Categories
अभिवादन

डॉक्टर! संघटना सामूहिकपणे पुढे जातेय

डॉक्टरांना अनावृत्त पत्र
ऑगस्ट - २०१६

प्रिय डॉक्टर,

पुन्हा एकदा पत्रसंवाद तुमच्याशी. तसं बघितलं, तर डॉक्टर महाराष्ट्र अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा तुमच्याशी संवाद होतच असतो. अगदी सतत. कारण आजही त्यांचं भावविश्व आणि विचारविश्व तुमच्या व्यक्तिमत्त्वाने व्यापलं आहे. त्या सर्वांच्या भावना मला तुमच्यापर्यंत पोचवणं अर्थातच, कठीण आहे; पण त्यातील दु:ख, वेदनेसोबतच निर्धार, सातत्य, कृतिशीलता, संघटनेप्रती समर्पणाची भावना, आपल्या वाढ आणि विस्ताराच्या दिशा, हे सारं समाधान देणारं संघटनेचं कर्तृत्व तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी नम्र प्रयत्न करणार आहे.

डॉक्टर, आजही दर महिन्याची 20 तारीख आम्हाला अस्वस्थ करते. तुमच्यानंतर कॉ. गोविंदराव पानसरे आणि त्यांच्यानंतर कर्नाटकातले बुद्धिवादी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी अशा एकूण तीन हत्या झाल्या. साधारणपणे वेळही तीच, पद्धतही तीच. जेव्हा तुमच्या खुनाची बातमी कानावर आली, तेव्हा मला व्यक्त करता येणार नाही, असा गोंधळ मनात सुरू आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनातील शंकांना बळकटी देणारी माहिती तपासातून पुढे येतेय. सनातनच्याच साधकांना अटक झालीय. काही संशयित फरार आहेत. आता कोणत्याही अडथळ्यांविना हा तपास अधिक वेगाने व्हावा, अशीच अपेक्षा आहे. या तीनही खुनांमध्ये एकच सनातनी प्रवृत्ती आहे, हे एव्हाना समाजाला समजलंच आहे; पण अजूनही मारेकरी, त्यांचे हस्तक सर्वोच्च तपासयंत्रणांना सापडत नाहीत, त्यामुळे आम्ही प्रचंड अस्वस्थ झालो आहोत. डॉक्टर, माननीय न्यायालयाने यात योग्य हस्तक्षेप केलाय. तपास वेगाने व्हावा, अशी तंबीच दिलीय. तपासयंत्रणांसमोर पण ही अस्वस्थता आम्ही काहीतरी कृती करून व्यक्तही करतो. कधीकधी जीवाचा संताप होतो, कधी हतबलताही जाणवते. पण तुम्हीच दिलेल्या विवेकाच्या आधारे ही हतबलता निर्धारपूर्वक आम्ही झटकतो आणि संतापालाच हत्यार बनवत संघटनेत कृतिशील राहतो. तुमचं बलिदान आता विवेकाचा प्रेरणास्रोत झालंय. डॉक्टर, संघटना सामूहिकपणे पुढे जातेय. समाज याची दखल घेतोय. नवनवी दालने कामासाठी उघडत आहेत, हे सारं संघटनेला पुढं नेणारं आहे. बळकट करणारं आहे.

डॉक्टर, गेल्या वर्षभरात संघटनेने आपल्या स्वभावानुसार आपली कालसुसंगता आणि उपयुक्तता विविध उपक्रम आणि लढ्यांच्या माध्यमातून सिद्धच केली आहे. गेल्या 7 ऑगस्टला पुण्यात आपण विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद घेतली. तिला देशभरातील विविध राज्यांतून दोनशेच्या वर प्रतिनिधी हजर होते. सर्वचजण आपलं काम बघून भारावून गेले. आपला ‘जादूटोणाविरोधी कायदा’ त्यांच्या राज्यात करण्याचा निर्धार त्यांनी केला. केरळ, कर्नाटक, आसाम या राज्यांमध्ये त्याची प्रक्रियाही सुरू झाली. सर्व राज्यांमधून आपल्याला आज निमंत्रणे आहेत डॉक्टर, सतत मागणी आहे. देशभरात आपण या कामातले आता सर्वमान्य संघटन झाले आहोत, ही आत्मस्तुती नाही; डॉक्टर, हे वास्तव आहे. तुमच्या बलिदानाने आणि कार्यकर्त्यांच्या जीवापाड मेहनतीने या टप्प्यावर आपण येऊ शकलो आहोत.

त्यानंतर 8 व 9 ऑगस्टला आपण रौप्यवर्षपूर्ती अधिवेशन घेतले. राज्य अधिवेशन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारी एक महत्त्वपूर्ण घटना असायची ना, डॉक्टर. तुम्ही खूप मेहनतीने मेळाव्याची तयारी करायचा. अगदी बारीक-सारीक नियोजन. काय विषय ठेवावा, कोणत्या वक्त्याला बोलवायचे, कार्यकर्त्यांपैकी कोणी बोलावे, सारं काही. हे सर्व नियोजन तुम्ही आमच्याकडूनच करून घ्यायचा, आता हे सारं तुमच्याशिवाय करायचं होतं. तुमच्याशिवायच हे पहिले अधिवेशन होते. कसं होणार, अशी थोडी शंका होती. नियोजनात तर आपण माहीर आहोत. डॉक्टर, त्याची काळजी नव्हती; पण अधिवेशन आपला तोच पूर्वीचा संघटनात्मक ठसा उमटवेल की नाही, याबाबत शंका होती; पण डॉक्टर… सगळ्या शंकांवर चळवळीने मात केली. प्रचंड उत्साहात अधिवेशन संपन्न झालं. थोर खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर ताप भरला असतानाही आले आणि म्हणाले, “डॉक्टरांच्या नंतरही ही चळवळ वटवृक्षासारखी वाढली, बाहेरूनही तिचा मोठा विस्तार झाला आणि आतही मुळं खोलवर रुजली.” आणि म्हणाले, “तुम्ही माझे आभार वगैरे नका मानू प्लीज… येथे उपस्थित राहणे, हे माझं कर्तव्य आहे.” असं म्हणताच आम्ही सर्वांची प्रचंड टाळ्या वाजवीत त्यांच्या या विनम्र भावनेचा सन्मानाने स्वीकार केला. संघटनेला बळ मिळालं, विश्वास मिळाला, या अधिवेशनातून साश्रुनयनांनी आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

डॉक्टर, तुम्हाला आणखी एक आनंदाची गोष्ट तर लगेचच सांगायला पाहिजे. अहो, आपण पुन्हा एक नवा कायदा मिळवला आणि तोही भारतातील एकमेव असाच. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा म्हणजेच तुम्हीच म्हणायचा तो ‘जातपंचायत विरोधी कायदा.’ जादूटोणाविरोधी कायद्यासाठी आपण अठरा वर्षं जीवाचं रान केलं आणि खरं तर जीवही गमावला; पण दुसरा एक कायदा मात्र आपण भरपूर प्रबोधन, थोडा दबाव आणि थोडी मुत्सद्दी वृत्ती याद्वारे घडवून आणला. डॉक्टर, आदल्या रात्री तुम्ही दूरचित्रवाहिनीला दिलेली मुलाखत सर्व महाराष्ट्राने पाहिली. त्यात तुम्ही जातपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात कायदा व्हावा, असे म्हटले होते. त्याच ऑगस्ट महिन्यात आठ तारखेला तुम्ही नाशिकला आणि 15 ऑगस्टला लातूर येथे ‘जातपंचायतीला मूठमाती परिषदा’ घेतल्यात, तेव्हा तुमच्या मनात हाच विषय घोळत असणार, डॉक्टर, ही मोहीम पुढे कशी न्यायची?

तुम्हाला सांगायचा अभिमान वाटतो डॉक्टर, ही मोहीम त्याच नेटाने सुरू आहे आणि आज कायद्याची यशस्वी लढाईही आपण लढली; पण यात अविनाशभाई आणि कृष्णा चांदगुडे यांचे परिश्रम आहेत डॉक्टर. आणि या विषयाचा पाठपुरावा करण्यात रंजना गवांदे, नितीन राऊत, प्रशांत पोतदार, मुक्ताताई, हमीद यांचाही सहभाग मोठा आहे. या कायद्याला आणखी एक औचित्य मिळाले डॉक्टर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125 वे जयंती वर्ष. बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक बहिष्काराच्या विरोधात लढा दिला. त्यांच्या या संघर्षात त्यांनी एका कमिशनसमोर जातपंचायतीच्या विरोधात साक्ष दिल्याचीही माहिती आहे. महाराष्ट्र शासनानेही या प्रसंगाचे औचित्य मानले आणि कायदा करण्याबाबत सकारात्मकता दाखवली. तरीही तेथे किल्ला लढावाच लागला. डॉक्टर, अधिवेशनाच्या अगदी शेवटच्या दिवशी कायदा दोन्ही सभागृहात मांडलाही गेला आणि मंजूरही झाला. अशी अविश्वसनीय घटना. या कायद्याच्या निमित्ताने केवळ तीन वर्षांत दोन कायदे मिळवणारी बहुतेक ‘अंनिस’ ही एकमेव चळवळ आहे.

कृष्णा चांदगुडे या विषयाच्या एका प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी पश्चिम बंगालपर्यंत जाऊन आले. फार भयंकर स्थिती आहे तेथे डॉक्टर. आपल्याकडेही काही कमी नाही. गेल्याच महिन्यात कौमार्याच्या परीक्षेच्या नावाने महिलांचा कसा अपमान केला जातो, ही घटना पूर्ण महाराष्ट्राने अनुभवली. या प्रश्नाची पाळेमुळे खूप खोल आणि लांब विस्तारलेली आहेत, हेही समजले. पुढील अनेक वर्षे हा विषय लढवावा लागेल. आपल्याच समाजबांधवांचं शोषण करणारी ही समांतर न्यायव्यवस्था मोडीत काढण्यासाठी त्याच समाजघटकांतील प्रागतिक विचारांच्या तरुणांनाही सोबत घ्यावं लागेल, ही दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, याची जाणीव झाली डॉक्टर.

डॉक्टर, आपण वार्तापत्र विभागाच्या रौप्यवर्षानिमित्ताने एक दिमाखदार असे दोन दिवसीय ‘अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन’ सांगलीला घेतले. हे संमेलन म्हणजे संयोजनाचा उत्कृष्ट नमुना ठरले. संपादक प्रा. प. रा. आर्डे सर, राजीव देशपांडे, अ‍ॅड. मुक्ताताई दाभोलकर, उमेश सूर्यवंशी यांच्यासह राहुल थोरात, सुहास पवार आणि सुहास यरोडकर यांच्या मेहनतीने अधिवेशन अत्यंत यशस्वी झाले. भरउन्हात दोन हजार श्रोते या अधिवेशनाला उपस्थित होते. भाषातज्ज्ञ गणेश देवी, डॉ. आ. ह. साळुंखे आणि ‘हिंदू’चे माजी संपादक पी. साईनाथ अशी मान्यवर वक्ते मंडळी या संमेलनाला लाभली. संघटनेने याद्वारे साहित्याच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले, अशी आता कार्यकर्त्यांची भावना आहे. या निमित्ताने आपण वार्तापत्रातील प्रकाशित निवडक मजकुरांचे तीन खंड प्रसिद्ध करण्याचा संकल्प सोडलाय. वार्तापत्र विभाग त्यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहे. त्यातील पहिला खंड प्रकाशितही झाला. डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या सर्व लेखांचा संग्रह चार पुस्तकांत आठशे पानांत प्रकाशित झालाय. आम्हालाही आश्चर्य वाटतं डॉक्टर, तुम्ही एका बाजूला चळवळीसाठी प्रत्यक्ष फील्डवर सातत्याने असायचे, त्यातूनही वेळ काढून तुम्ही आठशे पानं केवळ वार्तापत्रासाठी लिहिली आहेत. आम्ही कार्यकर्त्यांनी खरंच याबाबत अधिक गंभीरतेने विचार करून कृती करण्याची गरज आहे. सातत्याने लिहायला हवं. तुमच्यानंतर त्याबाबत उणीव जाणवते. डॉक्टर, सध्या डॉ. हमीद दाभोलकर लिहीत असतात अधूनमधून तरीही अजून खूप करता येण्यासारखं आहे, याबाबत आता दुसर्‍या फळीच्या कार्यकर्त्यांनी लिहायला हवं. आमच्यात ही चर्चा होत असते डॉक्टर; पण आता त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे.

आणखी एक घटना प्रथमच तुमच्याशिवाय घडलीय डॉक्टर संघटनेत. आपल्या संघटनेची राज्य कार्यकारिणी निवड झाली. ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या अगदी टोकाला म्हणजे शहादा, जि. नंदूरबार येथे झाली. तेव्हा महाराष्ट्रात पारा पार उंच म्हणजे शहाद्याचे तापमान 43 अंश सेल्सिअस. त्याच्या काहीच दिवस आधी सांगलीचे साहित्य संमेलन मोठ्या उपस्थितीत पार पडलेले. म्हणून उपस्थितीबाबत मनात शंका होती. डॉक्टर, या शंकांवर संघटनेने मात केली.

31 जिल्ह्यांतून दोनशेच्यावर प्रतिनिधी राज्य बैठकीला हजर होते. आपल्या संघटनेच्या इतिहासात एवढे प्रतिनिधी प्रथमच हजर होते. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील प्रतिनिधी गजेंद्र सुरकार यांच्यासह हजर होते. आता राज्य कार्यकारिणी निवडीबद्दल सांगतो तुम्हाला. एखाद्या राज्यव्यापी संघटनेच्या निवडणुका म्हणजे काय असतात, याची सर्वांनाच माहिती आहे. तोडा-फोडा, लॉबिंग, गटबाजी, जातीय समीकरणे, संघटनाबाह्य शक्तींचा हस्तक्षेप, वादावादी, हेवेदावे, भांडणे यांची लागण आपल्या संघटनेला तुम्ही कधीही होऊ दिली नाही. डॉक्टर, याहीवेळी संघटनेने ही परंपरा अगदी सहजपणे जपली. निवडणूक प्रक्रिया आपल्या ठरलेल्या लोकशाही पद्धतीने पार पाडली. लोकांनी स्वेच्छापत्रं भरली. काहींनी नावे सुचविली आणि प्रा. प. रा. आर्डे, कुमार मंडपे आणि शालिनीताई ओक यांच्या सहमतीने राज्य निवड घोषित केली. तरुण आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा संगम या कार्यकारिणीत झालाय. अविनाशभाई पाटील यांच्यावर पुन्हा सर्वांनी नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तुमच्यानंतर त्यांनीही स्वत:ला पणाला लावले. संघटनेसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे सारखी फिरफिर केली, करताहेत. आता सातत्याने परराज्यातही संपर्क करीत आहेत. तेथे आपल्याला प्रचंड मागणी असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आपण मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन देशभर या कामाचा विस्तार करू शकतो का, याची सध्या ते चाचपणी करीत आहेत आणि त्यात आपल्याला खूप संधी आहे, असा त्यांचा अनुभव आहे.

मला यावेळी तुमच्या वार्तापत्रात लिहिलेल्या एका लेखाची आठवण होतेय. त्या लेखाचं शीर्षक होतं, ‘मी कार्याध्यक्षपद सोडले.’ त्यात तुम्ही सर्वोदयी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा दाखला देत म्हटलेय की, संघटनेतील पदासाठी वखवखलेल्या माणसांचा हा जमाना आहे. आपल्या संघटनेत सत्ता, पैसा नाही. त्यामुळे त्या अर्थाने पदाचा फायदा काय; पण तरीही संघटनेला आता प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. (तुम्ही गेल्यानंतर त्यात प्रचंड वाढ झालीय.) संघटनेच्या पदामुळे मान्यता प्राप्त होते. स्वाभाविकच ते पद गेल्यावर ती मान्यता कमी होण्याची भीती मनात डोकावते. आज आपल्या संघटनेला याची बाधा नाही; पण आजूबाजूचे वातावरण फार प्रदूषित आहे, धोका होऊ शकतो. याविरोधात प्रभावी प्रतिबंधक लस म्हणजे संघटनेतील पद ही जाणारी बाब आहे, ही गोष्ट सर्वांनी सदैव ध्यानात ठेवायची. डॉक्टर, हे मूल्य रुजलेय. आपल्या संघटनेत अतिशय सहभागी आणि सहमतीच्या वातावरणात आपली निवडप्रक्रिया पार पडली आणि सर्व पदाधिकारी कामालाही लागलेत. आताच पुण्यात आपण त्या सर्वांची एक नियोजन बैठक घेतली आणि प्रत्येक राज्य पदाधिकार्‍याने ते येत्या चार महिन्यांत वर्षभरात आणि तीन वर्षांत कोणत्या दिशेने काम करतील, याचे नियोजन केले.

डॉक्टर, आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट महाराष्ट्रात घडली. शनी शिंगणापूरचा चौथरा महिलांसाठी खुला झाला. आजही ते शनी शिंगणापूरचं आंदोलन आठवतं. तुम्हाला मारण्याच्या धमक्या, अंगावर काळी शाई टाकण्याचा प्रयत्न, केलेला प्रचंड विरोध; पण न्यायालयानं एका खटल्याचा निकाल देत, शनिदेवाचा बंदी असलेला चौथरा महिलांसाठी खुला करण्याचे निर्देश दिले आणि ट्रस्टींनी अखेर ते मान्य केले. तुम्ही एका भाषणात गमतीनं डॉ. राम मनोहर लोहियांचं ते प्रसिद्ध वाक्य म्हटलं होतं, ‘लोग मेरी बात मानेंगे जरूर, लेकीन मेरे मरने के बाद।’ घडलंही तसंच डॉक्टर. स्त्रियांना घटनेने दिलेला समानतेचा अधिकार त्यांना उशिराने का होईना मिळाला. तसाच हक्क मुस्लिम महिलांनाही मशिदीत प्रवेशासाठी मिळावा, अशी आपली भूमिका आहे.

बाकी आपलं नियमितपणानं होणारे उपक्रम, संघर्ष ही सुरूच आहे. डॉक्टर, वसईच्या ‘मार्टिनबाबाचा भांडाफोड’ करीत त्यावर गुन्हा दाखल केला. बुवाबाजीची भांडाफोड प्रकरणे सातत्याने सुरूच आहेत. आपल्या मुंबईच्या टीमने नंदकिशोर तळाशीलकरांच्या मार्गदर्शनाने सचिन थिटे या तरुणासह सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी वसईच्या मार्टीन बाबावर गुन्हा दाखल केलाय. जातपंचायतीची प्रकरणं, ‘मिडब्रेन’च्या विरोधात प्रबोधन, स्त्री-पुरुष समता यात्रा, रिंगणनाट्य पर्व दोन, डिजिटल तारांगण, युवा परिषदा, कार्यकर्त्यांची प्रशिक्षण शिबिरे, जोडीदाराची विवेकी निवडीच्या संवाद सभा आणि खुनाचा तपास लागावा म्हणून अजिबात निराश न होता सातत्याने आंदोलन करणं, हे सारं काही सातत्याने सुरू आहे.

माध्यमांनीही आम्हाला खूप मदत केली. डॉक्टर, तुम्हाला प्रिंट; तसेच इलेक्ट्रॉनिक या दोन्ही माध्यमांचं महत्त्व होतं. तुम्ही फार खुबीने त्यांचा उपयोग आपल्या चळवळीसाठी केला. या दोन्ही प्रकारच्या माध्यमांनी संघटनेला नेहमीच सन्मान्य जागा दिली, दखल घेतली. गेली सव्वीस वर्षे सातत्याने घेत आहेत. त्या सर्व मित्रांचे खूप-खूप आभार.

संघटनेबद्दल केवळ सहानुभूती नाही डॉक्टर, तर आपण निर्धाराने उभे राहिल्याबाबत एक सन्मानाची भावना आम्ही समाजात फार मोठ्या प्रमाणावर अनुभवत आहोत आणि ही भावना केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभर आहे. डॉक्टर, याबाबत मी बाहेरच्या राज्यातील काही अनुभव ‘शेअर’ करतो तुमच्याशी. गेल्या वर्षी वार्तापत्र विभागाने वार्षिक अंकासाठी डाकीण प्रश्नांवर ‘कव्हरस्टोरी’ करायचे ठरवले. त्यासाठी मी राहुल थोरातबरोबर आसामच्या आदिवासी भागाचा पाच दिवसांचा ‘आसाम दौरा’ केला. तेथे हा प्रश्न भयानक आहे. तेथे आम्ही आसामच्या अगदी टोकावर मेघालय सीमेवर एका मुलाखतीसाठी गेलो. देशाच्या एका टोकाच्या राज्याच्या पुन्हा टोकाच्या गावी आदिवासी भागातील जंगलात वसलेल्या छोट्याशा गावात होतो. तेव्हा तेथे एक डॉक्टर आला. मध्यमवयीन, साधारणपणे चाळिशीचा असावा. आम्ही ‘अंनिस’वाले समजल्यावर आमच्याजवळ येऊन मोठ्या आदराने “अंनिस मला माहितीय, यू आर द पायोनिअर ऑफ धीस वर्क” तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातले देशातले पितामह आहात. डॉक्टर, हे ऐकून मी आणि राहुल आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. परराज्यात पाहिलेला आपल्याप्रतीचा हा सन्मान तुमची आठवण करून गेला.

दुसरं एक उदाहरण देतो डॉक्टर, हेही असंच इंटरेस्टिंग आहे. कर्नाटकातल्या बंगलोरमधील एका संस्थेने गेल्या वर्षी संघटनेला एका प्रशिक्षणाचे ई-मेलने निमंत्रण दिले. त्याची फी सांगितली 25 हजार रुपये. अविनाशभाईंनी त्यांना एवढी रक्कम भरणे संघटनेला शक्य नाही म्हणून निमंत्रण नाकारले. त्यांनी परत कळविले, “तुमच्यासाठी पैशांची कोणतीही सक्ती नाही; पण तुम्ही प्रशिक्षणासाठी दोन कार्यकर्ते पाठवा. भाईंनी मला व सुशीलाताईंना पाठविले. संघटनेने केवळ पाच-पाच हजार रुपये फीचे भरले. आम्हाला शंका होती डॉक्टर की, आपण पुरेसे पैसे दिले नाहीत; मग आपल्याला कशी वागणूक मिळेल? डॉक्टर, तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आम्हाला तिथे जास्त सन्मानानं वागवलं गेलं. आम्ही महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते आहोत, आमच्या सहभागाने त्यांनाच खूप भरून पावल्याची भावना होती. तेथील प्रमुख श्री. अशोक म्हणून होते. ‘क्रिटिकल थिंकिंग’वर उत्तम प्रशिक्षण देणार्‍या जगातल्या निवडक माणसांपैकी हा माणूस होता. जगभर फिरणार. कितीतरी वर्षे अमेरिकेत राहिलेला. त्याने त्याचा 20 ऑगस्ट 2013 चा अनुभव ‘शेअर’ केला आमच्याशी. तो म्हणाला, बातमी टीव्हीवर बघून मी सुन्न झालो. माझा सर्व स्टाफ त्यादिवशी बसूनच होता. कोणीही जेवलं नाही त्या दिवशी. मी जगभर फिरतो; पण शेजारी महाराष्ट्रात येऊन डॉक्टरांना भेटू शकलो नाही. तुम्ही इतकं चांगलं, मोलाचं काम करता, तुमच्यासाठी काहीही करू शकलो नाही. या अपराधी भावनेची बोचणी सतत मनाला असते. तुम्ही येथे आलात, सहभागी झालात ना, माझं मन हलकं झालंय. डॉक्टर, तुम्हाला आयुष्यात कधीही न भेटलेला माणूस हे सारं बोलत होता. आपलं काम तेथेही पोचलंय. असे अनेक अनुभव आपल्या सार्‍याच कार्यकर्त्यांचे आहेत. अगदी छोटे-छोटे अनुभवही आपल्याबद्दल समाजात असलेला भाव समजून घ्यायला पुरेसे असतात. कोणी कार्यक्रमासाठी हॉलचं भाडं घेत नाही, तर कोणी साधा रिक्षावाला अंनिस कार्यकर्ते असल्याचं समजलं की, प्रवासाचं भाडं घेत नाही, असे असंख्य अनुभव आहेत डॉक्टर, आज आपल्याबद्दलचा सन्मान वाढलाय. स्वीकृती वाढलीय. फार मोठ्या संख्येने तरुणांना संघटनेच्या कामात सहभागी केले आहे. अनेक पुरोगामी संघटनांच्या कार्यक्रमांना ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांची उपस्थिती हवी आहे. समविचार मित्रांच्या विविध आंदोलनात ‘अंनिस’चा सहभाग हवाय. ही प्रचंड अनुकुलता ‘कॅश’ करायला मात्र अजूनही आम्ही पुरे पडत नाही, याची नम्र जाणीव आहे डॉक्टर. कार्यकर्त्यांनी आपल्या प्रयत्नात कोणतीही कसर ठेवली नाही; पण भविष्यात अधिक व्यावसायिक पद्धतीने काम करावे लागणार, याची जाणीव झालीय. संघटनेचा पोत कायम ठेवत, हे घडवावं लागेल.

पोरा-बाळांनी भरलेल्या कुटुंबातील माणूस गेल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. हे आम्ही चित्रपटात पाहिलंय, समाजात कधी-कधी असं घडतंही ते बघितलंय. काही कथांमध्येही वाचलंय; पण डॉक्टर, तुमच्या जाण्यानं आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवलंय आम्ही थोडे अस्थिर झालो डॉक्टर, उगीच नाही म्हणणार नाही मी, पण सावरलो लगेच. या कामाचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि दीर्घकाळ चालणारी लढाई आहे, याची खोल जाणीव चळवळीला आहे. आपले राग-लोभ, महत्त्वाकांक्षा, आग्रह त्यागलेले कार्यकर्ते अनुभवले आम्ही या तीन वर्षांत. ‘ठीक आहे, हरकत नाही’ म्हणत आनंदाने हातात हात घेत पुढे चालणारे कार्यकर्ते पाहिले आम्ही. ताणाच्या प्रसंगी वेळेवर, याचं कधीतरी उत्तर मिळेल म्हणत तो ताण बाजूला सारून कामाला लागलेले कार्यकर्तेही बघितले आम्ही. पण कार्यकर्त्यांनी संघटनेचं हित सर्वोच्च मानलं. सामूहिक नेतृत्वाची प्रक्रिया सध्या संघटनेत राबविली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या आवडीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संघटनेच्या गरजेप्रमाणे कामाची जबाबदारी घेणं, अशी एक कार्यपद्धती संघटनेत विकसित होत आहे. आत्मस्तुतीचा धोका पत्करत सांगतो डॉक्टर, संपूर्ण महाराष्ट्रभर क्रियाशील आणि संपर्क मिळून 310 शाखांची ही संघटना लोकशाही पद्धतीने सातत्याने वृद्धिंगत होत आहे. अंतर्गत बांधणी मजबूत आहे. निर्धार पक्का आहे. मर्यादांचीही जाणीव आहे. त्या भरून काढण्यासाठी काही दीर्घ पल्ल्याच्या उपाययोजनांची तयारी चाललीय. अंधश्रद्धांनी मुक्त समाज कदाचित आम्हा कोणाला प्रत्यक्ष बघता येणार नाही; पण तुम्हीच सांगितल्याप्रमाणे अनेक शतकांच्या या लढाईसाठी अनेक शतके कार्यकर्ते निर्धाराने उभे राहिले. अगदी कणखरपणे, ‘आम्ही सारे दाभोलकर’ म्हणताहेत.

तयार आहोत डॉक्टर आम्ही, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नवनिर्माणासाठीही.

आपल्या अनेक कार्यकर्त्यांपैकी एक

विनायक