवण्यात आला. भटक्या समाजातील जातपंचायतीकडून अन्याय्य रूढी परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे शोषण या लघुपटात चित्रीत करण्यात आलेले होते.

प्रथम सत्राच्या सुरुवातीला कृष्णा चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दूरदृष्टीतून तीन वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या जातपंचायतीला मूठमाती या अभियानाचा, त्याअंतर्गत दिलेल्या लढ्याचा आणि त्या अंतर्गत पार पडलेल्या नाशिक, जळगाव, लातूर व महाड या चार परिषदांचा आढावा घेतला. जातपंचायतीकडून पीडित असलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेले कायदे कसे अपुरे आहेत, हे त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या चळवळीच्या अनुभवाच्या आधारे स्पष्ट केले व स्वतंत्र कायद्याची गरज विषद केली.

विशेष निमंत्रित व्यक्तींपैकी, कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या की, श्रमिक व स्त्रियांचे लढे लढत असताना त्यांना विभाजनवादी शक्तींपासून दूर नेण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. कायदा व न्यायासाठी उठलेल्या प्रत्येक आवाजाला आमच्या संघटनेचा पाठिंबा असल्याचे सांगून त्यांनी जातपंचायतीच्या मनमानीविरोधातील लढ्यात अंनिस सोबत असल्याचे सांगितले. आपल्या मनोगतात डॉ. बाबा आढाव म्हणाले, हा कायदा केवळ भटक्या-विमुक्तांसाठीचा नसून तो सर्वांसाठीचा कायदा आहे. वर्णीय, वर्गीयच नव्हे, तर सर्वंकष परिवर्तनाचा आपला नारा असला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता, राज्यघटनेप्रमाणे समाजनिर्मिती हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासाठी मी व माझी संघटना आपल्याबरोबर आहोत, असे आश्वासन त्यांनी दिले.

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी जातपंचायतविरोधी परिषदेसंदर्भातील महाराष्ट्र अंनिसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, जातपंचायतीविरुद्ध प्रत्यक्ष लढा देणारी म. अंनिस ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील पहिली चळवळ आहे. परंपरावादी समाजव्यवस्थेला कालसुसंगत पर्याय देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. एकीकडे, जातिव्यवस्थेला आव्हान देत जातपंचायतविरोधी अभियान आपल्याला सुरू ठेवायचे आहे. जातीअंतर्गत शोषणाला विरोध करताना पुरोगामी चळवळीतील काहीजण संभ्रमित अवस्थेत आहेत. पुरोगामी चळवळींमध्ये अधिक सुसंवाद असणे गरजेचे आहे. संविधान परिवार म्हणून आपण एकत्र यायला हवे. तरुणाईमधील आशादायक वातावरण ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे. ही चळवळ सर्वंकष परिवर्तनाच्या लढ्याचा एक भाग असल्याचे डॉ. आढाव यांचे मत मान्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. ठकसेन गोराणे यांनी प्रथम सत्राचे सूत्रसंचालन केले, तर पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे यांनी आभार मानले.

द्वितीय सत्र : या सत्रामध्ये बाधित व्यक्ती, जातपंचायत मूठमाती अभियानातील अंनिस कार्यकर्ते व विशेष आमंत्रित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. प्रशांत पोतदार यांनी सदर सत्राचे सूत्रसंचालन केले.

पीडित व्यक्तींचे मनोगत :

काका धर्मावत : ब्राह्मणेतर समाजातच जातपंचायती चालतात, असा गैरसमज पसरलेला आहे. मी स्वतः ब्राह्मण जातीत जन्मलो असून, माझ्या बहिणीने मराठा समाजातील मुलाशी लग्न केल्याने आम्हाला जातपंचायतीचा फटका बसलेला आहे. त्याविरोधात मी हायकोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे. भुसभुशीत पार्श्वभूमीवर न्याय मिळणे अशक्य असल्याने हा कायदा होणे गरजेचे आहे.

कोमल वर्दे : काशीकापडी समाजामध्ये विधवा स्त्रीला पाळाव्या लागणार्‍या प्रथा परंपरांच्याविरुद्ध मी माझ्या वडिलांच्या निधनानंतर आवाज उठवला. पंचांनी माझ्या आईला वाळीत टाकण्याची धमकी देऊन मुलगी किंवा समाज यांच्यातील एकाची निवड करायला सांगितले. अंनिसच्या माध्यमातून बहिष्कृत करण्याच्या विरोधातील लढ्याला जोडून घेता आल्याचे त्यांनी सांगितले.

शिवाजी डावळक : कोल्हाटी, डोंबारी समाजातील डावळकर याने समाजातील प्रथा-परंपरांना विरोध केल्याने त्यांना समाजबहिष्कृत करण्यात आले. वडिलांच्या मयताला कोणी सहाय्य करत नसल्याने पुण्यामध्ये शव आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंनिसच्या सहकार्याने जातपंचायतीच्या मनमानीविरोधात चळवळ सुरू केल्यानंतर पंचांनी जातपंचायत बरखास्त करत असल्याची घोषणा करून लेखी पत्र दिले; परंतु त्यांचे कार्य सुरूच राहिले आणि माझ्यावर अघोषित बहिष्कार टाकण्यात आला. इतर बहिष्कृत व्यक्तीदेखील समाजाच्या भीतीने लढ्याला साथ न देता विरोधीच वागतात, याचे दुःख होते. म्हणून उघड आणि छुप्या जातपंचायतीवर प्रतिबंध येणे गरजेचे आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अविनाश शिंदे यांनी त्यांच्या व त्यांच्या आईच्या वतीने मनोगत व्यक्त केले. त्यांच्या आईवर नवर्‍याच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आलेला होता. त्यातून न्यायालयात तिची निर्दोष सुटका झाली. परंतु जात पंचायतीने तिने खून केलेला आहे की नाही, हे ठरविण्यासाठी तिला रानात नेऊन ओले वस्त्र नेसून तांदूळ खाऊन ते थुंकण्यास फर्मावले. थुंकलेले तांदूळ कोरडे निघाल्याने तिला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आले. मुले लग्नाच्या वयाची झाल्यावर त्यांना सांगण्यात आले की, आईला सोडा किंवा आई हवी असेल, तर 15 लाख रुपये दंड भरा, तरच जातीत लग्नाची मुलगी मिळेल. पोलीस गुन्ह्याची नोंद करण्यास टाळाटाळ करत होते. कृष्णा चांदगुडे व रंजना गवांदे या अंनिस कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर पंचांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. जातपंचायतीच्या मनमानीविरुद्ध स्वतंत्र कायदा होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

5) छाया तामचीकर : नंदुरबार जिल्ह्यातील छायाच्या पतीच्या निधनानंतर तिच्यावर विवाहबाह्य संबंध ठेवण्यचे आरोप करून निवाडा करण्यासाठी पंचायत बोलावण्यात आली. तिला बोलण्याची संधीही न देता तिला निवाड्याचे अग्निदिव्य पार पाडायला सांगण्यात आले. या अग्निदिव्यानुसार तिच्या अकरा वर्षांच्या मुलाने हातावर तप्त कुर्‍हाड घेऊन त्याला भाजल्यास तिला दोषी समजण्यात येणार होते. पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी प्रचंड हेलपाटे घालायला लावले, विधिमंडळातही हा प्रश्न चर्चिला गेला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पद्मानंद हेवाळकर यांनी गावकीकडून वाळीत टाकण्याचे अनुभव मांडले. गोबरसरी बांधकामाचे कंत्राट सरपंचाला दिले नाही म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आले. खूप नाडणूक करण्यात आली.

-देविदास इंगळे