Categories
मानसमित्र

डिजिटल पालकत्व

वार्षिकांक - २०१७

डॉ. प्रदीप पाटकर

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संपर्क, शिक्षण, संप्रेषण, दैनंदिन व्यवहार अशा अनेक ठिकाणी डिजिटल तंत्रज्ञान डोकावत असून त्याला पर्याय नाही, अशी आजची स्थिती आहे. पालकत्व व शालेय शिक्षणही याला अपवाद नाही. मुले तंत्रव्यसनी होत आहेत, याची पालकांना काळजी वाटत आहे. हे नेट अ‍ॅडिक्शन व स्क्रीन अ‍ॅडिक्शन मनोविकार ठरत असून आभासी जगातून आपल्या पाल्यांना वास्तव जगात आणण्यासाठी डिजिटल पालकत्वाची जाण असणे गरजेचे आहे, यावर लेखक भर देत आहेत. डिजिटल सुरक्षिततेबद्दलच्या लेखकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.

मुले व आपण यात एक नवीन, दिवसेंदिवस रुंदावत चाललेला प्रदेश निर्माण झाला आहे, त्याला Digital space म्हणता येईल. त्यामुळे अर्थात मुले व आपण यातील मानस-अंतर वाढत चाललेले आहे आणि याचा सर्वांत गंभीर परिणाम मुलांवर होताना दिसतो आहे. आपण काय सांगत आहोत ते मधल्या अंतरामुळे मुलांपर्यंत पोचत नाहीय. त्यामुळे मुले ऐकत नाहीत, या जाणिवेने पालक सचिंत आहेत.

मुले कृत्रिम, आभासी जगात वाहवत, वास्तव जगापासून, विशेषतः घरापासून तुटत चालली आहेत, ती असुरक्षित क्षेत्रात निरागस; पण अतिआत्मविश्वासाने घुसत आहेत. Digital Media च्या व्यसनात गुरफटून जात आपला व्यक्तिमत्त्वविकास थांबवीत आहेत, याची साधार भीती पालकांना व जगभरातील मानसशास्त्रज्ञांना वाटत आहे.

तंत्रहुशार मुले तंत्रव्यसनी होत आहेत. 8 ते 18 वर्षे वयाची मुले दिवसाचे 6 ते 8 तास नेटवर घालवू लागली आहेत. techno-savy highly techno-idiot होत आहेत. नेट व्यसनाचे प्रमाण आपल्याकडे 8 टक्के, तर इतर काही देशात 30 टक्के इतके भयावह आहे. TV, Mobile, video games, net addictions ते सर्वसमावेशक screen addictions हे सखोल संशोधनातून आता मनोविकार ठरलेले आहेत. मुले आभासी जगाशी जोडून घेताना आपल्या कुटुंबापासून, आजूबाजूच्या जगापासून तुटत चालली आहेत. आभासी जगाशी connected, वास्तवाशी disconnected, online updated, outdated in reality अशी ही अवस्था. मुले techno savy to techno idiocy कडे जात आहेत.

त्यामुळे आपण सर्वांनी त्वरेने Digital-साक्षर व्हायला हवे. Digital तंत्रज्ञानाचा आवाका समजून घेतला पाहिजे. Digital तंत्रज्ञानापासून आपण अपरिचित राहून चालणार नाही. आपल्याला मुले तंत्र सुरक्षिततेपासून दूर होत, चुकून Digital addiction ची शिकार होत नाहीत ना, याबाबत सजग राहायलाच हवे. त्यासाठी Digital parenting समजून घेणे व आत्मसात करणे जरुरीचे आहे. मुलांचे पालनपोषण, संरक्षण, मार्गदर्शन, प्रगतीची संधी, जगण्यातील कौशल्याचे शिक्षण, स्वावलंबनाचा सराव आदी पालकत्वाच्या अनेक जबाबदार्‍यांमध्ये आता Digital parenting या महत्त्वाच्या विषयाची भर पडली आहे.

जीवनातील प्रत्येक क्षेत्रात-संपर्क, शिक्षण, संप्रेषण, दैनंदिन व्यवहार अशा सर्वच ठिकाणी आपल्याला Digital तंत्रज्ञान केवळ उपयुक्तच पडते, असे नसून त्याशिवाय आता पर्याय उरत नाहीय. शाळाही तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देण्यावर भर देत आहेत. मूल गृहपाठ करीत आहे की सराशी खेळते आहे, नेट surfing करीत आहे की facebook वर आहे, हे त्यांच्या Mobile-computer वर नजर टाकल्याशिवाय पालकांना काही कळत नाही. तसे डोकावले की मुलांना त्यांची privacy भंग झाल्याचा राग येतो, अविश्वासाचे गरमागरम वातावरण तयार होते, वितंडवाद होतात. mobile-computer-network चा गैरवापर हा मुद्दा बाजूलाच राहतो, नातेसंबंध बिघडू लागतात. मुलांना पालकांपेक्षा devices अधिक प्रिय वाटू लागतात. असे का होते ?

एकतर शाळेतील शिकणे काही तुरळक, सन्माननीय अपवाद वगळता आजवर सर्वत्र कंटाळवाणे, अवजड, अव्यवहार्य, एकसुरी असते, यात दुमत नसावे. मुलांना शाळा कोंडवाडा वाटते, हे ज्या उत्साहाने शाळा सुटल्यावर जल्लोष करीत बाहेर पडतात, त्यावरून रोज सिद्ध होते. पुढे मोठेपणी शाळेतील दिवस आठवून माणसे भारावून जातात, त्यात शाळेतील इतर उद्योगांचीच आठवण जास्त येत असते; शिवाय आजच्या वैतागी आयुष्यापेक्षा बालपण नेहमीच रम्य वाटते, हे तर साहजिकच आहे. शालेय शिक्षण त्या आनंदात भर घालत होते काय, हा प्रश्न न विचारलेला बरा. सुदैवी, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय, श्रीमंत, हुशार मुलांना शाळा प्रिय वाटली तर त्यात काही आश्चर्य नसावे, इतर समाजाप्रमाणे शिक्षकही त्यांची तेवढी काळजी घेत होतेच.

शिक्षणातील कंटाळा games, surfing यात कुठेही जाणवणार नाही, असा स्मार्टनेस नेट व स्मार्टफोन दाखवीत असतात. हुकूम कराल तेव्हा तो मुलासमोर मनोरंजक विश्व उघडून देतो. ‘आज नाही नंतर केव्हातरी बघू,’ ‘अगोदर आजचा अभ्यास कर,’ ‘काय सारखा-सारखा तोच खेळ खेळतोस,’ ‘परीक्षेत काय दिवे लावायचेत काय,’ ‘मागचा दिव्य रिझल्ट आठवा जरा,’ असे आडवे, खोचक, वैताग आणणारे काही न बोलता स्मार्टफोन (त्यांचे तंत्र-मायाजाल) आजचा अनुभव किती विविध प्रकारे मनोरंजक, उत्कंठावर्धक, आगळावेगळा, चटकदार वाटेल, असे प्रयत्न करतो. facebook, whatsapp, twitter, linked-in आदी भेटस्थळे, आभासी भेट प्रत्यक्ष भेटीपेक्षा जास्त मोकळी, कमी त्रासदायक, पटापट प्रतिसाद देणारी ठरेल, अशी व्यवस्था करतात. जगाशी connected असल्यासारखे वाटते, (प्रतिसादाची ओढ व चटक लागते, प्रतिसादावर स्व-प्रतिष्ठा पणाला लागते). मध्ये-मध्ये कुणी आडवे येत नाही. आभासी मैत्री ओतप्रोत थ्रिलने परिपूर्ण असते. त्यात मनातील, व्यक्तिमत्त्वातील खरे उघडकीला येण्याचा धोका नसतो, आपल्यात नसलेले आकर्षक गुण-रूप आपले म्हणून दाखविता येतात. काय खरे, काय खोटे हे शोधता येत नसल्याने ते शोधण्याचा नसता खटाटोप कुणी करीत नाही. आभासी जग आवडणे हेही एक नितांत गरज ठरल्याने त्यात गुंतून जाणे आवडते. ’हे काय, एवढी कशी बावळट तू? एवढेसुद्धा माहीत नाही?’, ’आता नाही हं, वेळ मिळाला की सांगीन, आता कटकट करू नको, ’असे काही न म्हणता गूगल’ किंवा ‘सिरी’ विचारलेल्या शंकेचे/प्रश्नाचे उत्तर त्वरित देते.बिले भरणे,पैसे देणे घेणे,पत्रे/निरोप पोचविणे अगदी चोखपणे (hacking होईपर्यंत) केले जाते. ही इतकी झटपट विनातक्रार सेवा, एवढे लक्ष कोण देते? उगाच नाही Digital माध्यम मन जिंकून घेत !

*****

Digital विश्व केव्हा जिवलग मित्र बनून मनाचा ताबा घेते, कळत नाही. मुलांनाच काय, मोठ्या माणसांनाही या ‘ओढग्रस्तते’चा पत्ता लागत नाही. मन जिंकणे, सेवा देणे, मनोरंजन करणे अशा अनेक बाबतीत, Digital जगाने आपल्यावर मात केलीय. आपणच फिरवलेले हे चक्र आता थांबविणे तर सोडाच; उलट फिरविणेही शक्य नाही. मुलांच्या मनात एवढे मजबूत स्थान मिळविणे शक्य आहे; पण त्यासाठी फारच सातत्यपूर्ण प्रयत्न, तेही मुले लहान असताना करीत राहावे लागतील. तेवढा वेळ, तेवढे कष्ट आजच्या जगातील थकलेले, पिडलेले पालक कसे घेऊ शकतील, याची कल्पना करणेही कठीण आहे. निदान वळसळींरश्र विश्वाबाबत सजग, साक्षर होणे एवढेतरी आपण केले पाहिजे. या जगाची दुसरी धोकेबाज बाजू आपण समजून घेतली पाहिजे, मुलाना त्याबाबत सतर्क, सावधान करायला हवे की नेमकी सुरक्षितता बाळगायला हवी, तेही आपण सार्‍यांनी समजून घ्यायला हवे.

फसविले जाईपर्यंत, सायबर छळ सुरू होईपर्यंत भाबड्या, निरागस मुला-मुलींचे भावविश्व आभासी जग जपते. प्रतिबंध नसेल तर नको त्या ीळींशी वर धाडसी मुले फिरून येतात आणि मग गुन्हेगारी जगाचे लक्ष वेधून घेतात, virus attack चे बळी ठरतात. जीवघेणे blue-whale मागे लागू शकतात….

*******

नेटमुळे फायदे खूपच झाले, पण तोटेही झाले. माहिती ‘शोधण्यातला’ आनंद Google ने of course सोप्पा करीत जवळजवळ काढूनच टाकला. शोधण्यातील कष्ट संपले आणि कष्टसाध्य अर्थपूर्णता कमी होत गेली. नेटमुळे वेळ वाचेल असे वाटता-वाटता आपल्या वेळावर सर्वांत जास्त ताबा नेटने मिळविला. नेटची आवड पाहता पाहता व्यसनात बदलून गेली. हबी (hubby) आणि बीबीपेक्षा मोबी अधिक प्राणप्रिय होत गेला. आभासी मैत्री वाढली आणि प्रत्यक्षातील नातेसंबंध तणावग्रस्त झाले. प्रतिसाद; तोही त्वरित (instant reply) हवा. ही तहान वाढत चालली आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रात ही त्वरित तृप्तीची म्हणजे instant gratification ची तहान शिरली.

‘नेट’ गर्दीत माणसे घुसली आणि तेथेही स्पर्धेत सापडल्याने स्वतःच्या प्रतिमेविषयी आशंकित झाली. आपली लोकप्रियता नेटवरील प्रतिसादाच्या संख्येवर मोजली जाऊ लागली. खासगी जीवनात मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केल्याने माणसामाणसांतील – (पती-पत्नी – मित्र-मैत्रिणी इ.) विश्वासाला तडा जाऊ लागला व वैवाहिक जीवन धोक्यात आले. स्वैराचाराला मोकळीक मिळाली, गुन्हेगारीला मैदान मोकळे मिळत गेले. सर्वांवर लक्ष ठेवता आल्याने खासगी जीवन सार्वजनिक होत गेले. ज्ञानाचा व्यासंग थांबत चालला. उलट वरवरचे उथळ, उत्तेजक, अर्धवट ज्ञान पसरत चालले. माणसे मूलार्थ, भावार्थ असल्या गोष्टीची पर्वा न करता कसेही कितीही; पण आत्ताच्या आत्ता आनंद- instant gratification- मिळविण्यासाठी, पोरकट, वरवरच्या, उथळ अशा सार्‍या सुमार गोष्टींचा पाठलाग करू लागले. आता निबंध वाचणे कमी होत चालले. attention अवधान आक्रसले, प्रलंबित व्यासंग-संशोधन नकोसे वाटू लागले आहे. उथळ, चटकदार वाक्य तेवढे मानमरातब टिकवून आहे. महाकाव्य सोडा, चार अर्धवट यमके जुळवीत, ओढून-ताणून उथळ तत्त्वज्ञानाची झलक कवितेत पेश करण्यालाच गौरव / प्रसिद्धी मिळू लागली. योग्य विचारमंथन आता संसदेतही होत नाही, भावनिक अर्थशून्य मुद्द्यावर समाजकारण, राजकारण चालते. हे सारे नेटमुळे झाले असे मला म्हणायचे नाही. सांस्कृतिक र्‍हासामागे अनेक आंतरराष्ट्रीय सामाजिक – राजकीय – आर्थिक – सांस्कृतिक उलथापालथी कारणीभूत असतात. परंतु ‘नेट’मुळे हे समाजातील सर्व थरांमध्ये झपाट्याने पसरू शकले, हे निश्चित. ‘नेट’सारखे अफाट उपयुक्त साधनही आपण अति व अविवेकी वापराने र्‍हासासाठी अधिक वापरू लागलो आहोत. आपण नीट नेट साक्षर झालो नाहीत.

या र्‍हासाचा गंभीर परिणाम नेट वापरणार्‍या मुलांवर होत आहे. ‘नेट’वरून ज्ञानासोबत ‘नेट’ व्यसन, अतिरिक्त मनोरंजन, cyber गुन्हेगारी, नेट -छळ, पोर्नोग्राफी, उघडे-नागडे हिंसक जग हे सारे त्यांच्यापर्यंत सहज पोचते आहे. या exposure चा त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर, ज्ञानेंद्रिये – शरीरप्रकृती – मेंदूवर, नातेसंबंधांवर, सामाजिक – वैचारिक उत्कर्षावर, ज्ञानसंपादनावर विलक्षण आघात होत आहे. ‘नेट’ वापराबाबत एकदम टोकाची भूमिका मी घेत नाहीये. पण दहशतवादी, अतिरेकी, युद्धपिपासू सत्ताधारी, जीवघेणी अणुबॉम्बसारखी / जंतुसंसर्ग व रासायनिक परिणाम घडवणारी शस्त्रे, धर्मयुद्धे, व्यसने, रोगराई या सार्‍यांपेक्षा जास्त मनुष्यबळी गेल्या कित्येक शतकात आत्महत्यांनी घेतले आहेत, हे लक्षात घेतल्यास मी नेट बळींबाबत एवढी टोकाची भूमिका का घेऊ इच्छितो, ते साधारणतः लक्षात येईल. तंत्रज्ञानाची उपयुक्तता लक्षात घेऊन ते संस्कृती उत्कर्षासाठी, जग अधिक शहाणे, सुंदर करण्यासाठी वापरले पाहिजे. त्यासाठी आपण Digital साक्षर व्हायला पाहिजे. पुढील पिढीला Digital माध्यमे कशी वापरावीत हे समजावून सांगण्यासाठी, Digital parenting समजून घायला हवे. एवढ्याचसाठी हा लेखनप्रपंच.

आजच्या संस्कृती संभ्रमात हिंसा, रक्तपात, बलात्कार, महाभयानक विध्वंस, याबाबतीतील उथळ स्वैर, बाजारू, अनैतिक चित्रिकरणे सामोरी आल्याने मुले व माणसे याबाबत बधीर, असंवेदनशील होत चालली आहेत. स्त्रीदेहाची बाजारू जाहिरात, स्वैराचार, लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध याबाबत अविवेकी दृश्यांचा भडिमार यामुळे या सर्वांबाबत मुलांच्या मनातील भावुकता, परवडणारे भोळेपण, निरागसता, romanticism संपून ही मने यांत्रिक व्यवहारी, उपभोगी, रुक्ष, असंवेदनशील होत चालली आहेत. हिंसेच्या चित्रीकरणाशी अधिकाधिक संपर्क आल्याने हिंसा, रक्ताळलेले देह, गुन्हेगारी, फसवणूक, याबाबत मने बधीर होत आहेत. संवेदनशीलता, सहिष्णुता हरपत चालली आहे. स्त्रीदेहाची बाजारू जाहिरात पाहून-पाहून लग्न, प्रेम, आदर, विवाह, भावुकता, निष्ठा, नैतिकता, निर्मल मैत्रीपूर्ण स्त्री-पुरुष संबंधांबाबत काही मुलांची मने रुक्ष, यांत्रिक, गरजेपुरते नाते, अविवेकी, उतावीळ, उपभोगवादी, हिंसक होत चालली आहेत.

Digital parenting शिकून घेताना एक लक्षात घ्यायला हवे की, मुलांना स्मार्टफोन आपणच देतो; मग तो कसा व किती वापरायचा हेही आपणच शिकवायला हवे. आपण फोन देऊन मोकळे होऊन चालणार नाही. Digital जग व मूल यामध्ये एक महत्त्वाचा मध्यस्थ आपण आहोत. साधा फोन द्यायचा तर साधारण वय वर्षे 6 नंतर आणि स्मार्टफोन वय वर्षे 13 नंतर द्यावा व त्याचा स्वतंत्र account उघडू द्यावा, वय वर्षे 15 नंतर. मनातील brakes वय वर्षे 18 ते 20 पर्यंत तयार होत नाहीत, असे मानसशास्त्र सांगते. त्यामुळे तोपर्यंत मुलांना नेट-प्रवासात तुमची साथसोबत, मार्गदर्शन; जरूर तेथे प्रतिबंध, नेट वापराचे शिक्षण याची जरूर आहे. वय वर्षे 18 पर्यंत मुलाच्या नेट वापरण्यावर लक्ष असू द्यावे. पहारा करण्याऐवजी सोबत राहावे. हे सारे नियम मला उपयुक्त वाटतात. केवळ शास्त्रीय अभ्यासातून आलेले हे या प्रश्नांचे उत्तर नव्हे. रोजच्या OPD त समोर येणार्‍या नेट-त्रस्त व नेट-बळींच्या कुटुंबाशी केलेल्या चर्चेतून ही काही impressions माझ्या मनात तयार झाली आहेत. नेटवरील या विषयावरच्या चर्चाही या बाबतीत मला मदतगार ठरल्या आहेत. त्या सर्वांचा नामनिर्देश येथे नसला, तरी माहितीच्या या संकल्पनेतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता येथे व्यक्त करायलाच हवी.

नेट वापरातील धोके ओळखून त्याबाबतीत सजग Digital पालक काय करू शकतील, याची चर्चा समाजात व्हायला हवी/होते आहे देखील. Identity thefts, hacking, account चोरणे, stalking (पाठलाग करणे), bullying(छळ करणे), luring (मोहात पडणे) असे अनेक प्रकार ‘नेट’वरील गुन्हेगारांकडून सतत होत असतात व कोणतेही मूल त्यांच्या कचाट्यात सापडू शकते. Digital पालकत्व मुलांना नेटचा वापर जबाबदारीने करण्यास शिकविते. त्यात आवश्यक ते नियम मुलांना पाळावयास लावणे, यात काहीच गैर नाही. फक्त ती शिस्त, धाक, दडपशाहीपेक्षा मदतीच्या भावनेने कुटुंबात मोकळी चर्चा करून मुलांना ती पाळण्यास उद्युक्त करणे जास्त प्रभावी ठरते.

Digital सुरक्षिततेबाबत काय करता येईल?

नेट वापरातील धोके कुटुंबातील चर्चेद्वारे मुलांना नीट समजावून देणे महत्त्वाचे आहे. खालील सूचना मला उपयुक्त वाटतात. :

फोन शक्यतो hands free वापरा. जेवताना, झोपताना, वाहन चालविताना, रस्त्यातून चालताना फोन दूर ठेवावा. येथे text prevention app वापरता येईल.

चालताना, गर्दीच्या ठिकाणी message लिहिणे टाळावे. कारण आजूबाजूला लक्ष नसल्याने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ शकते.

नेटवर आपण दिवसातून किती वेळ घालवीत आहोत ते समजण्यासाठी Time measuring/Time limiting app वापरू शकतो. अँटीव्हायरस, फायरवॅाल्स यांचा वापर नीट करावा.

संशयास्पद suggestive/provocative, भुरळ पाडणार्‍या, उचकविणार्‍या, नेहमीच्या नातेसंबंधातील मर्यादा ओलांडणार्‍या, मर्यादशील मैत्रीपेक्षा अधिक जवळीक साधू इच्छिणार्‍या मेसेजेस वा posts ना उत्तर / चिन्ह – प्रतिसाद देणे टाळावे.

नेट सुरक्षिततेसाठी password क्लिष्ट ठेवावेत, ते कुणालाही सांगू नयेत. ते सतत बदलावेत.

घरात वा बाहेर (सार्वजनिक ठिकाणे / cybercells / फोन शॉप्स / ग्रंथालये ) कुठेही असलात तरी site वरून नीट शांतपणे, पद्धतशीर logout करा. कुठल्याही site ला password लक्षात ठेवायला परवानगी देऊ नका.

संशयास्पद स्थळावरून sites / Links download करू नका.

नवीन व्यक्तींची, सर्वांची सरसकट मैत्रीची request स्वीकारू नका. संशय वाटल्यास Instant checkmate सारख्या site चा उपयोग करून त्या व्यक्तीबाबत गुन्हेगारी जगात काही नोंद नाही ना, हे शोधण्याचा प्रयत्न करा.

bullying – cyber छळ होत असल्यास, stalking (पाठलाग) होत असल्यास प्रतिसाद – reply देऊच नका. मूल अस्वस्थ, निराश, चिडचिडे झाले असल्यास त्याचा नेट वापर नीट पाहून त्यात त्याचा छळ होत नाही ना, हे तपासा.

मुलाची बदनामी केली जात असल्यास त्या site शी संपर्क तोडा. अधिकाधिक माहिती देत राहू नका. प्रतिवादाचा तेथे उपयोग होत नाही. गुन्हेगाराची सदसद्विवेकबुद्धी जागृत होईल, असा आशावाद ठेवू नका. संवाद थांबवा.

नेटवरून होणार्‍या प्रचाराबाबत विरोधी मते, त्या मुद्द्याविषयी इतर दृष्टिकोन काय आहेत तेही जाणून घ्या. अन्यथा propoganda ला बळी पडून नको ती/चुकीची मते स्वीकारली जाण्याचा संभव असतो.

तुमचे फोटो तुमचे ठिकाण सांगू शकतात. चोरांना घरफोडीसाठी याचा फायदा होऊ शकतो. फोन मधील ‘exit data’ (exchangable image file format ) turn off करा.

Social Media Vrb privacy settings नीट वापरा. purchase and use online filtering system. ऑनलाईन फिल्टर्स वापरा.

TV, Mobile वरची, parental control features वापरा. नेट वापरापायी पुस्तकांशी संबंध तोडू नका. पुस्तके, जर्नल्स आदी वाङ्मयाशी संपर्क असणे महत्त्वाचे आहे. सारा अभ्यास नेटवरच करण्याचा आग्रह (शाळेनेही) धरू नये. आभासी जगापेक्षा प्रत्यक्ष जगाशी संपर्क अतिशय महत्त्वाचा आहे.

सतत Digital safety तील नवी माहिती व नवी कौशल्ये शिकून घ्या.

नेट वापराबाबत त्यातील मजकूर / चित्रांबाबत आक्षेप असल्यास ताबडतोब report करा. site वर reporting mechanisms, help centres, support groups, हेल्पलाईन, hotlines असतात. तेथे आपल्या आक्षेपाची नोंद करा. मजकुराचा screenshot घ्या. त्या व्यक्तीला तुमच्या account मधून block करा. report करा. पुन्हा त्या व्यक्तीशी संपर्क साधू नका.

अमेरिकेत cybertipline.com, end revenge porn, अशी अनेक मदतस्थळे आहेत. जिथे तुम्ही आपले आक्षेप नोंदवू शकता. मनोस्वास्थ्याबाबत मुंबईत- Parisar Asha, Halley Movement (NGO).

Vodafone चे Digital Parenting Magazine आहे. www.asra.info, saath – www.ourindia.com, India suicide Hotlines, www.betterinternetforkids.eu.

Digital अर्थव्यवहाराबाबत सरकारी हेल्पलाईन -14444, मार्गदर्शन व मदत करू शकते.

मूल वय वर्षे 16 -18 वयाचे झाल्यानंतर, digital पालकत्वही, इतर पालकत्वाप्रमाणे, बळजबरीने, दमनशाहीने विशेष भरीव कार्य करू शकत नाही, असे दिसते (तशी ती शिस्तीची पद्धत आधीही उपयुक्त नसतेच). त्यांच्या नेट प्रवासावर तुम्ही पालक म्हणून सतत पहारा ठेवू शकत नाही. सबब, इतर पालकत्वाप्रमाणेच येथेही लहान मुलाची विवेकबुद्धी विकसित होण्यावर भर असावा. योग्य ते निर्बंध नीट समजावून सांगून वापरणे हे मुलांच्या लहान वयातच सुलभ होते. त्याचा स्वतःचा विवेकच पुढे त्याला स्वतःचे वर्तन – भावना – विचार संतुलित, संयमित ठेवण्यासाठी मदत करू शकतो. मूल जसजसे मोठे होते तसतसा बाह्य जगाचा त्याच्या मनावरचा प्रभाव वाढ जातो. अशावेळी संस्कारक्षम वयात त्याला मिळालेले विवेकनिष्ठ Digital पालकत्व पुढच्या त्याच्या Digital प्रवासात उपयुक्त ठरत जाईल.

चला तर, Digital पालकत्वाची ही नवीन जबाबदारी देखील आपण उत्साहाने पार पाडू या !!

डॉ. प्रदीप प. पाटकर

मानसोपचारतज्ज्ञ, पनवेल

patkar.pradeep@gmail.com