‘दि. 7, 8, 9 ऑगस्ट 2015 रोजीच्या ‘विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद’ आणि अंनिसच्या रौप्यपूर्ती महोत्सवानिमित्त सोहळ्यानिमित्त हजर असणार्या पंजाब तर्कशील सोसायटीचे कार्यकर्तेपदाधिकारी मा. हरचंद भिंधेर आणि राजकुमार यांची अंनिवाच्या वाचकांसाठी ही खास मुलाखत.
प्रश्न : पंजाब तर्कशील सोसायटीची सुरवात कशी झाली?
उत्तर : साधारण सन 1984 चा काळ होता. महान विवेकवादी डॉ. अब्राहम कोवूर यांचे इंग्रजी पुस्तक ‘Begone Godmen’ चे भाषांतर पंजाबमधील विवेकवाद्यांनी केले. त्याचे नाव होते ‘और देवपुरूष हार गये’ या पुस्तकानंतर लोकांत खळबळ उडाली. अनेकजण विचारू लागले की, भूतबाधा, करणी, भानामती इ. चमत्कारीक गोष्टी आम्ही स्वत: डोळ्याने बघतो, अनुभवतो मग ते खोटं असं तुम्ही कसं म्हणू शकता? यावेळी काही भानामती घडणार्या ठिकाणी जसे घरावर दगडे पडणे, कपडे आपोआप पेटणे इ.च्या बाबतीत आम्हाला आव्हान देण्यात आले. ते आम्ही स्वीकारले. आणि खर्या अर्थाने ‘पंजाब तर्कशील सोसायटी’ची सुरवात झाली.
प्रश्न : आपल्या सुरवातीचा जो काळ आपण सांगितला तो खलिस्तान या दहशतवादी चळवळीचा होता. पंजाब अशांत होता. त्याचा परिणाम आपल्या चळवळीवर काय झाला?
उत्तर : तुमचे म्हणणे खरे आहे. अशांततेच्या काळात तर्कनिष्ठ विचारसरणी जोर धरेलच याची शाश्वती नसते पण लोकांना शांतता आणि बदल हवा असतो हेदेखील खरे आहे. म्हणूनच कदाचित आमची चळवळ जोम धरू लागली.
प्रश्न : आपल्या संघटनेची बांधणी कशी आहे आणि आपले उपक्रम कसे चालतात?
उत्तर : आमच्या संघटनेचं पूर्वी फक्त पाचच पदाधिकारी असत. परंतु महाराष्ट्र अंनिसचे इचलकरंजीचे अधिवेशन आम्हाला डॉ.दाभोलकरांच्यामुळे जवळून बघता आले. आणि त्यामुळेच आम्ही म.अं.नि.स.सारखीच तर्कनिष्ठ सोसायटीची रचना बनवली. आता आमची प्रत्येक जिल्हा, तालुका कार्यकारणीदेखील आहे. आमच्या साधारण 80 अधिक शाखा आहे. यामध्ये 1000 अधिक कार्यकर्ते आहेत. उपक्रमामध्ये साधारण भांडाफोड आणि प्रबोधन चालते. महत्वाचे म्हणजे डॉ.दाभोलकर आणि अंनिसच्या संपर्काचा आम्हाला सोसायटी काढण्यासाठी खूपच उपयोग झालेला आहे. त्याचे महत्वाचे एक उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. अंनिसच्या पुणे परिषदेमध्ये विज्ञानबोध वाहिनी या उपक्रमाचा आम्हाला परिचय झाला आणि तो आम्हाला खुपच भावला. आम्ही याबाबत विचारविनिमय करून मुख्यत: कार्यकर्त्यांनी पैसे जमा करून एक सुसज्ज व्हॅन विकत घेतली आणि आश्चर्य म्हणजे मागील वर्षी या व्हॅनमधील पुस्तकांची विक्री एकाच वर्षात रू.20 लाखांची झाली. याचे मोठे श्रेय डॉ.दाभोलकरांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला आहे. इतर उपक्रमामध्ये आम्ही एक टी.व्ही.सिरीयल ‘तर्क की कसोटी पर’ चालवलेली आहे. चमत्कार, नाटक मंडळी, विचारगोष्टी, प्रबोधन कार्यशाळा इ. उपक्रम चालतात. 50 मानसिक आरोग्यकेंद्रातून आतापर्यंत 50,000 लोकांवर उपचार झालेले आहेत.
प्रश्न : आपण आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण कसं करता? कार्यकर्त्यांसाठीच्या काय अटी आहेत का?
उत्तर : सोसायटीमध्ये दोन पातळीवर कार्यकर्ता होता येते. पहिल्या पातळीवर सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश होतो. परंतु यासाठी त्याला सोसायटीच्या सात अटींचे पालन करण्याची प्रतिज्ञा करावी लागते. यामध्ये तर्कशील सोसायटी ही पुरोगामी चळवळ असल्याचे मान्य करणे दैनंदिन जीवनामध्ये नीतीमूल्यांचे पालन करणे. बुवाबाबांना विरोध करणे. सोसायटीचा वापर वैयक्तिक किंवा राजकीय कारणासाठी न करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करणे इ.अटी असतात. यानंतर ज्याला सोसायटीचा पक्का सभासद होण्याची इच्छा आहे. त्याने मात्र मी कोणत्याही धर्म-जात-आत्मा-परमात्म्याला मानत नसल्याचे व नास्तिक असल्याचे कबूल करावे लागते. त्यानंतरच तो पक्का सभासद होतो. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचे साधारण 1000 सभासद हे पक्के सभासद हे पूर्णत: नास्तिक मताचे आहेत.
प्रश्न : मला आपल्या पक्का सभासद अटींवरूनच आपणास विचारायचे आहे की, या नास्तिक मतामुळे आपणास समाजात काम करताना अडचण येत नाही का?
उत्तर : नाही. आम्हाला हे मत प्रचारात आणणेसाठी सगळ्यात मोठा फायदा होतो तो म्हणजे शहीद भगतसिंग यांच्या मताचा आणि त्यांच्या ‘मी नास्तिक आहे का?’ या पुस्तकाचा. स्वातंत्र्य काळातील सरदार भगतसिंग आणि क्रांतीकारी गदर पार्टी विचाराचा प्रभाव आजदेखील पंजाबवर आहे.
प्रश्न : महाराष्ट्रात आम्ही नेहमी म्हणतो की, महाराष्ट्र हा संत–समाजसुधारकांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. याबद्दल आपणास काय वाटते आणि पंजाबमध्ये कोणत्या पुरोगामी धारा आहेत.
उत्तर : मला यावेळी कॉ.पानसरे यांचे वाक्य आठवते की, महाराष्ट्र हा पुरोगामी राहिलेला नाही, तो पुरोगामी करावा लागेल महाराष्ट्र पुरोगामी असेल तर कॉ.पानसरे आणि डॉ.दाभोलकरांना एवढ्या निर्घृणपणे संपवण्यात आले नसते म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचे ठरविले पाहिजे की, आपण कोणत्या बाजूचे आहोत विवेकवाद्याच्या की धर्मांधतेच्या. आता पंजाबबाबत बोलायचे झाल्यास जो विरोध पुरोगामी विचारधारेस महाराष्ट्रात होत आहे तसा विरोध पंजाबमध्ये खचितच होतो. पंजाबात गुरूनानकसिंग, गुरू गोविंदसिंग, भगतसिंग इ.धर्मसंस्थापक, क्रांतीकारी परंपरा बोटांवर मोजण्याइतक्याच आहेत. पण मला वाटते पंजाबच्या जनतेने पुरोगामी प्रबोधन कमी होऊनदेखील जास्त पुरोगामीपण स्वीकारलेले दिसते याउलट महाराष्ट्रात दिसत आहे.
प्रश्न : आपले कार्यकर्ते वैयक्तिक आयुष्यात कर्मकांडाबाबत कसा निर्णय घेतात?
उत्तर : बहुतांशी कार्यकर्तेजन्म, मृत्यू वा इतर कोणत्याही प्रसंगी कर्मकांड पूर्णपणे टाळतात. कुटुंबाच्या अतिआग्रहामुळे काही कार्यकर्तेपरवानगी देतात. परंतु यामध्ये स्वत: सामील न होण्याच्या अटींवर. जवळजवळ सर्वच कार्यकर्त्यांची देहदान इच्छापत्र केलेले आहे. आमचे तर्कशील सोसायटीचे पहिले अध्यक्ष हे पोलीस खात्यात होते आणि त्यांनी 20 वर्षांपूर्वीच आपल्या मृत्यूनंतर देहदान केेले.
प्रश्न : शेवटी प्रश्न डॉ.नरेंद्र दाभोलकरांबाबत आपणास काय वाटते?
उत्तर : डॉ.दाभोलकर हे आमच्या सोसायटीचे मार्गदर्शक प्रेरणास्थान होते त्यांच्या खुनानंतर आम्ही जालिंधरमध्ये प्रोटेस्ट मार्च काढला. त्यांच्या नावाचे/कार्याचे कॅलेंडर काढले आहे आणि महाराष्ट्रातला जादूटोणा विरोधी कायद्यासारखा कायदा पंजाबमध्ये लागू करण्यात यावा अशी मागणी सोसायटीतर्फे आम्ही केलेली आहे.
डॉ.दाभोलकर लोहियांचे वाक्य नेहमी म्हणायचे, ‘लोग मेरी बात मानेंगे जरूर-मगर मेरे मरने के बाद। त्यांची किंमत त्यांच्यानंतर कळत आहे.
तसेच कष्टकर्यांचा नेता ज्येष्ठ प्रबोधनकार आणि भगतसिंगचा वैचारिक वारस कॉ.गोविंद पानसरे यांचा फारसा संपर्क जरी आमचा नव्हता तरी ते आम्हाला खूपच जवळचे वाटत होते त्यांच्या निर्घृण खुनानंतर देखील आम्ही प्रोटेस्ट मार्च काढून निषेध केला.
डॉ.नरेंद्र दाभोलकरांविषयी तर्कशील सोसायटीची एकच भावना आहे की, हा आधुनिक भारतीय विवेकवादासाठीचा पहिला शहीद आहे.
प्रश्न : सध्या देशात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. पंजाबमध्ये भाजपा आणि अकाली दल युती आहे. यामुळे सोसायटीच्या कामात काय अडचणी येतील?
उत्तर : अडचणी वाढत आहेत हे नक्की. पण अडचणींत जेवढी चिकाटी आपण दाखवतो तेवढी अनुकुलता निर्माण होते. लोकांचा लवकरच भ्रमनिरास होणार आहे. मार्क्सवाद्यांनी नेहमीच मदत केलेली आहे. त्यांच्या मदतीनेच हा अडथळा दूर करू.
डॉ.दाभोलकर आणि कॉ.पानसरे को लाल सलाम. धन्यवाद.