Categories
कथा

डागंवरचं भूत

वार्षिकांक - २०१५

कोंबड्यानं पहाटे पहाटे पाच वाजता बांग द्यायला सुरवात केली, तसं शेतकर्‍याच्या कष्टाच्या दिवसाला सुरवात झाली. दूध दुभत्या गायी-म्हशीला, औताच्या रेडे, बैलांना गवत घालणे, गायी-म्हशीची धार काढणे, धार काढून झाल्यावर वासरांना दूध पाजायला सोडणे, शेण काढणे, दूध डेअरीमध्ये पोच करणे. अशा कामाला सुरुवात होते. नारायण पाडवे हा शेतकरी अजून काही अंथरूणातून उठला नव्हता. आदल्या दिवशी चांगलं दिवस मावळेपर्यंत कापणी केल्यामुळे त्याचं अंग चांगलंच मोडून गेलं होतं. आता झोप पूर्ण होईपर्यंत उठायचे नाही असं ठरवून त्यानं सकाळच्या सर्व कामांना दांडी दिली होती. नवरा काल रात्री भातकापणीच्या कुलीला जाऊन थकून आलेला आहे. झोपू दे बापडा. म्हणून त्याच्या बायकोने त्याला उठवले नाही. मात्र त्या माऊली बापडीनं सकाळची सगळी कामे उरकून काही वेळाने गरम पाण्याचा तांब्या घेऊनच आपल्या दादल्याच्या अंथरूणाजवळ आली आणि म्हणाली, ‘अहो…उठा दिवसाची किरणं आता अंथरूणात आली. मला लवकर भाकरीला बसायचं आहे. डागंवरच्या शेतात जाऊन चार्‍याची पेंडी आणा जावा…. ‘भातकापणी, भाराबांधणी, खळ्यावर व्हळी रचणे या अंगावरच्या कामात अंगाचा खुर्दा झालेल्या नारायणानं आपल्या तोंडावरची वाकाळ बाजूला सारली, तोच सूर्याच्या कोवळ्या किरणांनं त्याचं डोळं धुण्याचंच काम केलं. तसं नारायण डोळं आपल्या कोरड्या हातानं चोळत अंथरूणातून बाजूला झाला. त्याच्या बायकोनं दिलेला गरम पाण्याचा तांब्या हातात घेऊन त्यानं तोंड धुतलं. खुंटीवरच्या टॉवेलनं तोंड पुसत त्यानं चहाचा पहिला कप बटर बुडवून खाऊन संपविला. नंतर पुन्हा एक कप चहा पिऊन त्यानं ढेकर देऊन समाधान व्यक्त केलं. आदल्या दिवशी धार चोळून ठेवलेला विळा आणि दोरी घेऊन तो उठला… जाता-जाता आपल्या बायकोला म्हणाला, ‘अगं… ऐकलंस का…? आज डागंवरच्या शेतातून दोन भार्‍याची जनावरांच्या गवताची मी बेजमी करतो. दुपारी विश्रांती घेऊन रात्री डागंवरच्या शेतात भाताच्या मळणीला मी जाणार हाय….? असं म्हणून नारायण आपल्या गावाच्या बाहेर तालुक्याला जाणार्‍या रस्त्यावर असणार्‍या डागंवरच्या शेताकडे निघाला.

आता नारायण आपल्या शेणगाव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असणार्‍या डागंच्या शेतात आला. उंच टेकडी फोडून एस.टी.सारख्या मोठ्या वाहनांना जाण्यासाठी रस्ता केला होता. त्या रस्त्याच्या आजूबाजूला शिवाराला डागंवरचं शेत असं म्हणतात. मृग नक्षत्राच्या अगोदर केलेल्या धूळवाफा भाताच्या पेरणीमुळे नारायण पाडवेचं पहिलं भात कापून मळून झालं होतं. त्यानं पाच मणाच्या भाताचं होईल इतकं पिंजार रस्त्याकडेच्या बांधावर रचून ठेवलं होतं. नारायण पाडवेच्या शेताच्या चोहीबाजूला भरगच्च भाताच्या लोंब्याचं पीक आनंदानं वार्‍यावर डोलत नांदत होतं. वेळंवर शेतकर्‍याची पेरणी, मशागत आणि पाऊसमान यामुळे भाताचं पीक, स्तनपानानं तृप्त होऊन आईच्या कुशीत आनंदानं खिदळणार्‍या मुलागत वार्‍यावर हिंदकळत होतं. डागंवरचं शिवार मोत्याच्या दाण्यानं फुलून आलं होतं. तिथं कुण्या वन्य प्राण्याचा त्रास नाही की, चोरांची भीती नाही. आता ऐन सुगीत अलगद हातानं शिवारातील दाणं घरातील कणगीला नेऊन लावलं म्हंजे पार पडलो. असं शेतकर्‍यांना वाटत होतं.

नारायणानं भाताची व्हळी रचलेल्या रस्त्याकडेच्या गवताचा उभा बोध कापायला सुरुवात केली. दोन पेंडी गवत कापून झाले असेल इतक्यात त्याच्या पाठीमागे भाताच्या पिंजराच्या व्हळीत काही तरी सरकल्याचा आवाज आला. त्यानं पाठीमागं पाहिलं. काहीतरी किडा असेल. असं समजून पुन्हा नारायण गवत कापू लागला. पुन्हा पहिल्यापेक्षा पिंजराच्या काड्या वाजल्याचा आवाज आला आणि पिंजराची व्हळी थोडी हलली. तसं नारायणाची खात्री झाली काहीतरी या व्हळीत आहे. त्याला पुन्हा व्हळीकडे पाठ फिरवून गवत कापण्याचं धाडस होईना. तो तसाच हातात विळा घेऊन रस्त्यावर आला. त्याचवेळी शेणगावकडे चालत येणार्‍या एका पाहुण्या माणसानं नारायणला विचारलं, ‘काय हो…., काय पाह्यलासा? काय हाय व्हळीत…?’ ‘मामा तेच बघतोय मी… कशानं हालली व्हळी. माहीत नाही.’ नारायण आपली नजर आणखी वाढवत म्हणाला. त्या दोघांचा बारकाईनं पाहण्याच्या हालचाली लांबून बघणार्‍या शेतकरी सदा सुपडेनं आवाज दिला, ‘अरे ये नारबा गवत कापायचं सोडून काय करतोस….? काय बघालाय?’ त्याच्या हाकेला काहीच उत्तर न देता नारायण पाडवे आणि गावाकडे चाललेला परगावचा पाहुणामामा व्हळी अधिकच वाकून बारकाईनं पाहू लागले…. काहीतरी तिथे आहे. या उत्सुकतेतून सदा सुपडे शेतकरी आपला विळा घेऊन तिथे आला. सर्वांच्या नजरा पिंजराची छोटी व्हळी का हलत आहे? गावाकडे चाललेला पाहुणा मामा म्हणाला, ‘अरं बाबांनो एखादं जनावर या व्हळीत घुसून बसलंय वाटतं….’ ‘व्हय पाव्हणं पण बाहेर तर पडंल की, नाही…?’ नारायण पाडवे म्हणाला….., ‘ते काय नाही; मी पिंजराची व्हळी यांग मारून मळणीचं पिंजार कसं विसकटतात, तसं या माझ्या मोठ्या विळ्यानं नारायणा तुझी पिंजराची व्हळीच विसकटतो.’ सदा सुपडे आपला रांगडापणा दाखवत, म्हणाला. ‘अरं पण त्यात मुकं जनावर असंल तर, त्याला लागंल तर…?’ नारायण पाडवे शंका व्यक्त करत म्हणाला… ‘अरं…. रान डुक्कर असेल तर त्याला मारूनच खायाचं असतंय नव्हं….?’ सदा सुपडेच्या या घाईगर्दी बोलण्यानं त्याच्या गावाकडे चाललेला पाहुणा म्हणाला, ‘…. तसं या व्हळीत रानटी डुक्कर असेल तर माझा तुमच्या गावाला येण्याचा फायदाच झाला….’ असं म्हणत हसू लागला…. आता सदा सुपडे रस्त्यावरून एका झटक्यात हनुमान उडी घेऊन पिंजराच्या व्हळीवर पडणार आणि आपल्या रांगड्या ताकदीनं पिंजराच्या गवताचा विस्कोट करणार इतक्यात ती पिंजराची व्हळी जोराने हलू लागली. आणि त्यातून एक माणूस बाहेर पडला…. ‘अरं ह्यो कोण…? कालच्या रातीला या व्हळीत झोपलाय.’ पाहुणे मामा म्हणाला. ‘अरं…. मी हाय मी हाय…’ सर्व केस विस्कटलेले, डोळे लाल झालेले. कपड्यांना लाल मातीची राड लागलेला एक तरुण माणूस आवाज देत बाहेर पडला.’ अरे… यात पडलातास की, यात घुसून झोपलातास…..?’ सदा सुपडे त्याची झडती घेतल्यासारखा बोलायला लागला. ‘मला वाचवा…. मला वाचवा….’ तो तरूण मदत मागू लागला. ‘तुला वाचवायला बेट्या कुणी धरलंय?’ नारायण पाडवे म्हणाला. ‘मला रात्री इथं भुतानं धरलंत…. आणि या पिंजराच्या व्हळीत कोंबलतं. ‘मी… मी…. राऊताचा गण्या’ असं म्हणून राऊताचा गण्या, ‘इथं भूत हाय रं, भूत हाय…’ म्हणत रडू लागला. ‘अरं रं… याला लवकर मांत्रिक, देवर्षाकडे न्यायला पाहिजे. नाहीतर वेळ आला तर याला मसणवटीकडे न्यायला लागेल.’ गावाकडे येणारे पाहुणेमामा बोलू लागले. ‘पाहुणं ती वेळ आल्यावर बघूया आदी याची जिवंत तिरडी उचलून याला गावी नेऊ या. धरा याला उचलून नेऊया…’ असं म्हणून सदा सुपडे आणि नारायण पाडवे यांनी गण्या राऊताला डागंवरच्या शेतातून आपल्या गावात आणलं.

गण्या राऊताला शेणगावात आणून त्याच्या घरी सोडेपर्यंत लोकांनी विचारलेल्या चौकशीला…. राऊताच्या गण्याला डागंवरचं भूत लागलं… हेच सर्वांना सांगत जावे लागले. गावात येताच त्या पाहुणेमामानं गण्या राऊताला सोडलं आणि आपल्या पाहुण्यांकडे जायाला निघाला. तोच गावातील स्टँडवरचा शिरपा न्हावी गिर्‍हाईकाची अर्धी दाढी दुकानात सोडून त्या पाहुण्यांना विचारू लागला, ‘पाहुणं हे राऊताच्या गण्याचं बोचकं कुठून उचलून आणला….?’ ‘तुमच्या डागंवरच्या शेतातून….. त्याला म्हणं रात्री भूत लागलंय. रात्रभर फिरवून कोंबलतं त्याला पिंजराच्या व्हळीत….’ पाहुणेमामा सांगू लागला. ‘काय….? गण्याला पिंजराच्या व्हळीत भूतानं कोंबलतं….? मग हा कसा काय जगला…?’ मध्येच शिरपा न्हावी घुसून बोला… ‘ते आता त्याच्या घरी जाऊन विचारा हां…’ असं म्हणून तो पाहुणेमामा आपल्या पाहुण्यांच्या घरी निघून गेला. शिरपा न्हावी विचाराच्या तंद्रीत पुन्हा गिर्‍हाईकाची दाढी करू लागला. त्याच्या दुकानातील गिर्‍हाईकांना बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी गण्या राऊताला डागंवरचं भूत लागलं. हा जणू विषयच मिळाला.

इकडे राऊताच्या गण्याला नारायण पाडवे आणि सदा सुपडे यांनी त्याच्या घरी आई-वडील आणि बायकोच्या हवाली केलं. आपल्या एकुलत्या एक पोराला रात्री डागंवरच्या भुतानं फिरवलं व पिंजराच्या व्होळीत कोंबलं… त्यातून सुद्धा पोरगं वाचलं म्हणून गण्याच्या आईनं आई यल्लाम्मादेवीचं आभार मानले. गण्याच्या बायकोनं नेहमीप्रमाणे विविध प्रश्नांचं बाण आपल्या नवर्‍यावर न सोडता त्याची मध घरात त्याला अंथरूण घालून सेवा करायला सुरवात केली. गण्याचा बाप माळकरी आतील सोप्यातून बाहेर आला. ‘विठ्ठल… विठ्ठल…’ असे विठ्ठलाचे नामस्मरण करू लागला. त्यानं आपल्या एकुलत्या एका पोराला उचलून घरी आणणार्‍या नारायण पाडवे व सदा सुपडे यांचं आभार मानलं नाही; उलट त्यांनाच बोलू लागला ‘बघा रे… काहीतरी करा… अरे माझी पंढरपूरची वारी फळाला आली. म्हणून माझं पोरगं वाचलं. काल अमावास्या होती. हडळीच्या फेरीत आमचा गण्या सापडला होता….’

‘सापडला ना…. राऊतमामा… मग झाकून ठेवा त्याला चांगला. च्यामारी आम्ही आमची गवत पाणी कामं सोडून तुमच्या लेकाला उचलून आणला. त्याबद्दल त्याचं नाही आभार मानणं, बसा म्हणणं किंवा चहापाणी, माणुसकी हे काही नाही. म्हणत्यात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंचं खरं…. चलं रं नारायण. आम्ही पण कुणाला कृतज्ञेची भाषा शिकवतोय….? बसा तुम्ही देवाचेच आभार मानत.’ असं रागानं बोलून सदा सुपडे, नारायण पाडवेला घेऊन निघून गेला. त्याच्याकडे गण्याचा बाप आ करून पाहतच राहिला.

रात्रीच्या गर्भात वाढ झाल्यानंतर सोनेरी पावलांनी सर्व निसर्गसृष्टीला मोहवून टाकणार्‍या दिवसाची सुरुवात होत होती. त्या उष:काल करणार्‍या सूर्यनारायणाला सर्व शिवारातील पिके यावर्षी समाधानाचं हसू आपल्या कणसाच्या माना डोलावून जणू अभिवादन करीत होती. शेतकर्‍याची… कष्टकर्‍याची श्रमदानाची पुण्याई फळाला येणार होती. पुढील वर्षभराची पोटगी मिळून शेतीमाल विकून त्यांच्या जीवनात बदल घडणार होता. नाहीतर दररोजच्या रोजी रोटीतून हातावरती फक्त कुटुंबाचं पोटच पोसलं जात होतं. यावर्षीच्या मेघराजानं सर्व सर्व भूमीमातेवर पाऊस पाण्याची माया केली होती. काळं रान, माळ रान, मशार रान, तांबडं रान, खडका ळरान सर्व रानावर त्यांच्या गरजेनुसार पाऊस पडला होता. म्हणूनच यावर्षी गावातील कुणाचं तरी घर सुधारणार व्हतं…., कुणाची सावकाराची कर्जे, बँकेची थकबाकी भागणार होती…. कुणाच्या मुलीचे, मुलाचे लग्न होणार होते. म्हणूनच सर्व शिवार आणि शेतकरी यांची खुशी जुळून आली होती.

पण नुकताच राऊताच्या गण्याला शेणगावच्या डागंवरच्या शेतात, रस्त्यामध्ये कुण्या भुतानं धरल्यामुळे तिथल्या सर्व शिवारावर नुकसानीचं काळं ढग उभ राहिलं होतं. दिवसाच्या भातकापणीला लोक शेतात कामाला येत होते. पण तशी मळणीला कुणीबी येईना, सर्व शिवार भात पीक कापून मोकळं झालं होतं. पण भाताच्या मोठ्याच्या मोठ्या व्हळ्या… बणव्या तशाच खळ्यात अडकून पडल्या होत्या. मळून दिल्यावर दळून कुणीबी खाऊ शकत होतं. पण आता वेळेवर मळूनच दाणे काढले नाहीत तर दळून खायाला सुद्धा मिळणार नाहीत. शिवाय भाताच्या दाण्याचा दर्जा चांगला राहण्यासाठी वेळेवर मळणी करणे गरजेचे होते. डागंवरच्या भूताचं… शेतकरी, गावकरी यांच्याबरोबर रस्त्याने जाणार्‍या वाटेकरी यांनीसुुद्धा धसका घेतला होता. रात्र पडायला लोकांच्या घराची दारं बंद होत होती. डागंवरच्या शिवारात भाताचं पीक निघून आता भात मळणीच्या व्हळीचं शिवार दिसत होत्या.

अशाप्रकारे शेणगावाच्या डागंवरच्या भूताच्या कचाट्यात सारं गाव सापडलं होतं. गण्या राऊताला डागंवरच्या भुताने झपाटल्यामुळे डागंवरच्या रस्त्याने जाणार्‍या माणसांना सर्व गावकर्‍यांना डागंवरच्या भुताच्या भीतीची लागण झाली होती. गावच्या स्टँडवरच्या शिरपासारखी माणसं चांगलं तिखट-मीठ लावून ज्याला त्याला सांगत होती. गण्या राऊताला बघायला येणार्‍या मंडळींना त्याच्या घरातून डागंवरच्या भुताच्या भीतीचं चांगलंच रतीब मिळत होतं. गण्या राऊतावर देवर्षी, मांत्रिक यांचा उपचार चालूच होता. थोडक्यात गण्या राऊत गावाच्या चर्चेच्या विषयातील सहानुभूतीचा हिरो झाला होता. आज सकाळी वेळ अकरा वाजले होते. शेणपाणी, चारापाणी करून गावकरी आपल्या घरात जेवणखाण्यात मग्न झाले होते. शेणगावचे पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे तालुक्याच्या गावाहून त्यांच्या गावात आले. त्यांच्या बुलेट फटफटी गाडीचा आवाज म्हणजे शेणगावामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेची सूचना करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या लाल दिव्याच्या सायरन गाडीचा आवाजात होता. त्यांच्या बुलेट गाडीच्या आवाजानं शेणगावचं गढूळ वातावरण चांगल्या स्थितीमध्ये अगदी निवळून जायाचं…. पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे हे तसे वांड, क्रोधिष्ट स्वरूपाचे व्यक्तिमत्त्व नव्हते. शांतपणा, नम्रपणा आणि क्वचित प्रसंगी दमबाजीपणा अशी त्यांची शेणगावाबरोबर व्यवहारकौशल्यता होती. तालुक्यातून येतानाच त्यांच्या बुलेट गाडीने डिझेल इंजिनचा टँक फुल्ल केला होता. म्हणून त्यांची गाडी रेसमध्ये नॉनकंप्लेड पळत होती. शेणगावात येण्यापूर्वी गावाबाहेरच्या रस्त्यालगत नारायण पाडवेच्या घरासमोर पोलीस पाटलांची बुलेट गाडी थांबली. त्यांनी त्या गाडीच्या धुडाला स्टँडचा खुटा लावून गाडी उभी केली. गाडीची चावी हातात घेतच त्यांनी आवाज दिला…

…..‘नारायण… अरे…. नारायण…’ पोलीस पाटलांचा आवाज ऐकून नारायण पाडवेची पत्नी रखमा बाहेर आली. ‘या.. या… पाटीलसाहेब…’ रखमानं पाटीलसाहेबांचे स्वागत केलं. ‘अहो… वहिनी नारायण कुठं आहे…? पाटीलसाहेब इकडेतिकडे पाहत बोलू लागले. ‘हाईत आत घरात. तुम्ही घरात तरी या…’ रखमा म्हणाली आणि घरात गेली. पोलीस पाटील हंबीरराव देसाई नारायण पाडवेच्या घरात गेले. पाहतात तर काय नारायण पाडवे आणि सदा सुपडे हे दोघं शेतकरी शांतपणाने बसले आहेत. ‘पाटीलसाहेब बसा… ही घ्या खुर्ची…’ नारायण पाडवे पाटलांसाठी खुर्ची पुढे करत म्हणाला… ‘असू दे, असू दे अरे मी इथं कॉटवर बसतो. तुम्ही बसा रे खुर्चीवर बाबांनो… अरे, सदा सुपडे…. लवकर बाबा नारायणाकडे आलास….? काय काम काढल्यात्यसा…?’ पोलीस पाटलांच्या या उत्तरावर ते दोघे गप्पच बसले. पोलीस पाटील हंबीरराव देवार्डेसुद्धा त्या दोघांची स्थिती पाहतच राहिले. ते सुद्धा विचारात गुंग झाले. तोच नारायणच्या पत्नीने समोर येऊन आवाज दिला. ‘पाटील साहेब चहा ठेवते बसा…’ असे बोलून आतील स्वयंपाक घरात ती निघून गेली. पोलीस पाटील कॉटवरून ताडकन् उठले आणि त्यांनी आवाज दिला. ‘रखमा वहिनी… थांबा आजचा चहा राहू दे, शिल्लक’, असं म्हणत ते सुद्धा स्वयंपाक घरात गेले. रखमा वहिनी… मला फक्त एवडं सांगा काय घडलंय…? ही आमची मित्रमंडळी एवढी गप्प का…? तसं रखमाने पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे यांना राऊताच्या गण्याला डागंवरचं लागलेलं भूत,…. त्याचा सर्व शेणगावाने घेतलेला धसका…. शेतकर्‍याची अडलेली मळणी पुढील कामाची झालेली शेतकर्‍यांची कुचंबणा, हे सर्व सर्व सांगितले. तसं सर्व गोष्टी ध्यानात येत पोलीस पाटील स्वयंपाक घरातून बाहेर हसतच आले आणि आपल्या हातातील बुलेटच्या गाडीची किल्ली तिच्या लांब साखळीला बोटाने गरागरा हवेत फिरवत म्हणाले…. ‘नारायणा… अरे सदा सुपडे… उठा मर्दांनो… अरं डागंवरचं भूत गण्या राऊताच्या मानगुटीवर बसलं होतं. ते गावाच्या मानगुटीपर्यंत येऊन बसेल, असं मला वाटलं नव्हतं. मला वाटलं हे डागंवरच भूत लगेच अदृश्य होईल. पण हे तर चांगलं गण्या राऊतानंतर गावालाच फिरवायलंय. काही नसतं रे हे. आता नारायण पाडवे तू डागंवरच्या भुताला आडवं पाडायचं आणि सदा सुपले तू नंतर त्या डागंवरच्या भुताचा सुपडा साफ करायचा… काय….?’ पोलीस पाटील हंबीरराव देवार्डेंच्या या बोलण्यावर घाबरून नारायण पाडवे आणि सदा सुपडेंनी तोंडाचा जबडा मगरीच्या जबड्यासारखा मोठा करत करत प्रश्न केला, ‘काय…?’ त्या दोघांचा अवतार पाहून पोलीस पाटील हसायला लागले. ‘अरं बेट्यांनो.. मी पण सोबत आहे की… चला बसा माझ्या गाडीवर.’ असं म्हणून पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे आपल्या बुलेट गाडीकडे निघाले. हा पोलीस पाटील आलाय आपल्या कामासाठी आणि डागवरच्या भुताविषयी बोलतोय काय….? आणि आता करतोय काय…? हे नारायण पाडवे, आणि सदा सुपडे यांना कळेना. पण गावच्या पोलीस पाटलांवर त्यांचा विश्वास असल्यामुळे ती दोघं गुमानं पाटीलसाहेबांच्या गाडीवर बसले. तसं पोलीस पाटलांची बुलेट फटफटी फाड… फाड…. फाड करीत गावाच्या बाहेर डागंवरच्या रस्त्याला निघाली.

गण्या राऊताला डागंवरच्या भुतानं झपाटून चार दिवस झालं होतं. त्याच्या बायकोनं, आईवडिलांनी केलेली त्याची सेवा, भूत उतरविण्यासाठी गावोगावच्या मांत्रिक, देवर्षी यांच्याकडे केलेला प्रवास यामुळे गण्या राऊताची तब्येत सुधारली होती. इकडे गावाकडे विशेष म्हणजे डागंवरच्या शेतातील शेतकर्‍यांची तब्येत बिघडली होती. डागंवरच्या भुताची भीती गावकर्‍यांच्या मनात उभी होती. सकाळचे अकरा वाजत आले होते. तसं काही वेळातच पोलीस पाटील हंबीरराव देवार्डेची बुलेट गाडी रस्त्यावरच्या माणसाचं कानकिरर्र आवाज करीत गावात आली. तशी ती गाडी सरळ गण्या राऊताच्या घराजवळ थांबली. बुलेट गाडीवरून पोलीस पाटील, नारायण पाडवे आणि सदा सुपडे खाली उतरले. गाडीचा मोठा आवाज ऐकून गण्या राऊताचा बाप घराबाहेर आला. पोलीस पाटील हंबीरराव देवार्डेंना पाहून.. ‘नमस्कार… नमस्कार… पाटीलसाहेब कसं काय इकडं येणं…?’ अशा आदराने प्रश्न केला. ‘नमस्कार राऊतमामा…. काय म्हणतोय तुमचा गणू? उतरलं का नाही त्याचं डागंवरच भूत….?’ पाटलांच्या या प्रश्नांवर गणू राऊताचा बाप भानावर येत म्हणाला… ‘विठ्ठलाची कृपा म्हणायची पाटीलसाहेब…. माजं पोरगं त्या भुताच्या तडाख्यातून वाचलं. चाललाय प्रयत्न, अजून काही ते भूत उतरलं नाही. तुम्ही कसं काय आला होता…..?’ आम्ही तुमच्या गणूचं भूत उतरावयाला आलो होतो.’ असं म्हणून पाटीलसाहेब, नारायण पाडवे, सदा सुपडे सरळ गण्या राऊताच्या घरात गेले. मधल्या घराचं दार बंद होतं. गण्या राऊत आपल्या बायकोबरोबर हसत खिदळत बोलण्यात मग्न होता. त्याचा आवाज ऐकून नारायण पाडवे आणि सदा सुपडेनी धाडदिशी दार उघडून आत आले. त्यांनी गण्या राऊताला त्याच्या बायकोसोबत आनंदानं चेष्टा मस्करी करीत आरामात बसलेलं पाहून ‘काय गण्याराव मजा हाय बाबा तुमची….!’ नारायण पाडवे त्याला म्हणाला. तसं. रागाने गण्या राऊत त्यांना म्हणाला… ‘अरे ही कुठली पद्धत एकदम घरात घुसायची…?’ ‘आम्हाला घरात जायाची पद्धत शिकवतोय गण्या…’ सदा सुपडे नारायण पाडवेकडे पाहत म्हणाला. ‘बेट्यानो बापय माणूस, बाई माणूस न बघता घरात घुसताय लाजा वाटत नाही तुम्हाला….?’ गण्या राऊत अधिकच रागाने बोलू लागला. ‘नमस्कार गणपतराव राऊत’ पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे गण्या राऊताकडे येत म्हणाले. ‘अहो ही दोघं त्या भुताकडे जाऊन आली आहेत. नारायण जरा दाखवा भुताकडे राहिलेल्या गण्या राऊताच्या वस्तू….’ तसं नारायण पाडवे गण्याच्या दोन्ही तुटलेल्या चपला दाखवीत म्हणाला… ‘ओळखलं काय गण्या तुझ्या चपला. अरंरंऽऽऽ अजून नाही ओळख लागत.’ ‘थांब’ असं म्हणून नारायण पाडवेंनी संत्रा नावाच्या दोन हाफ बाटल्या दाखविल्या, तसं गण्या राऊत ‘हे तुम्हाला कुठं सापडलं…?’ असं घाबरत म्हणाला… तसं नारायण पाडवेंनी अजिबात उशीर न लावता आपल्या दोन्ही हाताने गण्या राऊताची गळपट धरून त्याला खाली पाडलं. तसं गण्या राऊतची बायको मध्ये पडत म्हणाली, ‘अहो असं काय करताय. त्यांना का मारताय…?’ ‘अहो, वहिनी गण्याचं भूत उतरायचं चाललंय तुम्ही बाजूला व्हा…’ हंबीरराव देवार्डे पोलीस पाटील म्हणाले. खाली आडवा पडलेल्या गण्याला कॉलर धरून वर उठवून नारायण पाडवेंनी त्याला उभे केले. तोच सदा सुपडेनी गण्या राऊताच्या कानाखाली दोन फटके देत म्हणाला, ‘बेट्या… सासुरवाडीची दारू ढोसून रस्त्यामध्ये पडतोस… थंडी वाजते म्हणून पिंजराच्या व्हळीत लपतोस आणि डागंवरचं भूत लागल्याचा बहाणा करतोस. तुझं चांगलं हाय रे. बायको सेवा करते, आई-बाबा खायला आणून देत्यात. पण आमचं काय रे….? आमची शेतं दाण्यादुण्याने भरलेली असून आम्ही शेतकरी अनाथ झालोय. तुझ्या या भूत लागण्याच्या लबाडीच्या बहाण्याने….’

गावचं पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे आपल्या मुलाला, गण्याला पाहायला आले असतील. असं समजून ते बाहेर होते. पण आतला दंगा ऐकून गण्याचे आई-वडील गडबडीने आत आले. तसं गण्या राऊत पोलीस पाटलांच्या पाया पडत म्हणाला… ‘मला माफ करा.. मी चुकलो. मला दारू जास्त झाल्यामुळे मी भरकटलो…’ ‘बघा राऊतमामा, तुमच्या एकुलत्या एक दिवट्याचा प्रताप. आज सकाळी आम्ही गण्याला लागलेल्या डागंवरच्या भुताचा शोध घेतला. तेव्हा आम्हाला गण्याच्या सासुरवाडीच्या गावात कळलं. याची लबाडी…’ पोलीस पाटलांनी प्रकरणाचा उलगडा केला. तसं पाठोपाठ सदा सुपडे म्हणाला…. ‘राऊतमामा… बोलाना आता विठ्ठल… विठ्ठल… म्हणाना. अहो… तुमच्यापेक्षा पांडुरंग आम्हाला पावला. या आमच्या पोलीस पाटील साहेबांच्यामुळे… अहो गण्याच्याच मेहुण्यानं सांगितलं, त्याच्या गावात विठ्ठलाच्या मंदिराजवळ. त्या रात्री देवकार्यचं जेवण करण्यापूर्वी गण्यानं दारू ढोसली आणि आपल्या गावचा रस्ता धरला. परत सोबत घेतलेल्या दोन्ही बाटल्या वाटेत प्याला. याची चप्पल जिथे पडली होती, तिथेच या दोन्ही बाटल्या काही अंतरावर पडल्या होत्या. बाहेर दारू.., घरात जोरू… आणि लबाडीचा इस्तू लावून गावात घबराट सुरू…. वारे बेट्या’ असं शेवटचं वाक्य बोलून सदा सुपडेंनी आणखी दोन धपाटे गण्या राऊताच्या पाठीत घातले. तसं गण्या राऊत पुन्हा पोलीस पाटलांना गयावया करीत म्हणाला, ‘पाटीलसाहेब मला माफ करा… मी चुकलो…’ पाठोपाठ गण्याचे आई, वडील, बायकोसुद्धा गण्याला माफ करण्यासाठी पोलीस पाटलांना आग्रह करू लागले.

गण्या राऊताच्या घराबाहेर गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. गावचं पोलीस पाटील गण्या राऊताला पाहायला आलेत की, हजेरी घ्यायला आलेत? की आणि काय झालंय…? ते कळेना… इकडे गण्या राऊताची माफी करण्याचा आग्रह पाहून पोलीस पाटील म्हणाले, ‘अरे, गण्या स्वत: दारू पिऊन रस्त्यात पडल्यावर आपली अब्रू वाचविण्यासाठी… आपल्या बायकोच्या शिव्या, आई-वडिलांची बोली चुकविण्यासाठी… तू गण्या डागंवरचं भूत उभं केलास गावात भीती, दहशत पसरविलास तुला पोलिसातच द्यायला पाहिजे’…. ‘नको..नको… पाटीलसाहेब, मी चुकलो. मला माफ करा…’ पोलीस पाटलांचे पाय धरत गण्या राऊत पुन्हा पुन्हा विनवणी करू लागला…. तसं पोलीस पाटील म्हणाले, ‘गण्या… चल बाहेर, तुला माफी मी नाही करणार, गाव करील. अरे पण तुझ्यामुळे गाव चुकलंय. त्यांना कोण सत्य सांगणार…?’ तू कसं गावाला फसविलास ते गावासमोर सांगून त्यांची माफी माग… चल….’ तसं नारायण पाडवे व सदा सुपडे यांनी गण्या राऊताच्या बकुटीला धरून त्याला त्याच्या घराबाहेर आणला. त्यानं सर्व गावकर्‍यांसमोर डागंवरच भूत कसं व का उभं केलं, ते सांगितले व शेवटी सर्वांची माफी मागू लागला. पण गावकरी संतप्त झाले होते. त्यांनी गण्याला शिक्षा करण्याची मागणी केली. तेव्हा पोलीस पाटील म्हणाले, ‘गावकरी बंधूंनो… कायदा कुणीही हातात घेऊ नका. गण्याला कुणीही मारू नये; पण गण्याचा गुन्हा पाहता त्याला माफी नाही. त्यानं आताच्या आता आमचे गाव सोडून बाहेरील कुठल्याही गावी जावे. असं जर झाले तर भविष्यात कुणीही असे खोटे कृत्य करणार नाही, अफवा पसरविणार नाही.’ पोलीस पाटलांच्या या निर्णयाला सर्व गावकर्‍यांनी पाठिंबा दिला. गण्या राऊतानं गाव सोडण्याचा निर्णय मान्य केला. पाठोपाठ पोलीस पाटलांनी आवाहन केले. ‘डागंवरच्या भुताची भीती आता दूर झाली आहे. लोकांनी आता आपल्या शेतातील सर्व लहान मोठ्या भातांची मळणी रात्री चालू करावी. आज रात्री आपण स्वत: नारायण पाडवेच्या भाताच्या मळणीला जाणार आहोत.’

पोलीस पाटील हंबीरराव देवार्डेंचं हे आवाहन ऐकून नारायण पाडवे म्हणाला, ‘पाटीलसाहेब हे काय….? अहो, तुम्ही गावचं पोलीस पाटील साहेब… तुम्ही ओऽऽ कशाला मळणीला? अहो, तुमचं शेतीमाल, लागवड, शाळू बियाणे आणायचं हाय नव्हं. ते जाऊन आणूया की…’ ‘अरं, नारायणा आणि सदा… आरं शाळुचं पीक उद्या डोलानं फुललं रे… पण आज रात्री भाताची मळणी काढून डागंवरच्या भुताला पळवून लावूया की…. , अं कसं…? रखमा वहिनी तुमचा चहा आता रात्री या गड्यांबरोबर भाताच्या मळणीलाच पाठवून द्या. आणि रखमा वहिनी आता एक कप जादा पाठवा, बरं का,’ पोलीस पाटील म्हणाले. सतका वेळ गण्या राऊताचा सर्व गोंधळ शांतपणाने पाहत, ऐकत असणारा शिरपा न्हावी शांत होता. त्याला सर्वकाही कळत होतं; पण पोलीस पाटलांंनी एक कप जादा चहा का मागितला? हे शेवटंच वाक्य त्याला काही कळलं नाही. त्यानं चटकन शंका काढली… ‘पाटील साहेब, एक विचारू का? हा एक कप जादा चहा कुणासाठी ओ….?’ ‘अरं… डागंवरच्या भुतासाठी…?’ पोलीस पाटील हंबीरराव देवार्डे बोलले… तसं सर्वजण खळखळून हसू लागले.


तानाजी कुरळे

संपर्क : मोबा. 9765783874