अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकार्यांनी नारायणगाव या तमाशापंढरीतील प्रसिद्ध तमाशासम्राज्ञी मालती इनामदार यांच्या केसामधील ‘जट’ कात्रीने कापून काढून अंधश्रद्धेच्या रुपात ग्रामीण भागात प्रचलित असणारा देवीचा प्रकार हा समज दूर केला. अंधश्रद्धेमुळे गेली 22 वर्षे त्या ही दोन किलोची जट सांभाळत होत्या. ग्रामीण भागातील महिलांच्या केसांमध्ये ‘जट’ निघणे हा देवीचा प्रकार असून ‘जट’ महिलांच्या केसात आढळून आल्यास हे देवीचे रूप समजून त्याची हळद-कुंकवाने पूजा केली जाते. काही भागांत तर अशा महिलांच्या अंगात ‘देवीचे वारे’ येते, अशीही अंधश्रद्धा प्रचलित आहे. अशी ‘जट’ काढली जात नाही, काढल्यास मोठी संकटे येतात, असा गैरसमज आहे व ती ‘जट’ काढायची झाल्यास धार्मिक विधी करावा लागतो. त्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो व हा विधी न केल्यास अनेक संकटे येतात, अशी अंधश्रद्धा रूढ करून अनेक भोंदू बाबांनी ग्रामीण भागात भरमसाठ पैसे कमविले आहेत व या प्रकाराला महिलावर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे.
असाच प्रकार तमाशासम्राज्ञी मालती इनामदार यांच्याबाबत घडला. काही वर्षांपूर्वी त्यांच्या केसात ‘जट’ आली. देवीचा प्रकार समजून त्याही त्यास बळी पडल्या. गेल्या 22 वर्षांपासून त्या या जटेला सांभाळत होत्या. त्या जटेची लांबी किमान चार फुटांपर्यंत असून, त्याचे वजन साधारणत: दीड ते दोन किलोपर्यंत आहे. एवढी वजनदार जट सांभाळत त्या 22 वर्षे पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागात तमाशाची कला जिवंत ठेवत होत्या. त्या वेळी त्यांना ही जट सांभाळताना डोकेदुखीसारख्या आजाराला सामोरे जावे लागत होते; मात्र काही अनिष्ट प्रकार घडू नये म्हणून त्या हा त्रास सहन करत होत्या. त्यांचा हा त्रास मोहित इनामदार, विशाल इनामदार व राजेश सावंत पाहत होते. मोहित याने, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘जट’ प्रकार स्वत: काढून या अनिष्ट रुढींना पायबंद घालत आहे, असे वर्तमानपत्रात वाचले व त्या लोकांना मालतीताई यांच्या त्रासाची माहिती दिली.
रविवार, दि. 2 सप्टेंबरला अंनिसच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, जिल्हा महिला संघटक साधना बाजारे, जिल्हा सचिव मनोहर शेवकरी यांनी मालती इनामदार यांच्या नारायणगाव या राहत्या घरी भेट दिली व जटाबाबत त्यांची असणारी अंधश्रद्धा दूर करून त्यांच्या केसांमधील जट काढून त्यांची या त्रासातून मुक्तता केली. मालती इनामदार यांनी त्यांच्या केसांमधील जट काढल्यानंतर त्यांची त्रासातून मुक्तता झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला, तर त्यांचे भाऊ विजय सावंत व सून रुपाली इनामदार, विशाल इनामदार, मोहित इनामदार, सुरेश सावंत यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांनी ग्रामीण भागातील महिला वर्गाला आदर्श निर्माण करून दिल्याबद्दल कौतुक केले.
जट असल्यास घाबरू नका, संपर्क साधा
या वेळी नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील मालती इनामदार यांची 71 वी जट काढल्याचे सांगताना ग्रामीण भागात ज्या कोणी महिला केसामधील जट हा देवीचा प्रकार समजून भय घेऊन जगत आहेत, त्यांनी 9422305929 या क्रमांकावर संपर्क साधून आपली अंधश्रद्धा दूर करावी, असे आवाहन केले आहे.