Categories
कार्याध्यक्षांची डायरी व्यक्तिविशेष

डॉ.दाभोलकरांनंतर चळवळीचा आधार: एन. डी. सर

जुलै - २०१८

बाप माणूस’

भाई एन. डी. पाटील सरांबद्दल कृतज्ञता किती अन् कशा व्यक्त करायच्या, हा प्रश्न आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्म्य कर्तृत्वच तसे राहिले आहे. मी त्यांना तीन दशकांपासून सतत कार्यरत राहिलेले पाहतो आहे. सर्वमान्य, निष्कलंक, अभ्यासू व चिंतनशिल राहून सातत्याने कार्यरत राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून एन. डी. सर आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीतून स्वत:ला कष्टाने घडवून आपल्या चिकित्सक स्वभावातून निर्माण झालेली बंडखोरी व अन्यायाविरुध्दची चीड त्यांना ‘एक लढाऊ नेता’ म्हणून घडवायला कारणीभूत ठरली असावी. त्यामध्ये त्यांच्या मजबूत बांध्याच्या शरीरयष्टीने ‘भारदस्तपणा’ची भर टाकली आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव नेमके संदर्भासह मुद्देसह बोलण्याबरोबरच दिसण्यातून देखील पडत असणारच. त्याबरोबरच सर्वांत महत्त्वाचे त्यांचे योगदान राहील ते महाराष्ट्रातील ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला-युवा, भटका-विमुक्त, दलित-मागासवर्गीय यासारख्या पिछड्या राहिलेल्या वर्गाच्या जगण्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीतील लढाईतील सक्रिय सहभाग, त्यासाठी त्यांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कार्यरत राहण्याचे नेतृत्वाचे कौशल्य दाखविलेले आहे. त्यासाठी चिकाटीने कार्यरत राहताना कुठल्याही कारणाने न थकता, निराश न होता कार्यप्रवण राहण्याची हातोटी त्यांनी मिळविलेली आहे. व्ययपरत्वे आणि दुसर्‍या बाजूला डाव्या-पुरोगामी पक्ष संघटनांची ताकद कमी झाल्यामुळे त्यांना मर्यादा नक्कीच आल्या आहेत; पण त्यामुळे प्रश्न सोडविण्यासाठी लढण्याची आणि त्यासाठी जगण्याची उमेद काही ओसरलेली नाही. आजही ते अनेक पक्ष संघटना, संस्था व प्रासंगिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे पालक, मार्गदर्शक, सहकारी आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे व्यवस्था परिवर्तनासाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना फार मोठा आधार मिळतो. त्या अर्थाने ते महाराष्ट्रातील पुरोगामी, परिवर्तनावादी चळवळीचा ‘बाप माणूस’ आहेत, असे म्हणता येईल.

विचारांशी सुंसगत जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्‍या एन. डी. पाटील सरांचा आपल्याला अभिमान आहे; तसेच त्यांचा विचार-कर्म्य वारसा आम्हाला समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे; परंतु एवढेच पुरेसे नाही. म्हणून त्यांच्याप्रती नम्रतापूर्वक ‘कृतज्ञता’ व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे, असे आम्ही समजतो. कारण कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती ही आपल्या मानवी संबंधांना अधिकाधिक उन्नत व प्रगल्भ करणारी असते, असे आमचे मत आहे.त्यासाठीच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संस्थापक-अध्यक्ष ज्येष्ठ नेते ‘भाई एन. डी. पाटील कृतज्ञता सोहळा’ 15 जुलै 2018 रोजी राजर्षी शाहू महाराज स्मारक सभागृह, कोल्हापूर येथे आयोजित केला आहे. आपण त्यामध्ये सहर्ष निमंत्रित आहात.

आपला स्नेहांकित,

अविनाश पाटील,

राज्य कार्याध्यक्ष, महा. अं.नि.स.